कभिन्न काळा
मेघ भरून आला
बरसून गेला
सकाळी सकाळी
चहाच्या कपावर
वाफेचा मनोरा
तरी थंड आहे
जरासा बुडाशी
किती गर्द वाटे
धुके दाटलेले
दिसते न काही
सकाळी सकाळी
जरी खोल जावे
मनाच्या तळाशी
तरी आठवांचा
न सुटे येरझारा
एकांत निष्ठुर
अश्या दूरदेशी
उभा खिडकीपाशी
सकाळी सकाळी
निष्पर्ण झाडे
स्तब्ध गोठलेली
जणू शोक करती
ती पाने गळाली
दिसले उभे दूर
कुणी पाठमोरे
का भास व्हावा
सकाळी सकाळी
क्षणात डोळे
भरून यावे
कुणी आठवावे
पुन्हा ते नव्याने
प्रतिक्रिया
25 Jun 2020 - 1:19 pm | गणेशा
वाह.. काय सुंदर कविता.. खुप मस्त..
एकदा वाचल्यावर पुन्हा वाचून पाहावी असे वाटायला लावणारे शब्द.. मस्त
25 Jun 2020 - 1:23 pm | गणेशा
दुसऱ्यादा वाचताना हे लक्षात आले कि पाऊस असलेला काळ असताना निष्पर्ण झाडे हा उल्लेख का केला असावा? अनावधानाने की स्वतःचे एकाकी पण दाखवण्यास?
बहुतेक हे शब्द वरच्या कुठल्याच वातावरणा बरोबर मिळत जुळत नाही..
निष्पर्ण झाडे
स्तब्ध गोठलेली
जणू शोक करती
ती पाने गळाली
25 Jun 2020 - 2:26 pm | एस
हेच वाटलेले.
बाकी कविता छान आहे.
25 Jun 2020 - 3:16 pm | मनोज
धन्यवाद ! नॉर्थ अमेरिके मध्ये असता मॅपल झंडाची पाने गाळून गेल्यावर अचानक आलेला पाऊस आहे.
25 Jun 2020 - 3:25 pm | राघव
नुकताच एक फोटू पाह्यला होता त्यावरून मॅपलचंच झाड आठवलं ही रचना वाचतांना! सुंदर लिहिलंय. पुलेशु. :-)
26 Jun 2020 - 12:34 pm | रातराणी
वाह!