एकम् सत्

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
18 May 2009 - 7:54 pm

अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात... अर्थात शाळांपेक्षा आणि मास्टर्स/पिएचडीच्या पदवीदानापेक्षा, बॅचलर्सच्या पदवीदानाचा सर्वात जास्त गाजावाजा होतो, त्याला महत्व असते. त्याला येणारे अतिथी हे बर्‍याचदा जगात प्रसिद्ध असतात (किमान अमेरिकेत नक्कीच).

अशा ठिकाणी जी अनेक प्रभावी भाषणे झाली आहेत. नजीकच्या काळात असे एक प्रभावी भाषण, जे मला खूप आवडले होते,ते म्हणजे २००५ साली, स्टॅनफर्ड विद्यापिठात केलेले स्टिव्ह जॉब्ज (ऍपल काँप्युटर्स, आयपॉड, आयफोन फेम)चे भाषण. हे भाषण वाचले नसल्यास अवश्य वाचा. आपल्याकडे विविध कारणाने या पदवीदानाचे महत्व हवे तितके राहीले आहे असे वाटत नाही. कॉलेजच्या तासांप्रमाणेच हा समारंभ पण बंक करण्यात आणि पोस्टाने डिग्रिसर्टीफिकेट घरी येण्यात आपण समाधान मानतो... त्याने काही कदाचीत फरक पडत नसेलही, पण तरी देखील आता असे वाटते की हा अधुनिक काळातील चांगला संस्कार आहे.

तर अशा या पदवीदान समारंभाच्या मौसमात, कालच्या रविवारी (मे १७), राष्ट्राध्यक्ष ओबामांना नॉत्रे डेम विद्यापिठात प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले होते. आता हे विद्यापिठ कॅथलीक धर्म पाळणारे विद्यापिठ आहे. अर्थातच तेथील बहुसंख्य विद्यार्थी हे कॅथलीक आहेत आणि त्यांचे विचार हे बायबल म्हणजेच श्रेष्ठ, ते ही रोम मधून जसे सांगितले तसे. ह्या संदर्भात अमेरिकेत सर्वत्रच एक प्रश्न कायम टोकाच्या भुमिका घेतो, तो आला - गर्भपात हक्काचा. ख्रिश्चन धर्म आणि विशेष करून रोमन कॅथलीक पंथात गर्भपात मान्य नाही. त्यातील काही कारणे मला देखील पटतात, पण तो विषय वेगळा आहे आणि तरी त्यांची टोकाची आणि निव्वळ धर्मामुळे म्हणून असलेली भुमिका पटत नाही. त्याच वेळेस अतिरेकी स्वतंत्र (लिबरल्स) विचारवाद्यांना कुठलेच बंधन नको असते. मध्यम विचारवाद्यांना स्वतःपुरते बंधन अथवा विचारकरून कृती भावते पण इतरांना मात्र स्वातंत्र्य देणे महत्वाचे वाटते.

ओबामा हे देखील मध्यम मार्गातील आहेत. (बहुतांश डेमोक्रॅट्स तसेच असतात तर काही अतिरेकी स्वतंत्र अल्ट्रा लिबरल्स). असे मध्यम मार्गी ओबामा जे गर्भपात हक्क मानतात त्यांना "आपल्या विद्यापिठात" बोलावले म्हणून नॉत्रे देमच्या विद्यार्थ्यांना राग आला आणि गेले काही दिवस भरपूर निषेध झाला, बातम्या आल्या. अर्थात असे "वादग्रस्त पाहुणे" आणणे हे कुठल्याही विद्यापिठ प्रशासनांना आवडते, कारण त्यानिमित्ताने बातमी होते, फुकटची प्रसिद्धी होते, आपला स्वतंत्रपण दिसतो आणि नवीन विद्यार्थी पुढच्या वर्षाकरता मिळू शकतात. (सगळ्यात शेवटी"सबसे बडा रुपय्या!")

अर्थात ओबामा तेथे काल गेले आणि त्यांच्या वक्ता दषसहस्त्रेशू या कारकिर्दीस शोभणारे भाषण केले. मात्र या भाषणात गर्भपाताच्या हक्कावरून जे धर्माच्या नावाने फरक पडत वाद घडत आहेत त्याचा उल्लेख करताना ते जे काही म्हणाले ते त्यांच्याच शब्दात वाचण्यासारखे आहे:

...we must find a way to reconcile our ever-shrinking world with its ever-growing diversity - diversity of thought, of culture, and of belief.

In short, we must find a way to live together as one human family.

वरील वाक्ये जेंव्हा वाचली तेंव्हा "वसुधैव कुटुंबकम" म्हणणारे आपले जुन्याहून जुने असले तरी नित्यनुतन राहणारे भारतीय तत्वज्ञान आठवले.

तसेच आठवले अजून एक कायम वापरले जाणारे वाक्यः "एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति" अर्थात सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही.

राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत. कुठेतरी आपण सर्वसमावेशक नाही ह्या भितीने तर कुठेतरी त्यांचा त्यातील मुल्ये भ्रष्ट करून वापर करणार्‍यांच्या त्राग्याने प्रतिक्रीया म्हणून...

मग जसे "योग" निर्यात करून "योगा" आयात केला तसेच काहीसे उद्या आपण ओबामा म्हणतात म्हणून आपलेच तत्वज्ञान ऐकायला लागणार का?

वास्तवीक मला सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, आपल्या तत्वज्ञानातून घेतलेल्या ओळी असाव्यात असे सहज वाटणारी ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.

तुम्हाला काय वाटते?

संस्कृतीसमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारशुभेच्छाबातमीमाध्यमवेधप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 May 2009 - 9:39 pm | रेवती

लेख आवडला.
ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.
फक्त अभिमान किंवा आनंद वाटून गप्प बसण्याचे दिवस सरले असल्याची ठळक जाणिव जेंव्हा होते त्याची जबाबदारी वाटते.... तसे आहे हे. असे विचार जे आपण एका विशिष्ठ भाषेत शिकलो तेच पुढच्या पिढीला त्यांना कळतील अश्याप्रकारे कसे शिकवता येतील अश्या विचारानेही जबाबदारी वाटू शकते. अर्थात हे माझे मत आहे व कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आपण आपल्या देशाबाहेर असताना आपल्याच देशातील तत्वज्ञान जगासमोर येते तेंव्हा थोडे जास्त जबाबदारीने आपोआपच वागतो असं वाटतं.

रेवती

विकास's picture

19 May 2009 - 1:56 am | विकास

धन्यवाद.

आपण आपल्या देशाबाहेर असताना आपल्याच देशातील तत्वज्ञान जगासमोर येते तेंव्हा थोडे जास्त जबाबदारीने आपोआपच वागतो असं वाटतं.

देशाबाहेर असताना त्या देशातील अथवा इतर देशीय आपल्याकडे पाहून शितावरून भाताची परीक्षा करतात. त्यामुळे असे वागणे कधी कधी स्वतःपेक्षा आपल्या समाजाच्या हितासाठी पण महत्वाचे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2009 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पदवीदान प्रसंगीचे भाषणातील मानवतेकडे ("वसुधैव कुटुंबकम") कडे घेऊन जाणारा मार्ग शोधला पाहिजे हा विचार निश्चित कौतुकास्पद आहे, विचार भावला. खरं तर अशा प्रसंगी शिक्षण, गुणवत्ता, शिक्षणातील आव्हाने, अडचणी, जवाबदारी अशा विषयांवर विचार व्यक्त करण्यापेक्षा एक परिवार उभा राहिला पाहिजे, ही भावना उच्चच!

>>ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.

सहमत आहे !!!

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

19 May 2009 - 12:09 am | भडकमकर मास्तर

फार छान विचार मांडले आहेत...
विशेषतः.या ओळी
राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत. कुठेतरी आपण सर्वसमावेशक नाही ह्या भितीने तर कुठेतरी त्यांचा त्यातील मुल्ये भ्रष्ट करून वापर करणार्‍यांच्या त्राग्याने प्रतिक्रीया म्हणून...

लै वेळा सहमत.....

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

नोत्र डेम या कॅथोलिक बालेकिल्ल्यात जाऊन भाषण देणे कौशल्याचे काम आहे.

पण "सर्वांनी मिळून-मिसळून राहूया" हा एकमेव मंत्र शेवटचा नव्हता. "काही बाबतीत आपापसात फरक इतके असतात, की ते एक होऊ शकत नाहीत, तेही जाणा, तशी मतेही अभ्यासूपणे, हिरिरीने मांडा" - अशा आशयाची वाक्येसुद्धा होती.

एक उत्तम वक्ता.

मात्र विकास यांच्या लेखाला अनुसरून एक टिप्पणी - सेवाभाव, विरोधकांशी जुळवून काही काम करणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कॅथोलिक पाद्र्यांचे दाखले दिले. हे नोत्र डेमसाठी योग्यच होते. पाद्र्यांच्या सेवाभावी उदाहरणांनी आपण ख्रिस्ताकडे ओढले गेले, असे ओबामा म्हणाले. त्यांची काही वाक्ये "वसुधैव कुटुंबकम्"सारखी वाटतात, कारण त्या प्रकारची वाक्ये आधीपासून त्यांच्या धर्मात आहेत. हिंदू धर्माचा ओबामांनी चांगला उल्लेख केला, पण तो चारपाच धर्मांच्या नावाच्या यादीत...

बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा, आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांची पत्नी लॉरा बुश यांशी भाषणेही दूरदर्शनवर थोडीशी ऐकली. अत्यंत "तीच-ती" होती. शिवाय "युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड युनिव्हर्सिटी कॉलेज"च्या पदवीदान प्रसंगाला जातीने हजर होतो. तेही भाषण "तेच-ते" होते. त्यामुळे ओबामा यांच्या भाषणाचा कस आणि वेगळेपणा खास जाणवला.

विकास's picture

19 May 2009 - 1:54 am | विकास

>>>>मात्र विकास यांच्या लेखाला अनुसरून एक टिप्पणी - सेवाभाव, विरोधकांशी जुळवून काही काम करणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कॅथोलिक पाद्र्यांचे दाखले दिले. हे नोत्र डेमसाठी योग्यच होते. पाद्र्यांच्या सेवाभावी उदाहरणांनी आपण ख्रिस्ताकडे ओढले गेले, असे ओबामा म्हणाले. त्यांची काही वाक्ये "वसुधैव कुटुंबकम्"सारखी वाटतात, कारण त्या प्रकारची वाक्ये आधीपासून त्यांच्या धर्मात आहेत. हिंदू धर्माचा ओबामांनी चांगला उल्लेख केला, पण तो चारपाच धर्मांच्या नावाच्या यादीत...

माझ्या लिहीण्यात मला असे कुठेही म्हणायचे नव्हते की ओबामा हिंदू धर्मातील वाक्य संदर्भ म्हणून देत होते. (तसे केले तर जरा अतिच झाले असते. अहो काही झाले तरी सगळ्यांना पुरून उरून आपण मुरलेले राजकारणी आहोत हे त्यांनी सिद्ध केले आहे, असली चूक ते कशी करतिल? :-) )

म्हणूनच मी लेखाला नाव देताना, "एकम सत" असे दिले. आणि पुढे असेही लिहीले की, "सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही."

ओबामाने हिंदू धर्माचे नाव घेतले याचा माझ्या लेखात उल्लेख पण नाही कारण ती बाब माझ्या लेखी तितकी महत्वाची नाही. (मात्र त्याने हा देश कुणाचा आहे म्हणताना त्यात हिंदू पण राहतात, हे त्याच्या इनॉगरल भाषणात जे सांगितले ते मात्र मला नक्कीच महत्वाचे वाटले.). त्याच बरोबर आज पर्यंत कुठल्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने हिंदू धर्माचे नाव घेतले असेल का (इतके जाहीरपणे) ही एक संशोधनाची बाब आहे.

बाकी त्याच (एकम सत्/वसुधैव..) संदर्भात असेही वाटले की आता ओबामा (एक अमेरिकेन/पाश्चात्य/अहिंदू - काहीही) तेच सत्य म्हणेपर्यंत आपण त्या सत्याकडे दुर्लक्ष करायची गरज नाही. पण तसे आपण वागतो, म्हणूनच कविता आणि नाटके सुचतात जी सांगतात - तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी ;)

धनंजय's picture

19 May 2009 - 2:21 am | धनंजय

मग जसे "योग" निर्यात करून "योगा" आयात केला तसेच काहीसे उद्या आपण ओबामा म्हणतात म्हणून आपलेच तत्वज्ञान ऐकायला लागणार का?

या वाक्याने माझा गोंधळ झाला. म्हणजे योग पश्चिमेला जाऊन योगा झाला, तसे आपले तत्त्वज्ञान ओबामांच्या भाषणात पोचले... असे म्हटल्याचा गैरसमज झाला. असो. गैरसमज गेला.

वास्तवीक मला सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, आपल्या तत्वज्ञानातून घेतलेल्या ओळी असाव्यात असे सहज वाटणारी ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.

अशी चिरंरतन मानव्य तत्त्वज्ञानाची वाक्ये ऐकून मानव म्हणून अभिमान वाटण्यापेक्षा जबाबदारी वाटली पाहिजे - असा काही मथितार्थ आहे का?

मी सहमत आहे. (सहमतीवेगळे मत जवळजवळ कोणालाही शक्यच नाही.) मानव म्हणून अभिमान वृथा आहे - मानवपण आपल्याला न मागता जन्माने प्राप्त झालेले आहे. (काही लोकांच्या मते आपल्याला मानवजन्म पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त झाला, म्हणून त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापैकी मी नाही.) मानवाच्या सर्व संस्कृतींचा इतिहासही जन्मतःच आपल्या पदरी पडला आहे - त्यात अभिमान तो काय करावा. जबाबदार्‍या मात्र जाणतेपणी आहेत, त्या जाणतेपणी निभावाव्यात.

कुठल्याही प्रकारचे वंशज असल्याचा अभिमान निरर्थक आहे, आणि जबाबदार्‍या खर्‍या आहेत.

विकास's picture

20 May 2009 - 8:30 am | विकास

मी सहमत आहे. (सहमतीवेगळे मत जवळजवळ कोणालाही शक्यच नाही.) मानव म्हणून अभिमान वृथा आहे - मानवपण आपल्याला न मागता जन्माने प्राप्त झालेले आहे. (काही लोकांच्या मते आपल्याला मानवजन्म पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त झाला, म्हणून त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापैकी मी नाही.) मानवाच्या सर्व संस्कृतींचा इतिहासही जन्मतःच आपल्या पदरी पडला आहे - त्यात अभिमान तो काय करावा. जबाबदार्‍या मात्र जाणतेपणी आहेत, त्या जाणतेपणी निभावाव्यात.

कुठल्याही प्रकारचे वंशज असल्याचा अभिमान निरर्थक आहे, आणि जबाबदार्‍या खर्‍या आहेत.

स्वतःच्या कुठल्याही गोष्टींचा अभिमान असणे म्हणजे इतरांना तुच्छ लेखणे असा काही अर्थ घेण्याची गरज नाही. जगातील प्रत्येक भाषेत "अभिमान" या अर्थी शब्द असावा. किमान प्रमुख भाषांमधे तरी नक्कीच आहे. तेच "जबाबदारी" या शब्दाबद्दल. दोन्ही शब्द कर्मप्रयोगात वापरले जातात कारण त्या वृत्ती आहेत आणि सर्वत्र राहणार. फक्त त्यांना योग्य वळण असले तर त्याचा स्वतःच्या विकासासाठी आणि इतरांसाठीपण फायदा होऊ शकतो असे वाटते.

उ.दा.: शिवाजीला हिंदवीस्वराज्य का स्थापावेसे वाटले? कारण त्याला जशी स्वतःच्या माणसांची आस्था होती तसाच स्वतःच्या पुरातन संस्कृतीचा अभिमान (जो जिजाबाईंनी गोष्टीतून सांगितला) होता. अर्थात अभिमान आहे म्हणत शिवाजी काही टर्रेबाजी करत हिंडला नाही, तर त्यातून जबाबदारीने स्वत:च्या माणसांना स्वतःचे राज्य तयार करता येऊ शकेल असा स्वकृतीने आत्मविश्वास दिला...विचार करा, शिवाजीने जाणतेपणी जबाबदार्‍या निभावताना स्वतःची संकृती विसरला असता तर काय नाव काही असते तरी अजून एक "शाही"च झाली असती...

माडगुळकरांच्या एका शिवाजीवरील कवितेतील छान ओळी आहेत:

नसता झाला जर शिवराया, पढवती न जर त्यास जिजाऊ,
पर बोलीच्या पंजरी मरते, बाल कथातील चिमण्या राऊ

आज विचार करा, विंचवाच्या बिर्‍हाडासारखे सुंदर बालकवितांचे पुस्तक मराठीत लिहावेसे वाटले. हल्ली वास्तवीक भारतात पण ट्विंकल ट्विंकल चालू असताना... आता ते काय आहे? सत्यदेव म्हणा नाहीतर सत्यनारायण (थोडक्यात नाव काही दिले तरी तो चांगल्या अर्थी भाषेचा अभिमानच आहे).

स्वकर्तुत्वाव्यतिरीक इतर अभिमान हा ज्याच्याशी आपली असोसिएशन असते त्यां गोष्टींबद्द्ल होतो. जबाबदारी ही अशाच पण डोळस अभिमानातून येते आणि कमीअधिक फरकाने वृद्धींगत होते. दोन्ही गोष्टी स्वाभाविक असू शकतात. त्यात निरर्थक असे काही मला वाटत नाही.

सहज's picture

19 May 2009 - 7:06 am | सहज

>..अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.

सहमत. अर्थात इथे अमुक धर्म/पंथांचा वंशज म्हणुनच नव्हे तर एकंदर २१व्या शतकातील मानवजातीचा घटक म्हणुन. आज आपण (सर्व देश/मानवी समाज) जे घडत आहोत त्यावर जगातील अनेक देश, धर्म, समाजातील लोकांचे संस्कार आहेत.

>सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही.
एकम सत!

Nile's picture

19 May 2009 - 7:36 am | Nile

राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत.

हे वाक्य मला नेहमीच जरा खटकते. हे जे काही तत्वज्ञान तयार झाले त्यावेळी ते सर्वाना कळले, सर्वाने आचरणात आणले असे का? आजच ते दुर लोट्त आहोत असे का? आपण म्हणजे नक्की कोण? तत्वज्ञान म्हणुन तत्वज्ञाना कडे बघतात ते लोक का? माझा सुर काही टिकेचा नाही आहे पण मला वाटते विचार करणारी व्यक्ती काहीही असे दुर लोटत नाही. जे विचार करत नाहीत त्याबाबतीत मला काही म्हणायचे नाही. असो, Steve Jobs भाषण इथे ऐकता येईल.

स्वाती दिनेश's picture

19 May 2009 - 11:59 am | स्वाती दिनेश

अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.अगदी असेच ..
विकास, लेख आवडला.
स्वाती

क्लिंटन's picture

19 May 2009 - 1:38 pm | क्लिंटन

तसेच आठवले अजून एक कायम वापरले जाणारे वाक्यः "एकम सत विप्रा बहुदा वदंती" अर्थात सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही.

१००% मान्य.

राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत.

हे पण १००% मान्य.

’एकम सत’ हे तत्व भगवद्गीतेसंदर्भात प्रकर्षाने लागू होते असे मला वाटते. डेल कार्नेगी हे अमेरिकेतील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आद्य ’सेल्फ हेल्प’ वाले. त्यांनी How to stop worrying and start living हे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी अमेरिकेतील मॉलमध्ये सर्वत्र असलेल्या J.C.Penny या साखळीचे मालक जेम्स कॅश पेनी यांच्याविषयी लिहिले आहे.पेनी म्हणतात,"I wouldn't worry if I lost every dollar I have because I don't see what is to be gained by worrying. I do the best job I possibly can; and leave the results in the laps of the gods". भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ यापेक्षा काही वेगळे नाही.पेनींनी भगवद्गीता हे नावही ऐकले असायची शक्यता कमीच आहे.पण त्यांनी नकळतपणे का होईना भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ अंमलात आणली होती.आणि मला वाटते सर्व क्षेत्रातील यशस्वी आणि आघाडीच्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हीच शिकवण आचरात आणावी लागत असेल इतकी ही शिकवण सर्वव्यापक आहे.

आता हा विषय निघालाच आहे म्हणून त्यावर अजून थोडे लिहितो.मला स्वत:ला अमेरिका सोडून भारतात परत यावे लागले आणि त्या अर्थी मी अपयशी ठरलो असे मला वाटले.त्यावेळी मी महर्षि दयानंदांचे भगवद्गीतेवरील 'The teachings of Bhagavad Gita' हे पुस्तक अजून खोलात वाचले होते.त्यात ते म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते चा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो.फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा याचा अर्थ नाही.तसे असेल तर स्वत: भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा ती शिकवण अर्जुनाला कळेल ही अपेक्षा न ठेवता सांगितली असाही अर्थ निघू शकेल.महर्षि दयानंदांच्या मते ते तसे नाही.दयानंदांनी त्याच्या लावलेल्या अर्थावर मी स्वत: विचार केला आणि मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे असावा असे वाटते. हे गणिताच्या परिभाषेत लिहितो.

समजा A=संचित (मागील जन्मांतील unfulfilled कर्म). म्हणजे मागील जन्मात आपण काही चांगले/वाईट केले असेल पण त्याचे चांगले/वाईट फळ आपल्याला मिळाले नसेल तर ते संचित यात मोडते.
B=प्रारब्ध (या जन्मातील unfulfilled कर्म)
C=कोणत्याही गोष्टीसाठी केलेल आपले प्रयत्न

आणि R हे आपल्याला मिळणारे फळ असेल (Result) तर R=f(A,B,C). म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ या तीनही घटकांवर अवलंबून असते.यापैकी पहिल्या घटकाची आपल्याला अजिबात कल्पना नसते.दुसरा घटक माहित असायची शक्यता असते पण त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही कारण ती गोष्ट आधीच घडून गेलेली असते. आपल्या हातात केवळ तिसरा घटक असतो. तसेच f या फलनाचे (function) चे स्वरूपही आपल्याला माहित नसते. तेव्हा आपल्याला शक्य तितके चांगले प्रयत्न करावेत.आणि देवाला माहित असलेल्या गणिती सूत्रानुसार आपल्याला फळ मिळेल. हे दयानंदांच्या म्हणण्याचे माझे interpretation झाले. दयानंदांनी ’प्रसादबुध्दी’ ही एक संकल्पना त्याच पुस्तकात लिहिली आहे.ते म्हणतात की आपण देवळात गेलो आणि आपल्याला प्रसाद म्हणून खडीसाखर मिळाली की सफरचंद, आपण ते देवाचा प्रसाद म्हणून स्विकारतो.खडीसाखर मिळाली तर ’मला सफरचंद का दिले नाही’ असा उलटा प्रश्न आपण विचारत नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना येणारे फळ हा ’देवाचा प्रसाद’ म्हणून स्विकारावे असेही दयानंद म्हणतात.म्हणजेच दयानंदांच्या मते आपण चांगल्या फळाची अपेक्षा ठेवत आपले सर्वात चांगले प्रयत्न करावेत. पण त्याचे परिणाम देवावर सोडावेत आणि परिणाम जरी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आले तरी स्वत:ला अपयशी मानू नये. जे.सी.पेनी पण काही वेगळे म्हणत आहेत असे वाटत नाही. ’एकम सत’ हे तत्व यातूनच पुन्हा एकदा सिध्द होते.

विकास यांना हा महत्वाचा आणि चांगला विषय चर्चेसाठी आणल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर: मला माझ्या निराशेच्या काळात डेल कार्नेगी आणि दयानंदांच्या पुस्तकांचा खूपच उपयोग झाला.वेळ मिळाल्यास ती पुस्तके जरूर वाचावीत असे मी आग्रहाने सांगेन.त्याचा मला जसा उपयोग झाला तसाच इतरांनाही झाला तर चांगलेच असेल.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

20 May 2009 - 8:08 am | विकास

"प्रसादबुद्धी" हा शब्द चांगला आहे. अर्थात प्रसाद हा पुजा केल्यावर, म्हणजे वास्तवात फळ कष्टाशिवाय मिळत नाही हा अर्थ आहे आणि ते फळ तितकेच निरपेक्षवृत्तीने घेता आले पाहीजे.

स्वामी दयानंद सरस्वतींचे हे पुस्तक मी वाचलेले नाही मात्र त्यांचे "कर्मण्येवाधिकारस्ते" वरील भाषण (प्रवचन?) त्यांच्या पेन्सिल्व्हेनियामधील "आर्ष विद्या गुरूकुलम" मधे ऐकले होते. फार मजेशीर पद्धतीने आणि हलकेफुलके बोलत त्यांनी अर्थ सांगितल्याचे लक्षात आहे.

>>>अवांतर: मला माझ्या निराशेच्या काळात डेल कार्नेगी आणि दयानंदांच्या पुस्तकांचा खूपच उपयोग झाला.वेळ मिळाल्यास ती पुस्तके जरूर वाचावीत असे मी आग्रहाने सांगेन.त्याचा मला जसा उपयोग झाला तसाच इतरांनाही झाला तर चांगलेच असेल.<<<

वास्तवीक असे वाचन, जे म्हणले तर अवांतर आहे, म्हणले तर स्वाध्यायात ( शब्द्दार्थाने,
पांडूरंगशास्त्रींच्या नव्हे) आणायचे असते ते मूड असताना कधीतरी करावे असे वाटते. त्याचा गरज लागल्यावर "समुपदेशकासारखा" फायदा होऊ शकतो :-). त्यासंदर्भात गीतेतील एक चांगली ओळ आहे: "ज्ञानासम नसे काही, पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये || " अर्थात जे अभ्यासलेले असते वगैरे अर्थाचे मागेपुढे आले आहे. थोडक्यात योग्य वेळेस "अंतरी पावते", म्हणजे आठवते. (जे कुठल्याही ज्ञानाच्या बाबतीत असते, जे आपण संपादन केलेले असते). असो.

धनंजय's picture

21 May 2009 - 4:30 am | धनंजय

दयानंद सरस्वती हे एक मोठे विचारवंत होते. क्लिंटन यांनी त्यांच्या म्हणण्याचे केलेले गणिती समीकरण बघून क्लिंटन यांच्या प्रतिभेबद्दल अधिकच कौतूक वाटते.

परंतु या विचारवंतांनी केलेल्या उत्तम विचाराचा आरोप गीतेतील बर्‍यापैकी स्पष्ट वाक्यावर करणे ठीक वाटत नाही.

"मा फलेषु कदाचन" - अधिकार कधीच नाही असे ते वाक्य ठासून सांगत असता, त्याचा अर्थ "काही प्रमाणात अधिकार आहे", "चांगल्या फळाची अपेक्षा करण्यापुरता अधिकार आहे", "खडीसाखर की खोबरे नाही, पण कुठलातरी प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करावी" असा लावणे ठीक वाटत नाही. ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली.

गीतेत अमुक वेगळे आहे, म्हणून काय दयानंदांना स्फुरलेला सुविचार बेकार होतो काय? तर नाही. तो तितकाच चांगला राहातो. दयानंदांनी नम्रपणे श्रेय अव्हेरले, तरी आपण ज्याचे श्रेय त्याला द्यावे, हेच चांगले. आणि क्लिंटन यांच्या कल्पक समीकरणाचे श्रेय मी त्यांनाच देतो.

"एकम् सत्" म्हणण्याच्या हव्यासापायी कोणी काही नवीन, वेगळे म्हटलेच नाही असे करू नये.

बाकी "निराश होऊ नका, प्रयत्न करत रहा" हे जर एकम् सत् असेल, तर ते पेनी, कार्नेजी, माझी आजी या सर्वांनी सांगितले आहे, सहमत. पण "निराश व्हा, प्रयत्न थांबवून गप्पगार व्हा" असे कोणी म्हणणार आहे? ते पुस्तक खपणार आहे का?

विकास's picture

21 May 2009 - 8:47 am | विकास

>>>दयानंद सरस्वती हे एक मोठे विचारवंत होते.

आर्य समाजसंस्थापक दयानंद सरस्वती (१८२४-१८८३) वेगळे होते. त्यांचे भाषण मी ऐकायला तेंव्हा जन्मलो नव्हतो ;)

आर्ष विद्यागुरूकुलम स्थापणारे दयानंद सरस्वती हे वेगळे आहेत. (ज्यांचे हे पुस्तक आहे). मला वाटते हे चिन्मयानंद स्वामींचे शिष्य होते. त्यांनी गुरुकुल संकल्पनेत अध्यात्म शिकवण्यासाठी शाळा काढली. हे गुरूकुल पेन्सिल्व्हेनियात आहे. तेथेच ते राहतात आणि त्यांचे भाषण/प्रवचन मी ऐकले आहे असे म्हणले. ते देखील अधुनिक काळातील आध्यात्मिक (तरी देखील मिश्कील) विचारवंत आहेत.

"मा फलेषु कदाचन" - अधिकार कधीच नाही असे ते वाक्य ठासून सांगत असता, त्याचा अर्थ "काही प्रमाणात अधिकार आहे", "चांगल्या फळाची अपेक्षा करण्यापुरता अधिकार आहे", "खडीसाखर की खोबरे नाही, पण कुठलातरी प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करावी" असा लावणे ठीक वाटत नाही. ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली.

मला वाटते अधिकार आणि अपेक्षा यात फरक आहे. जेंव्हा एखादे काम हातात घेतो तेंव्हा अपेक्षेनेच घेतो.मात्र सर्व कष्ट केल्यावरही अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नाही तर तसे का मिळाले नाही असा त्रागा करू नकोस. कारण त्यावर तुझा हक्क नाही. नाहीतर रणांगणावर युद्ध कर सांगायला ही गीता सांगितली असती का? पण तशी सांगताना एकीकडे श्रीकृष्णाने अर्जून आपले ऐकेल अशी अपेक्षा केली. पण दुसरी कडे, "असे गुढाहूनी गुढ ज्ञान मी तुज बोलीलो, ध्यानात घेऊनी सारे, स्वेच्छेने योग्य ते करी" असे म्हणून तसे अपेक्षित फळ मिळण्यावर आपला अधिकार नाही हे पण कुठेतरी दाखवून दिले असे वाटले.

अर्थात हे वाक्य कोणी परीक्षेच्या निकालावर लावले तर बोंब होईल... पण ओबामाचेच उदाहरण घेऊ: आज आर्थिक घसरंडीचे उत्तरदायीत्व त्याच्या पदरात पडले आहे. त्यावर विविध पद्धतीने विचार करून ज्या निर्णयाने अर्थव्यवस्था मूळ पदावर येऊ शकते. आतात्याच्या कर्माला फळ येणार का नाही हे त्याला आत्ता खात्रीने माहीत नाही. पण त्याचा विचार न करता तसे मिळेल या अपेक्षेने अभ्यासपूर्वक योग्य निर्णय घेण्याचा हक्क त्याने बजावला आहे.

"एकम् सत्" म्हणण्याच्या हव्यासापायी कोणी काही नवीन, वेगळे म्हटलेच नाही असे करू नये.

असे कोणीच म्हणत नाही. या वचनाचा अर्थ केवळ असा आहे की (देवाधर्मासंबंधीचे) तत्वज्ञान सांगताना केवळ आपल्याला वाटते तेच बरोबर समजायचे कारण नाही. इतरही तेच सांगू शकतात जरी शब्द आणि कृती वेगळे असले तरी. थोडक्यात "ऑल्सो" म्हणा "ओन्ली" नको.

क्लिंटन's picture

21 May 2009 - 9:11 am | क्लिंटन

क्लिंटन यांनी त्यांच्या म्हणण्याचे केलेले गणिती समीकरण बघून क्लिंटन यांच्या प्रतिभेबद्दल अधिकच कौतूक वाटते.

धन्यवाद.

ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली.

दयानंद सुध्दा आपल्या कर्माचे फळ नक्की काय हा अधिकार केवळ देवाचा आहे असे म्हणतात. म्हणजेच आपण केलेल्या कर्माचा परिणाम काय होईल याचा निर्णय करायचा अधिकार आपल्याला कधीच नाही असाच होतो.कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असा लावला जातो.दयानंद म्हणतात तो तसा नाही तर कर्मणि एव अधिकार: ते म्हणजे तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे आणि मा फलेषु कदाचन म्हणजे तुझ्या कर्माची फळे काय हे ठरवायचा नाही. यात ठरवायचा हा शब्द मुद्दामून अधोरेखित केला आहे.

म्हणजेच मी परीक्षेसाठी अभ्यास करतो ते मला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा ठेऊनच.पण माझ्या A,B,C या घटकांप्रमाणे देवाला माहित असलेल्या गणिती समीकरणाप्रमाणेच मला फळ मिळणार आहे.याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेऊन अभ्यास करावा असा होत नाही.तर मी चांगले मार्क मिळावेत म्हणून माझ्या परिने चांगला प्रयत्न करावा आणि परिणाम देवावर सोडावा.आणि जो काही परिणाम देव मला देईल तो खळखळ न करता स्विकारावा.म्हणजेच माझा अधिकार अभ्यास करण्यापुरताच आहे.त्याचा परिणाम काय होईल हे ठरवायचा नाही.पण याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता अभ्यास करावा हा होत नाही.

परत एकदा लिहितो: याचाच अर्थ आपल्या प्रयत्नांचे फळ काय असेल हे ठरविणे आपल्या अधिकारात नाही.ते केवळ देवाच्या अधिकारात आहे.पण याचा अर्थ कर्म करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा होत नाही. (असे दयानंदांच्या सांगण्याचे माझे interpretation झाले.)

अर्थात याची अनेक interpretations असू शकतात आणि आहेत.मला स्वत:ला हे अधिक पटते.कारण चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता सर्वात चांगला अभ्यास होऊच कसा शकेल हे मला स्वत:ला कळत नाही.म्हणजे हे एका अर्थी काहीतरी करायचे म्हणून करणे किंवा शुध्द शब्दात पाट्या टाकण्यासारखेच झाले.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

अधिकार आणि अपेक्षा यांच्यात तुम्ही जो फरक करता तो पटण्यासारखा आहे. पण हा तुमचा स्वतंत्र विचार (किंवा दयानंदांचा, किंवा चिन्मयानंदांचा स्वतंत्र विचार) होय.

श्लोक पुढे असा चालू राहातो -

मा कर्मफलहेतुर्भू:

= कर्माचे फळ ज्याचा हेतू (मोटिव्हेशन) आहे असा असू नको.

म्हणजे चांगले मार्क (अभ्यासकर्माचे फळ) हा हेतू ठेवून अभ्यास (कर्म) करणारा असू नकोस.

पुढच्याच श्लोकात

"सिध्यसिध्यो: समो भूत्वा"

साधेल किंवा न साधेल याबाबत सम होऊन...
चांगले मार्क बद्दल अधिकार नाही, पण अपेक्षा आहे, म्हणजे चांगले मार्क मिळणार न-मिळणार याबद्दल "सम" झाल्यासारखे वाटत नाही. आणि गीता तर सम होण्याबद्दल सांगत आहे.

चांगले मार्क मनात ठेवून अभ्यास करणे खरेच चेतना देणारे असू शकते. तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण ते कर्मण्येव श्लोकाचे इंटर्प्रेटेशन आहे म्हणण्यात थोडा धोका आहे.

माझ्या मनात वेगळा सुचलेला विचार गीतेतलाच आहे (हे फक्त इंटर्प्रेटेशन) असे म्हणायची सवय लागल्यास गीतेमधील मूळ (मला इंटर्प्रेटेशन न सुचलेले, अजून न पटलेले) विचार असे मनात घ्यायची सवय मोडेल.

माझी अशी सवय मोडली तर माझे काय नुकसान होते? आपल्याला आवडलेल्या स्रोतात आपल्याला न आवडणारे विचारही असतात ते जोखण्याची कठिण कामगिरी टाळली जाऊ लागेल. आणि जे काय आहे ते माझ्या इंटर्प्रेटेशनप्रमाणे आहे (आणि माझ्या इंटर्प्रेटेशनप्रमाणे मी आधीच जगत असल्यामुळे मला बदल करायला काहीच नाही) असे समजून माझे वाचन-मनन आळशी होऊ लागेल. माझ्याबद्दल ही भीती ती सर्वांबद्दलच. तुमच्यासारख्या व्यासंगी व्यक्तीबद्दलसुद्धा.

असो. वरील भगवद्गीतेतील श्लोकातले काही शब्द विशेष उद्धरण करून वेगळे काढले आहेत. ते वेगळे काढून त्यांचा पूर्ण संदर्भ चुकलेला नाही असे पडताळता यावे, म्हणून पूर्ण श्लोक येथे देत आहे :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ॥ अध्याय २, श्लोक ४७
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ अध्याय २, श्लोक ४८

- - -

कधीकधी एखादे महान पुस्तक काय म्हणते त्याबद्दल "हे पुस्तक-वचन मला पटत नाही" असे म्हणणे बरे. "हे माझे इंटर्प्रेटेश आहे" म्हणण्यात गुळमुळीतपणा आहे. याचे उदाहरण मुद्दामून वेगळ्या ग्रंथातून देत आहे. तुमचे नामबंधू श्री. क्लिंटन यांच्या ख्रिस्ती धर्मातील. उदाहरण मुद्दामून टोकाचे देत आहे, म्हणजे उगाच ग्रे-शेड मध्ये माझा मुद्दा हरवणार नाही.

मत्तयच्या शुभवर्तमाना(इंग्रजीत गॉस्पेल ऑफ मॅथ्यू)मधला प्रसंग आहे. येशूला रोमन गव्हर्नर निर्दोष म्हणून मुक्त करणार आहे, तेव्हा ज्यू लोकांची झुंड म्हणते की याला माराच. आणि ते म्हणतात (इंग्रजी बायबलमधून)
"His blood be on us, and on our children" Matthew 27:25
याचा सामान्य अर्थ असा आहे, की त्या काळातल्या ज्यू लोकांनी येशूच्या खुनाचा दोष स्वतःकडेच नव्हे तर स्वतःच्या पुढच्या पिढ्यांकडे घेतला होता. अशी मत्तयची साक्ष ग्राह्य आहे, असे समजून अगदी हल्लीपर्यंत काही ख्रिस्ती लोक हल्लीच्या ज्यू लोकांना ख्रिस्त-खुनाचा दोष देतात.

आता काही सहृदय लोक आपले इंटर्प्रेटेशन सांगतात, की हे वाक्य वेगळ्या अर्थाने वाचले पाहिजे :
येशूच्या मृत्यूचा दोष पूर्ण मानवजातीवर आणि आपण सर्वांनीच वाईट विचारापासून सुधारायला पाहिजे. (अशा एका लेखकाचा दुवा)
हे इंटर्प्रेटेशन घेऊन पुन्हा मत्तयची साक्ष ग्राह्यच आहे!

मला वाटते, अशा परिस्थितीत बायबल कथेचा अर्थ सरळसरळ शब्दार्थ घेऊन, मग बायबलमधील मत्तयची साक्ष प्रमाण नाही, असे आजकालच्या ख्रिस्ती लोकांनी समजणे जास्त प्रामाणिक आहे, असे मला वाटते. मत्तयाची साक्ष ग्राह्य आहे, असे विचार वागवण्यासाठी इंटर्प्रेटेशनांच्या जंजाळात शहाणे लोक अडकतात तेव्हा वाईट वाटते.

- - -
(Matthew २७:२४-२५) When Pilate saw that he could prevail nothing, but that rather a tumult was made, he took water, and washed his hands before the multitude, saying, I am innocent of the blood of this just person: see you to it. Then answered all the people, and said, His blood be on us, and on our children.
संदर्भ लावून याचा अर्थ असाच दिसतो की "पिलात, हे रक्त तुझ्यावर नाही, तर आमच्यावर, आमच्या मुलांवर आहे..."
हा मानवजातीचा दोष आहे असे इंटर्प्रेटेशन काढण्यासाठी पिलात काय मानव नव्हता? मला तरी मत्तयाच्या वार्तेत या प्रसंगाचे सहृदय इंटर्प्रेटेशन काढणे म्हणजे विचारसूत्राची चकलीकडबोळी करणे भासते.

क्लिंटन's picture

22 May 2009 - 8:57 pm | क्लिंटन

धनंजय,

आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या एका श्लोकावर जितका काथ्याकूट झाला आहे तितका इतर कोणत्या श्लोकावर झाला असेल असे वाटत नाही.

माझ्या मनात वेगळा सुचलेला विचार गीतेतलाच आहे (हे फक्त इंटर्प्रेटेशन) असे म्हणायची सवय लागल्यास गीतेमधील मूळ (मला इंटर्प्रेटेशन न सुचलेले, अजून न पटलेले) विचार असे मनात घ्यायची सवय मोडेल.

हे १००% मान्य.

माझा स्वत:चा दयानंदांचे पुस्तक वाचायचा उद्देश माझ्या निराशेच्या काळात मनाला उभारी देणारे असे काहीतरी असावे हा होता आणि त्यामुळे मला उपयोग झाला हे नक्कीच.त्या पुस्तकातून मला अजून एक प्रश्न पडला होता.तो मागच्या प्रतिसादात निसटला होता तो आता लिहितो.सांख्ययोगात स्थितप्रज्ञ माणसाची तुलना समुद्राबरोबर केली आहे.ज्याप्रमाणे पाऊस पडला म्हणून किंवा उन्हामुळे पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्राची पातळी कमीजास्त होत नाही.त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाच्या मनात इच्छा येतात आणि जातात पण त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही.याचा अर्थ भौतिक जगात कोणत्याच इच्छा ठेऊ नयेत असा घेतला तर?मला एखादी गोष्ट पाहिजे ही इच्छाच मुळात नाहिशी झाली तर आपल्या हातून काहीच घडणार नाही.माझ्या काकांबरोबर मी या विषयावर बोललो होतो.त्यांनी मला एक चांगले उदाहरण सांगितले.आपले समाधान हे बाहेरच्या वस्तूवर अवलंबून असेल तर ती वस्तू आहे तोपर्यंतच आपले समाधानही आहे.म्हणजे एखाद्याला श्रीखंड आवडत असेल तर श्रीखंड खाऊन त्याला समाधान मिळेल.पण ते समाधान श्रीखंड संपल्यावर संपून जाईल.तेव्हा त्या श्लोकाचा अर्थ त्यांच्या मते भौतिक जगात इच्छा ठेऊ नका असा नाही तर इच्छा जरूर ठेवा पण बाह्य वस्तूंवर अवलंबून असलेले समाधान क्षणभंगूर असेल हे ध्यानात घेऊन त्यात जास्त गुरफटू नका असा आहे. पण ते दयानंदांच्या पुस्तकात म्हटलेले नाही. आता या अर्थ लावण्याच्या खेळात मूळ अभिप्रेत असलेला अर्थ हरवायला नकोच.

असो.भगवद्गीता हा या मूळ चर्चेचा विषय नाही तेव्हा त्यावर अधिक लिहित नाही.

धनंजय मलाही आपल्यासारखा बायबल आणि सगळ्याच ग्रंथांचा अधिक अभ्यास करायला आवडेल.आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. वेळ मिळेल तेव्हा या विषयावर नवा चर्चाप्रस्ताव आपणच लिहिलात तर ते अधिक चांगले होईल. माझ्यासारख्या अनेक मिपाकरांच्या अशा प्रश्नांना आपण उत्तरे देऊ शकाल ही खात्री आहे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

23 May 2009 - 3:44 am | विकास

>>>ज्याप्रमाणे पाऊस पडला म्हणून किंवा उन्हामुळे पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्राची पातळी कमीजास्त होत नाही.त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाच्या मनात इच्छा येतात आणि जातात पण त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही.<<<

न भंग पावे भरता हि नित्य ।
समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥
जाती तसे ज्यात जिरूनि भोग ।
तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ अ.२ - ७० ॥

विकास's picture

21 May 2009 - 9:28 am | विकास

या संदर्भात शोध घेताना एक "इंटरेष्टींग" संकेतस्थळ मिळाले.
कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक येथे पहा. त्याचा अन्वयार्थ, ट्रान्सलीटरेशन, हिंदी पासून रशियन भाषेत (ऑडीओ) अर्थ. श्रीधरस्वामी, रामानुजन, माधवाचार्य आदींची भाष्ये (त्या त्या श्लोका खाली) असे सर्व काही पहायला मिळते. आणि अर्थातसंस्कृत श्लोकाची ऑडीओ फाइल पण आहे.

मिसळभोक्ता's picture

19 May 2009 - 1:47 pm | मिसळभोक्ता

ह्या एकम सतच्या भानगडीत आज प्रभाकरन बसतो का ? आज तो मेला. श्रीलंकेच्या बुद्धसंप्रदायाने एका हिंदूची हत्या केली. ओबामाने त्याविषयी एकम सत च्या थीम मध्ये काही बोलले का ?

तुम्ही काहीही म्हणा विकासराव, ही हिंदू धर्मातील एकम सत ची भानगड बोलताना व्यवस्थित वाटते, तुमच्यासारख्या दयाळू, सर्वधर्मसमभाव (हिंदूंच्या कलाने) करणार्‍या लोकांना ती पटतही असेल, कदाचित, पण त्याच सत मधे प्रभाकरन, ओसामा, जॉर्ज बुश, लालू प्रसाद, अडवाणी, मनूसिंग, राज ठाकरे हे सर्वच येतात, हे कसे बुवा ?

सगळेच सत असेल तर मग निवडणुका कशाला ? हे जिंकले, ते नाही, म्हणून रागलोभ, मत्सर कशाला ? निरूपम अमराठी म्हणून तो एकम सत मध्ये येत नाही का ? आणि राम नाईक (पेट्रोलपंप वाटपकर्ता) एकम सत मध्ये यावा का ?

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

विकास's picture

19 May 2009 - 5:30 pm | विकास

तुम्ही तर ज्ञानी (विप्रा) आहात मिसळभोक्ता साहेब. तुम्हाला काही सांगायचे म्हणजे (आंतर्जालकालगणनेतील १४०० वर्षे वय असलेल्या) चांगदेवाला (त्यामानाने एकदमच लहान असलेल्या) मुक्ताबाईने सांगण्यातला प्रकार होईल. ;) तरी देखील प्रयत्न करतो: "एकम् सत् " म्हणजे तुम्ही ईश्वर मानणारे असा अथवा न मानणारे, तसा मार्ग दाखवत सहीष्णूवादी जीवन कसे जगावे हेच ज्ञानी व्यक्ती सांगत असते.

अर्थाचा अनर्थ करणारे "विप्रा" नसतात आणि ते एकम् सत् काय कुठलेच "सत् " नसते.

>>>तुम्ही काहीही म्हणा विकासराव, ही हिंदू धर्मातील एकम सत ची भानगड बोलताना व्यवस्थित वाटते, तुमच्यासारख्या दयाळू, सर्वधर्मसमभाव (हिंदूंच्या कलाने) करणार्‍या लोकांना ती पटतही असेल...<<<

धन्यवाद. मला दयाळू आणि सर्वधर्मसमभाव करणारा म्हणल्याबद्दल! सगळ पावलं :)

chipatakhdumdum's picture

22 May 2009 - 1:28 am | chipatakhdumdum

दहशतवादी प्रभाकरन हा हिन्दू नव्हता. तो ख्रिश्चन धर्माचा होता. त्याला सगळा पैसा चर्च कडून मिळत होता. त्याच्या सगळ्या हिन्सक कृत्याना चर्चचा पूर्ण पाठिम्बा होता. जरा गूगलवर जाउन त्याला जगातून कोण support करत होते याची पूर्ण माहीती घ्या.