गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Jun 2015 - 7:19 pm

मागिल भाग..
मग मि ही फार विरोध न करता , 'एकदा आणू हिला आणि पोरांना त्या महाराजाच्या मांडवाखालून . मी असल्यावर करणार काय तो लबाडी? अहो महाराज असला ,तरी आमच्याच शेजारच्या मांडवातला..सांगुन सांगुन सांगेल काय??'...असा विचार करुन हिच्या आणि मामा गोडश्याच्या सह जायला तयार झालो....
पुढे चालू...
=========================

मग ती अमावस्या आली .आणि ठरल्याप्रमाणे आम्ही महाराजाकडे जायला तयार झालो. मग पोरांना आज्जीबाईंकडे सोपवून,अगदी सकाळी आठाला मी..ही आणि मामा आमच्या वाड्यातून बाहेर पडलो..आणि दिसलेली पहिली रिक्षा पकडली..आपलं ते हे..मिळाली..मिळाली! (भोनीचा टैम..म्हणून असेल,नाही का? नाहितर पुण्यात एकवेळ पहिल्या झटक्याला लग्नाचं स्थळ अपेक्षित मिळेल,पण रिक्षा? छ्छे!!! असो..) मग रिक्षात बसलो..आणि मिटर पडला तसा मामा सुरु झाला. "डायरेक पुणे श्टेशनला घ्या!" रिक्षावाला .. , माझा धोतरछाप गुरुजी वेष ,कपाळाचं गंध ,डावीकडे बसलेला चकाचक पांढर्‍या कपड्यातला आणि पॉश्श काळं जर्किन घातलेला (हा)मामा , आणि उजवीकडे हिच्या आवडत्या पंजाबी ड्रेसात बसलेली (ही माझी) बायको.. हे सगळं न जमणारं गणित एकत्र आलेलं आहे,अश्या अर्थानी पाहुन पुढे बोलता झाला.."क्काय.....सुटली वाटतं केस?" .. "कसली?" मी बोलता झालो. पण मामा गोडश्यानी शिताफिनी तोंड घातलं. "हो...हो...सुटलीच समजा..म्हणून तर ह्यांना गावाला पोहोचतं करतोय..हातोहात!" मी ह्या खुलाश्यानी भयंकर भडकलो.आणि मामाकडे एक चिडलेली नजर फेकून माझ्या सँडलखाली त्याचा पाय दाबला..आणि त्याला नजरेनी "क्काय ह्हे??????" असं विचारता झालो. त्यावर मामानी निर्लज्जपणे डोळा मारल्यासारखं करुन मलाच परत गप्प केलं. आमचं हे काय चाललय? याचा धड विशिष्ट अंदाज न आल्यानी वैजू बर्‍यापैकी गप्प होती. पण स्टेशनला पोहोचेपर्यंत मला..मधुनच "क्काय ह्हे?..क्काय ह्हे!?" असं खूणेनी विचारत होती. मी आपला..कप्पाळावर हात मारल्याची उलट खूण करुन तिला गप्प करत होतो.

शेवटी एकदाच्या ह्या खाणाखूणीत रिक्षा ठेसनासमोर गेली. आणि आंम्ही उतरलो. मग जसा रिक्षावाला पुढे गेला,तसा मी मामा गोडश्याला पहिला हटकला. "अहो,ते रिक्षावाल्याला काय हो भलतं सलतं सांगत होतात?" ह्यावर मामा , "ह्हं ह्हं ह्हं.. अहो आमच्या महाराजांचा पाठ आहे तसा आंम्हाला दिलेला?" मी म्हटलं, "कसला? हे असं काहिबाही बोलण्याचा?" तर मला म्हणे, "आहो..काहिबाही नै हो..आपला हेतू दुसर्‍याला सांगायचा नाही,नाहितर सत्कार्यात अडचणी येतात..अशी शिकवण आहे आम्हाला महाराजांची" मी म्हटलं, "असेल..पण म्हणून का हि ही सांगायचं?" मी तापलोय हे ओळखून लग्गेच धूर्त मामानी सूर बदलला..आणि एकदम अतीनम्र होत सुटलाच माझ्यावर, "बरं...सॉरी! साष्टांग दंडवत तुम्हाला..चुकलो मी..माफ करा" .मला कससंच झालं,त्या माफी-मार्‍यानी. मी मग त्याकडे दुर्लक्ष करून मुळ मुद्द्याकडे आलो.. "असू दे..पण आता पुढे काय?" या माझ्या प्रश्नानंतर मामानी थोडी सेकंद जाणिवपूर्वक ब्लँक सोडली आणि एकदम "चला.." असा आदेश सोडला आणि फुटपाथवरुन भरभर चालू लागला. मग 'आता काय करता?' असा विचार करुन आंम्हीही त्याच्या मागुन चालू लागलो. काही वेळानी त्या अंतरापेक्षा अज्ञात अश्या ठिकाणाकडे जाण्याचा वैताग येऊन मी मामाला परत हटकला ''नक्की जायचय कुठे?" .. "इथेच! ह्याच्या पुढच्या गल्लीत. " मला कळे ना? की इथेच इथेच करत चांगलं तीन एक किलोमिटर चालवणारा हा मामा.., रिक्षासह इथे यायला कुचरला का? (हो! पैसे मीच टीचवणार होतो ना? रिक्षाचे! ) पण हे सगळच प्रकरण एकंदर त्या ठिकाणा इतकच मला अज्ञात जाणार पुढे ,याची जणू नांदीच वाजवू लागलं होतं अश्या प्रसंगानी..शेवट एकदाचे त्या अती उच्चभ्रू एरियातल्या..बंगलाही नाही आणि राजमहालंही नाही अश्या वास्तुच्या गेट समोर आम्ही आलो. मी मनात म्हटलं "बागडेवाडीचे मनेश्वर महाराज" ऐकल्यानंतर पुण्याजवळच्या कुठल्यातरी जुनाट वस्तीवजा ठिकाणी एखाद्या देवळात ह्यांचा दरबार भरत असून भगवी वस्त्र परिधान केलेला हा पारंपारिक महाराज असेल. पण हे प्रकरण भलतच उत्कंठावर्धक निघालं. वैजूही त्या भव्य वास्तुकडे पहात माझ्याकडे डोळे चमकवून पुन्हा आपलं ते "क्काय ह्हे!!!?" असं मला विचारु लागलीच. मग मी ही मामाला "अहो..कुठे आपण आलो नक्कि? " त्यावर मामानी मला "श्शूऊऊऊऊऊऊक!" असं खुणावून त्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या व्हरांड्यात नेलं.

इथे ठेवलेल्या एका मस्त मऊ आरामशीर सोफ्यावर आंम्ही विसावलो. आहाहाहा ! काय बरं वाटलं म्हणून सांगु? सकाळपासून सुमारे एक तास रिक्षातून आणि रस्त्याच्या खड्ड्यातून आपटत आणि नंतर तिन कि.मि.चालत येऊन थकलेला देह एकदम शांत होऊन सुखावला. हीला तर त्या सोफ्याच्या कोपर्‍यात झोप लागेल की काय? अशी शंका मला तिच्या मुद्रेवरुन आली. मी मामा कुठे? म्हणुन नजर टाकतो,तर मामा सराइतपणे आत गेलेला होता. काही क्षणातच एक अत्यंत सुस्मित,सुडौल आणि सुंदर अशी तरुण मुलगी आमचे समोर आली. आणि आमच्या समोरच्या खुर्चीवर विसावत..पाठिवरचे केस पुढे घेऊन "नमस्कार.. आत्माराम सर आपणच का?" असं विचारती झाली. मी आधी तिच्या कमालीच्या नम्र आणि मधाळ आवाजानी निम्मा घायाळ झालो.पण त्यातल्या 'आत्माराम-सर' ह्या उल्लेखानी परत तितकाच सावधंही झालो. शिवाय मी तिच्या आगमनानी किती सुखावलोय..? याचं वैजू कडेनी हळूच डोळे उघडून विहंगवालोकन ("विहंगवालोकन" - काय शब्द गावला च्या मारी! ;) व्वा! ) करेल की काय? याचिही भिती होतीच. पण तेव्हढ्यात ती बया म्हणाली, "कुणाला प्रॉब्लेम आहे?" मी:- "कसला?" ती:-(आवाज न होऊ देता सुस्मित हास्य करत.) "आत कार्डवर मॅडमना 'भविष्यकाळाची भिती' असं मिस्टर गोडसेंनी पॉइंटाऊट केलय,ते बरोबरे का?" मी:- "कसलं कार्ड? आणि म्याडम कोण ह्या नविन?" ती:- "अहो..मी मिसेस आत्माराम बद्द्ल बोलतीये" मी:- "ही!?...,बरं बरं..मग ते कार्ड कसलं?" ती:-"ते ना आमच्या आश्रम्-चं जॉबकार्ड आहे" मी:-" अहो माणसाचं असं अमाच्या बैक सारखं (जॉब)कार्ड काढतात काय तुमच्याकडे?" ती:-"हो...म्हणजे प्रोग्रॅम वर्काऊट व्हायला तीच सिस्टीम चांगली,असं आमचा गेल्या दहा वर्षांचा एक्सपिरियन्स सांगतो!" मी:-"असं होय! सांगू दे..सांगू दे. आता पुढे काय ते पटकन बोला" मी वैतागलो.. पण बया अगदी नीट तयार होती. मला म्हणते.. "पाच मिनिटात तुम्हाला मी आणि तुमचे मि.गोडसे घ्यायला येऊ.तोपर्यंत बसा इथेच..चहापाणि होइपर्यंत. बरं.. तुम्हाला चहा नेहमीचा देऊ की आमचा कषाय ट्राय करणार?" मी यातल्या शेवटच्या वाक्याकडे-गेलो..आणि तिला एकदम "कसाय म्हायत्ये का बाई.. आंम्हाला साधाच चहा लागतो..तो तुमचा कषाय पुन्हा (आलोच इथे तर!) ट्राय करु..काय?" असा यॉर्कर टाकला. पण ती भलतीच तयार होती हो. अजिब्बात न गांगरता आंम्हाला फक्त "ठिक आहे..ओक्के" असं म्हणून अदृश्य जाहली. मग दोन मिनिटात तो चहा आला. आणि आमचे चहापान होते न होते तोपर्यंत मामाही आला.

मी मामाला "काय हो? आंम्हाला इथे एकटे टाकून न सांगता गेलात कुठे?" असा भस्सकन अंगावर गेलो.पण मामा लग्गेच "ह्हु ह्हु ह्हु ..नाहि हो नाहि आत्माभटजी.. इथे एकटं नाहि रहात कुणी..एकदा आल्यावर" असं त्यांच्या (मला नंतर कळलेल्या) त्यांच्या प्रोग्रॅमच्याच भाषेत बोलू लागला. आणि पुन्हा आम्म्हाला "चला.." म्हणाला. मी आपला गावच्या रामाचं ..मारुतीचं नाव जपत जपतच हिला घेऊन त्याच्या मागनं जायला लागलो.. आत गेलो तर नजर खिळलीच त्या सगळ्या आलीशान फर्निचर कडे पहाताना. त्या हॉल मधे त्या उंची आसनांवर बरीच मंडळी दवाखान्यात पेशंट बसतात तशी बसलेलीच होती. ते पाहुन मला आपली भिती वाटायला सुरवात झाली.. म्हटलं आता ह्या दहा पंधरा जणांना पहाता आपला नंबर आता तासा दोन तासानी येतो की काय??? पण तसं काहीही घडलच नाही. आंम्ही मामा मागुनी सरळ त्या हॉलच्या मधून वरती जाणार्‍या सरकत्या जिन्यानी पुढे निघालो.. आता बरोबर ती स्मितहास्यिका तरुणीही आलेली होती. मला हे प्रकरण (म्हणजे जिना..तरुणी नव्हे!!!) नविन नव्हतं . कारण एकदा कँपातल्या एका महागड्या डॉक्टरच्या असल्याच दवाखान्यात जाताना तो सेकंड फ्लोअर पर्यंत नेणारा असलाच सरकता जिना नशिबी आलेला होता..तेंव्हा धोतर जिन्यात-जाता जाता वाचलं होतं. कारण तिथे मी कामालाच चाललेलो असल्यानी नसती लोकलज्जा नव्हती आणि मी ते चटकन हतानी वर(म्हणजे गुडघ्या पर्यंत हो!..)घेतलं होतं,आणि सुटलो-होतो. पण इथे सगळ्यां समोर धोतर-वर कसं घ्यावं हा प्रश्न पडलेला..विचित्र दिसलं असतं हे पहिलं,आणि कडेनी हिचा कटाक्ष मला "कसला रे धांदरट तू" असं बोलून काहिच जमू देत नव्हता,हे दुसरं. पण ह्यातूनंही शेवट ती बया'च कामाला आली. तिला माझी चाल्लेली त्रेधा लक्षात येऊन, तिनी जसे आंम्ही जिन्याजवळ गेलो ,तसे चटकन माझा हात धरला. तो ही हिच्या देखत! मला तिथेच २५लिटर घाम एकदम फुटायची पाळी आली. आणि ही बया सराइतपणे मला " डोन्ट वरी मि.आत्माराम..मिसेस आत्माराम..येस..यू..यू..प्लीज कम फ्रॉम धिस साइड" असं ऐन वख्ताला विंग्रजी मारुन हिनी वैजूला पण दुसर्‍या बाजुला घेऊन तिचाही हात हतात घेतला. आणि आंम्हा दोघांना लहान मुलांना जसं बागेत झोपाळ्यावर चढवतात..तसं -'एक..दोन..साडेमाडे......ती........न!' - करत तीनी जिन्यावर-चढवलं. मग मात्र आम्ही बिनधास्त झालो..(असाही तिनी अजुन तो हात-सोडलेला नव्हताच,मग घाबरा का म्हणा? ;) ) पण वैजूला त्या हातामागचं व्यावसायिक गुपित कळलेलं नसलं,तरी हे 'आपुल्याला-चढवणे..,जिन्यावरुनचे नव्हे!' इतकं मात्र झटकन लक्षात आलेलं होतं. मग तिनिच स्वतःचा हात मोकळा करवून घेत..त्या बयेला 'धन्यवाद' केलं,आणि माझ्याकडे बघे पर्यंत तर.. मी तो सोडलेलाही होता.. !

जिना संपवून मग आंम्ही तिघे त्या मनेश्वर महाराजांच्या खोलीत गेलो. पण खोली कसली? रुंदीच म्हणायला हवी तिला. अत्तिशय शांत वातावरणाची वातानूकुलीत ,धुपासारख्या कसल्यातरी मंद वासाचं रुमफ्रेशनर मारलेली ती खोली.आजुबाजुला बांबुची बेटं कुंडीत खोचावी तशी रोपटी ठेवलेली.. त्यामागून मंदप्रकाश योजना केलेली..अशी पूर्ण संस्कारीत खोली.(त्या बयेनी आंम्हाला आत नेताना..प्लीज कम इन धिस कॅबिन..असं म्हणून आत-सोडलं होतं.) आणि आत मधे पाटापेक्षा उंच आणि चौरंगापेक्षा कमी अशी तीन वेलव्हेट कोटींग केलेली आसनं मधोमध लावलेली होती..आणि समोर होते ते मनेश्वर महाराज. मी तर त्यांना बघुन ओळखूच शकलो नाही..म्हटलं हे महाराज!? एखाद्या बँक मॅनेजर सारखा अवतार त्यांचा..आणि कपाळाला ठशठ्शीत गंध भस्म वगैरे का हि ही ना ही!!!? शिवाय पायात बुटाडं देखिल. आम्हालाही कुठेच चपला काढायचा आदेश आलेला नव्हता म्हणा..त्यामुळे त्यांच्या बुटाडांकडे मी दुर्लक्ष केलं. पण महाराजांकडेच जायचय तर सिव्हिलमधे जा कशाला? म्हणूण मी आपला माझ्या ऑन ड्युटी ड्रेसवरच आलेलो..आणि हे सुशिक्षित महाराज प्रकरण म्हणजे खरच पुन्हा त्या अज्ञाता'ची (सुरवातीच्या हो! ) आठवण करवून देत होतं. मी मनात म्हटलं..'मरे ना का त्याचा ड्रेस कसाही असला तरी..आपल्याला थोडच त्याचं अनुग्रहीत व्हायचय..आणि वैजूही आज ह्याचं ऐकेल सगळं..पण ती ही कुणाची अनुग्रहीत होणार्‍यातली नव्हेच..त्यामुळे भ्या कशाला?'
====================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३.. ४४.. ४५.. ४६.. ४७.. ४८..

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jun 2015 - 8:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जमतय जमतय कॉर्पोरेट म्हाराज प्रकरण. बाकी हे वाचुन असा मी असामी आठवलं. तिकडच्या कथानायकाला पण असचं नेलं जातं एका बुवांकडे. सफेद अध्यात्म ;)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2015 - 9:02 pm | अत्रुप्त आत्मा

:)

शशिकांत ओक's picture

28 Jul 2015 - 8:04 pm | शशिकांत ओक

गुर्जी,
आपल्या भाव विश्वात प्रथमच डोकावलो...
सुखावलो. आपल्या शब्दचित्राचे कलात्मक लेखन वाचून...

तुम्हाला अजून ४८ वेळा डोकवावं लागेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jul 2015 - 8:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही. काहि काहि भाग प्रत्येकी ४८ वेळा वाचावेत एवढे छान आहेत. खास करुन वेदपाठशाळेमधले काही भाग.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2015 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद ओककाका.

@तुम्हाला अजून ४८ वेळा डोकवावं लागेल.>> आपणासहि धन्य वाद.

सूड's picture

30 Jun 2015 - 2:59 pm | सूड

असा मी असामी आठवलं.

+१

पैसा's picture

28 Jun 2015 - 9:14 pm | पैसा

कॉर्पोरेट बुवाबाजी!

यशोधरा's picture

28 Jun 2015 - 9:19 pm | यशोधरा

ह्म्म...

अत्रन्गि पाउस's picture

28 Jun 2015 - 11:31 pm | अत्रन्गि पाउस

...ह्याचे उत्तर लक्षात आहे नं ??

बॅटमॅन's picture

29 Jun 2015 - 2:26 am | बॅटमॅन

इन ट्यून विथ द ट्यून हे गुरुदेवांचं पुस्तक वाचलंय ना तुम्ही?

केऑसमधून कॉस्मॉस निर्माण होताना....सुप्रा कॉन्शसनेसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना...ब्रदर सुकुमारसेन, सुवर्णा कपूर, अन आप्पा भिंगार्ड्या... थोरच पुण्य हो तुमचं!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jun 2015 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

मला हे तु किंवा सुडुक लिहिणार ह्याची खात्री होती. :)

अत्रन्गि पाउस's picture

29 Jun 2015 - 6:33 pm | अत्रन्गि पाउस

केम बॅटमॅनभाय !!

चन्द्रशेखर च्या शेपटीवरचे फोड

अरे ए गुर्देव हे ने, एटला सर्रस एंल्गिस बोलते के एकदम मॅड इन इंग्लंड!! केम गोरधनभाय? ;)

रातराणी's picture

29 Jun 2015 - 11:32 am | रातराणी

मस्त रंगवून कुणीतरी गोष्ट सांगतय आणि आपण ऐकतोय असं वाटतं तुमची ही मालिका वाचताना. भारी लिहिता!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2015 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो. :)

पॉइंट ब्लँक's picture

29 Jun 2015 - 6:02 pm | पॉइंट ब्लँक

लै भारी लिव्हलय. :)

मयुरा गुप्ते's picture

29 Jun 2015 - 9:54 pm | मयुरा गुप्ते

हे तर एकदम गुबगुबीत, व्हेलवेट वाले बुवा निघाले की ओ... एकदम चित्रदर्शी वर्णन. छान लिहलयं.

--मयुरा.

टवाळ कार्टा's picture

29 Jun 2015 - 10:40 pm | टवाळ कार्टा

तीथे वाघीण दूध देतानाचा फोटो होता कै ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jul 2015 - 6:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भलते बौंसर टाकु र्‍हायला भौ तु.