गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३४ (विवाह विशेष...)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
11 Mar 2015 - 2:46 am

मागिल भाग..
अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!"
पुढे चालू...
==================================

आणि मग,झाली...अखेर ती बैठक की कायशी म्हणतात ज्याला जुन्या श्टाइल मधे.., ती बैठक झाली. फक्त उलट आश्चर्य म्हणजे, बाबां ऐवजी आज्जीच आमच्या विवाहास 'कमी वय' म्हणून 'अजुन चांगली(?) दो.......न वर्ष जाऊ देत,मग करा लग्न' असा आक्षेप घेत होती. पण शेवटी काकानी आज्जीला. "आगो मायो माझे... हा नुकत्याच पंचविशितला आहे. म्हणजे फार काहि घाइ होत नाहिये तुला वाट्त्ये तशी . आणि त्या पोरिचे म्हणशील तर मी जेव्हढे तिला ओळखले आहे,त्या नुसार तिचं अत्ता जे वय आहे..ते जन्म वय आहे फक्त. बाकि पोर डोक्यानी आपल्या आत्मू पेक्षा चांगली ५ वर्षे मोठी आहे. कळ्ळं???, आणि आपली परिस्थिती काय इतकि हलाखिची आहे का? कि जरा कुणाचा भार पडला कि डबघाइला आलो...अं...?" यावर आज्जी , " हम्म्म्म...ठिक आहे मग. आणि खरेच तू म्हणतोस तशी असली ना ती पोर तर मग होऊच दे . नैतरी आपला आत्मु तसा खुळाच आहे की! सुधारला थोडा ..,तर लवकर(च) सुधारेल तिच्या नादानी!" असं म्हणून निष्कारण शेवटी मला दगड मारलन. ( :-/ )

ही बातमी आमच्या वेदपाठशाळेतल्या मित्रगोटात न फुटती तरच नवल होतं. माझं (हे) लगिन ठरलं ,म्हणजे जणू काहि मी प्राचीन काळातल्या सारखं 'तिजंला रथातून पळवून' वगैरे आणतोय अश्या आविरभावात मित्रांचे घरी फोन येऊ लागले. एकदा तर एका कामात सगळ्यांनी मिळून मला दुर्गे-दुर्घट-भारी...तुजविण संसारी ह्या आरतीचं विडंबन हताशी घेऊन असं काहि छळलं की मी खरच एक दोघांवर चिडलो.

वैजु तुजविणं आत्मू दुर्मुखं संसारी,असारं वाटे जगं हे तुजविणं त्या-भारी।
यारी यारी आमची किती पुरते सारी,तारी तारी तूची आत्मू ला तारी... ॥भिजंगौली भिजंगौली...
भिजंगौली भिजंगौली... ये आत्मू-सदनी...,लवकर लवकर त्याला दे तू सं-जिवनी...भिजंगौली भिजंगौली॥धृ॥

असं शेवटी तिच्या गावाचं नाव(भिजगहुली..)-यातलं -भिजंगहुलीगाववाली...अश्या शब्दसंचयाचं शॉर्ट(मारलेलं) ,ते भिजंगौली...नामक-व्हर्जन..धृवपदाला जोडून,त्याची पुरती वाट लाऊन टाकली. आणि पुढे कहर म्हणजे ...

आत्मूसाठी पहाता-तुजंऐशी नाही,मनात असता तू-ची बोलतो का काहि?
वरती विवाद करितो पण त्याला घाई,सरते किशोर वयं हे-उरली लवं-लाहि....॥भिजंगौली भिजंगौली..॥१॥

असं करून माझा साद्यंत पंचनामाच केला जणू...पुढे मग मात्र अवरा आवरी सावरा सावरी केली थोडी...

प्रसन्न वदने प्रसन्न दे त्याला आशा,तुजविण कोणं- ही त्याला शिकविलं -ती भाषा?
अगं ए..तुजं हाती त्या आत्म्याची रेषा,आंम्हाला नाहि हो नुसत्या चौकश्या॥ भिजंगौली भिजंगौली..॥२॥

अशी तिला..(म्हणजे आरती'ला..) वाटेला लाऊन मोकळे झाले हलकट मेले सगळे....त्या दिवशीचा त्या कामातला यजमानंही ,आंम्ही नाश्ट्याला मधे-थांबलो असताना 'हे काय चाल्लय???' म्हणून तक्रारीला आला नाही. नंतर मला कळलं ,की त्याला सदाशिवदादाच्या नकळत कोणितरी फूस लावली होती..आणि तो हि या आनंदी गोंधळात सामिल झाला होता.

मी मात्र मनात विचार करत होतो, की हे काम कुणाचं??? कारण आमच्या चालु-टीम मधला तर कोणि म्हणजे कोणिही कविवृत्तीचाहि नाही आणि वृत्ताचाहि नाहि. मग हे डोकं कुणाचं.? पण त्यात एक दिवस दुपारि घरी निवांत पडलो असता माझा परमंमित्र किश्याचा फोन आला..आणि अभिनंदनाचे बोलता बोलता मधेच मला.."आता आंम्हाला कळलय तू न सांगताहि.." मी मधेच, "अरे मी कळविणार होतोच्,पण निश्चिती झाल्याशिवाय कसं...?" म्हणे पर्यंत ..परत मला तोडत.." पण तुझ्या बाकिच्या तिथल्या मित्रांना सरळ सांग ..नायतर कोणि तरी चिडवेल तुला ..आणि ओवाळेल आरती एखाद दिवस तुझी -खतरनाक!" असं बोलून जाणिवपूर्वक स्वतःचे नॉक खुपसता झाला. तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.. की आरती रचून यांना पुरवणारा हाच तो हरामी मेला. कारण पाठशाळेत मंत्रांची विडंबनं, अगदी बेमालुम उतरवणारा माश्टर हाच होता. म्हणजे पंचसूक्त पवमानातल्या आखुंची देवदेव सोमा चं राखुंडी दे रे दे रे सोमा (दात घासायला!) हे... तर सप्तशतीतल्या -जानता जानता वापि बलिपूजां यथाकृतम चं, आमच्यातल्या झोपाळू जोश्यावर -जागता जागता झाली इती-पूजां जोश्या कृतम असं करून-मारणारा तो ...वि डंबक स्वामी! मी त्याला मग.."लग्नाला आपण स्वतःच येणार की विडंबन पाठवताय...आपलं?" असा उलट दगड हाणल्यावर राक्षसासारखा खदाखदा हसला. पण काहि झालं तरी मी किश्या शिवाय सोडमुंजिलाही उभा रहाणार नव्हतो,तर लगिन तर दुरचीच बात. किश्या म्हणजे पाठशाळेतल्या माझ्या अट्टल मित्रांपैकी एक. शाळा सुटताना मी त्याला "मेल्या बोंबल्या...भेटशील ना रे परत.........???" म्हणून जी मिठी मारुन रडलो होतो. की त्यानी मला तितक्याच जोरात भेटत.. पाठित एक जोरात थाप मारल्या सारखं करून...सोडवून घेतलं...आणि जाता जाता.."आत्म्या हराम्या...रायगडातून देवगडात येश्ट्या येतात...लक्षात ठेव हो.." म्हणून मोठ्यांदी रडत रडत ओरडत गेला होता.

मग घरून सगळ्यांना रीतसर आमंत्रणे वगैरे पाठवणे सुरु झाले. अगदी मुहुर्त होणे.ग्रामदैवतांना पत्रिका ठेवणे असे सर्व सुरु होऊन आमच्या त्या घराला आणि पुढे पडलेल्या मांडवाला...परिपूर्ण मंगल सोहळ्याचे रूप आले.चारही बाजुनी आम्रपल्लवयुतं झालेला ,तो मांडवं..त्याच्या एंट्री-ला केळीचे घड आणि केळफुलासह लावलेली ती दोन खांबी कमान. त्याखाली ते नित्य सारवून आणि रांगोळ्या घालून -रेडी-केलेलं आंगणं. असा माहौल होऊन बसला. मग समावर्तनाचा..म्हणजे सोडमुंजिचा दिवस उगवला.. आणि त्याच सकाळी सकाळी माझी लाडकी काकू,सदाशिवदादा, आणि त्यामागुन किश्याही आपल्या लव्या-जम्या सह डेरे दाखल झाला.त्यात इतर मित्र-मंडळिही जमत होतीच. पण जसे आमचे नातेवाइक आणि सखारामकाकाचे खासमखास मित्र येऊ लागले,तशी मग आमच्या त्या घराची खिडक्या दारंही हसू लागली. जुनाट झालेल्या कौलांमधूनंही आनंद बरसू लागला. आणि विवाहाच्या आठवडाभर आधी आमचं घर एका नविन नात्याच्या स्वागताला तयार झालं. एकतर कुठेही विवाह .., ही घटना निश्चितच आनंददायक..पण जर त्यात तो खेडेगावातला विवाह असेल..तर आजंही सर्व गाव नाही म्हटलं,तरी किमान त्या घराच्या आजु बाजुची सगळी घरं तरी त्यात मनानी सहभागी असतात. मग लग्नाचं घर..हे मेन पीच असतं आणि आजुबाजुची पाचसहा घरं हे त्या पीच भोवतीचं ग्राऊंड...(त्यांच्यात हेवे दावे असले तरी!)

मग पहिली आली सोडमुंज! पण ...हा संस्कार म्हणजे काकाच्या म्हणण्यानुसार केवळ-गृहस्थाश्रमाचा दरवाजा..त्यामुळे त्याचे विधी करण्यापेक्षा 'उपदेश-सांगणे' महत्वाचे!. मग आमच्या सगळ्या कार्यक्रमाची धुरा आमच्याच सदाशिवदादावर सोपविलेली असल्यामुळे, काकानी त्याला सोडमुंजीपासून ते विवाहापर्यंत सगळ्या विधींमधे कशाकशाला महत्व द्यायचं? टाळायचं काय? सोडायचं काय? शिवाय नविनंही त्यात कुठे काय अ‍ॅड करायचं..?,इत्यादी सविस्तर चर्चा करुन सांगितलन. त्यादिवशी सदाशिवदादा आणि किश्यानी काकाच्या सांगण्यानुसार माझ्याकडून ती सोडमुंज-करवून घेतली. हो करवूनच. कारण एकिकडे त्याचे उद्देश सदाशिवदादा संस्कृतातून-म्हणत होता..आणि दुसरिकडे काका आणि किश्या ,मुद्दाम सगळ्या आलेल्या लोकांना बोलावून त्यांच्यादेखत माझ्याकडून ते उद्देश-आदेशा सारखे पढवून घेत होते.
काका:- "म्हण..आत्मू..म्हण.,सगळ्यांच्या समोर-मोठ्यांदी,..'मी अश्वक्रीडा..म्हणजे आजच्या काळातली ती तुझी बाइक...ती चाळे करीत यापुढे आजच्या दिवसापासून चालवणार नाही... मी द्यूत खेळणे...म्हणजे (सह)जीवनाचा-जुगार होइल..अश्या तर्‍हेनी कुठेही कध्धिही वागणार नाही. .. न सांगता प्रवासाला किंवा अज्ञात स्थळी जाणार नाही.'... " आणि हे चालू असताना मधे किश्या मेला हरामी..."म्हण...जलक्रीडा...म्हणजे पावसाच्या पाण्यात-सुद्धा खेळणार नाही,मग नदी समुद्र..तर लांबच! "... "गबाळा वागणार नाही..दर तीन दिवसाला दाढी करेन..रात्री उशीरापर्यंत मित्रांबरोबर रामाच्या देवळाबाहेरील पारावर चकाट्या पिटत बसणार नाही. ..सकाळी वास्तुशांतीला-जाताना नेसलेलं धोतर..संध्याकाळी कुणाच्या वांङनिश्चयाला(साखरपुड्याला)-जाताना , तेच उलट करून नेसणार नाही!" असली वाढीव कलमे-त्यात टाकत होता. उपस्थित नातेवाइकंही ही असल्या तर्‍हेची जबानी-घेतल्यासारखी सोडमुंज प्रथमच पहात होते. मग सगळे विधी संस्कार काकाला हवे तसे "कडक" पद्धतिनी झाल्यावर मला जरा सुटल्यासारखं वाटलं. आता लग्नानंतर मी काय ठरवून वाइटच वागणार होतो का? मग ही परेड कशाला? असले विचार माझ्या मनात येत होते.मग सदाशिवदादाला दुपारच्या जेवणानंतर मी गाठलं ..तेंव्हा तो बोलता जाहला.."अरे आत्मू..तुझा काका आहे ना, तो पक्का प्रबोधनाचा जीता जागता..करता करविता संत आहे रे संत! . धर्मातलं चुकिचं तो सगळं टाळतो..पण त्याचे जागी आवश्यक आणि काळाला लागू पडणार्‍या मात्रा शोधण्यात आणि त्या योग्य जागी लावण्यात मात्र तो , आपल्या शास्त्रीपंडितांचाही बाप आहे बाप! ..तेंव्हा अत्ता विचार करू नकोस. आणि लक्षात ठेव की कसोटीच्या क्षणी हे तुझ्या काकानी करविलेले असले संस्कारच तुझ्या कामी येणार आहेत."

शेवटी एकदाची ती सोडमुंज जाहली...आणि मग ग्रहमख वगैरे पार पडल्यावर तो विवाहाच्या आदला दिवस उगविला.. वांङंनिश्चयाचा! आता जिथे लग्न लावून घ्यायचं..तो मुलिचं घरं..नामक प्रकार अगदीच शेजारच्या गावातला असल्यामुळे...दुपारची जेवणे वगैरे अवरून..आमचे हे छोटे वर्‍हाड दोन मोठ्या - मिनी ट्रकातून पल्याडच्या गावला निघालं. आंम्हाला मिनिबसच काय? अगदी महामंडळाची येश्टी-करणं जरी परवडणारं असलं..तरी आमच्या काकाश्रींच्या नियोजनाबाहेर पाऊल टाकायची कुणाची काय टाप होती? काकाचं म्हणणं म्हणजे-"बडेजाव,मिरवामिरवी याच्यावर वायफळ खर्च करण्यापेक्षा जस्तीत जास्त साध्या आणि सोप्या पद्धतिनी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत.आणि मग वाटलच..कुणाला तर त्यानी तो वर-पैसा एखाद्या सामाजिक हितवर्धनाचे काम करणार्‍या संस्थेस दान करावा..आणि समाज ऋणातून मुक्त होण्याचं खरं पुण्य (वाजवून घेऊन!) गाठिशी बांधावं..अगदी कोर्टम्यारेज केलं...तरी!"

मग आस्ते आस्ते..आंम्ही डांबरी रोड सोडून त्यांच्या गावच्या त्या छोट्या लालमातिच्या रस्त्याला लागलो. आणि जरावेळानी ग्रामपंचायत भासावी, अश्या एका जुनाट घरट्या-जवळ...मु.पो. भिजंगहुली..लो.सं.-१०३६... ,अश्या दिसलेल्या त्या हिरव्या पाटीजवळ थांबलो. हे तर आमच्या गावाहुन लहान गाव..पण मोठं सुंदर आणि टापटीप होतं. अगदी सार्वजनिक नळंही जागच्या जागी होते...पाणि येत होतं की नाही? ते भगवंतास ठाऊक..पण होते...असल्यापासून तिथे ..दिसत तरी तसच होतं. मी त्याच नळकोंडाळ्या जवळ गाड्या-रिकाम्या होइपर्यंत ताटकळत होतो..पण तेव्हढ्यात आमचा किश्या आणि मागून आमच्या भट ग्यांग मधली पाच पंचविस मित्र मंडळी..कुठून तरी एका ब्यांजोवाल्याला हताशी घेऊन तिथे ओरडत गिल्ला करतच आली. आणि काका काय म्हणेल? इत्यादिची अजिब्बात पर्वा न करता मला खांद्यावर घेऊन त्या ब्यांजोवाल्याला ,चालू शिनुमातली गाणी वाजवायची ऑर्डर देऊन..माझी एकंदर वरात-काढायला सुरवात केली मेल्यांनी! एकिकडे मी मनातून सुखावत होतो...पण दुसरीकडे काका कोणत्याही क्षणी येऊन हे सगळं-बंद पाडेल..आणि दोस्तांची प्रचंड नाराजी होइल ,असं भयंही मला वाटत होतं. पण त्या दिवशी त्या ब्यांजोवाल्यालाहि नेमकं "तू...मेरी जिंदगी है..तू...मेरी आशिकी है...तू ही प्यार तू ही चाहत्,तू ही बेखूदी है...तू...." हे गाणं का वाजवायला सुचलं? कोण जाणे...? आणि मग काका मधे येऊन यांच्यावरचा राग त्याच्यावर काढत...त्याला एकदम.. "आरे फोकनिच्या... हे सुतकी तोडीचं गीत काय वाजवितोस अश्या प्रसंगी...? जरा ह्या प्रसंगी म्याच होइल असलं काहितरी खरड तुझ्या त्या तारा-यंत्रावर!" असं सुनवून गेला. मग काय? हा हरितं कंदिल हाती मिळाल्यानंतर ,आमच्या दोस्तं कंपनिनी त्या वाजविणार्‍यां समोर, तोंडात चांगल्या नोटाबिटा घेऊन नाचवित नाचवित आमची वरात...दोन गल्या पलिकडे असलेल्या ,त्यांच्या घरापर्यंत नेली.

मग आंम्ही सगळे त्या ग्राम पंचायती पासून निघालेले-पदयात्री आमच्या सगळ्या माणसांसह त्यांच्या आंगण्यात मांडवाखाली विसावलो. आणि जरावेळानी तिथेच (फक्त..) वांङनिश्चय कुठे होणार नक्की म्हणून मीच नजर फिरवू लागलो..तर आत ओटीवर एका खांबाला पाठमोरे निवांत टेकुन बसलेले एक वयोवृद्ध मला दिसले. मी म्हटलं...कोण असेल हे? पण माझा अंदाज तसाही चुकलेला नव्हताच. ते होते चक्क माझे गुरुजी! मग मला नंतर कळलं,की काकानीच ही सरप्राइज गिफ्ट..माझ्यासाठी नियोजित करून ठेवलेली होती. कारण गुरुजी तसे कधिही कुणाच्याही लग्नांना आदल्या दिवशी तर सोडाच,पण मुख्य दिवसालाही सकाळपासून वगैरे हजर रहात नसत. आलेच तर फक्त मुहुर्ताला यायचे,आणि केवळ आशिर्वाद देऊन...पुन्हा परत.कारण पाठशाळा कधिच -तशी सोडायची नाही..हे जिवनमूल्य! मग हा चमत्कार घड्ला कसा? तर त्याला काकू फक्त कारणीभूत..दिसत असली,तरि... पुढचा सगळा खेळ काकानीच -खडा टाकून काकु कडून घडवून घेतलेला होता. त्यामुळे कर्म काकुचं असलं तरी गुरुजिंना शाळेतून-बाहेर काढणे..याचा कर्ता काकाच होता. (शेवटी ते त्या संघटनेचं जितं जागतं व्याकरणच कि हो! ) काकूनी मग गुरुजिंना , "यावेळी तुम्ही तिकडे संध्याकाळला मला दिसला नाहीत्,तर मि तशीच रात्रिच्या गाडीने परतेन!" असा जवळ जवळ दमच भरला होता! मग गुरुजी न येऊन करतात काय बिचारे?

मग मात्र माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी धावत धावत गेलो, आणि तिथे विसावलेल्या माझ्या गुरुजिंच्या पायावर डोकं टेकवून आनंदाश्रूंना वाट करवून देता झालो. मग मला प्रेमानी पाठिवरून हात फिरवीत..गुरुजिंनी उठवलं..आणि मला " हे बघ आत्मू..आता तुझी एका सर्वस्वी नव्या जीवनाला सुरवात होणार आहे. तेंव्हा यालाही जर जिंकायचं असेल,तर याला आपल्या शिक्षणातली-संथा-मानायला लाग... सहजीवनातल्या अनुभवातून दरंरोज-मिळणारी संथा...तुकड्या तुकड्यानी मिळवायची,आणि वाक्य वाक्य जोडून घोकत रहायचं रोज..म्हणजे एकेक अध्याय मनात पक्के उतरत जातात. परिक्षा तर दररोजच होत असते.आपलीहि आणि आपल्या सहचारिणीचिही! तिथेही न भिण्याचा नियम पाळायला शिकलं,की मग मार्क कमी जास्त कसेंही पडले,तरी माणूस त्यात फेल-जात नाही....क्का......य?"

हा उपदेश होता की आशिर्वाद? हे त्या क्षणी कळलं नाही मला. पण मला आज मिळालेली ही आयुष्यातल्या महत्वाच्या टप्यावरची ,एक अत्यंत मौलिक आणि शाश्वत संथा आहे..हे मात्र त्याक्षणापसूनच उमगायला लागलं होतं. मी ती वाक्य ऐकत गुरुजिंसमोर डोळे मिटून तसाच बसलेलो होतो.आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन.
============================
क्रमशः............
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८ भाग- २९ भाग- ३० भाग- ३१ भाग- ३२ भाग- ३३

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

11 Mar 2015 - 3:28 am | रामपुरी

मस्त चालू आहे

चौकटराजा's picture

11 Mar 2015 - 5:09 am | चौकटराजा

बुवा , तुमच्यात साहित्य गुण नक्कीच आहेत ! वा !

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 5:46 am | अत्रन्गि पाउस

अतिशय सुरात लागलेले निषादाचे जवारीदार तानपुरे ऐकल्याचा भास होतोय ...
वा बुवा !!!

खटपट्या's picture

11 Mar 2015 - 5:52 am | खटपट्या

जबरी चालू आहे. लवकर लवकर येउद्या...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

म.....स्स्स्स्स्तं!!!!

प्रचेतस's picture

11 Mar 2015 - 9:08 am | प्रचेतस

हा भागही मस्त.
कथानायकाच्या जानवश्याची सोय कुठे केली होती ते मात्र कळले नाही. बहुधा पुढच्या भागात येईल.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2015 - 9:23 am | अत्रुप्त आत्मा

खेडेगावातलि लग्न... आणि त्यांची व्यवस्था याचं इनपुट वरती लेखातच आलेलं आहे. आणि त्यात 'वेगळी' व्यवस्था ,कुणाचिहि नसते.

झकासराव's picture

11 Mar 2015 - 9:27 am | झकासराव

वाह!!!!

चित्रदर्शी वर्णन... :)

रेवती's picture

11 Mar 2015 - 4:24 pm | रेवती

:)

स्पा's picture

11 Mar 2015 - 5:08 pm | स्पा

वाचितोय

किसन शिंदे's picture

11 Mar 2015 - 6:25 pm | किसन शिंदे

बरेच ऐकले होते तुमच्या या भागाबद्दल म्हणून वाचायला घेतला आणि प्रचंड आवडलाही!! :)

प्रचेतस's picture

11 Mar 2015 - 7:08 pm | प्रचेतस

कुठे ऐकले होते म्हणे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2015 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

ह्म्म!! पुस्तक लिवाच !!

दुर्गेच्यानिमित्ताने चांगली आरती करून घेतलीत आपली हे लक्षात आले. आत्मुस्तुती दुसरं काय!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2015 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा

कंजुस ,
आपल्याला असं मनापासून वाटत असेल, की ही मी माझि "हौस" भागवून घेत आहे... तर , आपल्या आ'कलन शक्ति ला माझा नमस्कारच!
=======================
आत्म स्तुति या शब्द वापरामुळे डोकं आपटुन घेतलेला- अतृप्त!

कंजूस's picture

12 Mar 2015 - 4:57 pm | कंजूस

नकानका हो असे डोके आपटु आमच्या आ'कलन शक्तीपुढे.आणि लेखनही आ'वरू नका असा या पामर वाचकाचा आ'क्रोश आहे .ललित लेखनातून उगाच तर्क काढणे नकोच.

साती's picture

19 Mar 2015 - 12:49 am | साती

आपल्या शिक्षणातली-संथा-मानायला लाग... सहजीवनातल्या अनुभवातून दरंरोज-मिळणारी संथा...तुकड्या तुकड्यानी मिळवायची,आणि वाक्य वाक्य जोडून घोकत रहायचं रोज..म्हणजे एकेक अध्याय मनात पक्के उतरत जातात. परिक्षा तर दररोजच होत असते.आपलीहि आणि आपल्या सहचारिणीचिही! तिथेही न भिण्याचा नियम पाळायला शिकलं,की मग मार्क कमी जास्त कसेंही पडले,तरी माणूस त्यात फेल-जात नाही....क्का......य?">>

सुरेख!