चुकचुकली पाल एक...!

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
1 Aug 2016 - 12:44 pm

गीत :
चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले

रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले

अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतातील सूर असे का मधेच पण तुटले

तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले

गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६

***

अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.
सुरुवातीच्या ओळी भावगीतासाठी म्हणून काहीश्या विचित्र अन गूढ वाटतात. त्याचा अर्थ शोधावा का? खरं तर नकोच. कांही हाती लागेल का नाही माहीत नाही. आणि बाकीची कविता मात्र अन्य कोणत्याही विरहगीतासारखीच वाटते.

पालीचे चुकचुकणे हे व्यत्यय येणे या अर्थाने आपण वापरतो. म्हणजे कांही विपरीत घडले अन अपेक्षित असे कालचक्र चुकले. आपल्या व्यवहारी जगात कालचक्र म्हणजे घड्याळाची टिक-टिक असेल तर त्याची लय पालीच्या चुक-चुक आवाजाने चुकतेच. या गीतातही अर्थातच ही प्रेमिका आपल्या प्रियाच्या विरहाने दिवस रात्र तळमळत आहे. व्यवहारी जगात त्याला शोधण्यात कांही अर्थ नाही हे तिला उमगले आहे. आता तिच्या भावविश्वातच फक्त ती प्रियकराला शोधत आहे. त्याच्याशी संवाद साधत आहे. अतिशय तरल कविता आणि भावपूर्ण स्वर फक्त अनुभवावेत असेच झालेत.

गाणी तयार होतात कशी ? हा आपण रसिकांना नेहेमीच पडणारा प्रश्न असतो. संगीतकार प्रवासात, गप्पात असले तरी त्यांना एक से एक चाली सुचल्याचे आपण वाचतो. गाण्यांच्या जन्मकथा रंजक असतात. 'चुकचुकली पाल' एक या गाण्याची गोष्ट अशीच कांहीशी आहे.

२०११ च्या दिवाळीच्या सुमारास लोकप्रभेत खळेकाकांवर लिहिलेला श्री. अनंत पावसकरांचा एक लेख आला होता. त्यात या गाण्याची जन्मकथा सविस्तर वर्णन केली होती. ती अशी:

१९६७ साली वसंत निनावेंची ‘चुकचुकली पाल एक.’ ही कविता खळेकाकांना मिळाली.
त्यांनी त्या कवितेला छान चालही लावली. या गाण्यासाठी त्यांना महंमद रफी हवे होते !
रफीसाहेब गायला तयार झाले. खूप रिहर्सल्स केल्या, पण गाडी मुखडय़ातच अडकली. ‘चुकचुकली’ हा शब्द उच्चारताच येईना. मराठीतला हा ‘च’ इतर कोणत्याच भाषेत नाहीय. रफीसाहेबांनी ढोरमेहनत घेतली, पण पहिले पाढे पंचावन्न! ‘चुकचुकली’तल्या ‘च’चा उच्चार ‘चूडी’तल्या ‘च’ सारखाच यायचा. हात टेकले दोघांनी. खळेकाकांनी हे गाणं इतर कोणाही गायकाला न देता सरळ बासनात गुंडाळून ठेवून दिलं. (यावरून आठवले- रफीसाहेबांची मराठी आणि संस्कृत उच्चारांची समस्या असावी. 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा' या गाण्याच्या सुरुवातीस जी प्रार्थना आहे, त्यातलं 'तस्मै श्री गुरवे नमः' हे नमः हे लम्हा सारखं म्हटलं गेलंय. सगळेच संगीतकार परफेक्शनिस्ट नसतात. बाबूजी किंवा खळेकाकांनी हे चालवून घेतले नसते. बाकी गोड आवाजापुढे छोट्या त्रुटी झाकल्या जातात. )

१९७६ साल उजाडलं. एके दिवशी खळेकाकांनी लतादीदींकडे या गाण्याचा विषय काढला. लतादीदींनी ती चाल ऐकताच चट्कन होकार भरला. गाणं रेकॉर्ड झालं. एल. पी. रेकॉर्डवर प्रसिद्धही झालं. आकाशवाणीवरही ते बऱ्याचदा वाजायचं. पण नंतर का कुणास ठाऊक. हे गाणं एच.एम.व्ही.ने फडताळात लपवून ठेवलं की काय. ते कुठेच सहजी उपलब्ध होत नव्हतं. १९९३ साली लतादीदींच्या सल्ल्याने जेव्हा ‘माझी आवडती गाणी’ हा आठ कॅसेट्सचा संच प्रकाशित झाला, त्यात हे गाणे गवसले.

आता हे गाणं ऐकायला कांही संस्थळांवर उपलब्ध आहे. खळेकाकांच्या वैशिष्ट्यानुसार प्रत्येक कडवे वेगळे, चाल वैशिष्ट्यपूर्ण आणि नितांतसुंदर झालीय.

एखाद्या गीताचं सोनं व्हायचंच असेल तर ते असं होतं ! लतादीदीना हे गाणे मिळाले म्हणून बरे. इतर कुणाची आपण कल्पनाही करू शकत नाही.

गाण्याची ही रोचक जन्मकथा ऐकल्यावर एक मोठठी शंका राहातेच, ती म्हणजे हे एका प्रेमिकेचे बोल असणारे गाणे रफीसाहेब कसे काय म्हणणार होते ? की त्यांच्यासाठी वरील शब्द बदलण्यात आले असते ?
जाऊद्या. आपण आपले गाणे ऐकूयात .. !

गाणे इथे ऐकता येईल.

कलासंगीतवाङ्मयकविताभाषासाहित्यिकप्रकटनविचारआस्वादसंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

बहुत शुक्रिया या नज्मसाठी! गाण्याची चित्तरकथा रोचक आहे.

विनायक प्रभू's picture

1 Aug 2016 - 12:51 pm | विनायक प्रभू

१+

अजया's picture

2 Aug 2016 - 9:02 am | अजया

गाण्यामागची गोष्ट आवडली!

सस्नेह's picture

2 Aug 2016 - 12:47 pm | सस्नेह

कविता आणि कवितेची गोष्ट दोन्ही आवडले.

बोका-ए-आझम's picture

1 Aug 2016 - 12:56 pm | बोका-ए-आझम

माणसांप्रमाणेच गाण्यांनाही नशीब असतं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2016 - 1:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

खळे काकांची सगळीच गाणे श्रवणीय असतात, त्यात ते गाणे लता ने गायले असले तर चेरी ऑन द केक.

हे गाणे पहिल्यांदाच ऐकले छान वाटले.

आणि तुम्ही सागितलेल्या इतिहासाच्या पार्श्र्वभुमिवर ऐकताना अजून मजा वाटली.

रफीच्या आवाजात हे गाणे कसे वाटले असते असे इमॅजिन करतो आहे.

पैजारबुवा,

असे किस्से अजुन असतील तर येउ द्यात. गाणी तयार होण्याची प्रक्रिया रोचक असते. सध्या लोकसत्ताच्या चतुरन्गमध्ये उत्तरा केळकर यान्चे पाक्षिक सदर अशीच छान माहिति देत.

यशोधरा's picture

1 Aug 2016 - 6:26 pm | यशोधरा

खूप सुरेख लिहिलंय, दुर्गविहारी म्हणतात, तशी मालिका बनवा.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2016 - 7:02 pm | मुक्त विहारि

हे गाणे कधी ऐकले नाही.

गाण्याची लिंक मिळाली तर उत्तम.

सर्व वाचक आणि प्रतिसादक यांचे आभार.

@मुवि, गाण्याचा दुवा वरती दिलाय. खूप जणांना हे गाणं माहीत नसतं, म्हणून निवडलंय.
@दुर्गविहारी, आणि यशोताई, प्रयत्न करेन.
फार पूर्वी कांही दिग्गजांना भेटण्याची संधी मिळालीय.

खेडूत's picture

1 Aug 2016 - 7:42 pm | खेडूत
मुक्त विहारि's picture

1 Aug 2016 - 7:44 pm | मुक्त विहारि

पण

पण

पण

गाणे ऐकता येत नाही आहे.

प्रमोद देर्देकर's picture

2 Aug 2016 - 11:36 am | प्रमोद देर्देकर

मुवि ही घ्या आठवणीतील गाण्याच्या साईटवर ते गाणे आहे त्याची लिंक. इथे ऐका.

http://www.aathavanitli-gani.com/Song/Chukachukali_Paal_Ek

ही साईट मस्त आहे. या साईटवर सगळी मराठी दुर्मिळ गाणी बहुतेक करुन उपल्ब्ध आहेत.

बरोबर, तीच. खाली उजव्या कोपर्‍यात प्लेयर आहे.
फक्त्र मोबाईलवरून ऐकता येत नाहीये.

ज्योति अळवणी's picture

2 Aug 2016 - 12:01 am | ज्योति अळवणी

आवडलं

पद्मावति's picture

2 Aug 2016 - 3:13 am | पद्मावति

खूप छान लिहिलंय.

नाखु's picture

2 Aug 2016 - 8:53 am | नाखु

गाणी त्याच नशीब घेऊन आलेली असतात तर काही गाण्यानीच नशीब बदलते..
अरूण दातेंच्या बाबतचा किस्सा लोक्सत्तामध्ये उत्तरा केळकरांच्या लेखात आला आहे.

मस्त लेख आणि गाणे पहिल्यांदाच वाचतोय.

नितवाचक नाखु

ब़जरबट्टू's picture

8 Aug 2016 - 10:07 am | ब़जरबट्टू

गाण्यामागील गोष्ट आवडली.

पैसा's picture

8 Aug 2016 - 10:17 am | पैसा

गाणे, आणि त्यामागची कथा सगळेच आवडले. १९७६ म्हणजे तेव्हा आम्ही आकाशवाणी आणि भावगीते भरपूर ऐकत होतो. पण हे गाणे ऐकल्याचे आठवत नाही. इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!