इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते.
सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते. म्हणूनच इंदूरच्या अभय प्रशालमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी झाली होती. संयोजकांच्या अंदाजे वीस ते बावीस हजार लोक आले होते. केवळ इंदुरच नव्हे तर धार, देवास, उज्जैन, खरगोन, ग्वाल्हेर येथूनही लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अक्षरशः गाड्या भरभरून लोक आले होते. तरूणांची उपस्थिती उल्लेखनीय होती. इंदुरात इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोक एखाद्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहातील असे मला तरी अजिबात वाटले नव्हते. पण ही गर्दी डोळ्यांचे पारणे फेडणारी दिसली. परप्रांतात एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या मराठी लोकांना एकत्र पाहण्याचा हा प्रसंग अतिशय सुखद वाटला. त्याचवेळी मराठी लोकांच्या सांस्कृतिक प्रेमाची पावतीही मिळाली.
ता.क. विशेष म्हणजे एवढी गर्दी असूनही एकही अनुचित प्रकार घडला नाही. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचा मेळावा झाला होता. त्यावेळी झालेल्या गोंधळाची मोठी प्रतिक्रिया लोकांकडून उमटली होती. त्यामुळे कार्यक्रमात बोलाविलेल्या राजकीय नेत्यांनीही या कार्यक्रमाच्या शिस्तबद्धतेचे कौतुक केले. लोकांचा तुडूंब प्रतिसाद पाहून संयोजक आणि कार्यक्रमाला उपस्थित स्थानिक नेतेही अवाक झाले.
थोडे इतर
या मुलांना 'झी मराठी'ने चांगलेच 'ग्रुम' केले आहे. त्यांनी काय, कसे (आणि आपल्याला म्हणजे झीला हवे तसे) बोलावे याचे पद्धतशीर प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते. अर्थात, झीने त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट नाकारता येत नाही. त्यांच्यामुळेच या मुलांना मोठे व्हायची संधी मिळाली हेही खरे.
लिटिल चॅम्प्सच्या मुलाखतींसाठी येथे क्लिक करा.
http://marathi.webdunia.com/entertainment/regionalcinema/littlechamps/
लिटिल चॅम्प्सचे फोटो येथे पहा.
http://photogallery.webdunia.com/marathi/Inner.aspx?GalleryId=451&ShowIm...
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 7:33 pm | श्रावण मोडक
जिल्हा माहिती कार्यालयाचे पत्रक का काढतोस? जरा लिही की हात मोकळा सोडून...
25 Feb 2009 - 11:20 am | पाषाणभेद
इंदुरची मराठी मंडळी रसिक आहेत. नेहमी तेथे काहीतरी कार्यक्रम होत असतात.
बाकी महाराष्ट्राच्या बाहेर गेले की आपल्या मातीचे महत्व कळते.
-( सणकी )पाषाणभेद
25 Feb 2009 - 11:33 am | जाणकार
भोचक साहेब,
मि मराठि वेबदुनिया वर तुम्हि लिहलेले वाचलेय त्यात तुम्हि छान लिहलेय मग इथे इतका संक्षिप्त विवरण का?
जरा मनमोकळे लिहा कार्यक्रम परत पाहिल्या सारखा आनंद मिळेल आणि लिहाल त्यात निलेश परब ह्यांनि सादर केलेल्या ७ मिनिटाच्या अतिसुंदर ढोलकि वादना करिता पण काहि लिहा.