नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली.
साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले. त्यापैकी अर्जुन उच्च्कुलीन राजपुत्र म्हणून वाढल्याने त्याला साक्षात गुरु द्रोणांकडुन सर्व दैवी अस्त्रांचे आणि शस्त्रांचे ज्ञान मिळाले तर कर्ण एक सूतपुत्र म्हणुन वाढल्याने त्या ज्ञानापासून वंचित राहिला मात्र द्रोणाचार्यांच्या आश्रमातच राहुन त्याने शस्त्रास्त्रांचे उत्तम ज्ञान मिळवले आणि धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले पण सर्व प्रकारे लायक असुनही केवळ प्रचलित जातिव्यवस्थेमुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे ज्ञान न मिळवु शकल्याने त्याला दैवी अस्त्रांपासून वंछित रहावे लागले जी त्याने नंतर परशरामांकडुन फसवणुकीने मिळवले आणी त्याच्मुळे त्याचा घात झाला.
पण या सर्व घटनाक्रमामागचे जबरदस्त राजकारण कधी कोणी समजुन घ्यायचा प्रयत्न करताना दिसत नाही. कर्ण आणि अर्जुन या दोन व्यक्तिरेखांच्या आडुन दुर्योधन आणि कृष्ण या दोन राजकारण्यांनी जे अप्रतिम राजकारण खेळले त्याच्या विवेचनासाठी हा खटाटोप.
महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा.
जर दैवी अस्त्रांचे अस्तित्वच अमान्य केले तर हे लक्षात येइल की द्रोणाचार्यांनी त्यांच्या सर्वच शिष्यांना केवळ युद्धकलेत आणि युद्धशास्त्रात प्रवीण केले होते. यात कदाचित रासायनिक शास्त्रावर आधारित अस्त्रे असु शकतील जी त्यांनी काही ठराविक लोकांना शिकवली ज्यांचा उपयोग कदाचित " सर्वसंहारक अस्त्रे " म्हणुन होउ शकत होता पण एकास एक युद्धात कदाचित ही अस्त्रे निरुपयोगी होती. हे गृहीतक मान्य केल्यास एकल्व्याची कथा देखील अजुन जास्त समजुन घेता येइल. जर अर्जुनाकडे इतकी सगळी संहारक अस्त्रे होती की जी एकास एक युद्धात देखील वापरता येत होती तर द्रोणाचार्यांच्या मनात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होइल की नाहीए याबाबत शंका असण्याचे कारण नव्हते. पण धनुर्विद्येतली एकलव्याची प्रगती आणी कौशल्य बघता त्यांना त्याबद्दल भय उत्पन्न झाले याचाच दुसरा अर्थ असा होतो की कदाचित दैवी अस्त्रे असा काही प्रकार नव्हताच. होत्या त्या सगळ्या अफवा.
त्यामुळेच कर्णाकडे दैवी अस्त्रे नाहित हे माहिती असुनही दुर्योधनाला त्याच्यात अर्जुनाचा प्रतिस्पर्धी दिसला. युद्धकलेत आणि धनुर्विद्येत अर्जुनाचा उतारा कौरवांकडे नव्हता आणि त्यामुळॅच पहिली संधी मिळताच दुर्योधनाने कर्णाला आपल्या जाळ्यात ओढले. दुर्योधनाच्या गुणाग्राहकतेचा आणी राजकीय दूरदृष्टीची ही पहिली चुणूक होती. या वेळी तरी युधिष्ठिराकडे त्या राजकीय कुवतीवर उतारा नव्हता आणी सर्वंकष राजकीय पटलावर कृष्णाचा उगम होइस्तोवर युधिष्ठिर विदुराच्या राजकारणीय कौशल्यावर विसंबुन तरलेला दिसतो.
अर्जुनाकडे दैवी अस्त्रे आहेत आणी कर्णाकडे ती नाहित हे जेव्हा कंठशोष करुन सांगितले जात होते त्याच्याच आसपास कधीतरी दुर्योधनाने कर्णाकडे दैवी अस्त्रे नसली तरी जन्मजात दैवी कवच आणी कुंडले आहेत अशी आवई उठवुन दिली असावी आणि ही नि:संशयपणे एक आवईच होती असे म्हणण्यास वाव आहे. कर्णाचे जन्मजात दैवी कवच भेदुन कुठलेही अस्त्र किंवा शस्त्र त्याला इजा पोचवु शकत नाही हे सत्य असल्यास द्रौपदी स्वयंवरामध्ये, गंधर्व युद्धात आणि विराट युद्धात त्याला इजा कश्या झाल्या याचे काही स्पष्टीकरण मिळु शकत नाही. शिवाय जर कर्णाकडे दैवी कवच कुंडले होती तर ती एक असामान्य घटना होती आणि अश्या असामान्य माणसाबद्दल परशुरामांना काही माहिती नव्हती हे संभवत नाही. त्यामुळे कर्णाचे अभेद्य कवच आणि कुंडले अस्तित्वातच नव्हती हे मानायला वाव आहे. अशी आवई उठवल्याने कर्ण अर्जुनापेक्षा सरस, प्रबळ आणि अजेय आहे अशी भावना सैन्यात पसरवण्यात दुर्योधन यशस्वी झाला आणि त्यामुळे सैन्याचे आणी कौरवपक्षाचे मनोधैर्य वाढले असावे. दुर्योधनाने राजकारणाच्या पटावरचे अजुन एक घर या खेळीमुळे सर केले.
दुसरीकडे द्रोणाचार्यांनी न शिकवलेली विद्या आणी कौशल्य कर्णाने परशुरामांकडुन हस्तगत केली असावी परंतु हे करताना त्याने यच्चयावत सर्व दैवी अस्त्रे परशुरामांकडुन शिकुन घेतली आहेत अशी आवई उठवण्यात दुर्योधन यशस्वी झालेला दिसतो. द्रोणाचार्यांना दैवी अस्त्रे परशुरामांनी शिकवली होती त्यामुळे अर्जुनाच्या गुरुंच्या गुरुंकडुन दैवी अस्त्रे शिकलेला महान धनुर्धर म्हणुन कर्णाची जाहिरात करण्याची संधी दुर्योधन दवडेल असे वाटत नाही. दुर्योधनाने अजुन एक पॉईंट सर केलेला दिसतो.
त्यानंतर त्याच्या या तंत्राला त्याच्यावरच उलटवण्याचा यशस्वी प्रयत्न कृष्णाने केलेला दिसतो. त्याने दुर्योधनावर कडी करत अशी आवई उठवलेली असावी की अर्जुनाने तर सर्वच देवांकडुन दैवी अस्त्रे मिळवली (परशुराम काय चीज आहे) आणी भरीस भर म्हणुन त्याने देवाधिदेव शंकराचा कृपाप्रसाद ग्रहण करुन त्यांच्याकडुन अस्त्रांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेले पाशुपत अस्त्र थेट शिवाकडुन मिळवले. अजुन एक ब्राउनी पॉइंट सर करताना या सग्ळ्या कथेला कर्णाला (न) मिळालेल्या शापांची फोडणी दिली गेली आणी अशी अफवा पसरवली गेली की कर्ण ऐनवेळी त्याचे ब्रह्मास्त्र विसरेल असा शाप परशुरामांनी दिला आहे तर कर्णाचे रथचक्र युद्धाच्या ऐन ध्मश्चक्रीत चिखलात घुसेल असा शाप त्याला ब्राह्मणाने दिलेला आहे.
यानंतर कर्णाला पुरते निष्प्रभ करण्यासाठी पुढची चाल खेळली गेली असावी आणि कुठल्याश्या ब्राह्मणाला पुढे करुन कर्णाकडे कधी नसलेले कवच आणी कुंडल त्याने त्या ब्राह्मणाला म्हणजे इंद्राला दान केली अशी आवई उठवली गेलेली दिसते. लोकांना दाखवण्यापुरता हा बनाव कदाचित खरेच घडवुन आणला गेला असाबा आणि घेणार्याला आणी देणार्याला दोघांनाही त्यातला फोलपणा जाणवला असावा पण त्यामुळे सैन्यावर मोठा दुष्प्रभाव पडु शकतो. झालेल्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कौरवांनी अजुन एक आवई उठवुन दिली की कर्णाच्या दानशूर पणावर प्रसन्न होउन इंद्राने त्याला अशी एक अमोघ शक्ती दिली आहे की ज्या योगे तो कुठल्याह्ही यौद्ध्याला मारु शकेल.
या शेवटच्या अफवेवरचा उतारा कॄष्णाला घटोत्कचाच्या मृत्युत दिसला आणि एवढी दु:खद घटना घडलेली असतानाही त्या घटनेचे देखील सवतःच्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करण्यात कृष्ण यशस्वी झाला. घटोत्कचाच्या मृत्युसरशी त्याने कर्णाची शक्ती वापरुन संपली आणी इंद्राकडे परत गेली अशी आवई उठवुन दिली. सर्व पांडव दु:खी असताना कृष्णाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रथावर उड्या मारुन आपला आनंद व्यक्त करताना कर्णाने त्याची शक्ता गमावल्याची बातमी पसरवली. त्यामुळे घटोत्कचाच्या मृत्युने मनोबल गमावलेल्या पांडव सैन्याला उलट आता अर्जुनाचा मार्ग निर्धोक झाला असे मानुन मनातली सर्व मरगळ झटकुन युद्ध करण्यास आधारच मिळाला. यामुळेच कदाचित अर्जुनाचे देखील मनोबल वाढले असावे. सैन्याचे तर नि:संशय वाढतेच.
युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्णाने शल्याला रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली याचा कृष्णाने या सगळ्या घडामोडीत अचूक उपयोग करुन घेतला आणि शल्याने मोठ्या कौशल्याने कर्णाचा रथ वेगळा काढुन युद्धाभूमीवर चिखल साठला असेल अश्या ठिकाणी नेउन उभा केला. आणि मग "चिखलातुन चाक निघाले की सांग, मी येतो परत सारथ्य करायला" असे सांगुन शक्य चक्क निघुन गेला. त्या चिखलात चाक रुतलेले असताना सारथी सोडुन गेलेला असताना आणि रथ हलत नसताना केलेल्या त्या एकतर्फी युद्धात कर्णाला नि:शस्त्र असताना मारताना 'अखेरच्या युद्धात रथचक्र जमिनीत रुतण्याचा ' त्याला शापच होता असे सांगण्याचे नैतिक पाठबळ देखील कृष्णार्जुनाला त्या शापाच्या अफवेतुनच मिळाले.
महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. दैवी अस्त्राने सदगती प्राप्त झालेले फार थोडे. भीष्म साध्या बाणांनी शरपंजरी पडले. द्रोणांचा तलवारीने शिरच्छेद झाला, भूरिश्रवाचेही तेच, कर्ण साध्या अंजलिक बाणाने मारला गेला, दुर्योधन गदायुद्धात गेला, वृषसेन साध्या बाणाने मारला गेला, दृष्ट्यद्युम्न आणि युधामन्यु यांना तर अश्वत्थाम्याने हातानेच मारले. असे असताना अवास्तव महत्व दिल्या गेलेल्या दैवी अस्त्रांना आणि शक्तींना राजकारणाच्या पटावर मोहर्यांसारखे वापरुन कृष्ण आणि दुर्योधनाने राजकीय चातुर्याचे असीम प्रदर्शन केले असे मानण्यास वाव आहे. या सगळ्या खेळ्यांमध्ये कर्ण आणि अर्जुन या दोघांचा प्याद्यांसारखा मोठ्या खुबीने वापर केला गेला.
******************
तळटीपा:
१. वरचे विवेचन हे माझे मत झाले. महाभारताच्या मुख्य कथेत सगळ्या दैवी घटना, व्यक्ती आणी शक्तींचा उल्लेख केला गेला आहे. जर या सर्व गोष्टींचे दैवी आवरण अथवा अस्तित्व अमान्य करायचे झाले तर या सगळ्या घटनांचे स्पष्टीकरण क्से करता येइल याचे विवेचन करण्याचा हा माझ्या दृष्टीकोनातुन छोटा प्रयत्न.
२. महाभारतातले राजकारण मुख्यत्वे लढले गेले चार पात्रांमध्ये दुर्योधन आणि शकुनी एका बाजुला आणि कृष्ण आणि युधिष्टिर दुसर्या बाजुला. त्यातही मुख्य खेळाडु दुर्योधन आणी कृष्ण त्यामुळे या दोघांचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात या संपुर्ण राजकारणामागे अजुनही व्यक्ती असु शकतात. " वर नमूद केल्याप्रमाणे हे माझे "रीडिंग बिटवीन द लाइन्स" किंवा "इंटरप्रिटेशन आहे त्यामुळे अमुक गोष्ट कृष्णाने केली याचा पुरावा मूळ महाभारतातुन काढुन द्यायला सांगितल्यास तसा काही देता येणार नाही.
३. हा लेख लिहिताना मुळात महाभारत घडले का? महाभरत खरे की केवळ एक कथा? या दृष्टीकोनातुन?विचार केलेला नाही. एका खर्या कथेचे दैवी आवरण बाजुला सारुन त्यातील काही घटनांचे विवेचन इतक्या ढोबळ अर्थाने कृपया या लेखाकडे बघावे.
प्रतिक्रिया
2 Apr 2016 - 11:45 pm | चांदणे संदीप
महाभारताचा ऐतीहासिक दृष्टीकोनातूनही अभ्यास जमेल तसा करत असतो.
थोडंफार ऐकलेलं : ऐतिहासिक दृष्टीकोनातून जरा इंटरेस्टींग सांगतो, जळगावच्या जवळ कुठेतरी "कटापूर" नावाचे गाव आहे. सांगतात की भीमाने, बकासुराला मारून त्याचे हात धडापासून उखडून जेव्हा दूर फेकले तेव्हा ते इथेच येऊन पडलेले म्हणून त्या गावाचे नाव कटापूर असे पडले. सेम स्टोरी कोल्हापूरच्या पुढे कर्नाटक सीमेलगतच्या एका गावाबद्दलही (नक्की नाव आठवत नाही) ऐकली आहे.
सोलापूर जिल्ह्यात, करमाळा तालुक्यात, एक गाव आहे "अंजनडोह" नावाचे. या गावाच्या नावाची कहाणी अशी सांगतात, की पांडव वनवासात असताना एकदा त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा अर्जुनाने याच ठिकाणी जमिनीत बाण मारून(बोअरवेल??) पाण्याचा झरा बाहेर काढला होता!! :)
अशा बऱ्याच कथा/दंतकथा ठाऊक आहेत. भेटलो की निवांत गप्पा मारू!
Sandy
2 Apr 2016 - 11:55 pm | उगा काहितरीच
चालेल चालेल ! :-)
2 Apr 2016 - 11:21 pm | तर्राट जोकर
महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . (लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.)
>> संतोषीमाता बद्दल ऐकले नाही तुम्ही??
स्वारी हां. अगदीच राहवले नाही म्हणुन अवांतर.
2 Apr 2016 - 11:30 pm | उगा काहितरीच
सॉरी इथे विषय भरकटवू इच्छित नाही. खवतून याविषयी लिहीन. धन्यवाद .
3 Apr 2016 - 9:35 am | आनन्दा
काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पुढील वाक्ये कदाचित हा गैरसमज दूर करतील.
१. संतोषी मातेची देवळे अगोदरपासून अस्तित्वात होती
२. संतोषी माता ही देवी आहे असेच मानतात... अवतार मानत नाहीत. विशेषतः राम, कृष्ण आणि परशुराम यांना भारतीय साहित्यात एक ऐतिहासिक पुरुष म्हणून स्थान दिले आहे. तसे इतर कोणत्याही देवांचे नाही.
3 Apr 2016 - 12:46 pm | तर्राट जोकर
१. अगोदरपासून म्हणजे कधीपासून?
२. दुसर्या मुद्द्यात खूप गोंधळ आहे. संदर्भ बघितले तर गोंधळ लक्षात येईल.
पण हे अवांतर इथे करायचे आहे काय?
4 Apr 2016 - 12:00 pm | मृत्युन्जय
प्रतिसाद आवडला.
महाभारत खरेच झाले की नाही तो एका वेगळ्या चर्चेचा विषय होउ शकेल म्हणुन त्या मुद्द्याला या लेखात हातच लावला नाही. पण लेख लिहिताना असेच गृहीत धरले आहे की ते घडलेच. फक्त त्या महाभारताला दैवी कोंदणातुन मोकळे करुन मानवी सीमेवर बद्ध केले आहे इतकेच. त्यामुळेच दैवी अस्त्रांचे अस्तित्व या लेखापुरते अमान्य केले आही इतकेच.
भीमाने कर्णाला ३१ वेळा हरवले असे जे म्हटले आहे त्याबद्दल बोलायचे झाल्यास ती अतिशयोक्तीच आहे पण भीम काही वेळेला कर्णाला वरचढ ठरला हे देखील सत्य आहे. पण भीम कर्णाला वरचढ ठरणे आणि कर्ण त्याला वरचढ ठरणे यात एक फरक होता तो असा की जेव्हा कर्णाने सर्वशक्तीन भीमाशी युद्ध केले तेव्हा भीमाला पुर्ण परास्त्र करुन त्याची पुरती मानखंडना करुन, त्याचा जीव घेणे शक्य असुनही तो न घेता त्याला अपमानित करुन सोडुन दिले. भीमाने कर्णावर असा निर्णायक विजय मिळवलेला दिसत नाही. अर्थात कर्णासमोर भीमाने दुर्योधनाच्या ३१ भावांना परलोकी धाडले हे ३१ पराभवांपेक्षा कमी देखील नाही.
4 Apr 2016 - 12:04 pm | मृत्युन्जय
कर्ण आणि अर्जुनांना प्यादे म्हणण्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना प्यादे मी फक्त राजकारणाच्या खेळापुरते बोललो आहे. महाभारताचे युद्ध या दोन यौद्ध्यांचे जीवावरच लढले गेले. युधिष्टिराच्या दृष्टीने अर्जुन सर्वात मुख्य यौद्धा होता तर दुर्योधनाच्या दृष्टीने कर्ण. त्यामुळे बुद्धीबळाचा पट समोर मांडल्यास त्या दोघांना वजीर म्हणता येइल पण त्या दोघांच्या खांद्यावर बंदुक ठेउन कृष्ण दुर्योधनादी प्रभुतींनी राजकारणाचा जो पट मांडला होता त्या दृष्टीकोनातुन बघता या दोघांचा प्याद्यासारखाच उपयोग झाला असे दिसुन येइल. म्हणुन ही २ प्यादी. त्यांचे मुख्य युद्धातले आणि एकुणच महाभारतातले योगदान नक्कीच स्प्रूहणीय आहे आणी त्या पटावर त्यांना प्यादी नाही म्हणता येणार. राजकारण या विषयात मात्र दोघे थोडे कच्चे विद्यार्थी होते :)
2 Apr 2016 - 7:47 pm | पैसा
इंटरेस्टिंग मते
2 Apr 2016 - 8:45 pm | दिग्विजय भोसले
आमच्या शकुनीमामांना का म्हणून विसरलात?
कृष्ण आणि शकुनी हे दोन राजकारणी होते ना?
2 Apr 2016 - 9:32 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
हे तुमच्या मते,त्यांच्यामते कृष्ण आणि दुर्योधन.
4 Apr 2016 - 2:02 pm | मृत्युन्जय
नाही हो. शकुनीमामांना विसरलो नाही. तळटीपेत त्याचा खुलासा केला आहे ना. मला तर युधिष्ठिर देखील मोठा राजकारणी वाटतो.
4 Apr 2016 - 3:06 pm | sagarpdy
दाजी पणशीकरांच्या वर्णनात - भीष्म, अंबा, द्रोणाचार्य, द्रौपदी, कर्ण या प्रमुख पत्रांतील सूडाचा संघर्ष, या सूडचक्रात अडकला नाही असा कृष्ण आणि बाकी सगळी प्यादी असा दृष्टीकोन.
पर्व मधील "माणसांची" कथा आणि त्यात कर्णाला जवळपास काहीच नसलेले महत्त्व.
मृत्युंजय मध्ये असलेला उदात्त आणि महान कर्ण
युगांत मध्ये अजूनच वेगळे विवेचन.
दृष्टीकोन वाचावेत आणि सहज पटावेत, तसाच हा अजून एक. महाभारत इज ओस्सम - इतिहास असो वा कथा.
[नाव मृत्यंजय घेऊन कर्णाला प्यादे म्हणणे हादेखील एक सही प्रकार, परत एकदा वाचणार]
4 Apr 2016 - 3:57 pm | उगा काहितरीच
लै वेळा सहमत.
4 Apr 2016 - 3:41 pm | मृत्युन्जय
सर्व वाचक प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. शंभर प्रतिसाद आले. धागा सार्थकी लागला.:) (मला तर २५ जेन्युइन प्रतिसाद आले तरी धागा सार्थकी लागल्याचा आनंद होतो) :)
4 Apr 2016 - 5:08 pm | अभ्या..
मृत्योंजया
प्लीज मी हे वाक्य स्वाक्षरीसाठी घेऊ? प्लीज ;)
4 Apr 2016 - 5:16 pm | मृत्युन्जय
हाहाहा. घे की.