!! तुळशीचे लग्न !!
दिवाळीत राहिलेले फटाके कधी वाजवायचे तर तुळशीच्या लग्नात. प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशीचे लग्न भारतात पारंपारिक पद्धतीने लावल्या जाते. तुळस या रोपट्याच्या फांदीला बांगड्या, साडीचा आहेर, आणि काय काय असते. भटजी असतो, मंगलाष्टके असतात आणि फटाके असतात. कुठे तरी बँड असेल आणि कुठे कुठे काय असेल.........! या संबधीची एक ऐकीव कथा जी पद्मपुराणात आहे, असे म्हणतात. ती अशी की, जालंधर नावाचा एक महाप्रतापी व असाधारण योद्धा होऊन गेला. त्याने देवलोकांना बेजार करुन सोडले होते. आणि त्याच्या भाऊबंदास दैत्यास सुखी केले होते. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. आणि तिच्याच पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनांत अजिंक्य ठरला होता. त्याचा पराभव कसा करावा म्हणून देवलोकांच्या बैठकी होत होत्या आणि इकडे जालंधराने इंद्रपुरीवर चाल करायची आणि इंद्राची खोड मोडायची अशी तयारी चालविली होती. पुढे देवांचे आणि दैत्यांचे तुंबळ युद्ध झाले. आणि त्याच्यात नेहमीप्रमाणे देवांना जराशी माघार घ्यावी लागली. तेव्हा श्रीविष्णुने जालंधरास युक्तीने ( कपटाने ) पराभुत करायचे ठरवले. जालंधरची पत्नी जिच्या पतिव्रत्यामुळे त्यास जे सामर्थ्य मिळाले होते ते नष्ट करायचा विडा श्रीविष्णूने उचलला. त्याने जालंधर युद्धात धारार्थी पडला असा निरोप दिला आणि दोन वानरांकडून विष्णूने त्याचे शिर व धड जालंधरप्रमाणे दिसेल असे करुन वृंदेच्या समोर आणून टाकले. तेव्हा ती दु:खाने व्याकुळ होऊन शोक करु लागली. इतक्यात एका कपटी साधूने येऊन संजीवनी मंत्राने या कपटवेषधारी जालंधरास उठविण्याचा उपक्रम केला. धड व शिर याच्या जागी जालंधराचा वेष घातलेला विष्णू उभा राहिला. तेव्हा आनंदाच्या भरात आपला मृत पती सजीव झाला असे मानून त्या जालंधररुपी विष्णूस कवटाळले. पुढे विष्णू तिच्याच घरी राहू लागला. वृंदेच्या अज्ञानामुळे का होईना तीचे पतीव्रत ढळले. त्यामुळे तिकडे ओरीजनल जालंधर बलहीन झाला आणि युद्धात पराभुत झाला. नंतर खरा प्रकार वृंदेस कळला. त्यामुळे संतापाच्या त्या साध्वीने विष्णुला शाप दिला की तुला पत्नीचा वियोग घडून दोन वानरांचे साह्य घेण्याची पाळी तुझ्यावर येईल त्या प्रमाणे पुढे रामवतारी ते घडलेच आहे. असो, त्या नंतर वृंदेने चिता रचून तीत प्रवेश केला. आपण कपटाने महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून विष्णुस वाईट वाटले. इतकेच नव्हे तर तो तिच्या रक्षेजवळ वेड्यासारखा कितीतरी दिवस बसून राहिला. आता हे वेड घालविण्यासाठी काय करावे म्हणून पार्वतीने त्या राखेत तुलसी, आंवळा, व मालती यांचे बी पेरुन तीन झाडे उत्पन्न केली. त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. पुढे वृंदा ही रुक्मिणीच्या रुपाने अवतरुन विष्णूचा अवतार जो कृष्ण त्यास तिने कार्तिक शु. द्वादशीस वरीले. हाच तो रुक्मिणीकृष्णविवाह जो दरवर्षी धुमधडाक्याने साजरा करतात.
या निमित्ताने आपणास माहित असलेल्या काही कथा किंवा काही माहिती जर आली तर तिचे इथे स्वागत आहे.
प्रतिक्रिया
24 Nov 2007 - 9:25 am | विसोबा खेचर
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली.
क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा..
तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे...
बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती...
तात्या.
24 Nov 2007 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती...
तात्या,
मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे.
पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे !
तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला.
अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Nov 2007 - 10:27 am | सहज
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला.
मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.
24 Nov 2007 - 11:56 am | प्रकाश घाटपांडे
आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य.
प्रकाश घाटपांडे
24 Nov 2007 - 12:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य.
लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Nov 2007 - 12:47 pm | बेसनलाडू
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार.
(आभारी)बेसनलाडू
15 Jun 2012 - 2:39 pm | नाना चेंगट
हल्ली डबल बॅरल थंड पडलेली दिसत आहे..
असो बदलीन.
15 Jun 2012 - 3:35 pm | तर्री
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे.
अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे.
मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे.
आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!
15 Jun 2012 - 5:55 pm | रुमानी
माहितिपुर्ण लेखन !
आभारी आहोत.
प्रासंगिक मालिक सदर येउदेत..........! तसे आता सणावाराचेच दिवस आहेत.
श्रावण आलाच कि?
15 Jun 2012 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, हे जुने धागे कोण वर आणतंय रे....!
-दिलीप बिरुटे
15 Jun 2012 - 6:52 pm | स्पंदना
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान?
बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.