सकाळी सकाळी
कभिन्न काळा
मेघ भरून आला
बरसून गेला
सकाळी सकाळी
चहाच्या कपावर
वाफेचा मनोरा
तरी थंड आहे
जरासा बुडाशी
किती गर्द वाटे
धुके दाटलेले
दिसते न काही
सकाळी सकाळी
जरी खोल जावे
मनाच्या तळाशी
तरी आठवांचा
न सुटे येरझारा
एकांत निष्ठुर
अश्या दूरदेशी
उभा खिडकीपाशी
सकाळी सकाळी
निष्पर्ण झाडे
स्तब्ध गोठलेली
जणू शोक करती
ती पाने गळाली
दिसले उभे दूर
कुणी पाठमोरे
का भास व्हावा
सकाळी सकाळी