कातरवेळ
*कातरवेळा*
सांजरंग केशराचे पसरले आकाशात
पाखरांची लगबग परतण्या घरट्यात !
चिवचिवाट त्यांचा मधुर, सुखवि कानाला,
संधिकाल चा धुंद गारवा, मोहवि मनाला !!
मावळतीला रविबिंब, क्षितीजावरती झुकले,
लाल केशरी रंग नभाचे, लाटांवरी उमटले!
सागरा पल्याड बुडता, सुर्याचा तांबूस तो गोळा,
नीशा हळूच दाटताना, हुरहुर लावती कातरवेळा !!
हळुहळू अंधारताना, लाटाही मग होती धूसर,
निरवता तीरावरली, मनात झिरपे खोलवर !
तुझे भास दाटून येता, दिशा भोवती अंधारल्या,
कातरवेळी झाडांच्याही सावल्या बघ थरथरल्या !!
- वृंदा मोघे