धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा)
जय धन मान सकळ सुखसागर
माया वसत त्रीखंडी निरंतर
पैसा पैसा पैसा पैसा
दिसतो ऐसा, आहे कैसा?
लपविला जर टॅक्सची खासा
काळा शार बने मग पैसा
भरता सरकाराऽचे देणे
शुभ्र धन नांदे अभिमाने
हिरवा रंग नोटांचा तुमच्या
नयनी दिसे झणी लोकांच्या
काळ्या नोटा, दिली सुपारी
लाल रंग मग धन ते धारी
रंगबिरंगी अती पैसा वरचा
परीटाकडून शुभ्र करायचा
पैसा अपुला रोड भासतो
दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो
खोटी नाणी, चपळ फ़िराई
तांब्याची मोडीत विकाई
पेटीत ठेवून कोऱ्या नोटा
तुकडेवाल्या जोडून वाटा
पैसा नश्वर, आरोप खोटा!
शाश्वत आहे प्लास्टीक नोटा
उधारीचा तो पैसा प्लास्टीक
जपून ठेवती पैसा बॅन्कीक
पैसा ॐ निर्गूण निराकारा
सांगे वेबचा ई व्यवहारा
पैसा जाई पैसा जिकडे
गरीबांशी तो धरी वाकडे
धनिका घरी धनाची गंगा
तरीही भुकेला सदाची नंगा
पैसा पैसा पैसा पैसा
दिसतो जैसा, नाही तैसा!
श्रमाविना जे धऽन कमवले
तृणमुल्य ते सतत भासले
स्वकष्टाची जरी कांदा भाकर
संतुष्ट करी जशी लोणी साखर
चिंतापिशाच जवळ ना येई
भ्रम खोटा बघ धन ते देई
पैसा मिळता शांती पळाली
पैसा पळता झोप उडाली
म्हणे गोपालसुत धनवाना
मायाऽऽपाशा सोडून द्याना
प्रतिक्रिया
7 Oct 2008 - 8:25 am | प्राजु
छान लिहिले आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Oct 2008 - 11:26 am | विसोबा खेचर
स्वकष्टाची जरी कांदा भाकर
संतुष्ट करी जशी लोणी साखर
वा! या ओळी सर्वात आवडल्या..! :)
आपला,
(पैसेवाला) तात्या.
8 Oct 2008 - 5:10 pm | अरुण मनोहर
प्राजु, तात्या. प्रतिसाद नोंदवल्यासाठी आभार.
8 Oct 2008 - 5:22 pm | प्रकाश घाटपांडे
अस्ला तरी बी वांध नस्ला तरी बी वांध पोटापान्या पुरता अस्ला म्हजि झालं. पन हे ठरवनार कोन व कसं?
बाकी धनाढ्य एकवीशी झकास
प्रकाश घाटपांडे
9 Oct 2008 - 8:23 am | अरुण मनोहर
आता प्वाटापुर्ता पयसा मंजे कीती त्ये आपापलं प्वाट बगूनच आपलं आपनच ठरवायच की!
पन असं करायच सोडून उगाच लोक दुसर्याइच प्वाट बगून दुकी व्ह्तात म्हनून तर सारा इस्कोट होतो बगा!
धन्यवाद.
8 Oct 2008 - 10:09 pm | रामदास
काय काय मनात येतं कविलोकांच्या काही सांगता येत नाही.
बाकी एकविशी म्हटल्यावर थोड्या गुदगुल्या झाल्या होत्या.
9 Oct 2008 - 8:29 am | अरुण मनोहर
खरयं रामदासजी. कवी कधी पैसा, कधी गोलगुबार **, कधी जरीचे धागे, कुठल्या कुठल्या भन्नाट चीजा बघत असतो! गुदगुल्या होणारच की! ;)
आभार. तुमच्या कविता, लेखन मला खूप आवडते.