गं...!
कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'!
मागचे "सा रे" विसरायला लावणारा,
पुढलं "मा प" ओलांडू न देणारा,
"धा नी" रंगात मोहरवणारा,
पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू..
थोडासा सरळ, थोडासा वळणदार..
पण आतल्या गाठीचा मात्र बिलकुलच नाही.
कान्याला टेकून आपला ऐटीत उभा.
सुबक, कमनीय, गोजिरा अगदी!
आणि जेव्हा तो तुझ्या तोंडून ऐकते ना,
त्याचा लगाव, लहेजा आणि लगन...किती रे कातील!
तुझ्या ग च्या लडीवाळ चक्रव्यूहात मी कधी कशी ओढली जाते कळतच नाही..
गोल गोल गोल गोल, तिथंच फिरत रहाते मी.
आजुबाजुचे शब्द विरून जातात.
