वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज
२००३ चा वर्ल्डकप हा आफ्रीका खंडातला पहिला वर्ल्ड्कप! अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर १९९१ मध्ये क्रिकेटजगतात परतलेल्या दक्षिण आफ्रीकेला झिंबाब्वे आणि केनिया यांच्याबरोबर या वर्ल्डकपचं यजमानपद देण्यात आलं होतं. हा वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाने रॉबर्ट मुगाबेच्या हुकूमशाही सरकारच्या निषेधार्थ हरारे इथे झिंबाबवेविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यास नकार दिला. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणावरुन केनियाविरुद्ध नैरोबी इथे खेळण्यास नकार दिला. झिंबाब्वे आणि केनिया या दोन्ही संघांना या मॅचेसमधले पॉईंट्स बहाल करण्यात आले.