मागिल भाग..
आणि ह्या काहिश्या समाधानानी दाटलेल्या हृद्य प्रसंगी, काकूचा निरोप घेऊन आंम्ही घराकडे परतलो.
पुढे चालू...
===================================================
काहि व्यवसायच असे असतात..की त्यामधे सुट्टी घेण्याचं स्वातंत्र्य असलं,तरी ती मिळण्याचं असेलच असं नाही. आता हेच बघा ना.. मी इकडे दिडदोन महिन्याकरिता आलो आणि त्यातले पंधरावीस दिवस गेले कसे ते खरच कळलं नाही..असं म्हणण्यासारखे दिवस सुखात चाललेले होते. पण ह्यो भटजीगिरीचा धंदा म्हणजे कोणत्याही क्षणी वैयक्तिक सुखावर संकट येणार्या डॉक्टरच्या धंद्यासारखा. एक दिवस मी आणि ही .. आमुची प्रथम भेट जाहली त्या प्रांती असलेल्या समुद्री डोंगरापायथ्याच्या शंकराच्या देवळात जायला निघालो होतो. मनात नियोजन असं होतं,की तिकडे त्याच दुपारच्या वेळी जावं आणि हिला तिथे घडलेली ती धनगराची कथा सांगावी. एकतर तो परिसर जितका निसर्गरम्य तितकाच त्या देवालयामुळे त्या निसर्गाचं खरं आध्यात्मंही उलगडून सांगणारा. त्यामुळे पुढील आयुष्याबद्दलच्या काहि गुजगोष्टी तिथे निवांतपणे बोलता येणार होत्या. आणि आता आंम्ही सकाळी नवाला निघणार ,एव्हढ्यात हिच्याच गावाहुन चार माणसं घराकडे येताना दिसली. ही पण गाडीवरून उतरुन पुढे झाली..आणि त्यांना 'काय झालं?' वगैरे विचारु लागली. आल्या आल्या त्यांनी मला , "हे बघा आत्मुभट . नाही म्हणू नका.आणि तुम्ही आता आमचे आहात." असं हिच्याकडे पहातच बोलायला सुरवात केली. "आमच्या गावचा भट आडलाय.सख्ख्या भावांची दोन लग्ने..एकाच दिवशी एकाच मांडवात लावीत नाय,असं आता अचानक म्हणायला लागलाय. लग्न फिस्कटवायला आणलीन मेल्यानी..तुम्ही आहात इकडे असं कळलं.आणि मागे तुम्हीच त्यानी विस्कटलेलं काम केलवत ते समजल्यानी आम्ही आलोय. तुम्ही चलाच आता. "
झा...लं. आता जाणे तर निश्चितच होते. शिवाय हिच्याच गावचे काम .म्हणजे इकडून नाराजी असली,तरी ती आड येणार नव्हती. मग मी पंधरा मिनिटात ऑनड्युटी ऑनड्रेस होऊन तिकडे गेलो. आधी त्या बुट्ट्या खविसाच्या टोळीतल्या त्या माजलेल्या भैरवाला सरळ केला.सरळ शब्दानी ऐकणारं ते प्रकरण नव्हतच. काकाच्या संघटनेची आणि त्याच्या गावक्या तोडण्याची धमकी घातली..तसा मारक्या बैलासारखा तिथुन पिशवी उचलून चालता झाला. मग त्या उपस्थितांना शांत केलं.आणि तसादिड तासात ते शुभ-मंगल करवून तिथनं परतलो. परत घरी येइपर्यंत चांगलाच उशीर झाला..तोपर्यंत हिचाही मूड गेला..आणि हिनीच मला "आपण उद्या नै त पर्वा जाऊ.आता काहि नको ह्या उन्हातनं जायला" असं सांगितलन. मी ही मनातून जरा नाराजच झालो होतो. कारण हिच्यापेक्षा माझा त्या देवस्थानी जायचा अधिक ओढा होता. पण हे काढिव मुहुर्ती वाढिव झालेलं लग्न लावता लावता आमचा मात्र सुंदर मुहुर्त फिसकटला तो फिसकटलाच.
दुपारची झोपंही लागे ना. शेवटी विहिरीवर जाऊन मोटार चालू केली .आणि वाडीला पाणी लावत बसलो. तासभर तसाच गेला. आणि माझ्या एका आवडत्या केळी'शी मी गप्पा मारण्यात दंग असतानाच ..मागुन "चहा" असा आवाज आला. बघतो तर ही आगदी नटून थटून आल्यासारखी वेशभूषा करुन दोन कपात तो "चहा" घेऊन आलेली होती. मी तो चहा घेतला खरा पण मला हिच्या ह्या अत्ताच्या वेशभूषेचे कोडे काहि केल्या उमगेची ना!. मी आपला पारंपारिक अडाख्यांनुसार 'स्त्रीयांस केंव्हाही नटणे मुरडणे आवडते..हें हीं त्यांतलेंच एक अंसांवें' असे संवाद जुनाट श्टाइलनी मनात म्हणत होतो. पण हिनी तो चाहा दिलेला संपत आला,तरी मलाही काहि कळे ना.आणि हि पण काहि बोले ना. मी मनात म्हटलं आली पंचाईत आता. पण तेव्हढ्यात माझ्या लक्षात आलं...हे आपण आणलेल्या कापडाचं वस्त्र लेऊनी हे भूतं आपणासमोर उभे राहिले आहे. मी म्हटलं चला...आपल्याला 'न सांगता ' हे कळलय ते एक बरच आहे. पण आता ते तसेच ओळखून दाखवा म्हणजे आफतच. कारण ओळखून दाखवा म्हणजे ओसंडून वाहणारे लालित्य वापरून बोला. कारण त्याखेरिज स्त्रीमन प्रसन्न कसे व्हावे? असा आपला माझा एक (बहुतेक जुना....ट!) समज. पण तरिही त्यापेक्षा भयंकर प्रश्न म्हणजे हे असे अज्जिब्बात बोलायला न जमणार्या मी...ते बोलावे कसे??? . मी काहि किश्या इतका या प्रांतात तरबेज नव्हतो. शेवटी ती भयाण शांतता मला छळायला लागली. आणि हिचा आमच्या सप्तशतीतल्या दुर्गा,चंडी,काली असल्या एखाद्या संहारक रुपात मला प्रत्यय येतो की काय? ह्या भयास्तव मी नकळत "फारच छान दिसतोय तुला हा ड्रेस...म्हणजे तुलाही आवडला ना? तुच सांगितलेल्या रंगाच्या कापडानुसारचा? " अशी सलग तीन वाक्य बोलून मी , 'चला...झालं सगळं बोलून!' म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. म्हटलं...आपलं उलट कौतुक वगैरे न होवो. पण हजामत होण्यापासून वाचलो,तरी पुष्कळ!
पण हिच्यावर अपेक्षित परिणाम फार साधला गेला होता अशी काहि चिन्ह दिसेच नात. मग मी आपला पुन्हा "रंग चुकिचा आला का?" असा डिफेन्स वर आलो. तर मला हिचा रडताना नाक फुरफुरत येतो तसा "क्ला" असा आवाज आला. "मग काय झालं?" माझा पुढचा प्रश्न. "तू एक शेड उतरलेली आणलीस" .. "अगं .. मग एव्हढा ड्रेस घालून दाखवायला आलीस,तो काय हे सांगायला?" मी गाढवा सारखा बोलून गेलो. "पण मी वाइट आहे ..असं कुठे म्हटलय?" पुन्हा त्याच-नाकफुरफुरत्या तप्ताश्रूंकित आवाजात! ..मी मनात म्हटलं बोंबला तिच्यायला. हे कोडं पहिल्यापेक्षा गहन झालं की! त्यातनं आता माझ्यापुढे असा पेच पडला..की,-"पण मी वाइट आहे ..असं कुठे म्हटलय?" ..आणि, ''तू एक शेड उतरलेली आणलीस".- या दोन्ही विधानात नक्की अर्थ काय काढायचा? दोन्ही विधानं परस्पर विरोधीही नाहीत. एकमेकाच्या आजुबाजुचीही नाहीत. एकसमान तर नाहितच नाहीत. खरच..हे स्त्री मन ओळखणं ब्रम्हदेवाच्या बापालाही अवघड. शेवट मी मनाचा उरलासुरला हिय्या करून हिला "मग जाऊ दे हा ड्रेस.आपण दुसरा आणू उद्याच!" असं म्हणून ,त्यावर तोड काढायचा प्रयत्न करु लागलो. ह्यावर मला "तसं नै पण!" असं त्याच स्फुंदक आवाजात उत्तर मिळालं. मग मनात म्हटलं, आली आता मात्र खरीच पंचाईत. शेवट मी चिडून "बरं मग काय करायचं आपणं आता???" असं म्हणून सरळ पांढरं निशाण फडकवलं. तर अचानक माझ्या हतातला चाहाचा रिकामा कप घेऊन हिनी पळत दूर जाऊन मला "कै नै...ड्रेसचं कापड आवडलच होता मला..फक्त तुला जरा टेंशनमधे आणावं म्हटलं!..म्हणून नाटक केलं मी!" असं म्हणून वाकुल्या दाखवल्या सारखी चक्क हसत हसत पळून गेली. मग माझ्या लक्षात आलं...मी आल्यादिवशी ते डोळे धरलेल्याला लगेच ओळखून जी घोडचूक केलेली होती..त्याच्यावरचा हा उतारा होता. आणि मग,"रामा माझ्या कर्मा ...सूड घेणं हा जातीवंत स्त्रीस्वभाव आहे. " असली काहितरी पौराणिक नाटकछाप वाक्य उच्चारत मी ही घराकडे परतलो.
....................................................
दिवस निवला सांज झाली,पाखरे पुन्हा घराकडे आली
सूर्यही थकला कृद्ध झाला,आली त्याच्या गालावर लाली
सांजवेळचा पिंपळ तो ही ,पाने हलवी वारा म्हणुनी
शांत शांत होई तो वारा, तृण ही सारे बसती लवुनी
घारींच्याही घिरट्या सरल्या,आकाशीच्या मनामधुनी
काक चिमण्या येती सारे,दिवस निजला घराकडे थकुनी
वाडीतून आल्यावर संध्याकाळी..मी माझ्या त्या आंगणातल्या, भेंड्याच्या लाडक्या झाडाखाली उभा राहुन सांजेचं आकाश निरखत असताना ह्या ओळी मनात येत होत्या.आणि मनातच नव्हे..तर मी चक्क बर्यापैकी मोठ्यांदी बोलत होतो. आणि ह्यात काका कधी त्याच्या सायकलसह आत आंगण्यात आला. आणि माझ्यामागे येऊन उभा राहिला,ते मला कळलच नाही. मी त्याची चाहुल लागताच अचानक थांबलो. पण काकानी लगेच मला "कविराज गीतंबहाद्दर आत्माराम..आहो थांबलात का? चांगलं सुरेख चाललं होतं की!" असं हटकलन. मी ही त्याला "नाही रे काका विशेष काहि त्यात...येतं आपलं असच मनात" म्हणून विषय टाळू लागलो. तर मला तो "असं नुसतं मनातच का बरं? ते तसच पेनात आणि कागदावर पण उतरलं पाहिजे आता!" असं म्हणाला. ह्यातल्या 'आता'...ह्या शब्दानी मी चांगलाच सावध झालो. आणि मला जे ओळखायचं ते ओळखू आलचं. नवरात्र होऊन गेलेला होता. आणि ह्यावर्षीचं गावातलं देवीच्या देवळासमोर होणारं 'नाटकं' काहि झालेलं नव्हतं . कारण त्यात काम करायला कोणी नटी मिळाली नाही हे एक कारण आणि ज्या लेखकानी ते लिहिलवतन..तो गाण्याला नेमका अपुरा निघालेला. म्हणूनंच गावातले कोणीहि त्यात रस घेइनासे झाले होते. आणि नाटक बाजुला पडलेलं होतं.पण आता त्याच नाटकाला नटी मिळाल्यामुळे,मुख्य सोय झालेली होती.आणि गीतांशिवायंही ते तसच करायच परत एकदा ठरलेलं होतं.
म्हणजे..त्यातली ही (उरलेली)गाणी रचायची आता माझ्या अंगावर येणार होती तर!!! . मनात म्हटलं हे बरं आहे काकाचं. एकतर आजचा दिवस त्या अचानक लगीनघाईत वाया गेलेला .आणि उद्यापर्वाचा तिकडे जाण्याचा बेत आखावा, तर हे काकाचं अवघड काम माझ्यावर येण्याची धास्ती. पण ते आलच तसं. रात्री जेवताना काकानी बरोब्बर मला गुळ लावत ह्या कामाची धुरा माझ्यावर सोपवली. आणि त्याहुन भयंकर म्हणजे मला गाण्यांचं लिखितातलं बेरींग-येण्यासाठी रात्री मला त्या नाटकाच्या सुरु झालेल्या तालमींना घेऊन गेला. काका ह्या अवघड जबाबदार्या त्याच्या संघटनेतल्या कामांसारख्या कोणत्याही क्षणी मार्गी लावण्यात कसा वाकबगार आहे,हे कळलं या निमित्तानी मला! शिवाय ते नाटकंही म्हणे अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपलेलं. मला धक्काच बसला ..मी काकाला रात्री तिकडे जाताना विचारलच. "अरे ..आठवडा उरलेला फक्त..आणि अजुनंही गाणी नाहीत...म्हणजे मी तुला गावलो नसतो..तर करणार काय होतात मग?" काका:- "ह्या!!!!!!...त्यात काय अवघड ? हिते पंधरा गावातले पंचवीस हौशी गीतकार उद्या पकडले असते.आणि त्यांना विषय देऊन लाऊन दिली असती त्यांच्यात स्पर्धा दिडदिडशे रुपड्यांची...हाए काय त्यात? दोन दिवसात तीन नाटकांची गाणी तयार!!!" मी अवाकच झालो हे सारं ऐकून.
पण तरिही आमच्या कोकणातली गावात होणारी ही नाटकं म्हणजे एक प्रचंड आनंदाचा आणि दंगामस्तीचा सोहळाच असतो. अगदी जिथे तालमी चालतात..त्या हौशी कलाकारांच्या चढाओढी आणि भांडणापासून..ते नाटकाच्या दिवशी अर्ध्याकच्च्या बांधलेल्या श्टेजपर्यंत...आणि त्याच श्टेजच्या मागच्या बाजुला पर्दा-लाऊन केलेल्या मेकपरूम मधील लगबगी पासून ..ते त्याच मेकपरूमच्या बाहेर उभ्या असलेल्या एखाद्या टवाळ कंपू पर्यंत ..हे सारं अत्यंत मजेमजेचं आणि धिंगामस्तीचं वातावरणं असतं. मी पाठशाळा आणि नंतर व्यवसायाच्या नादात हे वैभव पार आणि ठ्ठार विसरुन गेलेलो होतो. ते आता काकाच्या निमित्तानी मला सक्रीय एंजॉय करायला मिळणार होतं. तश्यातच हिला माझा हा किंचीत कवित्वाचा गुण माहित नव्हता तो अचानक दिसेलंसा झाल्यानी,माझीया मनालाही-बरीच लाली चढली. आणि मग पुढील दोन दिवसात मी त्याच नशेमधे त्यांना जमतील तशी चांगली पाच नाट्यपदं खरडून दिली. फार विशेष अशी नव्हती ती. पण ती मी अचानक लिहुन दिल्येत..याचं कामं करणार्यांना कोण कौतुक!
शेवटी त्या तालमी होता होता तो मुख्य दिवस आला. आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून आमच्या देवीच्या देवळासमोरिल पटांगणाला अगदी जत्रेसारखं रूप आलं. स्टेजसमोर चारिही बाजुला खांबं, पडदे ,त्यावर मुन्शिपाल्टी खात्यातनं-'मिलवलेले घ्गुलोप' सोडलेले .. देवळाच्या बाजुच्या झाडामागे गावतल्या 'चनेफुटाने' विकणार्या विश्याकाकानी बत्तीच्या उजेडात लावलेलं त्याचं छोटं दुकान.. त्याच्या आजुबाजुला आयाबाया आणि लहान पोरांचं.. 'ए मला दे शेंगदाने थुज्यातले...' 'नाय बा...शेंगदाने कुटं..??? मज्याकडे तर वाटाने' असं चाललेलं. त्यातच एखादी किरटी पोरगी आयकडे ररत "मला नळ्या...घे" असं करत असलेली. आनि बाजुला दुसर्या एखाद्या गावातनं आलेला एक फेरिवाला,त्याच्या सायकलवर 'गुलाबी कापुस, काहि खेळणी,प्ल्याश्टीकचे रंगीत चष्मे,छोटी ह्यालिकापटंरं ' असं काहिबाही विकायचं दुकान थाटून बसलेला. आणि श्टेजच्या बाजुला काहि मान्यवर खुर्च्यांची एक रांग सोडून मागे सगळ्या आम पब्लिकला बसायला भलीमोठ्ठी जाजमं अंथरलेली. त्यावर आंम्ही एका बाजुला जागा-धरुन बसलेले..इतर पब्लिकंही.. "नाय ..ह्या वेळेला नटी गावतलीच आहेसे कळ्ळेले ..खरे काय?" असे प्रश्न टाकत आजुबाजुला बसायला लागलेलं..आणि अश्या वातावरणात मग ते नाटकं सुरु झालं. नाटकाचं नाव होतं...............
======================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९..
प्रतिक्रिया
16 Apr 2015 - 5:01 am | एस
अवांतरः किती वाजता उठता हो तुम्ही? :-)
16 Apr 2015 - 8:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आवडेश.
16 Apr 2015 - 9:41 am | स्पा
जबराट
16 Apr 2015 - 9:42 am | स्पा
कोकणात जाऊन आल्याचा फिल येतो मस्त ( लोकल च्या भिकार गर्दीत)
16 Apr 2015 - 9:47 am | अत्रुप्त आत्मा
@ कोकणात जाऊन आल्याचा फिल येतो मस्त ( लोकल
च्या भिकार गर्दीत)…>> ह्हा ह्हा ह्हा!!! पक्का कोकणमय आहेस हां पांडोबा तू!
16 Apr 2015 - 10:16 am | स्पा
चल माझ्या गावाला
आडिवर्याला
16 Apr 2015 - 9:50 am | पॉइंट ब्लँक
नाद खुळा!
16 Apr 2015 - 10:29 am | नाखु
मालक
16 Apr 2015 - 11:48 am | पॉइंट ब्लँक
तुमच्या एका आयडीमुळं पूर्ण दक्चिण पच्चिम महाराष्ट्रची पंचाईत झाल्या. ;) संदर्भानुसार समजून घ्या, "नाद खुळा" हे कधी वाक्प्रचार मनून वापरलय आन कधी तुमासनी उद्देशून लिवलय ते.
16 Apr 2015 - 10:04 am | यशोधरा
मस्त चाललं आहे..
16 Apr 2015 - 10:14 am | स्पंदना
आत्मुस मी मागचे सगळे लेख वाचत वाचत येथेवर आलेय हं.
प्रतिसाद दिले नाहीत,म्हणुन वाचले नाहीत अस नाही.
कधी कधी काही ठिकाणी चक्क दंडवत घालावासा वाटतो तुम्हाला. सुंदर लिखान आत्मुस!!
16 Apr 2015 - 10:25 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद हो स्पंदना ताई! :)
16 Apr 2015 - 10:28 am | टवाळ कार्टा
कै शाळा झाली नै "कथानायकाची" ;)...बाकी ती "गावातलीच नटी" म्हणजे वैजू"च" अस्णारै असे गुपित फोडू कै? ;)
16 Apr 2015 - 11:11 am | अत्रुप्त आत्मा
नाही रे कार्ट्या ट वाळा! ;-) नाही ब्रे तसे कै! ;-)
16 Apr 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा
मग तर्र नक्कीच "कथानायकाच्या" तोंडाला रंग लागला अस्णारै...आणि वैजू प्रेक्षकांतूनच ओरडाणार "अय्या" =))
16 Apr 2015 - 11:50 am | पॉइंट ब्लँक
हा हा. लई मज्ज येइल नै. पुढच्या भागात नटीचा फोटो आलाच पाहिजे ह्यासाठी मिपाकरांनी आंदोलन करावे असे जाहीर आवाहन करत आहे ;)
16 Apr 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा
"कथानायकाच्या" मनातरी नटी आपल्याला हव्या असलेल्या नटीपेक्षा वेगळी असेल तर? त्यापेक्षा आपणच आपली आवडती नटीला मनात आणावे ;)
16 Apr 2015 - 2:13 pm | पॉइंट ब्लँक
ही ही. विचार आवडले :)
16 Apr 2015 - 11:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
गप्राव मेल्या...सगळं बिंग तु एकटाचं फोडणार का? त्यांना पण फोडायला काहितरी ठेव की शिल्लक. ;)
उगीचं कथानायकाला त्रास देउ नकोस..
16 Apr 2015 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा
@उगीचं कथानायकाला त्रास देउ नकोस>> खौट चिमणराव!
16 Apr 2015 - 11:06 am | खटपट्या
नेहमीप्रमाणे मस्त.
16 Apr 2015 - 1:13 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर लिहिता बुवा तुम्ही.
कथानायक आणि वैजूवयनी ह्यांमधील प्रेमाचा गोडवा खूपच हळूवारपणे टिपला आहात.
नाटकाची सुरुवातही झक्कास.
16 Apr 2015 - 2:45 pm | नाखु
अनुमोदन.
ठळक शब्दांबाबत प्रत्यक्ष भेटीत खुलासा राखून ठेवला आहे.
नाखु
आसन क्र ८ बॅट्याच्या मागे आणी सगा शेजारी
पुणे राजापूर यष्टी.
16 Apr 2015 - 2:21 pm | बॅटमॅन
क्या बात है.
मस्ताड हो बुवा.
16 Apr 2015 - 2:24 pm | पॉइंट ब्लँक
हितं गाळालेल्या जागा भरत "जिलबी" असं लिहिण्याचा मोह आवरत नाहीए ;)
16 Apr 2015 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
@ हितं गाळालेल्या जागा भरत "जिलबी" असं
लिहिण्याचा मोह आवरत नाहीए>> ह्हा ह्हा ह्हा!
अहो, लिहा की मग! कशाला तेव्हढाच पॉइंट ब्लँक सोडता!?