जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस.....
कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा.
अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या,
कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले.
पुस्तके मनाचा आरसा असतात,
कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते!
पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा
कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा.
‘रमलखुणा’ म्हटलं कि,
आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय,
त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात,
असं वाटतं.
‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’
आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.
तपशील विस्मरणात गेले, पण आठवतात ते
केवळ अज्ञात, गूढ प्रांतात केलेले अगणित प्रवास!
काही प्रवास, भयचकित होऊन,
तिथेच अर्ध्यावर सोडले.
डोळे आणि मन मजबूत झाल्यावर,
परत प्रवास चालू केले....!
आता भय वाटत नाही. फक्त चकित होते.
मनातल्या इतक्या नाना प्रकारच्या खोल दर्पात
त्या माणसाचे मन किती आरपार उतरले होते!
कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा.
किती लिहिले!
कुणाकुणाचे संचित लिहिले!
नियतीला जणू पानापानांवर खेळवत ठेवले.
माणसं केवळ बंदा वाटायची,
त्याने त्यांची चिल्लर समोर ठेवली.
माणसं केवळ नितळ वाटायची,
त्याने त्यांच्यातला आरभाटपणा दाखवून दिला.
कुठल्या कोनातून पहायचा?
कुठल्या प्रतलावर सगळा खेळ मांडायचा?
तिकडे त्यांनी भय इथले संपत नाही असे नुसते लिहिले,
इकडे याने ते शब्दाशब्दातून दाखवून दिले.
पण ती भिती पुनःपुन्हा हवीहवीशी वाटायची.
कळल्यासारखे वाटायचे,
पण आठवू गेल्यास सगळे निसटून गेल्यासारखे वाटायचे.
खरं तर ठार विसरायलाच हवं होतं आत्तापर्यंत!
पण मनाचा दरवाजा उघडला कि, इस्किलार भेटतोच!
कथा संपतात! पण अर्क उतरतोच मेंदूत. स्मरणात.
नियतीच्या रमलखुणा त्याने सोडवल्या नाहीत,
पण त्यांची आढ्यता अशी काही मांडून ठेवलीय
कि कठीण प्रसंगी नियतीची गूढ सावली ओळखून गप्प राहावे,
इतके अवसान दिले. इतकी समज दिली.
‘सांजशकुन’ होताना,
लाल डोळ्यांचा ‘पारवा’ तटस्थपणे कडेमनी कंपाऊंडवर बसत असेल,
तेव्हा त्याला आजही,
तो लिहिणारा माणूस दिसत असेल!
प्रतिक्रिया
11 Dec 2015 - 6:54 pm | जव्हेरगंज
जी एं ची अजून एक पण कथा वाचली नाही! तेवढं राहिलयं, कविता छान पण त्यांच्या एखाद्या कथेवर रसग्रहण पण टाका की!!
12 Dec 2015 - 12:53 am | बोका-ए-आझम
विदूषकही अफलातून! पण यात ' बखर बिम्मची ' चा उल्लेख हवा होता.
12 Dec 2015 - 10:01 am | राही
जी.ए. मूड नेमका पकडलाय जो पकडल्यासारखा वाटत असताना निसटून गेलाय असे भल्याभल्यांचे झालेय.
12 Dec 2015 - 10:54 am | उगा काहितरीच
जीए... नाम ही काफी है!
जीए... म्हणजे हत्ती अन् चार आंधळे या कथेतील हत्ती ! ज्याला जसे समजतात तसे घ्यावे .
12 Dec 2015 - 11:08 am | आतिवास
मुक्तक आवडलं.
'रमलखुणा' आणि 'बखर बिम्मची' आता आज (पुन्हा) वाचतेच.
12 Dec 2015 - 11:15 am | भानिम
साॅल्लिड.... तुमचं मुक्तक वाचुन मेंदूतल्या 'जीए' सेंटरला जाग आली परत... आता लायब्रीत जाऊन जीए घेऊन येणे क्रमप्राप्त आले....
12 Dec 2015 - 12:42 pm | कंजूस
घेतो आता सुटकेची पुडी.ते काळं मांजर घरात पुन्हा आलं वाटतं.
15 Dec 2015 - 2:40 am | रातराणी
वाचायच राहून गेलंय बरंच :(