खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
28 Nov 2022 - 11:57 am

Rajmachi point

यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं. त्यामुळं सकाळची शेवटची लोकल पकडली आणि लोणावळ्याकडे निघालो.

अखेर शिवाजीनगरहून लोणावळ्याला पोहचलो. थंड हवेच्या ठिकाणी जास्तच गरम होत होतं, ढगाळ हवासुद्धा होती. मग विचार करत होतो की, खंडाळ्याला अशा वातावरणात जायचं की नाही, कारण ढगाळ हवेमुळे फोटो नीट येणार नाहीत. थोडं खाणं झाल्यावर म्हटलं, “बघुया जाऊन पुढं!. किमान खंडाळ्याच्या स्टेशनपर्यंत तरी जाऊन येऊ”. असा विचार करून चालायला लागलो. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुढं निघालो. मजल-दरमजल करत, वाटेत फोटो काढत खंडाळा स्टेशनपर्यंत पोहचलो. मग म्हटलं, “जाऊ अजून पुढं, खंडाळा व्ह्यू पॉईंटपर्यंत तरी जाऊया इथंपर्यंत आलोय तर”. मग तसंच चालत राजमाची पॉईंटवर पोहोचलो. तिथून दिसणारा उल्हास नदीचा धबधबा आणि तिचं खोरं पहिल्यांदाच इतक्या शांतपणे न्याहाळू लागलो होतो. मस्त वाटत होतं. तिथूनच दूरवर मंकी हिल केबिनच्या पुढचा रेल्वेचा बोगदा दिसत होता आणि माझ्या खाली खंडाळ्याच्या बोगद्यातून बाहेर पडलेला आणि लोणावळ्याकडे जाणारा Expressway थोडासा दिसत होता. त्याच बोगद्याचे आणि एकूणच या परिसराचे फोटो काढण्याचा उद्देश ठेवूनच मी आज इथंपर्यंत पोहोचलो होतो, पण इथून Expressway चे बोगदे मात्र नीट दिसत नव्हते.

Expressway
राजमाची पॉईंटपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. उल्हास नदीचं खोरं तिथून न्याहाळून झाल्यावर मी थोड्या वेळानं खंडाळा व्ह्यू पॉईंटकडे निघालो. लांबूनच त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या दिसू लागल्या होत्या. तिथं पोहोचल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसलं ते पाहून मनातल्या मनात “Ohh wowww” असे स्वर उमटले. जुना महामार्ग, त्याच्या खाली Expressway आणि त्या खाली लोहमार्ग, या सगळ्या मार्गांवरून सुरू असलेली अखंड वाहतूक, समोर जुन्या रिव्हर्सिंग स्टेशनचे अवशेष, सह्याद्रीचे कोकणाकडचे आणि खाली दरीत दिसत असलेलं खोपोली. तिथं पोहोचत असतानाच 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुरात्ची थलालवर डॉ. एम. जी. राजचंद्रन चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दिसली, म्हणजे तिचे टपच दिसले. मस्त दृश्य दिसत होतं या पॉईंटवरूनही. मग मनात आलं की, आज स्वच्छ हवा चांगली असती तर.
Khandala point

आता ठरवलं इथंपर्यंत आलोच आहे, तर तसंच आणखी चालत खाली अमृतांजन पॉईंटपर्यंत तरी जाऊन यावं. मग लागलो पुढं चालायला. इथून थोड्याच अंतरावर घाटरस्त्याची डागडुजी सुरू होती. अमृतांजन पॉईंटच्या जवळ पोहचल्यावर तिथून दिसणाऱ्या घाटाचं दृश्यही मस्त दिसत होतं. एकीकडे दरीत खोपोली शहर, दुसरीकडे सह्यकडे, जुन्या महामार्गाखालून जाणारा Expressway आणि समोरच्या डोंगरावरून छोटीशी दिसणारी आगगाडी! मग तिथं जरा जास्त वेळ रेंगाळलो. आजपर्यंत फक्त बस आणि ट्रेनच्या खिडकीतून पाहिलेलं दृश्य तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहत असल्यामुळे खूपच उत्साहित वाटत होतं.

Amrutanjan
पूर्वीच्या अमृतांजन पुलाच्या जागी गेल्यावर आता जरा काही तरी थंड प्यावं वाटलं. कारण लोणावळ्याच्या स्टेशनपासून इथपर्यंत जवळजवळ सव्वासात किलोमीटर चालणं झालेलं होतं. आता तिथं शिल्लक राहिलेल्या इतिहासाच्या काही खुणांचे फोटो काढून घेतले. कारण तिथंपर्यंत जाण्याचा माझा हेतूच तो होता. त्यानंतर मग परतीच्या मार्गाला लागलो, चालतच. तेव्हाच सुरू झालेला थेंब-थेंब पाऊस लोणावळ्यापर्यंत सुरूच होता. मध्येमध्ये थोडं खाण्यासाठी-पिण्यासाठी छोटा ब्रेक घेत लोणावळा स्टेशनवर पोहोचलो आणि संध्याकाळची लोकलही लगेच मिळाली. एकूणच या परिसराला दिलेली ही पहिलीच भेट खूपच मस्त होती. हे सारं केलं होतं खंडाळ्याच्या घाटासाठी!

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/11/blog-post_28.html

वावरइतिहासमुक्तकप्रवासभूगोलदेशांतरआस्वादलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

28 Nov 2022 - 12:07 pm | सौंदाळा

मनस्वी भटकंती आवडली. अशा अवचितपणे केलेल्या भटकंतीची मज्जा वेगळीच असते.

पराग१२२६३'s picture

28 Nov 2022 - 11:55 pm | पराग१२२६३

हो नक्कीच

सस्नेह's picture

28 Nov 2022 - 12:13 pm | सस्नेह

मस्त मुशाफिरी.

मस्त!गर्द झाडी आहेत.

गोरगावलेकर's picture

28 Nov 2022 - 12:47 pm | गोरगावलेकर

भटकंती आवडली

लोणावळा स्टेशनच्या बाहेर जो रस्ता बस डेपोकडे जातो तिथे बीएसएनएलचे केंद्र लागेल तिथूनच आतल्या गल्लीतून खोपोली नगरपालिकेच्या खोपोली-लोणावळा-खोपोली बसेस सुटतात. त्या बसने तुम्ही खंडाळा स्टेशन नाका ( तलावाकाठी स्टॉप आहे), राजमाची पॉईंट (तुम्ही जो खंडाळा व्ह्यू पॉइंट म्हणता तो), अमृतांजन पूल किंवा खाली जाणाऱ्या घाटरस्त्यावर खोपोली डायवर्शन किंवा खोपोली नाका(महडसाठी) इथे उतरू शकता.

खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते. परतताना लोणावळाकडे जाणारे वाहन पकडावे.

खंडाळा स्टेशनच्या बाहेर मेन रोडवर एक रस्ता शाहरूखच्या बंगल्यकडे जातो तिथून उल्लास नदी खाली उडी घेते. तेही छान स्पॉट आहे.

भाविक असणाऱ्यांनी लोणावळ्यात नांगरगाव आश्रमाकडे (दोन आहेत) जावे. आणखी दोन जागा आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2022 - 5:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते

कंजुस काका बहुतेक तुम्ही कुरवंडे गाव म्हणताय, जिथुन बंगल्यांच्या वाटेने थोडे वर जाउन उजवीकडे गेल्यास ड्युक्स नोज आणि डावीकडे आय एन एस शिवाजीच्या कुंपणा जवळुन खालचा रस्ता पकडल्यास चावणी गावातुन उंबर् खिंडित जाता येते.

पराग१२२६३'s picture

28 Nov 2022 - 11:57 pm | पराग१२२६३

धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.

श्वेता व्यास's picture

28 Nov 2022 - 2:23 pm | श्वेता व्यास

छान भटकंती.

श्वेता२४'s picture

28 Nov 2022 - 2:52 pm | श्वेता२४

फोटोही छान

सिरुसेरि's picture

28 Nov 2022 - 6:58 pm | सिरुसेरि

छान भटकंती व फोटो . नागफणीचा फोटो आहे का ?

कपिलमुनी's picture

29 Nov 2022 - 2:50 pm | कपिलमुनी

पायपीट : उत्तम
फोटो : नो क्मेंट

कुमार१'s picture

29 Nov 2022 - 4:37 pm | कुमार१

भटकंती आवडली.

चौथा कोनाडा's picture

2 Dec 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा

झकास भटकंती !
उनाड दिवसाने छान सरप्राईझ दिलं म्हणायचं !

पराग१२२६३'s picture

2 Dec 2022 - 7:57 pm | पराग१२२६३

हो अगदी