मागिल भाग..
अश्या तर्हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन..
बर्याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं...
पुढे चालू...
==============================================
पांगलं ते पांगलं खरं,पण आंम्ही सगळी देवीच्या देवळापासून घरी चालत चालत येता येता हीचं अजुन एक नाटक सुरु झालं.
ही:-आत्मू...
मी:- काय?
ही:-तू गाणी कधीपासून लिहितोस?
मी:- १ अठवड्यापूर्वीपासून...(पलिकडून काकाचा हशा!)
ही:- सांग ना????
मी:- अगं खरच १ अठवड्यापूर्वीपासून...काका म्हणाला-लिही! म्हणून खरडलं सुचेल तसं.
ही:- खोट्टं!
मी:- काय? काका म्हणाला ते?
ही:- आं sssssss मी मारीन हं!
काका:-(हसत हसत..) ए... तुमची वयं काय रे?
ही:- आजच्या दिवसा एव्हढी!
काका:-(अज्जुन हसत..) व्वा....,बालिके.., तत्वज्ञान बोलू लागलीस. भटाची बायको शोभायला लागलीस हो बाकी!
ही:-आं sssssss सखाकाका.. मी नै ज्जा...
काका:- बरं मी नाही येत तुमच्यात.. आंम्ही सगळी पुढे जाऊ का? तुम्ही या मागुन निवांत गप्पा मारत.
ही:- नक्को! अंधारात मला भिती वाट्टे.
काका:- मंजे????? आत्मू असला तरी?
ही:- ह्हु ह्हु ह्हु हू! त्याला पण वाट्टे!
मी:- ए.... मला कधी गं वाट्टे?
ही:- मग ...आमच्या घरी गेलेलो तेंव्हा तूला पडक्या विहिरीजवळ मी घाबरवलेलं..तर घरापर्यंत येइस्तोवर रामनाम चाल्लवतं तुझं!
मी:- ते अंधारामुळे..भुताखेताच्या भितीमुळे नै कै! अगं मी वेदसंपन्न ब्राम्हण आहे ब्राम्हण. आमच्या जानव्याच्या ब्रम्हगाठीत सगळी भूतं वश असतात.
ही:- ह्हो!!! .... यजमान सोडून! (इथे काका आज्जी आई...सगळे हसून हसून खलास!)
मी:- ए........धंद्यावर जायचं नाय हां..आधीच सांगुन ठेवतो.
ही:- बरं बरं... म्हायत्ये खूप प्रेम आहे ते.
काका:- अरे भल्या माणसांनो..भांडू नका .नायतर त्या नाटकातल्या सारखी तुमचं भांडण सोडवायला भांडण पंचायत तयार करायला लागायची.
यावर मी काही बोलणार एव्हढ्यात आज्जी सुरु झाली...
आज्जी:- हवीच हो हवीच असली एखादी पंचायत. मेली गावात नै नै त्या विषयांवरनं भांडणं खेळतात लोकं.
आई:- छे हो..आपल्या गावात बराच एकोपा आहे. एव्हढी नै कोण कुणी हमरीतुमरीला येत.
आज्जी:- तुला गं कसं म्हायती? तू काय वा...च ठीऊन असतेस की काय?
काका:- झालं...आता तुमचं जन्मजात भांडण सुरु झालं.. आगो.. बोलता बोलता घराचं आंगण आल्याचं तरी कळतय का तुम्हाला? वैजू....किल्ली घे ही..कुलुप उघड जा!
ही:- मी नै.........................
काका:- का गं? त्याला पण भित्येस की काय एकटीनी उघडायला?
ही:- आत्मूला आधी मला एक गाणं लिहुन द्यायला सांग तू..तरच उघडीन.
काका:- ह्ह्हा ह्हा ह्हा ह्हा... काय गो वेडे हट्ट तुझे. बरं सांगिन हो सांगिन.. आता आत जाऊन आपल्या सगळ्यांना तो आम्लपित्तावरचा काढा कर बरं तुझ्या आयुर्वेदातला इंश्श्टंट्वाला.. अती रात्र झाल्ये झोपायला. तेंव्हा काढा हवाच.
काकानी हिच्या गाण्याच्या ऑर्डरवर मनमुराद हसत आपली ऑर्डर सोडली. आणि बाकिचे आत गेल्यावर मी आणि काका..बाहेर आंगण्यातच आंब्याच्या फळीच्या बाकड्यावर बसलो. आत ओटीवर..माजघरात आंथरुणांची उघडा उघड सुरु झाली...मग जरावेळानी तो काढा आला. आणि काढेपान सुरु असता असता..काकाही सुरु झाला.
काका:-(मला हळूच..) आत्मू..
मी:-क्काय?
काका:-वैजूवर खूप जीव आहे ना रे तुझा..?
मी:- .....................
काका:- ह्हा ह्हा ह्हा... सांग की मला.
मी:- आंssss ..काका .. हे असलं काय रे विचारतोस अत्ता!? आणि तुला काय माहित नाहीये होय?
काका:- ह्हा ह्हा ह्हा... मला म्हायत्ये रे मुला..पण आज तुझ्या तोंडुन ऐकायचय...तुमचं इलु इलु म्यारेज की नै? मग सांग ना तू!
मी:- ह्हो!!!
काका:- ह्हा ह्हा ह्हा.... काय हो?
मी:- काका....छळू नकोस ना..
काका:- अरे आहे तर आहे म्हण की मुला... त्यात विचित्र काय वाटायचाय एव्हढं?
मी:- विचित्र नै रे..पण आपल्यात असं बोलतात का? उघडपणे.
काका:- आपल्यात नै बोलत..पण आपण बोलू की! त्यात काय पाप आहे होय?
मी:- पाप नाही रे काका.. पण मला येत नाही तसं बोलता.
काका:- आत्मु....याला डायलॉग अडकणं म्हणतात बरं का!
मी:- म्हणजे काय?
काका:- अरे .. ह्याला आत्मसंवादातली तूट ..असं म्हणायला हवं. तत्वज्ञानाच्या भाषेत.
मी:- पण येव्हढ्याश्या गोष्टीसाठी तत्वज्ञान कशाला?
काका:- मुला..येव्हढ्याश्या गोष्टीसाठी...असं विचारतोयस.पण तुला तरी हे ऐकल्याशिवाय का उत्तर उलगडलं?
मी:- .....................
काका:- अरे तत्वज्ञानाचा जन्मच बारीकसारीक गोष्टींच्या अज्ञान आणि भयातून होत असतो.
मी:- असेल!
काका:- असेल नव्हे...होतोच! आता हेच बघ ना.. तुला एखादी गोष्ट बोलता येत नाही.पण मनात त्याविषयीचं चिंतन अखंड चालू असतं. आणि त्याच गोष्टी विषयाचं ते अधिक असतं..हो की नै?
मी:- हो.
काका:- मग आपण जिथे अडतो. तिथे दुसर्याशी बोलून मोकळे नाही झालो..तर ती गोष्ट पुढे कशी सरकायची?
मी:- हम्मम.. पण मग भिती वाटते ती गोष्ट बोलताना...त्याचं काय?
काका:- कशामुळे वाटते भिती?
मी:- आपण बोललो, तर आपली टवाळी उडेल..याची!
काका:- आणि नाही बोललो...तर मन जी टवाळी वारंवार आत उडवत राहिल..त्याचं काय करशील मग?
मी:- काका तू गहन बोलतोस..मला कळत नाहीत या तत्वज्ञानाच्या गोष्टी..जाऊ दे!
काका:- अरे आत्मू..लक्षात घे,की आपल्या भारतवर्षातले मोठमोठे तत्वज्ञ ऋषीमुनी फक्त भगवंताशीच बोलुन गप्प बसले असते...तर तुझ्यामाझ्या सारख्याचं काय झालं असतं?
मी:- पण मग आपण काय ऋषीमुनी आणि गुरुमहाराज व्हायचं का आपापली रोजची कामंधामं सोडून?
काका:- अरे...ऋषीमुनी व्हायची गरज नाही.. पण त्यांनी जसं चिंतन ग्रंथरूपानी आणि बोलून प्रकट केलं..तसं आपल्याला करायला काय हरकत आहे?
मी:- पण म्हणजे करायचं काय नक्की?
काका:- अता तुला तुझ्या प्राणप्रीय धंद्यावरूनच सांगतो. तुम्ही पुरोहित मंडळी गप्पा मारायला जमता भेटता..तेंव्हा, 'मला हे कळत नाही? ते तू काय ते सांग.' असं म्हणून एकमेकाशी उघड होताच ना?
मी:- हो...पण ते कामातल्या अज्ञानाविषयी झालं.. त्याची उत्तरं कामाच्या प्रॅक्टीसमधून मिळतात.
काका:- बरोब्बर! काय शब्द वापरलास तू? प्रॅक्टीस..बरोबर ना?
मी:- हो...
काका:- मग जीवनातल्या इतर विषयांबाबतंही आपल्याला चांगलीच प्रॅक्टीस असते..त्यावरची उत्तरं शोधायला आपणच परस्परात बोलायला हवं ना? आणि ते ही प्रॅक्टीस असलेल्यांनीच.. ज्यांना त्याचा (प्रतिपाद्य विषयांचा) अनुभव नाही,त्यांचा केवळ जुन्यासांस्कृतीकपणाचा वांझोटा अधिकार मानीत,त्यांचे पाय कशाला धरायला हवे प्रत्येक वेळी???
मी:- पण मग याविषयी जुन्या ग्रंथांमधे असतच की तत्वज्ञान? ते का बघू नये.?
काका:- बघावं की!.. ते ही बघावं..पण त्याला कालगतीची बाधा येते. ते तत्वज्ञान ,त्याची मांडणी.. हे त्या काळाचं अपत्य झालं..आजच्या काळात ते सर्वस्वी लागू पडत नाही..आणि बर्याचदा ते विरोधी किंवा अपकारकंही ठरतं. शिवाय ते ऋषिमुनी आणि ग्रंथपण ठेव बाजुला.. त्या ग्रंथ आणि तत्वज्ञानाची खरीखुरी पारायणं किंवा पोपटपंची असं दोन्ही केलेल्यांची आपल्याला मदत कशी आणि काय होणार? ज्यांना चालूवर्तमानाचा अनुभव/भान आणि आकलन नाही,त्यांच्याकडून आपल्याला नुसतं दिखाऊ आणि कोरडं समाधान वजा जाता मिळणार काय? डोंबल!!!
मी:- मग जायचं कोणाकडे?
काका:- अरे...कोणाकडे जायला कशाला हवं. एका अंधळ्याची समस्या जास्त अचूक कोणाला कळते? दुसर्या अंधळ्याला! तुमच्यात पुरोहितांचं पुरोहितांना कळतं...तसं! मग त्यासाठी समान समस्या असलेल्यांनी परस्परांनाच शंका विचारून/अडचणी सांगुन, खुलेपणानी एकमेकांशी बोलायला हवं.. आमच्या संघटनेत होतं तसं!
मी:- पण तुमच्या संघटनेला पण ग्रंथ असेलच ना? जातीनिर्मूलनाचा!
काका:- मुळीच नाही. गरजच भासली नाही कधी तसली. आंम्ही प्रत्येकजणानी आपापली जात पाळायची बंद केली,आणि आंम्हीच सगळेजणं जीवंत जीतेजागते ग्रंथ होऊन बसलो..उघडलेल्या पानांचे!. आणि..म्हणून तर आंम्ही आता सगळ्या समाजात देखिल ही सवय हळूहळू निर्माण करु शकतोय. एकदा आपण परस्परांचा हात धरून चालायला लागलो...की ग्रंथही लागत नाहीत,त्यांच्या संपदाही लागत नाहीत..आणि त्यावरचे तथाकथित अधिकारी म्हणवले जाणारे तत्ववेत्तेही लागत नाहीत..समजलं!
मी:- हो...कळतय तुझं म्हणणं...पण वळत नाही अजुन..
काका:- ह्हा ह्हा ह्हा...!!! याकरता मी माझ्यासाठी आजंही वापरत असलेली यावरची तोड सांगतो तुला...! ती घोकत घोकतच झोप आज.. आणि आधी तुमच्यात संथा-घालतात..तशी म्हण माझ्याबरोबर दहा वेळा
मी:- सांग!
काका:- म्हण .."मला जेव्हढं-वळलय,तेव्हढच-मला कळलय!"
मी:- (उठता उठता..मनातल्या मनात..) "मला जेव्हढं-वळलय,तेव्हढच-मला कळलय!" "मला जेव्हढं ............
काका:- हां छान...आता सकाळी आपोआप उत्तर देशील मला...तुझा वैजूवर जीव आहे की नाही? नाही त्याचं!
मी:- काका.......... आता परत छळू नको ना!
काका:- आं!!!! मधेच दुसरं बोलू नकोस.. ज्जा....असाच घोकित घोकित अंथरुणाकडे... आणि अत्ता नको तर नको म्हणूस..पण उद्यापासून संध्या करताना गायत्री मंत्रा ऐवजी हाच मंत्र खरोखर जप १०८ वेळा.. बर्याचश्या चिंता निर्माणच होणार नाहीत...आयुष्यात..ज्जा.....
त्या रात्री मी तो जप करत करत झोपी गेलो.. आणि खरोखरच पुढल्या आयुष्यात या एका साधनाच्या आधारे,मी कितीतरी गोष्टी अगदी सहज प्राप्त केल्या.आणि त्याही स्वतःच्या स्वतःच.
...................................................................................................
बोलता बोलता माझा हा सुट्टीचा सुखद कालवधी संपला,आणि मी परत एकदा पुण्यात येऊन काम एके काम,काम दुणे घर,काम त्रिक (भटजी..)अड्डा,काम चोकं ब्यां..कं, कामा पाचे संसारं... हा न संपणारा पाढा म्हणायला लागलो. दुसर्याच वर्षी इकडे नवी बाइक घेणे ही जाहले.. आणि त्या पुढच्या दिवाळीपर्यंत माझी बाइलंही गावाहुन इकडे आली. बाकि या पुण्यानी मला पहिल्या दोन/तीन वर्षातच,केवळ कामच नाही तर या शहराचं खरंखुरं नागरिकत्वहि बहाल केलं. आणि मी ही हळूहळू अट्टल पुणेकर या सदरात जाऊन बसलो.आणि याची खातरजमा झाली ती घरी फोन येऊन बसल्यावर! म्हणजे कामासाठी येणार्या फोनवर माझं होत असणारं बोलणं..हीनी एक दिवस पोलिस रिपोर्टसारखं टीपलं. आणि रात्री जेवताना मला "तू यजमानांना अगदी खोचक बोलतोस हं" असा तक्रारिचा सूर हिच्याकडून उमटला. आता ते बोलणं हा या शहराचा स्थायीभावच आहे,याला मी तरी काय करावं? आहो...आमच्या पुण्यात साधी सत्यनारायणाची यादी जरी सांगायची झाली,तरी इथली माणसं ती तंतोतंत आणि अचूक(काय भयंकर शब्द आहे हा!) मिळाली आहे की नाही?, याला पूजेपेक्षा अधिक महत्व देतात. म्हणजे यादीत फक्त "आरतीसाठी २निरांजने"... येव्हढं लिहून भागत नाही. ती तेलाची की तुपाची?,साजूक की डालडा?, त्यात घालायचं तूप १वाटी की अर्धी?, ते तूप घालायला चमाचा की ती संक्रांतीच्या वाणात (याच शहरात..)लुटवतात ती 'छोटी पळी'?...असलंही डि-टेलिंग करावं लागतं. मग हे सांगताना मेंदुचं तारायंत्र होणार नाही तर काय होणार दुसरं?
पण तरीदेखिल एक गोष्ट अगदी निर्मळपणे सांगतो हं... हा त्रास देखिल एका दीर्घकालिन अध्ययनासारखा एकदा आंगवळणी पडायला लागला ना..की मग पुण्यात काम करण्यासारखी मजा नाही दुसरी. त्यातच तुमच्या राशिला आमच्या त्या शि.मि.गुरुजींसारखे बॉस लाभलेले असले..तर तुम्ही निरांजनांच्या बाबतीतली वरची सगळी डिटेलिंग करुनच थांबत नाहीत,तर त्या तूपाच्या वाटी वर आणि खालि ठेवायला एकेक बारीक ताटली सांगुन यजमानांच्याही सवाई होऊ शकता. बाकि या शि.मि.गुरुजिंबरोबर मी पहिली तीन वर्ष अगदी तुफ्फानी कामं केली. त्यातच त्यांच्या वयोमानानुसार ते त्यांचे काहिकाही यजमानंही माझ्यावर सोडू लागले. पण त्यांच्याकडचं व्यवसायावरचं मिळणारं शिक्षण,हे सगळं व्यवहारी आणि हिशेबी स्वरुपाचं होतं. त्याशिवाय जे बुद्धिचातुर्य कोणत्याही धंद्याची जान असतं,ते त्यांच्या ठाई म्हणावं असं नव्हतच. ते मला शिकायला मिळालं,ते या शहराच्या सगळ्या सवयींचा अर्क ओळखून बसलेल्या एका माणसाकडून. त्यांचं नाव अण्णाव सांगण्यापेक्षा त्यांचं सूत्र्रच इथे सांगावं हे अधिक बरं. म्हणजे नाव सांगायला काही हरकत नाही..पण ते ज्या सूत्रानुसार हे काम करीत असतं,त्यात ते एव्हढे एकरूप झालेले होते,की त्यांचं निराळं असं अस्तित्वच त्यातून शोधुन काढता येऊ नये. म्हणजे ते यजमानाकडे देखिल, "काकूsssssssssssss मला होमाचा भात देता नाssssssss??? द्या बरंssssssss!!!!" असं गो..ओओओड आवाज काढून बोलायचे..तसच घरी आले तरी बायकोला देखिल... "अगंssssssssssपिशवी घेत्येस ना माझ्या हातूssssssssssन.. घे बरंssssssssss!!!" असं बोलायचे. मला देखिल हाक मारताना, "आत्मूssssssssssssssssssss" अशी ,त्या आत्मु चं मू .. चेटकिणीच्या नाकासारखं ओढून लांब करून ते हाक मारायचे. आंम्ही सहकारी पुरोहित मंडळी तर त्यांच्यामागे त्यांची थट्टा करताना देखिल ,हे स्वतःशी बोलताना "त्रिंबssssक.........अरे सकाळ झाली,उठ बरं आताssssssssss.अंघोळीला जाऊन कामाला जायचय नाssssssssमग जा बरंssssssssss" असं बोलत असावेत ,असं म्हणायचो. त्यांच्या या जाणिवपूर्वक शांsssssssत आणि गोssssssssड बोलण्यातच ते सूत्र होतं. "डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर"
म्हणजे ते काही सदानकदा सगळ्यांशी सगळी वाक्य याच टोनमधे बोलायचे असं नव्हतं.पण समोरचा माणूस कुठे चिडणार आहे? कुठे त्रासणार आहे? कुठे नाराज होणार आहे? याची चाहुल त्यांना अगदी बरोब्बर काहि सेकंद आधी लागायची.आणि बोलता बोलता ते मुद्याच्या वाक्यांमधे ही अशी शुगर मिसळून द्यायचे. त्यामुळेच आमच्यात त्यांना शुगरफ्याक्ट्री हे टोपण नाव पडलवतं. आता अशी ही आधुनिक व्यवसाय प्रशिक्षणालाही मागे टाकेल अशी त्यांची वार्तालाप पद्धती असल्यामुळे त्यांचा यजमान संग्रहही अफाट होता.आणि आमचे लोक देखिल त्यांच्याकडे कामाला जायला अगदी आनंदानी तयार! नुसत्या गणपतिच्या पहिल्या दिवशीच्या पूजाच त्यांच्याकडे १००/१५० असायच्या. मग त्यातल्या दहा पंधारा ठिकाणी स्वतः जाऊन उरलेल्या सर्व ठिकाणी ते आंम्हा इतर पुरोहितांना पाठवीत असत. आणि त्यांच्या यजमानांना देखिल, 'आपले गुरुजी जो माणूस पाठवतील तो उत्कृष्टच असणार'..यावर कोण जबरदस्त विश्वास!? याला कारणंही तसच होतं. त्यांनी आंम्हाला त्यांच्या एखाद्या यजमानाकडे पाठवलं,की नियम एकच असायचा. पूजा पोथीप्रमाणे हवी ती सांग. पण कोणत्याही कारणास्तव यजमानावर चिडू ओरडू नको.. जे काहि सांगायचं,बोलायचं ते सावकाश ,सभ्यपणे,आणि हळू आवाजात..तरच तुला ह्या कामास जायला मिळेल. त्यामुळे एरवी आंम्ही आमच्या राज्यात कोणतं का धोरण अवलंबे ना,पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच!
==================================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..)
प्रतिक्रिया
20 Apr 2015 - 3:00 am | शैलेश लांजेकर
एकदम मस्तच!
20 Apr 2015 - 8:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्वा!! कथानायक आणि ना-यिका पुण्यनग्रीत स्थिरावलेले बघुन ड्वॉळ्यात आणंदाश्रु आले. ;)
कथानायक ना-यिकेला शापिंगला नेतो का हो तुळशीबागेत वगैरे? =))
20 Apr 2015 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा
llluuullluuullluuullluuullluuullluuu
20 Apr 2015 - 10:51 am | टवाळ कार्टा
बाकी वैजू "कथानायकाच्या" ४ पावले पुढेच आहे ;)
20 Apr 2015 - 11:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
माफक बदल """""""""""""""""""""""""""कथानायक"""""""""""""""""""""" असा उल्लेख करत जा रे बाबा.
20 Apr 2015 - 7:22 pm | अत्रुप्त आत्मा
@ वैजू "कथानायकाच्या" ४ पावले पुढेच
आहे ;)>> आणि तू त्याही पुढे ४ पावले! हो की नै? :P
20 Apr 2015 - 9:01 am | पॉइंट ब्लँक
गियर शिफ्ट भारी जमला आहे. आधी कौटुंबिक खेळीमेळी, आयुष्याचे तत्वज्ञान आणि मग व्यवहारीक ज्ञान. मस्तच :)
20 Apr 2015 - 7:59 pm | यशोधरा
आवडला हा भाग.
21 Apr 2015 - 7:45 am | प्रचेतस
हाही भाग झकास. खूप आवडला.
संवाद लै भारी लिहिलेत.