वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान
१९९६ चा वर्ल्डकप हा १९८७ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेला दुसरा वर्ल्डकप होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या जोडीला श्रीलंकेलाही स्पर्धेचं संयुक्तं यजमानपद बहाल करण्यात आलं होतं. श्रीलंकेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत मॅचेस खेळण्यास नकार दिल्यावर या दोन्ही संघांची खात्री पटावी म्हणून श्रीलंका विरुद्ध भारत-पाकिस्तान अशी मॅच खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये वासिम अक्रमच्या बॉलवर सचिन तेंडुलकरने रोमेश कालुवितरणाचा कॅच घेतल्याची नोंद झाली!