वर्तुळ-कोन सिद्धांत
"
"
हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना
एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना
स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही
कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना
उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो
सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना
भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो
किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना
माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला
गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना
.
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही
आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी
पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही
वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही
मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही
शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी
का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही
का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही
जयश्री अंबासकर
गहाणात ७/१२.....
गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे
कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे
रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?
मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे
बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे
कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?
खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे
कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल]
मज दोन आसवांना हुलकावता न आले
हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले
कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी
उपटून यातनांचे तण काढता न आले
निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती
परक्याच आपल्यांना समजावता न आले
मरणासवे कितीदा फसवे करार झाले
जगणे नकोच होते, पण टाळता न आले
अनुकूल सूचनांना वगळून चूक केली
प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले
जयवी - जयश्री अंबासकर
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी
झेलण्या केले खुले काळीज मी
भेटुनी जाते त्सुनामीसारखी
मिरवतो आयुष्यभर ती झीज मी
आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी
पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी
ठरवले आहेस तू उत्तर तुझे,
की चुकीची मांडतो बेरीज मी?
-- उपटसुंभ
काय माझ्या रेखिले आहे कपाळी
व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी
मागते आहेस का आषाढ श्रावण
वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी
स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या
काळजामध्ये किती जपशील जाळी
लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता
दुःख येते प्रत्यही शोधीत आळी
आसवांवर तेवते आयुष्य माझे
वेदनांची साजरी करतो दिवाळी
फुंकरी घालू नका जखमांवरी या
मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी
-- उपटसुंभ
जीवना, भेट केव्हातरी
अंतरीच्या उमाळ्यापरी
आसवांच्या उधाणातही
पापण्यांच्या रित्या घागरी
भांडणावाचुनी व्हायची
भेट माझी-तुझी का खरी?
नाव मी भोवर्याला दिली,
साद देती किनारे जरी
जीवघेणा कडाका इथे,
सांत्वनाच्या तिथे चादरी !
पाचवीलाच मी पूजिली
शब्द झेलायची चाकरी
अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना
नाही जमेस काही आयुष्य मोजताना
भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या
काळीज सागराचे घेऊन हिंडताना
ना घातली हवा तू राखेस एकदाही
सारी हयात गेली अंगार शोधताना
आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी
आवाज होत नाही स्वप्नात बोलताना
होतो बर्याचदा मी माझाच हाडवैरी
बेभान अक्षरांचे आसूड ओढताना
- उपटसुंभ