मागिल भाग..
आणि अश्या वातावरणात मग ते नाटकं सुरु झालं. नाटकाचं नाव होतं...............
पुढे चालू...
======================================
रामाची सीता...
हां ...... , पण ह्यात गोंधळाल हां तुम्ही. आता 'रामाची सीता...' ह्या नावाची ट्रॅजिडी म्हणजे, खरं तर या वर्षी ठरलेलं नाटक होतं- सीता स्वयंवर . पण पहिल्यांदा तालमी सुरु झाल्या आणि हुंबैस्नं मिलवलेली प्रोपेशनल नटी ठरल्या मानधनाच्या दुप्पट मागायला लागली. आणि मग आली पंचाइत सगली. मग महिना तसाच गेल्यावर मूळ तारिखंही चुकली आणि लोकानी त्यावर तोडगा काढायचा ठरवला. आणि एक दिवस रात्रीची जेवनाखावना झाल्यावर देवीच्या पाराला जमली सगली नाटकाच्या मिटींगला.
दामु काडकरः-(आंगभर कचकून पावडरीत माखलेल्या नान्याशेटकडे पहात) नाय पन मी काय म्हनताव नान्याशेट..
नान्याशेटः- म्हण की लवकर..मेल्या!
खाडक्यांचा गजू :- त्याला आज कायपन लवकर जमीयाचा नाय. (हळूच..नान्याशेटला) त्याची पावशेर जादा झाल्ये!
दामु:- तुला वास मारत असेल तं लांब जा बगू तू...आवदंसा मेली! तं मी काय म्हनताव.. बीन नटीचा नाटक होत नाय काय ओ?
गजू:- हा...नवसागराशिवाय......हातभट्टी...........
दामु:- तिच्यामायला तिच्या... हानीन हां मेल्या तुला!
नान्याशेटः- मेल्यानो.. ह्या भांडणाचच नाटक करु एक..गज्या साल्या त्याला बोलू दे की..शुद्धीतच आहे ना तो? ..(डोळा मारुन..) म........ग!?
दामु:- तर शीतास्वंयऊंवर कशाला सारका तो मेला? आपण 'रावणमंदोद्री ओपन म्यारेज' - केला तर?
नान्याशेटः- अरे पण मंदोदरी म्हणजे पुन्हा स्त्री आलीच ना नाटकाच्या उदरी? म्हणजे परत नटी कुठनं आणायची?
दामु:- तं काय झाला? ती मंदोद्री मंजे राक्षशीनच ना? कालीच असनार ना ती जाडीढबाडी.. मं मी र्हातो उबा जांबली साडी नेसून...आनी कोनाच्या तरी गंग्वानाचा आंबाडा करून घालतो, न् थ्यांत केवड्याची पाना लावतो मोराच्या फिसार्यासारखी...सगले लोक थाकडच बगतील...म्येला कोन्ला कलायचा पन नाय? कशे????
नान्याशेटः- देऊ काय देऊ.. अजुन थोडी? देऊ?????
गजू:- त्याला इंग्लिश चालायची नाय..खरच शुद्ध हरपेल साल्याची.. त्ये बघा आले रघारामपंत. त्यांना विचारा.
रघाराम :- राम राम मंडळी.. कुठपरेंत? काय सुचतय की नाही दुसरं काही?
नान्याशेटः- तोच विचार पडतोय. मायला कळेच ना झालय.
रघारामः- अरे स्त्री पात्र विरहीतच करायचय ना? मग ग्रामसमस्येवर आधारीत असं लिहुन घ्या की कुणाकडनं तरी
दामु:- हे ग्राम शमश्या काय असतय? सामुशासारक वाट्ट्य
गजू:- उतरली बहुतेक!
दामु:- हो... उतरली... द्ये धा रुपे..येतो लाऊन फरत!
नान्याशेटः- ए गपा रे मेल्यानो... पण रघादादा लिहिणारा आहे कोण? (आपल्यात?)
रघारामः- अरे मुंबैसहुन आलेला भाचा नै का माझा.. तो तिकडे नाट्यशास्त्रवर्गात अध्ययन केलेला आहे.
नान्याशेटः- हम्म्म्म... मग सांग त्याला लिहायला.. आणि त्याला म्हणावं स्त्रीपात्राचं अॅडिशनपण साइडबाय साइड तयार ठेव. मंजे मिळालीच कुणी तर बरं ते ही. शेवटी बाई असल्याशिवाय नाटकाला बघणार कोण?
दामु:- हा...., हाच म्हनताय मी पन! बाई हवीच!
गजू:- झाली...वेळ झाली याची.. जा घरी जा आता.
दामु:- फो&^%$च्या तू काय दारी जातोस काय मग?
नान्याशेटः- तुम्हाला कमिटीवरनं ब्रेक दिन हां मी!
रघारामः- ह्हा ह्हा ह्हा ह्हा... जाऊ दे..जाऊ दे.. आता आपण सगळेच ब्रेक घेऊ.. आता काळजी सोडा माझ्यावर. हां.... ५दिवसात नाटक लिहुन तयार होइल.. तालमीची जागा शोधा आता
दामु:- पन त्यो नाटकाचा नाव सांगा बा कोन्चा तो.. मी फुकट पब्लिशेटी करीन उद्याफास्न
गजू:- हे बघा.लग्न नै झालं,आणि म्हने.. बारसं कधी?
दामु:- मेल्या हराम्या...पंताच्या डोस्क्यात असल की नाव..काय हो पंत?
रघारामः- आरे आधीचं रहित झालेलं कोणतं??? सीतास्वयंवर. म्हणजे आताच्या नाटकात राम आणला की झालं.. पब्लिकपण नाराज नाही...कसे?
दामु:- पन शीतेत राम नसतो काय???
गजू:- घ्या .. सगळं सांगून परत हा विचारतोयच की ,रामाची सीता कोण?
दामु:- (टाळी मारून ..ज्जोरात हसत!) हा बं मेला...नाव दिलन आपल्याला नाटकाचं 'रामाची सीता' ...असाच नाव घेऊ
नान्याशेटः- अरे खरच की...दाम्या लेका संध्याकाळी ६ नंतर अक्कल भारीच तेज चालते हो तुझी.. समस्याप्रधान नाटकाला अगदी योग्य नाव आहे.. फक्त त्यातला 'कोण' काढून टाकू..म्हणजे पब्लिकला वाटेल पौराणिक...आणि मिळेल समस्याप्रधान..
रघाराम:- ह्हा ह्हा ह्हा !!! व्वा! दाम्या मेल्या कळीचा मुद्दा सोडवलास रे जाता जाता.. हे घे माझ्याकडून बक्षीस दहा रुपये रोख!
गजू:- मंजे हा काय आज घरला जात नाय आता...
दामु:- चल..चल..म्येंल्या...थुलापन न्येतो चल...
नान्याशेटः- ह्हा ह्हा ह्हा ह्हा... चला पंत चला... ही वाघळं गेली आता झाडावर! आपण आपले घरी जाऊ..
........................................................................................................................
अश्या तर्हेच्या अनेक मिटींगा होऊन..ते नाटक ठरलं एकदाचं..आणि माझ्या गीतलेखनानी पावन होऊन.., आमच्या समोर श्टेजवर सुरु झालं. आता भरपूर कमी वेळात-बसलेलं ते नाटकं . ते प्रॉप्टींगशिवाय उभं तरी कसं रहाणार होतं? आणि असंही कोकणातली बहुसंख्य नाटकं...म्हणजे श्टेजवर केलेली..खरी खरी ..असं म्हणतोय हो मी पण! तर बहुसंख्य नाटकं,ही गावातल्याच हौशी लोकांनी मिलुन बसवलेली असतात. त्यामुळे दिवसाभरातली कामंधामं अटोपूनच तालमी होतात. त्यामुळे अभिनय जसा येइल तसा असतो,तशीच डायलॉग अठवण्याची तर्हाही!..काहि काहि तर रंगमंचाची शोभा वाढवण्यासाठी घेतलेल्या पात्रांना, डायलॉग असा म्हणजे असा विसरायला होतो..की त्या डायलॉगपेक्षा जेटलॉग परवडला. तर काहि काही हौशी टू सुपारीमेकर होऊ घातलेल्या ग्रामपातळीवर-खेळणार्या नटांना ----त्या गावातल्या नाटकातले डायलॉग ------ह्या गावात-येण्याचा आजार असतो. म्हणजे एकदा कट्यार मधल्या चांद'च पात्र .. जी अब्बाहुजुरच्या ऐवजी... "हे घ्या दोन किलो खजुर" म्हणालं..आणि तो खां साहेब पैगंबरवासी व्हायच्या बेताला आला. त्यामुळे पुढे त्या नाटकात वारंवार आणि मोठ्यांदी येणार्या चांद'च्या प्रॉमटरच्या आवाजाला वैतागून एक आज्जीबाई गर्दीतून .. "अरें मेंल्या तुला जळ्ळं कै आठवत नै तर त्या ब्याकवर्डं ला फॉरवर्डं ला तरी आणं...मंजे एकाचेच ऐंकू काय तें...!" असा आवाज दिला..आणि त्या चांदा'स ग्रहणच लागले नंतर एकंदरीत.. त्यात आमचं नाटकं हे समस्याप्रधान..आणि त्यातंही ग्रामसमस्या हा विषय..त्यामुळे पहिलाच शीन ग्रामपंचायतीचा लावलेला होता. मग आधी 'नमन नटवरा विस्मयकारा' ची पारंपारीक नांदी झाली. आणि (हातानी बाजुला करायचा पडदा सरकवून..) नाटक सुरु झालं.
दृश्यः- एक टेबल..त्या मागे एक खुर्ची..कोपर्यात एक पिंपं(पाण्याचे!) .. आणि आत खुर्चीवर एक (पेंगत)बसलेला आणि बाजुस (तसलाच!) एक ग्रामसेवक.. तिथे गावातल्या तक्रारदार माणसाची येंट्री..
त.मा.:-(खुर्चीवरचा पेंगेत आहे,आणि ग्रामसेवकंही तसल्याच अवस्थेत आहे हे पाहुन) "अहो... कुणी आहे का?" (पब्लिककडे बघत ) काय हो ही नोकरदार मंडळी? कामाच्या वेळेत झोपतात. कमाल झाली. आता यांना उठवायला काय भूपाळी लावायची का आपण?
(पब्लिक मधून आवाज..) भूपाली नको,येक कानाखाली लावा त्येच्या..कदी बी घेतो मेला! नाटकात सुद्दा! (यावर श्टेजवरच्या झोपेचं सोंग घेतलेल्यासह सगळ्यांचा हशा..)
त.मा.:- (खुर्चीतल्याला हलवून धक्का देत..) आहो उठा उठा..
खुर्ची:- (डोळे चोळत..) काय आहे? दुपारच्या ज्येवनाला वेल हाय अजून! तुमी पाच वाजता या बगू..
त.मा.:- अहो..पण अत्ता सकाळचे ११ वाजलेत आणि झोपताय काय? मग आमची कामं कोण करणार?
खुर्ची:- (शिपायाला..) ए,, यांची तक्रार लिहुन घे रे अर्जावर आनी टाक कपाटात... सरपंच आल्यावर बगू .. (पुन्हा झोपेत..)
त.मा. :- (अर्जावर कै तरी खर्डत..) कमाल झाली .. कसला हा बेभरोशी पणा.. या सरपंचास आंम्हीच निवडून दिले.. आणि हे घरात आरामात असतात.आणि इकडे ही अवस्था! जनतेसाठी काहि काही मनात नाही यांच्या. श्शी! (जायला निघतो..पण तेव्हढ्यात कागद बघत,ग्रामसेवक त्याला आडवतो.. )
ग्रा.से.:- ओ..... थांबा!
त.मा:- आता काय?
ग्रा.से.:- नाव काय हो तुमचा?
त.मा:- का? आता काय अपेक्षित किंवा अवडतं नाव नसेल,तर नाव-घेणार नाही की काय आमचं?
ग्रा.से:- हो...............त्ये काय लग्नात नवर्यामुलिचा उखाना वाटला काय?
त.मा:- आहो,मग तक्रार-घेण्याचा आणि नाव कुठलंही असण्याचा काय संमंध?
ग्रा.से.:- त्ये काय पन असू द्या हो...पन जे हाये त्ये नाव लिहा की सहिला.
त.मा.:- लिहिलय की मग?
ग्रा.से.:- हे असं?
त.मा:- अक्षर वाचनीय आहे बरं माझं,कृपया आपण आपले शिक्षण तपासा
ग्रा.से.:- ओ...मी धाव्वी फास हे...उगीच शाला काढायला नका लावू
त.मा.:- अरे गाढवा ,मग वाच की
ग्रा.से.:- मी वाचू?
त.मा.:- नाय तं काय तुझ्या पिताजींना बोलवायचं का मग आता?
ग्रा.से.:- माझ्या नको .तुमच्याच बोलवा आनी विचारा ह्ये असला कसला नाव ठेवलन तो!
त.मा.:- चांगलं 'श्रीरंग' ठेवलय हो नाव माझं, असलं'कसलं नाही ठेवलेलं!
ग्रा.से.:- हो काय? मग हा हातं "श्शी!" असा कशाला लिवलाव सहीत? आनी वरचं ह्ये वाक्य पन अर्जातलं वाटत नाय तुमच. जरा डोकं थपासा डॉक्टराकडनं.. हे घ्या आनी वाचा तुमीच!
त.मा.:- (कागदाकडे डोळे फाडून बघत!) अरे बाप रे! खरच हो.. माझीच चूक झाली. अत्ता देतो हं करेक्शन करुन! काय म्येलं डोकं माझं. मनात बोलत होतो. तेच गेलो लिहुन. तरी हिला सांगत असतो मी. सकाळचा जप जास्त करुन देत जा जरा मला..पण झाडलोटीच्या कारणानी लगेच हकलते ही मला देवघरासमोरनं..काहि काळजी नाही आजकालच्या बायकांना नवर्याची...श्शी!
ग्रा.से.:- अहो... आता आधी बोलून घ्या आणि मग लिवा.. नायतर फरत "श्शी" - करताल!
...................................................................................................................................
पब्लिक हसून हसून बेजार झालं .. अश्याच काहि तुफानी विनोदी प्रसंगांसह आणि दोन गाणी होऊन पहिला अंक पडला. आणि रघारामपंताच्या भाच्याचा भाव तिथेच नको तितका वधारला. मग पब्लिकमधली टवाळांची आणि हौश्यांची ग्यांग रंगपटाकडे,आणि काहि रसिक प्रेक्षक त्या रघारामपंताच्या भाच्याकडे धावले. त्याच्या सह्या घेणं सुरु झालं. हा भाच्चाही हुंबैहून केवळ नाट्यशास्त्रच नव्हे,तर रसिकप्रेक्षकसमवेतवार्तालाप आणि रसिकंनातेशास्त्रंही चांगलं नीट शिकून आलेला होता. त्यामुळे सही घ्यायला आलेल्या पब्लिकमधे पुरुष,महिला,युवक,युवती असा खास-भेदभाव न करता तो सगळ्यांना "एकाच पद्धतीचं हसू" सही सहं प्रेझेंट करत होता. (पण त्यातल्या काहि युवकांना आणि बर्याचश्या युवतींना,तो हळूच व्हिजिटींग कार्ड सरकवायला विसरला नाही लेकाचा!) त्यात काही जणं त्याला प्रश्नंही विचारत होते.
१:-(हा एक उत्साही बाप आहेव.) नै....मंजे फारच मिश्किल आणि विनोदी लिहिता हो तुम्ही? आमच्या मुलास पण शिकवाल काय?
भाचा:- (एकदम प्रोफेशनल आवाज आणि वाक्यांसह..) अहो दादा..ते शिकवून येत नाही. आधी मूळचं असं काही असावं लागतं माणसात
१:- असं असं...हो का? मग बघतो आमच्या मुलात काहि मुळच दिसत का ते? (जातो)
२:- (ही एक चाळिशीतली स्त्री आहे...) (लाडानी..)काय रे??? नाव काय तुझं????
भाचा:- हे घ्या कार्डं . त्यावर आहे.
२:-आय्या...हो का? बरं मला सांग..तिकडे मुंबैला नाट्यसमुह असेल नै का रे तुमचा?
भाचा:- हो आहे...मग?
२:- हम्म्म...वाटलच मला. मी गाते बरं का रे! तिकडे 'लागलं' कुणाला तर सांग हं.
भाचा:- बरं!...ठिक आहे!...बघतो!...या!...धन्यवाद!.. (बाजुच्या पब्लिकचं लक्ष नाही असं लक्षात येताच..हळ्ळुच!) आहो...त्या कार्डावर नंबर आहे बरं का माझा.
२:- हम्म्म्म्म... वाचला हं मी .. करीन बरं फो.....न! बाssssssssय!
३:- (ही एक [सुबक] कॉलेज युवती आहे.) यू आर टूssssssss गुड!
भाचा:- (मोहरुन) ओह! येस! थँक्यू... थँक्यू!
३:- योर ऑटॉग्राफ प्लीज!
भाचा:-(प्रोफेशनल बेरिंग सुटून..) व्हाय नॉट? व्हाय नॉट? शुअर शुअर! प्लीज हॅव अ सिट.
३:- ओह थँक्स. (ओढणी सावरून बसता बसता..) मुंबैला असता का तुम्ही?
भाचा:- हो! असतो . तिकडेच - असतो.
३:- बरं..बरं..बरं..बरं..बरं! कार्ड देता का तुमचं.
भाचा:- होssssssssssssssssssssss..., हे घ्या नं.
३:- अहो हळू! घाबरले की मी! बरं येते आता. 'धन्यवाद!'
भाचा:- का हो? निघालात लगेच?
३:- नाटक - सुरु झालं ना तुमचं...
भाचा:- क्काssssssssय?
३:- आहो...तिसरी घंटा नै का झाली...दुसर्या अंकाची!
भाचा:- हो....हो...हो...हो....हो....ठीक आहे. भेटा मग नंतर हं! (फोन'चा इशारा करत..) ग्लॅड टू मीट यू.बाssय!
३:- ओक्के! बाssssssबाय!
...........................................................................................
आणि मग तो दुसरा अंक सुरु झाला.. ह्यात आधी ४/५ पाणी समस्येचे शीन आणि २ गाणी होऊन्,शेवटाला बरीच ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन आल्याचा शीन होता..
(विंगेतून आवाज... "आमची कामे नीट करा...नायतर जागा खाली करा" ह्या आवाजानी बिथरून तो झोपाळखुर्ची आणि ग्रामसेवक दचकून एकदम झोपेतून जागे होतात!)
ग्रा.से.:- सायबानू...गावकरी मोर्चा घ्येऊन आल्येत हो. सांबाला आता
खुर्ची:- बरं बरं...ते बगतो मी . तू आदी सगल्यांला आत घे..सरपंच येतील येव्हढ्यात. मी सेट-करतो थोपरेंत सगल्यांना! का...य?
(ग्रामसेवक सगळ्यांना आत घेऊन जाजमावर बशिवतो..आणि मग सरपंचाची येंट्री होते.)
सरपंचः- काय मंडली? आज समदे येक होऊन आलात. काय झाला काय येवडा नक्की?
एक ग्रामस्थः- झाला काय मंजी? त्ये पलनीटकरांचा श्रीरंग आनी पर्वा मी पन यिऊन ग्येलो.. आमच्या तक्रारीच घ्येता काय नुस्त्या?
सरपंचः- आरे आरे बाबांनो ...वाचल्या मी तक्रारी..
एकः- मग काय लोन्चा घालताव त्येचा घरी? कामा केंव्वा करनार? मायला नल बसून धा म्हय्ने होत आले.पानी काय फुडच्या जन्मी देनार?
एक काका:- (नाकात बोलत!) नांयं तं कांय? घरोंघंर नंळ बसवून पेंप्रांत फोंटों छापुन घेंता. आणी पाणी आंल्याशिवाय कांय त्यां नळांवरं श्रांद्धे घांलांयचीं तुमचीं?
सरपंचः- ह्ये बगा मंडली, आता नल बसवायचा काम आमचा होता..तो आमी क्येला..क्का..य? तं ट्येपर्यावरच्या त्या धरनात पानी काय आता आमी सोडायचा का? त्ये काम तर द्येवबाप्पाचा नाय का? उगीच भांडता आमच्याशी हित यिऊन तुमी.
दोनः- ओ.............भांडता मंजे काय? घरात कामा नाय का आम्माला? म्येले...खोटी आश्वासनं दिलित कशाला?, की थुमच्या समद्यांच्या घरात पानी आनू आमी निवडून दिलित आमाला तर म्हनून!
सरपंचः- ..................
तीनः- नाय ता काय? म्येल्या नळाचा'च चित्र घिऊन निवडून आलास ना तू?
चवथा:- (तिसर्याला...) ए.......... तू आयड्या नको दिऊ त्याला.. फुडच्या वेळेला पान्याचा चित्र घिल तो..काय?
तीनः- म्येल्या तो काय माजा जावै हाय? तेवा आयड्या दिऊ मी थ्येला.
सरपंचः- अरे...अरे...भांडू नका ... आता पावसाला आलाच हाय का नाय तीन आटवड्यावर. थोडी कल काढा.
एकः- कल कशी काढनार? तुम्मी अज्जुन दोन/दोन ट्यांकर लावा ना व्हिरींना...मंजे झाला. येक तर त्ये तरी भ्येटू दे,नायतर ह्ये तरी! काय गाववाल्यानु?
सगळे:- बरोबर बरोबर!
सरपंचः- ठीक हाय मंडली.. तुमची मागनी मी वरपरेंत पोचवतो...
(ते)एक काका:- (आकाशाकडे पहात..) वंरं! ... हं... इंद्राकंडेंपण वशिलां कांय हों तुमचां?
सरपंचः- ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा... आहो थ्या इंद्राकडे नाही..पन तालुक्याच्या इंद्राकडे हाए ना. आता उद्याच ह्या आमच्या मान्साला पाठिवतो थकड,...कसा? मग? झाला का नाय आता तुमच्या सगल्यांच्या मनासारका?
सगळे :-(उठता उठता)... हो......... झाला झाला..
एकः- पन हा काम आता व्हायला हवा हो..., नाय तां फंरत आमी यायचो फुडच्या टायमाला..आनी तुमाला आमच्या समश्येचा फुन्ना पत्त्याच नसायचा, मंजे येवडा सगला करून परत तुमचा आपला थो म्हनतात तसा व्हायचा..आनी आम्मालाच प्रश्न विचारायचेत..की, (सगळे ग्रामस्थ मिळुन..) रामाची शीता....कोन?
( भैरवीत... इंद्राला पावसासाठी साकडं घालणारं समुहगीत....[आणि]पडदा..............)
.................................................................................................
अश्या तर्हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन..
बर्याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं...
==============================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०..
प्रतिक्रिया
17 Apr 2015 - 9:46 pm | यशोधरा
आला आला पुढचा भाग! आता वाचते :)
17 Apr 2015 - 10:52 pm | सूड
हा जेटलॉग काय असतो?
17 Apr 2015 - 11:33 pm | स्पा
जेट लाॅग म्हणजे दिवसभरात किती जेट आली गेली त्याचि नोंद असेल
17 Apr 2015 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा
आंssssss :'( :'( :'(
मग काय पायजे थिते???? :-\ सांग ना पांडूssss!
दुष्ट!!!!!
17 Apr 2015 - 11:45 pm | स्पा
जेटलॅग असावे कदाचित
18 Apr 2015 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा
तेच म्हणायचय मला. धन्यवाद रे पांडोबा!
संपादकः- ते जेटलॅग करा हो जेटलॉग ऐवजी.. आणि सूडुक्,पांडोबा आणि माझे हे सर्व प्रतिसाद काढून टाका. प्लीज. :)
18 Apr 2015 - 1:36 am | सूड
त्याने काय होईल?
18 Apr 2015 - 1:45 am | अत्रुप्त आत्मा
नाय ना कळत तुला ... मग बस तसाच . कै फरक नै पडत एखाद वेळेस नाय कळल तर!
18 Apr 2015 - 7:17 pm | टवाळ कार्टा
जौद्या गुर्जी...तो सध्ध्या असाच सगळ्यांच्या मागे हे काय ते काय असे विचारत फिरत असतो :)...त्याच्या वरताण सुडींण भेटली बहुतेक =))
17 Apr 2015 - 11:36 pm | स्पा
जेट लाॅग म्हणजे दिवसभरात किती जेट आली गेली त्याचि नोंद असेल
18 Apr 2015 - 12:05 am | यशोधरा
ह्या भागात ड्रेमवाली, घरचे, गुर्जी आणि काकू का नाय्येत? :|
18 Apr 2015 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा
गुर्जी आणि काकू तर या गावातले नाहिच आहेत. आणि बाकि घरच्यांचा तसा काहि सहभाग यात निर्देशीत केलेला नाही.. पुढच्या भागात कदाचीत तो नाट्यचर्चेच्या रूपानी येइल.
18 Apr 2015 - 6:57 pm | प्रचेतस
एकदम चटपटीत संवादांनी भरलेला धागा दिसतोय.
सध्या अजिंठ्यास असल्याने तूर्तास ही पोच.
सवडीने धागा वाचून प्रतिसाद देईनच.
18 Apr 2015 - 9:13 pm | जुइ
मजा आली हा भाग वाचताना. ग्रामीन भागातील नाटकाचे छान चित्र उभे केले आहे.
18 Apr 2015 - 9:35 pm | स्पा
एक गोष्ट जाणवतेय ती म्हणजे मुळ कथे सोबत कोकणातली संस्कृती , माणसे, वातावरण सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभे राहतेय
क्लास!
पुस्तक व्हायलांच्च्च्च हवे