मागिल भाग..
असं म्हणून काका त्या आनंदाश्रूंसह बाजेवरून उठून माझ्यापाशी आला... आणि माझ्या पाठीवर थोपटत लहान मुलासारखं मला झोपवून..,शांत मनानी स्वतःही निद्रीस्त झाला.
पुढे चालू...
==========================
काका बरोबरच्या त्या संवादी रात्रीनंतर काहि दिवस तिकडे काहि इकडे असं करत केंव्हा गेले ते कळलं नाही. आणि शेवटी आमच्या घरी तो बारश्याचा समारंभ अगदी अस्सल कोकणी श्टाइलने पार पडला. मग एकच मोठ्ठा पाळणा की दोन वेगळे स्वतंत्र? समारंभ मोठ्ठा करायचा की साधा? अश्या अनेक चर्चा उपचर्चा झाल्या. आणि कुण्णीच एकमतावर येत नाही,हे पाहून मी चिडून आदेश सोडला.. "एक काहितरी निर्णय घेतला नाहीत तर मी पोरांचे फक्त नामकरण संस्कार करवून घेइन्,आणि बाकी काहिही करु देणार नाही!" तरिही यानंतर थोडीफार धुसफुस झाली..पण काकुच्या समजावणुकीनंतर प्रश्न सुटला..आणि अगदी साध्या पद्धतीने सर्व काही नीट जाहले.मी ठरवलेली नावे ठेवणेही झाले. आणि त्यामुळे काकू अत्तिशय आनंदली. माझ्या दृष्टीनी कार्यक्रमाची हीच खरी सांगता होती. पण बारश्यात नावं ठेवणे हे प्रकर्ण येवढ्यानी संपत नाहीच. मग हिच्या आवडिची दोन ..आइच्या, आज्जीच्या, ह्याच्या, त्याच्या ,..असं करत करत ती लिश्टं पण एव्हढी मोठ्ठी झाली की मी जुळ्यांचा बाप न होता, (नामतः ) किमान अर्धकौरवांचा कींवा कौरवार्धाचा बाप होतो की काय? अशी भिती मज मनाला वाटू लागली. पण ह्या काळजीतून शेवटी काकूनीच सोडवलं. आणि "ब्बास करा हो ती नावांची हौस. इथे ती पोरं रडून झोपायला आली त्याकडे नै कुणाचं लक्ष! आवरा बरं." असं म्हणून सगळ्यांना भानावर आणलं.
माझेही सुट्टीचे दिवस संपत आले. आणि मी हिला "आणखि काही दिवस..अगदी वर्षभर सुद्धा इकडे रहा आणि ही दोघांना सांभाळवायची कसरत जमत आली ,कीच ये पुण्याला." असा खाजगीत दम भरुनच आलो. कारण, इकडे आमच्या वाड्याच्या मालकिण बाई असल्या लक्ष द्यायला.तरी हे एकावेळी दोन बालकांना सांभाळणे हे सोपे नव्हे याची पुरेपुर जाणिव मला झालेली होती. मी देखिल किती वेळ घरात देऊ शकणार होतो? आमचा हा पौरोहित्याचा धंदा म्हणजे जवळ जवळ ह्या इस्पितळातून त्या इस्पितळात ऑपरेशन करत फिरणार्या डॉक्टरच्या सारखाच. कामाला कुठली एक ठराविक वेळ नाही.कि कुठले दिवस नाहीत. आणि कुठचाही धंदा म्हणजे केवळ वर्तमानच. भूतकाळ हिशेबी लावत ठेवायचा आणि भविष्य काळाची गणित बांधून ठेवायची पण लक्ष ठेवायच आज-वरच. त्यामुळे मनाला होणारी दगदग, हा धंद्याचा पाया!!!. त्यात सगळी गणिते जुळवून घर आणि संसाराकडे अगदीच दुर्लक्ष होतं,अश्यातला भाग नाही. पण हवं तितकं लक्ष दिलं जातच्,असंही नाही.कर्मसहयोगानी मला लाभलेली सहचारिणी ही खरच सहचारिणी होती. पहिलं वर्ष जाइपर्यंत ती थांबते कुठे तिकडे गावी. अगदी प्रॅक्टीस पूर्ण केल्यासारखी करून आठ दहा महिन्यात परतण्याची तयारी झाली देखिल हिची. मग मी रीतसर जाऊन सहकुटुंब परतलो एक दिवस. वाड्यातंही मालकिणबाईंसह सगळ्यांनी आमचं जंगी स्वागत केलं .. आणि लगेच दुसर्या दिवशी त्या आतल्या आंगणासारख्या थोड्या जागेत पुन्हा एक बारश्यासारखाच समारंभ घडवून आणला. भरपूर कौतुक झालं या आमच्या जुळ्यांचं. त्यात आमच्या बरोबर किश्याहि पोहोचते करायला आलेला असल्यामुळे माझ्यावर सदर कार्यक्रमाची जबाबदारी फारशी पडलीच नाही. लोकांना द्यायच्या अल्पोपहारापासून सगळं काही किश्यानीच पाहिलं,आणि कार्यक्रम मार्गी लाऊनच तो परतला. म्हणून मलाही ते कौतुक शांतपणे पहायला मिळालं.मग दिवाळी झाली..आणी काही दिवसात तुळशीची लग्नं संपता संपता आमचा पुन्हा भटजीगिरी एके भटजीगिरी हा कार्यक्रम सुरु जाहला.
......................................................
या जुळ्यांना सांभाळणं हळूहळू अंगंवळणी पडत होतच. पण त्याचबरोबर "जुळ्याचं दुखणं!" ही म्हण अस्तित्वात का आली ? याचा अगदी पुरेपुर अनुभव येत होता. सदू झोपेत रडायला लागला रे लागला..की मी त्याला घेऊन बाहेर वाड्याच्या अंगणात जाइपर्यंत स्वानंदीला-जाग यायची. आणि 'सदू' हे जणू काही जन्मजात आई खात्यातलं असलेलं डिपार्मेंट.., बाप का म्हणून सांभाळतो? या विदारक जाणिवेनी ही बया लग्गेच कंठ-सोडायची..मग ह्याला वैजूकडे देऊन मी माझं हे लाडकं परंतू मूळ(रडवं..) डिपार्मेंट खांद्यावर घेऊन परत अंगणात मोकळ्या हवेत जाऊन थापटवीत थापटवीत उभा रहायचो. ते कार्ट आईजवळ गेल्या गेल्या शांत व्हायचं आणि काहि मिनिटातच हे उभयत: सहघोराध्यायात जायचे. स्वानंदी मात्र मला नंतर किमान अर्धा तास आठ्वणीत(राहिलेली!) सगळी बालगीतं,बडबडगाणी इत्यादी गायला लाऊन मगच झोपायची. नियमच होता तिचा तसा. पुण्यातले काहि जुना...टं पुणेरी जमातीतले यजमान जसे शंकरावर दोन लिटर दूध अभिषेक पात्रातून पडून संपत नाही..तोपर्यंत रुद्राची एकादशिनी-झाली..असे गृहीतच धरत नाहीत..(झालेली असली तरी!) तसच होतं ह्या बयेच. अर्ध्या तासाला एक मिनिट जरी कमी पडलं..तरी लग्गेच हीचं ट्यां...व्हायचं.
ही एकावेळी दोन खाती (पोरांची!!!) सांभळताना सुरवाती सुरवातीला तर मला अगदी नक्को........व्हायचं. मग "एकदा झालात बाप,की करायचा नसतो पश्चाताप!" असली भयावह शाब्दिक वचनं-हाणणारे हल्लीचे शहरी सद्गुरु आठवायचे. अगदी आवडले नाहीत्,तरी हे आठवणीत येतातच असल्या तारेवरच्या कसरती करताना. (जगातील समस्त आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक दु:ख-दबाव लेपांचे घाऊक विक्रेतेच हे! ) पण त्या केवळ बोधवचने भक्तांच्या तोंडावर फेकून स्वतः मस्त आरामात जीवन जगणार्या सद् गुरुंना आमच्या संसारात खरच एकाला दोन बालके अॅटेटाइम आलेली आहेत...त्यामुळे किमान थोडा मनःस्ताप तरी करु द्यावा..असलं वचन सांगावयास सुचावयाचे नाही. कारण त्यांना , क्लेश वाहून गेल्याशिवाय मन शांत होत नाही,असं अनुभवातून येणारं साधं मानसशास्त्र कळत नसतं.तसाही ह्या असल्या सद्गुरुंचा सामान्य माणसांच्या प्रत्यक्ष जीवनाशी संबंध येत नाहीच. आणि मलाही असले गुरु संबंधी जाहलेले नकोच असतात. पण भाग्य हे आत्मविधिलिखिताचा जणू चढता आलेख असतं ,असं वाटण्यासारखे काहि प्रसंग येतातच आयुष्यात.. त्यातलाच प्रसंग ह्या आत्म-विधिलिखितानी आमच्यावर आणवलाच एके दिवशी! आणि असल्या एका सद् गुरुंशी गाठ पडलीच..नको ती!
त्याचं काय झालं..की आमची ही जुळीही पहाता पहाता दोन वर्षाची होत आलेली होती. (आणि मेंदु पाच वर्षाचा होत आलेला होता!) एकदा सदुनी आमच्या वाड्यातल्या किमान पंधरा वीस मांजरांपैकी एकाला त्या दरवाजाच्या लावलेल्या अडसरावरून किल्याच्या बुरुजावरून चढून आत येणार्या सैनिकाला हात द्यावा.. तसा त्या मांजराला हात देऊन आत घेतलं. तशी मलाही मांजरं आवडतात..पण आमचं हे एक नंबरचं पार्सल सदू..ह्या मांजरापेक्षाही जास्त हुश्शार होतं याची मला जाणिव होतीच , ..म्हणून मी चिंतेत होतोच.पण ते आत आलेलं मांजरहि मेलं भलतच तयार होतं. आधी आत येऊन सदुशी नीट सलगी करु लागलं..अगदी त्यानी शेपटी ओढली तरी डोळे मिटून निवांत अंदाज घेत असल्या सारखं बसलं होतं. त्यामुळे मी ही पुस्तक वाचता वाचता जरा कानाडोळा केला. पण भाऊ आणि मांजराचा हा शांततामय चाललेला शीन, स्वानंदीबैंना पाहावला नाही, आणि तिनी लग्गेच जवळ येऊन त्या मांजराचे डायरेक कानच उपटलेन..मग मात्र ते फिस्स करुन अंगावर आलं...आणि मी त्याला हुसके पर्यंत स्वानंदीच्या पायावर डावली मारुन गेलं. बया लगेच रडायला लागलीच ..पण सदू ही दचकल्यामुळे -सुरु झाला.. ह्या आवाजानी ही बाहेर आली.. आणि मला "कसली ती जळ्ळी पुस्तकं वाचतोस..? " असं करून उगाच माझ्यावर भडकली.. मी तिला.. "अगं मी हकललं मांजराला..कै झालेलं नाहीये..बारिकसा पुसट ओरखाडा आलाय पायावर..आणि आपण अत्ता डॉक्टरकडे जाऊ की लगेच" असं म्हणालो.. माझं हे विंजेक्शन त्यावेळी उपयोगी पडून सगळं शांत झालं..पण नंतर त्यानी री अॅक्शन दाखवलीच चांगली. डॉक्टरनी तर साधी पट्टीही न लावता उलट हिला.., "अहो वहिनी..काहि झालेलच नाहीये..कशाला येवढ्या काळजीत पडताय!?" असं म्हणून आमची पाठवणी केली. पण ही मात्र डॉक्टरकडून 'काहिच' उपचार न झाल्यामुळे उगीच नाराज आणि साशंकित झाली. मग घरी आल्यावर , रडताना बायका जश्या धुसफुसतात..तश्या धुसफुशीतली काही खास बायकी श्टाइल मधली वाक्य पुढे एक तास अधुन मधून माझ्या कानावर पडत राहिली..
"पायाच्या जागी डोळ्याबिळ्यावर बसला असता पंजा ..म्हणजे मग??? " "मोकळा वेळ असला की मुलांकडे पहायचं का त्या पुस्तकात डोकं खुपसायचं???" "जप्त केली पाहिजेत सगळी पुस्तकं एकदा" "मी अज्जिब्बात त्या मांजरांना घरात पाऊल सुद्धा ठेऊ देत नाही! मांजरांना कळत असतं का? मुलं लहान आहेत ते?" आमच्या घरात चाललेली ही धुसफुस खाजगी असली तरी आमच्या मालकिण बाईंना अश्या प्रसंगांचा का कोण जाणे ठाव लागायचाच.. मग त्या आल्या आणि मला 'सबुरीचे बोल चार' ऐकवून-हिला नीट शांत करुन गेल्या. पण जाता जाता होऊ नये ते घडले.. आणि आमच्याकडे काहितरी बिनसलय याची चाहुल..मामा गोडश्याला लागली.. आणि येश्टी आगाराकडे रिकाम्या चाललेल्या गाडीत जसा एखादा फुकटा भटक्या शिरावा.. तसा मामा गोडश्या आमच्या घरात घुसला. मामा गोडश्या म्हणजे आमच्या वाड्यातलं फुकट सल्लागार खातं. आणि देवानी असल्या कामांची जन्मजात वर्णी-लाऊन द्यावी अशीच काहिशी योजना ह्याच्या बाबतीत घडलेली. कुठेही कोणाकडेही काही चिंतनीय प्रसंग घडला,की मामा गोडश्या तिथे दुधात माशी पडावी तसा येऊन पडायचा. तसाच पडला तो आमच्या दारात . आणि आत येण्याआधी त्याच्या खास श्टाइलनी दाराजवळचा पडदा तिरका करून त्यानी नुसती मुंडी आत टाकली..आणि खर्जातला तो आवाज काढत "काय झालं पोरिला?" असं चिरकला.. मी काही नाही वगैरे म्हणेपर्यंत हिनी मात्र त्याला "नै कै झालं..पण मांजराचा हल्ला होता होता वाचला" असं म्हणाली.. मी लगेच मामाला "अहो हल्ला कसला? शेपूट लागली पायाला..आणि गेलं" असं म्हणून प्रकरण मिटवायच्या बेताला आलो होतो.. पण मामा गोडश्या मेला हलकट ही संधी सोडेल होय..? लगेच आत घुसला...आणि हिच्या खांद्यावरुन स्वानंदीला उचलून घेऊन उगीच "आले..आले..लागलं होय.." वगैरे एक्टींग करायला लागला. मी त्याला "अहो झोपलेली पोर जागी होइल.. " असं म्हणून हिच्याकडे "तू तरी कश्शाला लग्गेच दिलस तिला ह्याच्याकडे?" असं नजरेनीच बोलू लागलो. पण हिला मेला त्या मामाचं प्रत्येक वचन खरं वाटत होतं त्यावेळी. मामा गोडश्या सुटलाच पुढे.. "वहिनी.. तुम्ही एकदा सगळे माझ्याबरोबर चला..!" हिनी कान टवकारलेले पाहुन मी लग्गेच त्याला - "कुठे???" असा चेंडू टाकला. पण मामा अट्टल चाल खेळण्यात. त्यानी माझं बोललेलं कानावर देखिल न घेता ,हीला निर्देश करत "आमचे बागडेवाडीचे मनेश्वर महाराज आहेत ना त्यांच्याकडे चला..ह्या अमावस्येला..आमावस्येला त्यांची पॉवर फुल्ल चालते(?) आणि अमावस्या असल्यामुळे ह्यांना पण कै काम र्हायचं नै..सहज येता येइल?नाही का?" (यातले शेवटचे दोन प्रश्न खौटपणे मला-मारलेले होते साल्यानी! :-/ ) "पुढे येणारे धोके आणि संकटं अगदी अचूक सांगतात आमचे मनेश्वर महाराज! चलाच तुम्ही,म्हणजे पोराबाळांवरची आरिष्ट कळतील तरी ..येणार असली तर!" असा भला मोठ्ठा बाण मारलाच. एरवी वैजू ह्या महाराजगिरीच्याच काय कसल्याच भूलभुल्लैय्यात फसणारी नव्हती. पण एकदा पोटच्या पोराच्या काळजिनी,मातृहृदय हळवं झालं..की कसल्याही गोष्टीचा झटकन प्रभाव पडायला वेळ तो कितीसा लागणार? झा......लं! हिला त्यात काहितरी "खरं-वाटलच!" आणि मग आमचे महाराजाकडे जाणे अटळ झाले.
मग मि ही फार विरोध न करता , 'एकदा आणू हिला आणि पोरांना त्या महाराजाच्या मांडवाखालून . मी असल्यावर करणार काय तो लबाडी? अहो महाराज असला ,तरी आमच्याच शेजारच्या मांडवातला..सांगुन सांगुन सांगेल काय??'...असा विचार करुन हिच्या आणि मामा गोडश्याच्या सह जायला तयार झालो....
=========================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३.. ४४.. ४५.. ४६.. ४७..
प्रतिक्रिया
24 Jun 2015 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
म्या पैला. आता वाचतो :) :) ;)
24 Jun 2015 - 11:08 pm | टवाळ कार्टा
कहर डि........ट्टेल्लीं कर्ता गुर्जी
25 Jun 2015 - 12:24 am | एस
मस्तच आहे. फक्त दोन वर्षांची मुले चांगली दुडुदुडू धावतात. एका वर्षातच चालायला शिकतात पोरे. सहा-आठ महिन्यांचे ठीक आहे.
25 Jun 2015 - 12:31 am | रातराणी
नया है वह! स्मायली गुरुजी स्मायल्या टाकायची दीक्षा द्या मला :)
25 Jun 2015 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा
हां! हे मात्र चुकलंच! रांगणेच्या ऐवजी दुडु दुडु चालणे एडवलं पाहिजे. करतो उद्या तसा बदल.
25 Jun 2015 - 6:37 am | यशोधरा
आता महाराज कशाला मधे! :| उगाच कायतरी भयानक प्रकर वगैरे नकोयेत.
25 Jun 2015 - 6:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हंजे गुर्जी पण दुसर्या गुर्जींचा/ म्हाराजांचा सल्ला घेतात? :O
25 Jun 2015 - 11:22 am | उगा काहितरीच
मालिकेसाठी लिहा गुरूजी , लै पोटेन्शीयल दिसतय !
(हघ्या हेवेसांनलगे )
25 Jun 2015 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही हही! नको बाबा. हल्ली तिकडे जे "चालू" आहे, ते पहाता ते लोक माझ्या लेखनाची टनाटन फ्राय आवृत्ति बनवुन विकतिल.
25 Jun 2015 - 2:21 pm | अत्रन्गि पाउस
स्वानंदी मांजराकडे बघतेय ...प्रकाश झोत ...पार्श्व संगीत ....
डोळे मिचकावले ....३ वेळा रिपीट ...
मांजर वळले ...ढण ताण ...वार्याचा झोत ...पडदे उडाले...कुकरची शिट्टी ...
बुवा पान उलटत आहे ....चिरंजीव पंजा चाटू का ओढू ह्या विचारात ...एकदम फोकस पंख्यावर ...तो फिरतोय गर गर ....
स्वानंदीच्या चेहेऱ्यावर स्मित ...आणि निश्चय ..मांजरा कडे सरकतेय पार्श्वसंगीत लय वाढवताय ....
...एकदम रत्नाकर सहकारी बँक ..गृह कर्ज घ्या ...अशी जाहिरात ...खाली कासीम बाबा बंगालीह्याची पट्टी फिरतेय ...
...
.
.
.
.
.वगैरे वगैरे वगैरे
26 Jun 2015 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा
=)) हहा ह्ह़ा ह्हा हह़ा! =))
27 Jun 2015 - 9:39 pm | यशोधरा
=))
25 Jun 2015 - 1:14 pm | खटपट्या
आवडला हाही भाग. बाकी प्राण्यांना अजाणती लहान मुले बरोबर कळतात. जर पाळीव प्राणी असेल आणि आपल्या एखाद्या क्रुतीने राग येणारा प्राणी तीच क्रुती जर बाळाने केली तर काहीच करत नाही. हे अनुभवले आहे. हो पण अगदीच त्रास झाला तर मात्र थोडा त्रागा करुन तीथून कलटी मारतात.
25 Jun 2015 - 1:40 pm | खेडूत
वा!
कथा पण आता दुडू दुडू चालायला लागली!
पुढचा भाग लौकर येऊ द्या...
26 Jun 2015 - 6:36 pm | रेवती
:)
27 Jun 2015 - 9:34 pm | प्रियाजी
वा! गुरुजी, सरळ चाललेल्या कथेत रहस्यमय वळण! मजा येणार आता. पुभाप्र.
27 Jun 2015 - 11:20 pm | प्रचेतस
ख़ास बुवाशैलीतला भाग.
मजा आली जुळ्यांचं दुखणं वाचून.
28 Jun 2015 - 8:36 pm | पॉइंट ब्लँक
मस्त जमलाय हाही भाग. :)
29 Jun 2015 - 5:52 pm | पॉइंट ब्लँक
आता सापडला. काल लेख वाचल्यापासून ह्याची आठवण येत होती.