झगमगाटात हरवलेले . . . . .

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
7 Sep 2013 - 1:29 pm

गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे.

.......................................................................................

परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता.. मी मंदीराच्या आत येणार नाही बाहेरच थांबेन एवढ्यावर काय ती मांडवली केली.

तसे फार काही लांब नाही, आमच्या येथील भायखळ्याच्या मंदीरातच जायचे होते. संध्याकाळी परतताना ट्रेनला ती सोबत असतेच, डॉकयार्डला उतरल्यावर टॅक्सी त्या मार्गाने घेतली. भलेमोठे आणि प्राचीन मंदीर असले तरी आडवाटेला असल्याने तिथे तुलनेत गर्दी कमीच असते. अर्धा तास तो काय एक्स्ट्रा जाणार होता. तरी देवासाठी म्हणून माझ्या नास्तिक मनाला तो ही जड झाला होता.

टॅक्सीतून उतरल्या उतरल्या बायकोने आपला मोर्चा हारवाल्याकडे वळवला. आता हे लोक हिला लुबाडणार हे लक्षात येताच मी देखील पटकन टॅक्सीचे भाडे देऊन तिच्या मागे मागे हजर झालो. तिने एक थाळी उचलली तसे मी पहिले किंमत विचारली. तुमच्याकडून काय जास्त घेणार भाऊ, फक्त पन्नास रुपये.. समोरून उत्तर आले.. पाहिले तर एक छोटासा हार, नारळ आणि दोनचार फुले.. हिशोब काही पटला नाही. चार दिवसांपूर्वीच टिटवाळ्याच्या गणेश मंदीरात जाऊन आलो होतो. तिथे शंभर रुपयाला थाळी पडली असली तरी त्यातील हार या हाराच्या वजनाच्या दसपट होता. मी जवळच एका पानावर ठेवलेला छोटासा हार आणि एखादुसरे फूल कसे विचारले, तर ते सात रुपयांचे होते. त्याच्या बरोबरीलाच एक नारळ घे बायकोला म्हणालो तर नशीबाने कबूल झाली. नारळाचे पंधरा रुपये पकडून बावीस रुपये झाले आणि मी मंदीराच्या दारातच अठ्ठावीस रुपयांची बचत झाली म्हणून देवाचे आभार मानले.

ठरल्याप्रमाणे बायको आत आणि मी तिच्या चपलांवर नजर ठेऊन बाहेर उभा राहिलो. त्या आधी तिला लवकर काय ते आटोप अशी ताकीद देण्यास विसरलो नाही. मंदीराला प्रदक्षिणा घालणार्‍या एका काकांनी मला सहज अन उगाचच विचारले, का रे बाळा, आत नाही जात का.. देवाचे दर्शन घे.. आज चांगला वार आहे.... वाटले फिल्मी स्टाईलमध्ये एक हात पुढे, एक कंबरेवर अन पाठीला पोक काढत अमिताभच्या आवाजात उत्तर द्यावे, इनसे मेरी पुरानी दुश्मनी है चाचा.. पण वास्तवाचे भान ठेऊन आवरला तो मोह..

जवळच एक टेबल लाऊन दक्षिणा घेण्याचा कार्यक्रम चालू होता. वीस-बावीस वर्षांची पोरेच होती टेबलवर.. मंदीराच्या दारापाशीच बसलेली असल्याने येणार्‍या जाणार्‍यांना अगदी हाका मारून बोलावत होते. हा काय दक्षिणा घ्यायचा प्रकार म्हणून सवयीप्रमाणे मनातल्या मनात थोडासा चिडणार तोच नजर त्यांच्या डोक्यावर लावलेल्या बॅनरवर पडली. चामुंडेश्वर मंदीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ओह्ह, ती दक्षिणा नसून गणपतीची वर्गणी होती तर.. झरझर स्वताचे सारे दिवस आठवले जेव्हा मी त्यांच्या भुमिकेत होतो. आमच्या बालगोपाळ मित्रमंडळाचा गणपती साजरा करायची आवड असायची, काम करायची ताकद असायची, देण्यासाठी वेळ असायचा, अडीअडचणींचा सामना करायची हिंमत असायची पण नसायचा तो फक्त पैसा.. आणि मग तो जमेल तितका कमीच वाटायचा.. पण धमाल मात्र फुल टू यायची, त्याचा वर्गणी किती जमते याच्याशी जराही संबंध नसायचा.

पॉकेटमनी नावाचा फारसा प्रकार नसताना पहिल्यावर्षी कुठून कुठून पैसे जमवून आणलेली बाप्पांची छोटीशी मुर्ती, तिच्यावर रोज नवीन हार घातला जाईल याची घेतलेली काळजी, आपापल्या घरांतून प्रसाद म्हणून आणलेली फळे, हाताला लागलेल्या थर्माकोलच्या तुकड्यांपासून आणि मिळेल त्या टाकाऊ-टिकाऊ वस्तूंपासून बनवलेले मकर, आमचा बाप्पा सुद्धा कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून देण्यासाठी त्याची त्याच उत्साहात केलेली पूजा-अर्चा अन आरतीचा तो चढतच जाणारा आवाज.. सारे सारे काही डोळ्यासमोरून तरळून गेले.. पण आजही ते दिवस आठवले की राहून राहून असेच वाटते की त्या वेळी आम्हाला पुरेसा पाठींबा आणि सहकार्य मिळाले असते तर कदाचित आजही ती परंपरा कायम असती. आजही आम्ही आमच्या चाळीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असतो. त्या निमित्ताने का होईना मुंबई सोडून इथेतिथे विखुरलेले सारे चाळकरी काही दिवसांसाठी पुन्हा एकत्र आले असते...

चांगल्या आठवणी आठवताना शेवटी नेहमी एक खंत मनात दाटून येते.. तसेच झाले माझे..

इतक्यात बायको दर्शन घेऊन बाहेर आली आणि तिचेही लक्ष्य त्या मुलांवर गेले. स्वताहूनच म्हणाली, आज चांगला मुहुर्त आहे, थोडीफार देणगी देऊया का रे? तिची स्वताची लाख इच्छा झाली आणि ती स्वता कमावती असली तरी देवाच्या नावावर खर्च करताना ती माझी अशी परवानगी घेतेच.. धाकच आहे माझा तसा..

मी म्हणालो, "अग्ग ते दक्षिणावाले नाहीत तर गणपतीची वर्गणीवाले बसलेत.."

ओह्ह म्हणत ती आपला दक्षिणा द्यायचा प्लॅन कॅन्सल करू लागली तसे मीच तिला बळेच तिथे नेले आणि पावती फाडायला लावली.

बायको पैसे देत असताना सहज संवाद साधायचा म्हणून त्या मुलांकडे विचारणा केली, "कुठे बसवता रे गणपती?"

"हे काय इथे समोरच, त्या गाड्या लागल्या आहेत ना, त्यांच्या पलीकडे..." मंदीराला लागून असलेल्या मोकळ्या जागेकडे हात दाखवत एकाने उत्तर दिले.

मी लहान असताना दरवर्षी आमच्या माझगाव विभागातले तसेच लालबागपर्यंतचे लहानमोठे सारेच गणपती न चुकता बघायचो. पण हा भाग तसा आडवळणाला असल्याने गणपतीच्या दिवसात कधी इथे येणे झाले नव्हते, इथे गणपती बसतो हे देखील मला माहीत नव्हते, अगदी आजच समजत होते. तरीही नव्यानेच बसवायला सुरुवात झाली का म्हणून मी चौकशी केली तर समजले की यंदाचे त्यांचे ३४ वे वर्ष होते.. माझ्यासाठी हा एक धक्काच होता.. म्हणजे माझ्या जन्माच्याही आधीपासूनचा हा गणपती होता तर..

मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितले की मी जवळच राहतो मित्रांनो, पण आज पहिल्यांदाच तुमच्या गणपतीबद्दल ऐकतोय..

त्यावर त्यातील एकजण जे उत्तरला ते खरेच नकळतपणे दुखावून गेले मनाला..
म्हणाला, "तुम्ही मोठमोठ्या मंडळांचे गणपती बघत असाल, जिथे भारीतले डेकोरेशन आणि भलीमोठी मुर्ती असते... आमच्या छोट्या गणपतीला कशाला याल.."

खरेच खूप वाईट वाटले हे ऐकून, वाटले त्याला तडकाफडकी उत्तर द्यावे की असे नाहीये रे बाबा.. सजावट रोशनाई हि असतेच बघण्यालायक, पण दर्शनाला शेवटी देवच खेचून आणतो. दर्शनानंतर त्याची लोभस मुर्तीच लक्षात राहते. डोळे दिपवायचे काम रोषणाई नाही तर त्या मुर्तीच्या चेहर्‍यावरचे तेज करते. मी स्वता नास्तिक असलो आणि कोणा देवाचा भक्त नसलो तरी गणपती या देवाचा फार मोठा चाहता आहे. खरे तर गणेशोत्सव हाच मुळी माझा सर्वात फेवरेट सण आहे. आजवर विभागातील सारे गणपती वेचून वेचून बघत आलोय. पण तुझेही बरोबरच आहे, दुर्दैवाने खरेच तुमचा गणपती इतरांच्या झगमगाटात हरवलाच, पण माझे दर्शनाला न येण्यामागचे कारण ते नव्हते जे तू समजत आहेस....... पण हे सारे त्याला ऐकवून पटणार नव्हते..

त्या मुलांना त्यांच्या गणपतीला यंदाच्या वर्षी आणि यापुढची सारी वर्षे न चुकता भेट द्यायचे कबूल करून मी तिथून निघालो. जाता जाता मनात एकच विचार येत होता की असे बरेच गणपती आणि गणपती मंडळ असतील जे या झगमगाटात हरवले असतील जे शोधायला हवेत. त्यांना भेट द्यायला हवी. चार लोकांना त्यांच्याबद्दल सांगायला हवे. यांनाही गरज आहे कोणाच्या तरी पाठींब्याची, कोणाच्या तरी सहकार्याची, पाठीवर पडणार्‍या कौतुकाच्या थापेची.. पुरेशी वर्गणी जमल्यास कदाचित त्यांचा उत्सव साजरा करायचा प्रश्न मिटत असेल, पण भक्तांची वाढलेली रांग पाहून त्या मुलांचा हुरूप नक्कीच वाढेल नाही का..!!

- तुमचा अभिषेक

धर्ममुक्तकप्रकटनविचारलेखअनुभवमतशिफारससल्लामाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Sep 2013 - 3:32 pm | पैसा

उपेक्षितांचे अंतरंग!!

अनिरुद्ध प's picture

7 Sep 2013 - 3:48 pm | अनिरुद्ध प

या लेखा बाबत तुमच्या प्रतिक्रियेशी पन्नास टक्के सहमत.

तुमचा अभिषेक's picture

9 Sep 2013 - 1:44 pm | तुमचा अभिषेक

उपेक्षितांचे अंतरंग असले तरी या लेखातील विचार माझ्या मनातले आहेत, त्यांच्या डोक्यातले नाहीत :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !