हिशेब हिशेबाचा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
3 Sep 2016 - 6:37 am

आमची प्रेरणा
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. तिचा नवरा चिन्मय (माझ्या दुसऱ्या एका मित्राचा मुलगा) लहानपणी आमच्या मांडीवर खेळलेला असल्याने आम्हा दोघांना त्यांचे नवीन घर बघण्याची फार उत्सुकता होती.

आम्ही सगळे घर बारकाईने बघितले. कुठे काय कसे घर सजवले आहे हे बघत आम्ही नवरा-बायको आपसात बोलत होतो. ऋतुजा ( तिची मुलगी) कुठल्या शाळेत जाते ? आम्ही विचारले, पण तिने तिकडे दुर्लक्ष केले. रुचिराकडे तीन मोबाईल आहेत. एक खास सेल्फी आणि व्हाट्सअँप साठी, एक टॅब फेसबुक आणि सिरियल्स बघण्यासाठी आणि एक ऋतुजाला कार्टून्स बघण्यासाठी. माय-लेकी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यातच बिझी असतात. भूक लागली की पिझ्झा, चिप्स, कोक मागवून घेतात... आणखी काही करायला वेळच मिळत नाही ... वगैरे कौतुकाने सांगत होती.

या गप्पा चालू असतानाही तिचे माना वेळावून सेल्फी घेणे, त्या लगेच व्हाट्सअँप वर पाठवणे वगैरे चालूच होते. त्यातूनच क्षणभराची गॅप पकडून मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे, हे मला ठाऊक होते, पण नवीन घराचे मात्र आजच कळत होते. .

मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो, ब्रेकफास्ट तयार करतो, तिला आठवड्याची अंघोळ घालतो, सर्वांसाठी स्वयंपाक करून जेवायला वाढतो. दोन दिवस घराची पूर्ण साफसफाई, कपडे धुणे वगैरे त्यानेच करायचे. शनिवार रविवार मला पूर्ण फ्री.

माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो, कारण व्हाट्सअँप, फेसबुक आणि सिरियल्स मधून तिला इतर काही करायला तिला अजिबात फुरसत नसते हे तिने सांगितलेच होते.

बाहेर पडल्यावर बायको म्हणाली ही घरीच तर असते (होम मेकर आहे). नवरा बिचारा पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो, भरपूर पैसे मिळवतो. ही इथे हिरॉईन सारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.

तीन मोबाईल असल्याने नऊ हजार रुपये वायफाय आणि मोबाईल डाटावर खर्च करते आहे. मुलगी चार तास शाळेत असते, त्या वेळात ती आपल्या मैत्रिणींबरोबर मॉल्स मध्ये शॉपिंग आणि किट्टी पार्टी वगैरे आटोपते, किंवा माहेरी जाऊन बसते... पाची दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवऱ्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा ?

मी अजून विचार करतो आहे.आपल्याच मित्राची भाची आहे. ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?

संस्कृतीविनोदसाहित्यिकसमाजराहणीराहती जागामौजमजाप्रकटनआस्वादविरंगुळा