मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. इकडे इंदूरमध्ये या काळातली हिंदी वर्तमानपत्रे वाचल्यानंतर आणि इथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर ही प्रतिमा अधिक ठळक होते.
एक तर लोकांना धड माहिती नसते. त्यात माध्यमे जे दाखवतील त्याच्या आधारे मत बनविण्याची आणि ती व्यक्तही करण्याची सवय लागलेली असते. जया बच्चन यांनी असेच एक बिनडोक विधान केले. 'मै युपी की हूँ हिंदी में ही बात करूंगी' हे सांगून झाल्यावर 'महाराष्ट्र के लोग हमें माफ करे' असे सांगत त्यांना राज ठाकरे यांना शालजोडीतून हाणण्याचा उद्योग केला. पण हे करताना हा 'जोडा' राज ठाकरेंऐवजी अवघ्या महाराष्ट्राला लागेल याचा अंदाजच आला नाही. बर्याच चॅनेलवाल्यांनी मात्र पहिले वाक्य दाखवून त्याला राज ठाकरेंची प्रतिक्रिया जोडली. त्यातून असा अर्थ निघाला, की राज ठाकरेंचा हिंदीत बोलायलाही विरोध आहे. आणि मुंबई व महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोलावे अशी त्यांची 'आज्ञा' आहे. वास्तविक राज काय इतरही कुणा मराठी माणसाचा महाराष्ट्रात हिंदी बोलायला विरोध आहे असे नाही. त्या कार्यक्रमात महाराष्ट्राविषयी जया यांनी जे कुत्सित उद्गार काढले, त्याविरोधात सगळे काही पेटले आहे, ते सोडून भलत्याच गोष्टीचे दळण चॅनेलवाली मंडळी दळत होती.
विशेष म्हणजे हा वृत्तांत पाहून इथल्या वृत्तपत्रात येणारी पत्रे लेखही तसेच होते. योगायोगाने या वादानंतर काही दिवसातंच हिंदी दिन आला. त्यावर इथल्या नई दुनियाच्या पुरवणीत मुख्य लेख आला. त्या लेखात एका बाईंनी वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या व्यक्ती हिंदी कसे शिकतात आणि त्यांना ती कशी आवडते, हे मांडले. इथपर्यंत ठीक होते. लेखाचा शेवट करताना त्या राज ठाकरेंवर घसरल्या. 'बॉलीवूडचे तारे नेहमीच इंग्रजीतच बोलतात, त्या तुलनेत जया बच्चन या राष्ट्रभाषेत बोलल्या हे चांगलेच, पण तरीही ती बाब म्हणे राज ठाकरे या कट्टर भाषावाद करणार्याला खटकली', असे लिहून या बाई मोकळ्या झाल्या. अहो, बाई पण वाद काय? तुम्ही लिहिता कशावर कशाचा काही संबंध आहे का? माहित नाही त्या विषयावर मतं व्यक्त करायची कशाला?
त्याच नई दुनियात पुढच्याच रविवारी राज ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेला भाषावाद या विषयावर लेख आला आहे. या गृहस्थांनी लेखाची सुरवात अशी केलीय की माझा जन्म रावेरमध्ये झाला आहे. आम्ही गुजराती असूनही घरात बरचसे मराठी बोलणारे आहेत, माझी आई मराठी भाषक आहे. एवढं सगळं सांगून झाल्यावर त्यांचीही गाडी राज ठाकरेंवर घसरली आहे. राज ठाकरेंनी म्हणे हिंदी बोलणार्यांच्या डोक्यात काठी घालायची ठरवली आहे. असे करण्यामुळे ते स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारत आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले यांना मिळालेली कीर्ति हिंदी गाणी गाऊनच मिळाली आहे. अन्यथा त्या केवळ 'मराठी गायिका' ठरल्या असत्या. अशी उदाहरणे देऊन राज ठाकरे 'बॉलीवूड'चे मराठीकरण करण्याच्या प्रयत्नात असले तरी ते शक्य नाही, असा निष्कर्ष काढूनही हे महाशय मोकळे झाले आहेत. पुढे मराठी लोक इंदौरला 'इंदूर' म्हणतात. पण म्हणून त्यांना कोणी बोलत नाही असा छुपा वारही केला आहे. हे वाचल्यानंतर हसावं की रडावं तेच कळेना. अरे, बाबा, महाराष्ट्रात हिंदी बोलू नका असं कोणी म्हणतंय का? राज ठाकरे यांनीही असं सांगितलेलं नाही. मग फुका स्वतःच निष्कर्ष का काढतोस बाबा. नीट म्हणणं समजून घे ना, असं त्याला जाऊन सांगागावसं वाटलं.
इकडे ऑफिसमध्येही वेगळीच तर्हा. इथल्या काही हिंदी भाषक सहकार्यांना असं वाटतंय की जणू छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर 'मनसे'चे कार्यकर्ते बसले आहेत आणि स्टेशनमधून बाहेर येणार्या प्रत्येकाला ते 'मराठी बोलायला भाग पाडत आहेत.' किंवा मुंबईत ज्यांना मराठी बोलता येत नाही, त्यांना हाणून, मारून मुंबईबाहेर पळवलं जातंय. किंवा महाराष्ट्रात रहाणारे इतर भाषक भलतेच दबावाखाली रहात आहेत. काहींना वाटतं, 'दोन दिवसांसाठी मुंबईत गेलं तरी मला मराठी बोलायला लावतील. काहींनी म्हटलं, 'तुमच्याकडे स्पॅनिश पर्यटक आला तरी तुम्ही त्याला मराठीत बोलायला लावाल.' काहींचे निष्कर्ष तर फार पुढचे होते. त्यांच्या मते, आता महाराष्ट्रात उद्योग रहाणारच नाहीत. नवे उद्योग येणार नाहीत. पर्यटनावरही मर्यादा येतील.'' प्रत्येकाच्या कल्पनेचा पतंग सरसरून वर जातो आहे. या विषयावर पत्र लिहिणार्यांचीही अहमहमिका लागली आहे. जो उठतो, तो राज ठाकरेला झोडपायला पहातो आहे. ती पत्र वाचून हसायला येतं आहे. त्यातल्या त्यात डांगे नावाच्या एक माणसाने छान पत्र लिहिलं. जम्मूमधून म्हणे बिहारी आणि युपीच्या लोकांना तिथल्या लोकांनी मध्यंतरी हाकलून लावलं. त्यावर कुणीही आवाज उठवला नाही. पण मुंबईत राज ठाकरेंनी नुसतं काही बोललं की बास त्याविरोधात दळण दळणं सुरू होतं. हा अपवाद वगळता बाकी सगळं यच्चयावत पत्र राज ठाकरेंना झोडणारीच होती.
तिकडे टिव्ही चॅनल्सवरही सुरू असलेली बोंबाबोंब वेगळीच. अगदी एनडीटिव्हीसारखं इतरांच्या तुलनेच चांगलं असणारं चॅनेलही काही वेळा काहीही दाखवत होतं. 'व्हॉइस ऑफ इंडिया' नावाचं एक महान चॅनल आहे. त्याने एकदा राज ठाकरेवर एक बातमी केली. त्यात असं दाखवलं की राज ठाकरे नावाचा कोणी गुंड आहे. बरं हे दाखवलंही असं की एका यज्ञाच्या तिथून राज ठाकरे जात आहेत. (हे सगळं स्लो मोशनमध्ये) त्या पार्श्वभूमीवर 'सरकार'मधलं 'गोविंदा गोविंदा' हा घोष वाजतोय. सालं, ते पाहिल्यावर राज ठाकरे नावाचा फार मोठा राजकीय गुंड आहे, की काय असं वाटत होतं. या चॅनेलवाल्यांच्या डोक्यात त्यांचा तो बुम घालावा असं वाटलं. त्यातल्या त्यात एकदा नाईन एक्स या इंग्रजी चॅनेलवर जरा बरी चर्चा झाली. त्यात 'उषा उत्थप, भरत दाभोळकर, प्रल्हाद कक्कड' असे लोक होते. त्यात भरत दाभोळकरने नेमका आक्षेपाचा मुद्दा काय नि जया यांच्या बोलण्यातून ध्वनित होणारा अर्थ कसा अवमानकारक आहे, ते छान सांगितलं. मुळात समाजात ज्यांची प्रतिमा मोठी आहे, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सांभाळून बोलायला हवं. त्याचे काय परिणाम होतात, हे त्यांना कळलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाकीच्या वक्त्यांनीही त्याला अनुमोदन दिले. पण अशा प्रकारचे कार्यक्रम जरा कमीच झाले. बाकीच्या चॅनलवाल्यांनी त्याला गुंडच ठरवून टाकले.
त्यातल्या त्यात अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे फेब्रुवारीत रमणदीप सिंग नावाच्या एनडीटिव्हीच्या एका संरक्षण विभाग पहाणार्या पत्रकाराचा या विषयाचा सर्वांगीण वेध घेणारा छान लेख त्यांच्या वेबसाईटवर वाचायला मिळाला. बिहारी आणि युपीच्या मंडळींची मानसिकता, गटात राहून तिथे मतदारसंघ तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न, त्यातून निर्माण होणारे नेतृत्व, त्याला हवा देण्यासाठी बिहार, युपीतून येणारी नेतेमंडळी, या सगळ्याची मानसिकता, त्याचा मराठी माणसावर झालेला परिणाम, इतर राज्यात असलेली युपी, बिहारी लोकांची प्रतिक्रिया या सगळ्या बाबी छान मांडल्या होत्या. पण असे प्रयत्न अपवादात्मकच.
हिंदी, इंग्रजी वेबसाईटवर आणि ब्लॉगवरही राज ठाकरेंविरोधात लिहिणारी मंडळी भरपूर दिसली. या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून तर मुंबई आणि मराठी माणसे जणू भांडकुदळ आहेत. ती अमराठी लोकांच्या डोक्यात दगड घालायच्या इराद्यात आहेत, असेच चित्र उभे रहात होते. त्यात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हा पाठही होताच. त्यात मला अगदी अपवादात्मकच दक्षिण भारतीयाची प्रतिक्रिया वाचायला मिळाली. एका तमिळी भाषकाने आयबीएनच्या वेबसाईटवर लिहिलेली प्रतिक्रिया वाचली. स्वभावधर्मानुसार आयबीएनने त्याचा वेगळा लेख करून लावला. हा तमिळ भाषक म्हणत होता, 'मीही एकेकाळी तमिळनाडूत हिंदीविरोधी आंदोलनात सहभागी होतो. जे दिसेल ते आम्ही त्यावेळी फोडायचो. पण आता मी किती चुक होतो, हे आज मला कळतं आहे. उत्तर भारतातल्या संधींसाठी मला हिंदी येणं किती गरजेचं आहे, हे मला जाणवतंय वगैरे वगैरे.' अरे बाबा, पण मराठी माणसाला हिंदी येत नाही. हिंदी बोलायला विरोध आहे, असं कुणी सांगितलं? अहिंदी राज्यात सर्वाधिक हिंदी बोलणारे महाराष्ट्रातच सापडतील. देशात सर्वाधिक हिंदी बोलणार्यांचे शहर मुंबई आहे. प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय? ब्लॉगवरही तीच कथा. ब्लॉग लिहिणारेही संगणकाच्या की दामटून लिहित होते.
हे सगळं पाहिल्यावर एक नक्की वाटलं. या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे. इंग्रजीत लिहिणारी बरीच मराठी मंडळी आढळली. पण इंग्रजीत लिहिणारे मराठी स्तंभलेखक जवळपास नाहीत. त्याचवेळी हिंदीत लिहिणारी मंडळीही नाहीत. हिंदी भाषक प्रदेशात पत्रकारिता करणारी मराठी मुळे असलेल्यांना मुख्य प्रश्न माहित नसतो. त्यामुळे त्यांची भूमिकाही अनेकदा इतर हिंदी भाषकांप्रमाणेच असते. माझ्या परीने मी बराच प्रयत्न करून हिंदीत लिहिले. प्रतिक्रिया लिहिल्या. या सगळ्याबाबतीत तुमचा अनुभव काय?
डिसक्लेमर- मी कुठल्याही प्रकारे राज ठाकरे यांचा समर्थक नाही. पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे.
प्रतिक्रिया
22 Sep 2008 - 7:08 pm | संदीप चित्रे
भोचकपणा आवडला :)
राज ठाकरेचे मार्ग पटत नसले तरी त्याच्या मुद्यांत नकीच तथ्य आहे.
22 Sep 2008 - 7:16 pm | अभिजीत मोटे
आपण परीस्थितीचे अगदी सुबक वर्णन केले आहे. तसं पाहीलं तर आज मराठि माणसंच प्रथम या गोश्टींना विरोध करताना दिसतात मग परप्रांतीय का करनार नाहीत? त्यांचा तर विरोध करण्यात फायदाच आहे. कोणि मराठिबद्दल लढायला तयार झाले तर हे लोक अगोदर संशयाने त्याच्याकडे पाहू लागतात. यात त्याचा काय फायदा आहे? त्याचि मुले कुठलि भाषा शिकतायत? मराठी शिकत नाहीत तर मग हा मराठिबद्दल का बोलतोय? हे आणी असे बरेच प्रश्न ऊपस्थीतीत केले जातात आणि लोकांना मुळ मुद्यांपासून दुसरिकडे नेले जाते. खाजगीमधे बरेच लोक या आंदोलनाला मान्यता देतात पण पार्टीचा अजेंडा वेगळा म्हणून विरोध करनारे पन बरेच आहेत. अशा मुद्द्यांवर मला वाट्तं सर्वांनि एकत्र आले तर जनमतामुळे कदाचित परप्रांतीय सुद्धा त्यांचि विचार सरणी बदलतील.
.................अभिजीत
22 Sep 2008 - 9:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्या मतांशी सहमत. आणि हे चित्र फक्त महाराष्ट्राबाहेर नाही तर पुण्यातही आहे. हापिसातल्या अमराठी लोकांशी बोलून माझं हे मत झालं आहे.
एक सुधारणा:
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, आपल्या भारतात बावीस (२२) मान्यताप्राप्त / राष्ट्रभाषा आहेत आणि त्यांतल्या दोन, इंग्लिश आणि हिंदी, या व्यवहारासाठीच्या / अफिशियल भाषा आहेत. त्यात प्रत्येक राज्य "आपल्या मनाप्रमाणे", म्हणजेच बहुदा जनमताप्रमाणे, राज्याची व्यवहारासाठीची तिसरी भाषा ठरवू शकते.
आपल्या महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा ठरवली आहे. आणि दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात हा कायदा आहे. राज ठाकरे यांची त्यासंदर्भातली मागणी कायद्याबाहेरची नव्हती, ते फक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी याचा उच्चार करत होते.
पण त्यासाठी हिंसा व्हावी असं मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही, माझा हिंसेला पाठींबा नाही.
अदिती
22 Sep 2008 - 7:45 pm | लिखाळ
आपण घेतलेला आढावा छान आहे. मुख्यतः हिंदी प्रांतात राहून आपण हे अनुभवले आहे आणि लिहिले आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राबाहेर लोकांना काय वाटते आहे ते समजले.
भरत दाभोळकरांसारखे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांनी उघडपणे मराठीची बाजू घ्यावी हे फार आनंददायक आहे.
--लिखाळ.
22 Sep 2008 - 8:45 pm | राघव
आपण बरोबर लिहिलेले आहे.
वेगवेगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्स वर चाललेली यासंदर्भातली हुल्लडबाजी बघितली तर हे चित्र सहज डोळ्यासमोर उभं राहतं.
पण या चॅनलवाल्यांना एक समजत नाही; ते राज यांची जेवढी बदनामी करतील, त्यांच्याबद्दल चुकीच्या/भडक/अवास्तव बातम्या दाखवतील, त्यामुळे महाराष्ट्राबाहेर जरी त्यांची प्रतिमा हिंदीद्वेष्टा (जे ते मुळात नाहीत) अशी तयार झाली तरी मराठी लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत जाईल. अन् त्यामुळे महाराष्ट्रात तरी त्यांना जनाधार भरपूर मिळेल; त्यांची हिंसाचारी पद्धत कितीही नावडली तरीही. हा जो गैरसमज राज यांच्याबद्दल पसरतो आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात तरी फायदाच होणार हे निश्चित.
मुमुक्षु
22 Sep 2008 - 8:49 pm | अनामिक
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे. हिंदी लोकांनी महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आदर करावा आणि महाराष्ट्रातल्या सरकारी व केंद्र सरकारी नोकर्यांत मराठी भाषकांना प्राधान्य मिळावे (त्यात बिहारी व युपीवाले भरले जाताहेत म्हणून) एवढी आमची माफक अपेक्षा आहे. त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण काय?
अगदि मनातलं बोललात!
22 Sep 2008 - 10:03 pm | सर्वसाक्षी
यांना सध्या राज सापडला आहे.
काही ना काही चमचमीत हवेच असते. तो कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मीही पाहिला, भरत दाभोळकर हे जेव्हा घटनेचे विश्लेषण उत्तम प्रकारे करु लागले तेव्हा संचालिकेने अनुकुल प्रतिसाद दिला नाही. हिंदी वाहिन्या मराठी आणि मराठी भाषीक यांना फारच नगण्य व क्षूद्र समजतात. शिवाय हिंदी ही देशाची अधिकृत अशी एकमेव भाषा आहे असा अपप्रचारही केला जात आहे.
या सर्व वाहिन्यांना एक आव्हान - चेन्नै मध्ये जाउन गॉगलशेठची हिंदीतुन मुलाखत घ्या आणि तीचे थेट प्रसारण करून दाखवा. वाटल्यास गॉगललशेठ ऐवजी अम्माची घ्या.
22 Sep 2008 - 10:24 pm | इनोबा म्हणे
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत.
हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो.
उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
22 Sep 2008 - 10:26 pm | इनोबा म्हणे
लेख फारच आवडला. विचार छान मांडले आहेत.
हिंदी भाषक जेव्हा राज यांच्यावर टिका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्या शेपटीवर पाय पडलेला असल्यामुळे ते भुंकणारच, पण मराठी माणुस जेव्हा राज यांच्यावर टिका करतो तेव्हा मात्र फार संताप येतो. असो.
उशिरा का होईना मराठी माणसाला राज यांचे मुद्दे पटत आहेत हे सर्वात महत्वाचे आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
22 Sep 2008 - 10:41 pm | यशोधरा
आवडला लेख.
सद्ध्याच्या चॅनेलवाल्यांकडून इतका मुद्देसूद विचार अपेक्षित करता येऊ शकेल का?? रोज प्रत्येक चॅनेलवर बातम्या काय, किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम काय, दोन्हींचा दर्जा बेतास बात हे म्हणण्याच्याही खालचा आहे. शेवटी त्यांचे गणित टीआरपीचे! आपण ज्या प्रकारे बातमी प्रसृत करतोय, त्याचे काय परिणाम होतील हे समजण्याची अक्कल आणि गरज जर त्यांना वाटेल तर मग अजून काय हवे!
22 Sep 2008 - 10:53 pm | विसोबा खेचर
पण त्यांच्या काही मुद्यांत नक्कीच दम आहे. भलेही हिंसाचाराचा मार्ग चुकीचा असेल. पण काही मुद्दे मांडले जाणे गरजेचेच आहे.
भोचक गुरुजी,
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख....
अजूनही असेच काही उत्तमोतम लेखन येऊ द्या, ही विनंती..
आपला,
(मराठी) तात्या.
22 Sep 2008 - 10:57 pm | प्रभाकर पेठकर
फार पोटतिडीकीने मांडलेले विचार सत्य परिस्थितीला धरून आहेत. प्रत्येक मराठी माणसाने मराठीत बोलायचा आग्रह धरावा. मराठी भाषकालाच व्यापारात साथ द्या. मराठी भाषकानेही 'व्यापार' करायला शिकावे. गोड बोलायला शिकावे. मेहनत करायला शिकावे. जिथे काही व्यावसायिक कौशल्याची कामे असतात आणि आपल्या मराठी माणसाकडे ते कौशल्य नसेल तर आणी तरच इतर भाषकांकडून सेवा स्विकारावी.
अरबस्थानात आम्हाला अरबी भाषा येत नसेल तर विचारतात 'किती वर्षे राहतो आहेस इथे?, अजून जुजबी अरबीही बोलता येत नाही?' शाळेत चवथी पर्यत अरबी भाषा अनिवार्य विषय आहे. उत्तीर्ण होण्याची सक्ती नसली तरी प्रयत्न दिसावा लागतो. ते अश प्रकारे त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आम्ही तोडकी मोडकी अरबी शिकतोच.
हे इतर भाषिक महाराष्ट्रात येतात, मुंबई-पुण्यात व्यवसाय करतात. ते किती स्थानिकांना नोकरीत तरी ठेवतात? संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या व्यवसायाला गरज पडणारे सर्व कारागीर उत्तरप्रदेश, बिहारातूनच आणलेले असतात.
राज ठाकरेंनी राजकिय स्वार्थासाठी का होईना जो मुद्दा उचलला आहे त्याला माझा संपूर्ण पाठींबा आहे. हिसा टाळावीच पण हिंसे शिवाय दहशत बसणार नाही आणि दहशती शिवाय 'माज' उतरणार नाही. जया बच्चन ह्यांच्या विधानांच्या विरोधात हजरोंच्या संख्येने त्यांच्या बंगल्यावर मोर्चा न्यायला पाहिजे होता. तो प्रचंड जनसागर बघून त्यांना ताबडतोब माफी मागावी लागली असती. आणि पुढच्या वेळी तोंड उघडताना त्यांनी दहा वेळा विचार केला असता.
23 Sep 2008 - 1:24 am | बबलु
छान लेख. आम्ही सहमत.
तुमचा अभ्यास गाढा आहे राव.
....बबलु-अमेरिकन
23 Sep 2008 - 4:06 am | अभिजीत
आपला लेख आवडला. राजचा मुद्दा बरोबरच आहे. हे इंग्रजी-हिंदी मिडियावाले राज ठाकरेचे चुकीचेच चित्र उभे करीत आहेत. त्यात राजदीप सरदेसाइ सारखा मराठी पत्रकार आय बी एन मधून त्यात भर घालतोय ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे. (एन डी टी वी वर होता तेंव्हा हा आपल्याला पटत होता राव.)
मिडियावाल्यांनी हिंदी/इंग्रजी प्रेमाचे हे असले प्रयोग तमिळनाडू, केरळ, बिहार, आंध्र मधे करून बघावे.. तिथे ह्यांच्या हिंदी/इंग्रजी प्रेमाच्या गप्पाच कोणाला कळणार नाहीत.
23 Sep 2008 - 6:03 am | प्राजु
भोचक पणा अगदी वर्मी बसला आहे.
लगे रहो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 7:01 am | अनिल हटेला
अगदी सहमत !!
भोचकपणा आवडला!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Sep 2008 - 7:17 am | yogeshpatil
फारच छान अभ्यासु लेख आहे. अभिनंदन.
असे म्हणतात की ज्या गोष्टी बद्दल कमी माहिती असते त्या गोष्टी वर लोकांचा जास्त विश्वास बसतो..
23 Sep 2008 - 10:06 am | ऋषिकेश
लेख चांगला वाटला.
मजा अशी आहे की मिडीया हे त्यांना हवे तेच चित्र समोर उभे करते.. येत्या काहि काळात युद्ध, राजकारण इ. प्रत्येक ठिकाणी मिडीया स्पोकपर्सन (प्रवक्ता) या पदाला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे (येत आहे) ते या मुळेच. उत्तम प्रवक्ता तोच जो मिडीयला आपल्या तालावर नाचवू शकतो.
तुम्ही(आपण सगळेच) 'लालु'ला जे काहि ओळखता त्याची खिल्ली उडवता त्याला बिहारी पत्रकारीता जबाबदार आहे का? मी तरी त्याचं एकही जाहिर भाषण ऐकलेलं नाहि. तरीही त्याची एक इमेज मनात आहे. करुणानिधीच्या सवयी, जयललितांच्या साड्या व चपला, ममताबाईंचा सिंगूरलढा आदी गोष्टी हेच पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यात खरं काय आणि विश्वास किती प्रमाणात ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न होणार आहे (झाला आहे).
राज यांची ही प्रतिमा याच पॅटर्नचा अपरिहार्य भाग आहे. जर तुम्ही म्हणता तशी मराठी बोलण्याची "भिती" इतरेजनांत तयार झाली आहे तर हा राजच्या चाणाक्ष नीतीला यश येतंय असं मला वाटतं
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
23 Sep 2008 - 10:19 am | विजुभाऊ
राज वर टीका करणारे बहुतेक चॅनेल वाले तथाकथीत पत्रकार हे भैय्ये आहेत किंवा त्यांचे बोलविते धनी भैय्ये आहेत.
श्वान मालकाच्या भाषेतच भुंकते.
हिन्दी भाषीकांची एक गोची असते ..त्याना हिन्दीशिवाय इतर कोणतीच भाषा नीट येत नसते .
ब्यान्के ला बैन्क आणि ग्यास ला गैस म्हणणारे हे लोक त्यांचे उच्चार ही नीट करु शकत नाहीत.
रॉबर्ट्चा उच्चार ते राबर्ट असा करतात पार्टी चा उच्चार पाट्टी कडतात.
त्याना तेच श्रेश्ठ वाटत असते.
आपण मराठी भाषीकानीच जर त्यांच्याशी मराठीत बोलायचा आग्रह धरला तर त्यां श्वानांचे शेपुट सरळहोईल
( पुण्यात मराठी समजत नाही म्हणणारे रीक्षावाले पाहिल्यावर मला धक्का बसला होता)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
23 Sep 2008 - 10:27 am | मराठी_माणूस
प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही, तिच्या कुरघोडीचा आहे.
अगदि बरोबर.
काल म्.टा. मधे प्रसिध्द झालेले एक पत्र
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3510464.cms
23 Sep 2008 - 12:46 pm | नंदन
हिंदीची कुरघोडी नको आणि या लोकांच्या आक्षेपांना तोंड देण्यासाठी, वस्तुस्थिती मांडण्यासाठी इंग्रजी व हिंदी या भाषांत काही लिहिलं गेलं पाहिजे - हे दोन्ही मुद्दे पटले. विशेषतः सध्या मीडियाला आलेलं महत्त्व पाहता दुसरा मुद्दा विशेष पटतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी