ह्याच्या सध्याच्या जगण्याबद्दल किंवा जगण्याच्या नावाखाली किंवा जगणं चालू रहावं, यासाठी हा जो काही करतोय, त्याबद्दल बोलताना ह्याला अवघडल्यासारखं होतं.
अर्थात त्यात स्वत:ची शरम वाटावी असं काही नाही. पण मन लावून बोलण्यासारखंही काही नाही, असं ह्याला वाटतं.
पण 'असं काय आहे' की जे करता करता किमान स्वत:शी तरी मनापासून बोलता येईल, हे काही त्याला माहित नाही.
आणि मुळात 'असा' काही प्रकार असतो का, याबद्दलही ह्याला अलीकडे संशय यायला लागला आहे.
तर बदलांकडे बघण्याची ह्याची पूर्वीची स्वच्छ नजर आताशा गढूळलीय.
पूर्वी स्पंजने पाणी शोषावं तसे बदल ह्याच्यात आपसूक झिरपायचे आरपार.
हल्ली एक बदल नीट झिरपेपर्यंत पुढचे बदल लाईन लावून बोकांडी बसायला तयारच असलेले, ह्याला दिसतात.
'टिकून रहायचं असेल' तर हे अमुक नवीन बदल ताबडतोब आत्मसात करणं आवश्यक आहे, अशी एक भीती किंवा गाजर प्रत्येक वेळी ह्याला दाखवण्यात आलंय.
एखाद्या स्वर्गीय आणि उदात्त कारणासाठी असेल, तर तेही ठीक..
पण नुसतं टिकून राहण्यासाठी म्हणजे काही खऱ्याचं नाही.
आणि कुठपर्यंत नुसतं टिकूनच रहायचं ?
आणि कुठं निघालेत हे सगळे टिकत टिकत??
अशी चरफड एखाद्या पेगसोबत..
कदाचित वापरून वापरून, झीज होऊन, ह्याचा स्पंज राठ होत चालल्यामुळे अलीकडे 'चाललंय ते अनंत काळ असंच चालू रहावं'
अशी ह्याची निवांत रवंथ करत बसलेल्या बैलासारखी मनोकायिक अवस्था...
'इथं काहीच स्थिर नाही. सगळं विश्र्व क्षणाक्षणाला बदलतंय'
वगैरे चमको वाक्यांनी ह्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाही आता.
जसे बरेच जण कुठल्या ना कुठल्या फेजमध्ये सेल्फ हेल्प बुक्स, काऊन्सेलर्स किंवा यू-ट्यूबवर पैशाला पासरी उपलब्ध असणाऱ्या, सो कॉल्ड मोटीवेशनल स्पीकर्सच्या तावडीत सापडतात, तसा हा पण गेलाय त्या मांडवाखालून कधीतरी.
ह्याच्यासारखे लोक म्हणजे त्या मोटीवेशनल सभा टाकणाऱ्यांसाठी कच्चा माल..!
पण ते ही एका अर्थानं ठीकच म्हणायचं.
ह्याच्यासारखे लोक नसते तर त्या कोडग्या आत्मविश्वासानं लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, लाईफ लेसन्स देणाऱ्या विद्वानांना त्यांचा स्वत:चा असा 'अंडरलाईंग कॉज' कसा काय सापडणार होता...!
पण आताशा ह्याला तो शेणसडा, यू-ट्युबवर नुसता दिसला तरी मळमळल्यासारखं होतं.
स्पिरीच्युऍलिटीचं पण थोडंफार तसंच.
जे जिवंत नाहीत त्यांचं सोडून द्या.... ते काही ह्याचं फारसं बिघडवू शकत नाहीत.
पण ह्या जिवंत असलेल्या स्पिरीच्युअल मास्टर्स वगैरे लोकांचं पण काय खऱ्याचं नाही, असंही त्याला वाटायला लागलंय.
हा त्यातल्या बऱ्याच जणांना आयुष्यातला थोडा थोडा काळ फॉलो करून बसलेला आहे.
एकावरून दुसरा.. दुसरा आवडायचा बंद झाला म्हणून तिसरा..मग चौथा... मग सगळेच साईड बाय साईड.
'त्यांचं त्यांनाच नीट सुधारलेलं दिसत नाय... हे काय मला सांगणार..!' म्हणून सोडून दिलेले काहीजण.
'सोपं करून सांगतो' म्हणणारेही हळूहळू फाफलत गेले कुठंतरी शरीरमनबुद्धीआत्माकर्मविकारवासना वगैरे बुडबुड्यांच्या जंगलात... नंतर सापडलेच नाहीत.
काहीजण त्यांचं ते मायाळू आत्मज्ञानी वगैरे स्मित घेऊन राजकारण वगैरे करायला लागले डोळ्यांदेखत...!
पण 'काहीं'च्या बाबतीत मात्र अजूनही ह्याची
लव्ह-हेट रिलेशनशिप चालूच आहे.
पण मुळात ह्यालाच 'ते' फक्त अधूनमधून तोंडी लावण्यापुरतं हवं आहे.
त्यामुळं 'त्यांनी अनुभवलेला तीव्र विषादही नको आणि त्यांना सध्या जे काही होतंय ते ब्लिस किंवा एक्स्टसी किंवा माइंडफुलनेस किंवा कॅलॅमिटी किंवा फ्लॉवरींगही नको'
(म्हणजे आपोआप मिळालं तर ह्याला चालतंय ते!!)
पण तोपर्यंत 'माझं माझं जे काही चाललंय, ते तसंच चालू रहावं' अशी ह्याची अपेक्षा.