कुण्या देशिचा असेल वारा??
दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा,
धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा.
विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती?
वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा..
सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा,
थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा?
किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची?
रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा?