गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३१

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
26 Feb 2015 - 12:00 am

मागिल भाग..
फक्त तो जेव्हढा याबाबतीत सशक्त होत जाइल्,तेव्हढं हे फळ आपल्याला अधिकाधिक खणखणीत आणि वाजवून मिळेल.
================================

अध्ययन आणि खरेखुरे गुरुसंस्कार याच्या सहाय्याने आंम्ही मुलं खरोखर मोठी होत होतो.आणि अपरिहार्यपणे पाठशाळेतून बाहेर पडायचं वर्षंही जवळ येत चाललेलं होतं. आंम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला तो एक अत्यंत जड अवघड दिवस असे. अगदी माझ्या चार महिने आधी,असेच ३ विद्यार्थी अध्ययन संपवून शाळेतून बाहेर पडले होते. त्यात ती जोडगोळीही होती. श्रीराम व जयराम . काकू तर हे दोघे जाणार त्या वेळी तिला ते सहन होणार नाही,म्हणून जी वाडित जाऊन बसली ती काहि परत यायला मागेच ना. गुरुजिंनाही असे प्रसंग जड जायचेच. पण गुरुजिंची त्यावर तोड म्हणून..,स्वतःची अशी काहि तत्व तयार केलेली होती. त्यामुळे ते स्वतःला सहज आवरु शकत.

माझ्या शेवटच्या वर्षातली ती दिवाळीची सुटी संपवून मी पाठशाळेत जसा परत आलो..तशी माझी अगदी पहिल्या दिवसापासून ती शाळा सोडून जाण्याच्या प्रसंगानी झोप उडवायला सुरवात केली. एखाद्याला उरलेले सहा महिने हा काळ भरपूर मोठ्ठा वाटेल. पण ज्या एका जगात आपण अत्यंत मायेच्या माणसात इतकी वर्ष साथि सवंगड्यांसह घालविली ते जग, "आता कायमचं सुटणार" ही जाणिव ,हातात असलेला वेळंही अत्यंत वेगवान वाटायला लावणारी असते. तशात आमच्या शाळेतलं वातावरणं हे कमालीचं घरगुती होतं. त्यामुळे इथे आलेल्या विद्यार्थ्याला साधारण पहिले दोन महिने उलटले,की त्या ठिकाणी वेगळं नवं असं काहि वाटायचच नाही. वळचणीहुन दुपारच्या सरत्या उन्हात जाणार्‍या बकर्‍या..गुरांपासून ते संध्याकाळी अंगणात येऊन चिवचिवाट करणार्‍या चिमण्यांपर्यंत सारं काहि आपलं,नित्य परिचयाचं! माझा शाळेतल्या जिवलग मित्रांपैकी जो अत्यंत बिलंदर म्हणून प्रसिद्ध होता,तो किश्याही शाळा सोडताना, काकू समोर नको..,म्हणून गोठ्यामागे जाऊन ढसाढसा रडला होता. मी त्याला अवरायला गेलो..तसा मला म्हणतो "आत्म्या...मायला ,बापानी ह्याच शाळेत कशाला रे टाकलन शिकायला..??? राग येतो त्याचा राग..! सालं..माझी खरी आईस माझ्याजवळ नाही, ही जागा-तशीच मोकळी राहिली असती रे..दुसर्‍या एखाद्या पाठशाळेत.. तर ते चाललं असतं रे मला.....! आता,त्या जागी आलेल्या या मायेला कसा सोडून जाऊ रे मीsssss!!!? " असं म्हणून अक्षरशः गोठ्यामागल्या भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागला... किश्याची ही दुसरी बाजू माला चांगली ठाऊक होती. तरिही मी त्याला आवरु शकलो नाही. शेवटी हेमंतादादा.. त्याची बॅग घेऊन बाहेर आला. आणि बोलावलेल्या रिक्षात किश्याला त्यानी अगदी मायेनी घट्ट पकडून समजावून सांगत सांगत अंगणातून नेलं. श्रीराम आणि जयराम तर अधीच आत जाऊन बसलेले होते.

काकू कुठेही दिसत नव्हती. गुरुजी मात्र सगळं मनात ठेऊन हसतमुखानी या तिघांना निरोप द्यायला रिक्षापर्यंत आलेले होते. हातात थोडा गुळ आणि खोबरंही होतं. ते तिघांच्या हतावर ठेऊन..त्यांना "पोरांनो,आता पुढच्यावर्षी आपल्या शाळेच्या अनुष्ठानाला भेटा रे परत ! " असं ते त्याच हसतमुखानी म्हणाले. आणि रिक्षावाल्यानी खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्खटाक करून रिक्षा सुरु केल्यावर..ती रिक्षा जशी बाहेर वळली तितक्याच सहजतेनी गुरुजिही घराकडे वळले. मी आणि सदाशिवदादा मात्र रिक्षाचे दूर जाणारे सूर ऐकत काहि क्षण कवाडी जवळच तसेच उभे ठाकलेलो होतो.त्यात हेमंतादादा मागे येऊन कधी उभा राहिला हे देखिल आंम्हाला कळलं नाही. मग तो आणि सदाशिवदादा ,सदाशिवदादाच्याच त्या येमेटी वरून रिक्षापाठी श्टँडकडे गेले,आणि गुरुजिंनी माझ्यावर, काकुला वाडितून बोलावून आणायचं काम सोपवलं. मी वाडित गेलो..तर काकू विहिरि मागच्या एका ओंडक्यावर गप्प गप्प बसलेली होती. मी तिला जवळ जाऊन "काकू...तू चल ना घरी, आता गेले ते रिक्षातून.." असं म्हणालो. तर तीनि , "म्हायत्ये रे मला ..मी पाहिलं इकडनं" असं काहिसं म्हणली आणि पुढे मला, "तू जा...मी येते पाच मिनिटानी" असं सांगायला लागली. पण मला गुरुजिंनी "तिला वाडितून आण,एकटा येऊ नकोस परत.तुझं ऐकते ना ती! म्हणून तुला पाठ्वलय...जा!" असा जवळ जवळ आदेशच दिलेला होता. त्यामुळे मी माझ्या नकळत काकूला, " तू नै आलीस तर मी पण इथेच बसेन..तुझ्याशेजारी!" असं बोलून गेलो. आणि तिथेच खाली पाचोर्‍यात फतकल मारुन बसलो देखिल. मग काकूनी देखिल , "तुझ्या गुर्जींना बरोब्बर कळतं,कुणाला कुठे पाठवायचं ते!...चल." असं म्हणून माझं मनगट पकडून भराभर घराकडे यायला लागली. वाटेत मी तिला , "पण तू इकडे वाडित का येऊन थांबलीस?" असं विचारल्यावर मला ती म्हणाली, "अरे आत्मूबाळा...पोटचं पोर असलं,तर ते खरोखर घर सोडून गेलं,तरी परततं कधितरी. पण ही तुम्हि पोरं परत यालच याची खात्री काय रे तितकिशी? गेलात तुमच्या जगात...की गेलात!" असं म्हणाली आणि मी हे वाक्य सहन न होऊन तिथेच संतापून रडायला लागलो. त्यावर ती परत " अरे मेल्या तुला नैय्ये हो म्हणत मी..तू मला पोहोचवल्याशिवाय जाशील का?छळू मेला...पुस ते डोळे" असं बोलली. मग मी लगेच (आनंदानी ) तिला "तू ही पुस तुझे" असं म्हटल्यावर, माझ्या पाठित एक(नेहमीचा..) धपाटा घालून... "हलकट..!कळतय मला ते.." असं म्हणून हसायला देखिल लागली. गुरुजि मात्र आमची ही एकमेकाची चाललेली "शाळा" ,पडवीच्या मागल्या दारातून हळूच बघत होते. आणि जसे आंम्ही मागच्या आंगण्यात आलो. तसे मला , "आत्मू...(छान हो..छान!..)असा हतानी दाखवित.." चला..पाठाला बसा जाऊन बाकिच्यांबरोबर" असं फर्मावून आत गेले सुद्धा. मी मात्र आपला..'गुरुजि कसं आपल्यालाच महत्वाच्या कामगिरीवर निवडतात' ..या आत्मानंदात पाठाला जाऊन बसलो देखिल.

झालं...तो दिवस सरला. आणि माझे माझ्या सहपाठकांबरोबर 'शिल्लक अध्ययनाच्या संथा घेत रहाण्याचे' काहि अखेरचे दिवस सुरु झाले. आणि दिवसच म्हणायला हवं त्यांना . कारण, आमच्या समुहाचा सर्व अभ्यासक्रम मे महिन्याच्या सुटी आधी तीन महिने संपणारा असाच शिल्लक राहिलेला होता. मग आंम्ही मुद्दाम हळूहळू अध्ययन करतोय ,हे जसं गुरुजिंच्या लक्षात यायला लागलं..तशी त्यांनी एक दिवस आंम्हाला 'गुगली' टाकलीच.

गुरुजि:- पोरांनो..आज पासून तुमची दुपारची शाळा बंद...

आंम्ही:- ..................

गुरुजि:- अरे...बंद म्हणजे काहि उनाडक्या नै हो करायला लावणारे तुम्हाला....अधिकृतपणे!

आंम्ही:- ..............

गुरुजि:- आज पासून तुंम्ही माझ्यासमोर अग्निमुखाचा प्रयोग* - चालवायचा. आणि तो झाला..की श्राद्धप्रयोग.
[*अग्निमुख >>>कुठलेही होमंहवन-सुरु होण्यापूर्वी..होमकुंडाची, त्यातल्या वापरायच्या साधन-सामग्री ची, आणि आत निर्माण केलेल्या अग्निची.. ही एक संस्कारात्मक पूजा आहे. ]

(गुर्जिंच्या या गुगलिनी... मात्र आमची अगदी टोटल विकेट उडाली.)

गुरुजि:- (आमचे चेहेरे पहात..) ह्हा ह्हा ह्हा... अरे पोरांनो.., ह्या गोष्टीत तुम्ही जर का तयार होऊन बाहेर पडलात..तर निम्मं मैदान माराल कामातलं...क्का....य!?

मी:- पण हे कामाशिवाय कसं शिकता येणार?

गुरुजि:- बोल्लात...महाशंकेखोर चिकित्सक शिरोमणी आत्मारामपंत...बोल्लात!? वाटच बघत होतो मी..ज्जा..स्वयंपाक घरातून जाऊन ४/६ वाट्या २ आमटी वाढायच्या पळ्या...आणि ती मोठ्ठी कढई घेऊन या बाहेर..

(आंम्हाला अजुनंही काहि हे उमगत नव्हतं.पण गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून आंम्ही सगळे आत जाऊन त्या वस्तू घेऊन आलो.)

गुरुजी:- बसा असे पूर्वेस तोंडे करून बसा.आणि ठेवा समोर ती कढई...सदाशिवं...ती दर्भाची जुडी टाक रे एक इकडे...हां...आता ही कढई म्हणजे तुमचे यज्ञकुंडं..किंवा हल्ली विटा ठेऊन वर घमेलं ठेवतात ना ...ते! ..असं समजा आणि करा सुरवात प्रयोगाला... हम्म्म..थांबू नका..चालू द्या आचम्य..प्राणानायम्य

आंम्ही सुरवात केली खरी..पण ह्या प्रॅक्टीकल पुढे आमची अक्क्ल किती टिकेल..त्याच चिंतेनी आंम्ही नविन बॅट्समन सारखे पाय..मागे-पुढे करायला लागलो. गुरुजिंना ही प्रतिक्रीया अत्यंत अपेक्षितच होती. मग ते पुढे सरसावले आणि आंम्हाला धीर देत देत...
गुरुजि:-हम्म्म..चला खोटं खोटं आचमन..आणि प्राणायाम मात्र खरा खरा करा बघू...अरे प्राणायाम हा जितका होइल तेव्हढा आपणा भिक्षुकास उपयोगी...क्का..य? नाहितरी हल्लीच्या या वाढत्या कामांच्या युगात..आपणाला बाहेर वहानांचा आणि यजमानांच्या घरात ह्या धुराचा अप्रतिहत मारा-सहन करावा लागतो. चला करा सुरवात..

असं म्हणून आमच्या रांगेतच शेवटाला आसन टाकून बसले देखिल. मग आंम्ही पहिले चार पाच दिवस तो अग्निमुखाचा सुरवातीला अति अवघड वाटणारा "प्रयोग" ,गुरुजिंना कॉपि करत चालवायला लागलो. मग गुरुजि आंम्हाला प्रयोग..करता करता..मधेच "हम्म्म..याला काय म्हणतात?..- ही प्रणिता... ही बर्ही...हा इध्मा..हे आज्यपात्र..ही सृवा..." अशी यज्ञपात्रांची (ऑपशनली ठेवलेल्या वाट्या पळ्यांची..) नावं सांगायचे. आणि कुणी होमकुंडा(कढई)भोवती.. "अग्निं परिसमुहनं..अग्निं पर्युक्षणं" ला (अनुक्रमे..) उलट सुलट पाणि फिरवायला चुकला..की त्याला "म्हणा - प्रथम-घड्याळी एक ते बारा,नंतर-बारा ते एक" अश्या कृती'च्या वाक्यांची संथाच घालायला लावायचे. आणि वर परत आंम्हाला - "तुमच्या हल्लीच्या आंग्लभाषीत यजमानांना हेच सगळं... आधी क्लॉकवाइज...नंतर अ‍ॅयांटीक्लॉकवाइज...असं नविन संस्कृत'मधे सांगायला लागणारे हो मुलांनो...तुंम्हाला!" असं म्हणून भरपूर हसायचे. मग क्काय? आमचंही त्यात - "ह्या...ह्या..ह्या..ह्या!" मग मी गुरुजिंना "@होमकुंडाभोवती प्रत्येक दिशेला -दर्भाची परिस्तरणं चार/चारच का घालायची? @(मुख्य होमापूर्वी एक विशिष्ट आहुती देण्यासाठी होमकुंडा बाहेर ठेवायचा समिधांचा गठ्ठा ..ज्याला "इध्मा" असे म्हणतात...) तो
'इध्मा'..(ऋग्वेदियांमधे..) १५ आणि कृष्णयजुर्वेदी-हिरण्यकेशीयांमधे १८,ह्या संख्येत(च) का असतो..वगैरे प्रश्न विचारायला सुरवात केली. गुरुजि अशी माहिती देताना ,हातच काय? बुद्धिही कधी जरासुद्धा अखडती घेत नसत. असं म्हणण्याचं कारण म्हणजे..ते यापाठिमागे धर्मश्रद्धा काय आहेत? हे तर सांगायचेच..पण शेवटी त्यांचं अश्या प्रश्नांवर एक अत्तिशय प्रबोधनात्मक उत्तर असायचं..

आत्मू...धर्मश्रद्धेमधे - का??? ..ह्या प्रश्नाला कोणतंही उत्तर असत नाही..हेच त्याचं सर्वात मोठ्ठं उत्तर आहे..हे अगदी आयुष्यभर नीट लक्षात ठेव. आणि श्रद्धा-या शब्दाचा अजुन एक अर्थ ज्याची त्याची-आवड! ,हाच आहे..हे ही त्याच उत्तराचं मूळ आवरण-नीट लक्षात ठेव.

पुढे ते मला म्हणाले, "आत्मू .. १५ कि १८ ? हा प्रश्न काय.. किंवा १५च का? किंवा १८च का? हा त्यातला उपप्रश्न काय..हे कर्मकांडांचे-प्रयोग..ज्यांनी "बसविले" किंवा(समाजमानसात..) "ठसवले" .त्यांना स्वतःला ते बरोबर वाटलं.. हे त्यातलं खरं सत्य असतं. बोलताना आपणंही त्याला "आत्मानुभव" असं गोंडस नाव देतो खरं! पण मूळात असते ती - "आपली आवडच" तुमच्या विविधभारती-वर लागायची ना?...तशी! अरे कुणाला शिक्रण चमच्यानी खावसं वाटेल,कुणाला हातानी! कोणि एका घासात दोन काप खाइल्,कोणी चार! ज्याला जसे रुचते आणि पचते..तशीच त्याची धर्मश्रद्धा असते..क्काय? त्यामुळे जोपर्यंत शिक्रण खायची भूक आहे,तोपर्यंत हे असले पाठभेद चालणारच.

पण मी तरिही एव्हढ्यानी गुरुजिंना हार जात नसे.. मग मी विचारी:- "पण समजा मला १५ ही नाही आणि १८ ही नाही ,,असं वाटलं, आणि मी एकच समिधा घेतली इध्म्याला तर? म्हणजे तसा "अनुभव" आला तर? मग मी काय करायचं?
गुरुजि:-

"मुला ..तुझ्या ह्या प्रश्नाला उत्तर इतकच..की तू तुला हवं ते करायला आणि निभावून न्यायलाही- मोकळा आहेस..हे लक्षात ठेव. आपण ज्या समाजात आज जगत आहोत..त्याचं खासं वैशिष्ठ्य..म्हणजे त्याला, फार पुढेही गेलेलं चालत नाही,आणि फार मागेही आलेलं चालत नाही... त्यामुळे जोपर्यंत तुझ्या श्रद्धा.., फक्त आणि फक्त तुझ्याशीच निगडित असतील,तोपर्यंत तु तुझ्या निर्णयाला मोकळा आहेस.पण ह्या श्रद्धेत..जेंव्हा आणखि एकाचाही अंतर्भाव होइल..तेंव्हापासून हे गणित सामुहिक होइल...हे ही कानात तेल घालून लक्षात ठेव."

"त्यामुळे, धर्मसुधारक व्हायचं असेल..तर तुझ्या सखारामकाकाचं काळीज घे..आणि निष्णात्त भटजी व्हायचं असेल..तर तुझ्या सदाशिवदादाचं!... क्का....य? "

ब्बास....ह्या पहिल्या अग्निमुखाच्या प्रयोगाच्या शिक्षणावेळी झालेल्या प्रश्नोत्तरांनी मला त्यावेळी जे बळ दिलं.. ते त्या अग्निमुखाच्या प्रयोगापेक्षा शंभर पटिनी मोठ्ठं आहे.अशी खूण गाठ बांधुनच मी पुढे श्राद्धप्रयोगही "कसा-करतात?" ते ही शिकलो. मग मला त्यात.. "@तिनच पिढ्यांचा उल्लेख का? @ श्राद्धातलं "पवित्रक" तीन(च) दर्भांचं का करतात? श्राद्धं सोडून इतर कर्मात ते दोनच दर्भांनी का-बनवितात? @श्राद्धात...यजमाना समोरिल २ ताम्हनात पितर आणि देवस्थानाच्या पूजेसाठी जे तिळाचं आणि सातूचं पाणि (तिलोदक्/यवोदक) करून ठेवतात..त्यात बुडवून वापरायचे दर्भाचे "कूर्च" ... हे श्राद्धाला ७ दर्भाचे आणि पक्षाला ९ दर्भाचे का करतात?" असे ..एक ना शंभर प्रश्न पडलेच..पण त्याची उत्तरंही मनात मिळत गेली. कारण गुरुजिं प्रश्न विचारणार्‍याचं एकदाच असं नी.....ट ऑपरेशन करत असतं..की सहसा..पुन्हा त्याच्या पोटात तश्या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचा गोळा-उठू नये. आमचे गुरुजी या बाबतीत मात्र अगदी खरेखुरे शल्य-विशारद होते.
.........................................................................................................

बोलता बोलता ह्या नविन ट्रेंनिंगनी आमचा तो हळूहळू घालवायला मिळणारा काळंही अगदी लीलया खाऊन टाकला.
आणि पाठशाळेची अधिकृत सुट्टीची जाहिर तारिख..जी ३० एप्रिल. ती आली . एका बाजुला हे आपलं एक काळजाच्या आत ठेवलं गेलेलं घर ,आता आज तरी सोडावं लागणार हे दु:ख्खं..तर दुसर्‍या बाजुला..आता आपण आपल्या मुक्तविश्वात संचार करायला मोकळे झाल्याचा आनंद. त्यात माझा आणखि आनंद म्हणजे मला न्यायला..स्वतः सखारामकाका आणि आई ,असे दोघेही आलेले होते. आणि ते ही घरापर्यंत जायला स्पेशलरिक्षा-करून!!! मग दुपारची जेवणे वगैरे झाली.आणि माझं गाव जवळच असल्यामुळे मी वजा जाता बाकिचे साथिदार काकूचा निरोप घेऊन तिला व गुरुजिंना नमस्कार करून (माझ्या आधी :-/ ) येश्टीश्टँण्ड कडे रवाना झाले. मी मात्र सखारामकाका आणि गुरुजिंची चाललेली खलबतं कधी संपतायत याची वाट बघत आईजवळ तिष्ठत बसलेलो होतो. आणि आई मला.."मेल्या... माझ्याजवळ काय बसून रहातोस? ती तूझी काकू बघ...तिच्याशी जाऊन बोल तरी आता जरा वेळ..आल्यापसून बघत्ये मी सारखा टाळतोयस तू तिला.." असं मला,मी खरच टाळू पहात असलेल्या त्या प्रसंगावर आणून सोडत होती.

मी काकूशी काय बोलायला जाणार होतो? हिंम्मतच होत नव्हती माझी. शब्द अजिबात काम करत नव्हते त्या दिवशी. नुसता समोर गेलो तरी गळा दाटुन येत होता. आणि सारखं वाटत होतं..की आज मी गेल्यावर काकूला समजावणार कोण? एकाहून एक जड प्रसंग मनासमोर उभे रहात होते. शेवटी काका आणि गुरुजिंची खलबतं संपली.आणि पिशवी खांद्याला लावत माझी पिशवी माझ्यासमोर टाकून काका मला "चला..उठा आत्मारामपंत..उठा...निघायचय हो आपल्याला" असं म्हणाला. मी रीतसर देवांना आणि गुरुजिंना नमस्कार केला.. तरिही अजुनंही माझा काकू समोर जायचा धीरच होइ ना! शेवटी गुरुजिंनी ही अवस्था ओळखली आणि काकूला .."अगो येणार आहेस की नाही त्या स्वयपाकघरातून बाहेर? " अशी आज्ञार्थी हाकच दिली. काकू आली.. मी संपूर्ण रडवेल्या मनानी तिला नमस्कार करायला वाकलो. काकूनी माझ्या डोक्यावरनं हात फिरवत.. "ये हो बाळा पुन्हा...येशील ना रे???"काकू कडून हा दुसरा प्रश्न, इतक्या आतून आला.. की मी पुन्हा रडत कधी काकूच्या पायांवर कोसळलो..ते मला कळलं देखिल नाही. मग गुरुजिंनीच माला उठ्वलं. माझ्यामागून आई देखिल काकूला नमस्कार करायला वाकली.आणि म्हणाली...." तूंम्ही खरं वाढवलत हो त्याला..आता माझ्यापेक्षा जास्त तुमचा आधिकार आहे त्याच्यावर."

मी ,सखारम काका , गुरुजि.. सगळेच भारावलेलो होतो. सखारामकाकानी सुद्धा गुरुजिंना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. गुरुजि तो प्रथम घेत नव्हते. पण काका म्हणला.. "हे बघ बंडू.. आपण मित्र वगैरे नंतर..अगदी फार नंतर..पण तू ज्या आस्थेनी आणि निष्ठेनी हे सर्व करतो आहेस..त्या बद्दल तरी मला एक नमस्कार तुझ्या त्या कार्याला करु दे"
मग काहि क्षणात आंम्ही सगळे रिक्षात बसलो...जाताना गुरुजि गुळखोबर्‍यासह आले..माझ्या हातावर ते ठेवलं.आणि "परत ये रे आत्मू..!" ..असे प्रेमाचे शब्द बोलून ते वळले. काकूनिही पुन्हा मला तिथे आशिर्वाद दिल्यासारखा पाठिवरून हात फिरवलन. रिक्षा परतिच्या वाटेवर फिरली...आणि मी रिक्षाच्या मागच्या खिडकितून..कवाडीच्या दारातून आमच्या रिक्षाकडे पहात असलेल्या काकूचं स्तब्ध मनानी दर्शन घेत राहिलो...रिक्षा पुढे निघाली..पण घर येइस्तोवर,माझी मान खाली होती..आणि डोळे ओलेचिंब.
==========================
क्रमशः ....

मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)
भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८ भाग- २९ भाग- ३०

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

26 Feb 2015 - 12:09 am | रेवती

आईग्ग! गहिवरून आलं.

आनन्दिता's picture

26 Feb 2015 - 12:12 am | आनन्दिता

:(

सूड's picture

26 Feb 2015 - 12:50 am | सूड

.

जबरी. या लेखमालेतल्या सर्वात आवडलेल्या लेखांपैकी हा एक आहे.

मधुरा देशपांडे's picture

26 Feb 2015 - 2:12 am | मधुरा देशपांडे

निःशब्द! खूप आवडला हा भाग.

वाचतांनाही काकू आणि गुरुजींना आम्ही सोडून चाललो आहोत असं वाटलं.

खटपट्या's picture

26 Feb 2015 - 6:52 am | खटपट्या

डोळे पाणावले !!

साती's picture

26 Feb 2015 - 7:14 am | साती

सुरेख लिहिलंय.
गुरुजींनी तुम्हाला नुसतंच पौरोहित्य न शिकवता धर्माचं खरं मर्म शिकवलं.

सतिश गावडे's picture

26 Feb 2015 - 7:22 am | सतिश गावडे

डोळ्यात पाणी आणलंत गुरुजी. लिहित रहा.

निमिष ध.'s picture

26 Feb 2015 - 9:26 am | निमिष ध.

हाही भाग अतिशय सुंदर झाला आहे. अजुन लिहा.

प्रचेतस's picture

26 Feb 2015 - 9:43 am | प्रचेतस

खूपच सुंदर झालाय हा भाग.

नाखु's picture

26 Feb 2015 - 10:18 am | नाखु

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे

बॅटमॅन's picture

26 Feb 2015 - 10:31 am | बॅटमॅन

......

अजया's picture

26 Feb 2015 - 11:19 am | अजया

रडवलंत हो गुरुजी.

सुंदर आणि रडवणारा दोन्हीही!!
"मुला ..तुझ्या ह्या प्रश्नाला उत्तर इतकच..की तू तुला हवं ते करायला आणि निभावून न्यायलाही- मोकळा आहेस..हे लक्षात ठेव. आपण ज्या समाजात आज जगत आहोत..त्याचं खासं वैशिष्ठ्य..म्हणजे त्याला, फार पुढेही गेलेलं चालत नाही,आणि फार मागेही आलेलं चालत नाही... त्यामुळे जोपर्यंत तुझ्या श्रद्धा.., फक्त आणि फक्त तुझ्याशीच निगडित असतील,तोपर्यंत तु तुझ्या निर्णयाला मोकळा आहेस.पण ह्या श्रद्धेत..जेंव्हा आणखि एकाचाही अंतर्भाव होइल..तेंव्हापासून हे गणित सामुहिक होइल...हे ही कानात तेल घालून लक्षात ठेव."
ह्या उत्तरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.

लय ब्येक्कार लिवतोस बुव्या तू :(

गुर्जींच्या भावविश्वातिल खुप सुरेख क्षणांचे साक्षीदार झालो आम्ही वाचता वाचता. :)

खुपच उत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

निशब्द !

राही's picture

26 Feb 2015 - 5:37 pm | राही

शब्द नाहीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 10:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या शेवटच्या वर्षातली ती दिवाळीची सुटी संपवून मी पाठशाळेत जसा परत आलो..तशी माझी अगदी पहिल्या दिवसापासून ती शाळा सोडून जाण्याच्या प्रसंगानी झोप उडवायला सुरवात केली. एखाद्याला उरलेले सहा महिने हा काळ भरपूर मोठ्ठा वाटेल. पण ज्या एका जगात आपण अत्यंत मायेच्या माणसात इतकी वर्ष साथि सवंगड्यांसह घालविली ते जग, "आता कायमचं सुटणार" ही जाणिव ,हातात असलेला वेळंही अत्यंत वेगवान वाटायला लावणारी असते.

अतिशय सहमत. :(

ह्या लेखमालेतला सगळ्यात जास्त आवडलेला लेख बुवा.

समिर२०'s picture

27 Feb 2015 - 11:27 am | समिर२०

.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Feb 2015 - 7:52 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व वाचक प्रतिसादकांचे मन:पूर्वक धन्यवाद! __/\__

खेडूत's picture

27 Feb 2015 - 8:01 pm | खेडूत

येकदम भारी हो गुर्जी !
ते क्रमश: बघून आनंद वाटला .

पैसा's picture

1 Mar 2015 - 6:52 pm | पैसा

अप्रतिम लिहिताय बुवा!