लहानपण देगा देवा....

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
3 May 2013 - 5:04 pm

बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं. रिझल्टच्या चिंतेपेक्षा गावी गेल्यावर काय काय धम्माल करता येईल याचाच विचार मनात जास्त असायचा.

वय वर्ष १० ते १५-१६ या काळात उन्हाळ्यातली सुट्टी म्हणजे माझ्या अंत्यत जिव्हाळ्याचा विषय होता. बाबांचं गाव आणि आईच माहेर हे एकच आणि जवळ जवळ असल्यामुळे 'मामच्या गावाला जाऊ या..' सारखी गाणी ऐकली कि विचार पडायचा, आईचं आणि बाबांचं गाव एकच का? वैताग यायचा खुप. पण तो थोड्या काळापुरताच कारण एकच गाव असल्याने दोन्ही घरची मायेची माणसं आयतीच भेटत. आणि मग काका-काकीकडून लाड करून घेतल्यानंतर मामाच्या घरी जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडत असे, 'मामाच्या गावाला जाऊ या' हे गाणं गुणगुणायला सुरूवात केली कि गाणं संपेपर्यंत मी मामाच्या घरात पोहचलेला असायचो.

सुट्टी लागल्यानंतर एखाद्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता गावाला जाणारी लाल डब्बा पकडली कि माझ्या सुखी दिवसांना सुरूवात व्हायची. एरवी सकाळी झोपेतून उठण्यासाठी कुरकूरणारा मी, गावी जाण्याच्या दिवशी मात्र आईने न उठवताही उठून बसत असे. मुंबईहून गावी जाणारी ती गाडी संपुर्ण दिवसभरात एकमेव आणि ती ही पहाटेच असल्यामूळे त्या गाडीला पर्याय नसायचा. प्रचंड धक्काबुक्की करत गाडीत चढल्यानंतर खिडकीजवळच्या जागेवर माझा आणि माझ्या बंधूराजांचा डोळा असायचा. पण लहान असल्याने मला झुकतं माप मिळायचं आणि तासा-तासाने जागा दादाबरोबर बदली करण्याच्या बोलीवर त्या खिडकीजवळच्या जागेवर मी स्थानापन्न व्हायचो. मग खिडकीत बसून फर्राट वारा चेहर्‍यावर घेत गाडीबाहेरच्या जगाचा मजेशीर आनंद घेण्याचा काम सुरू व्हायचं. लाल-पिवळ्या फुलांनी बहरलेली झाडं, नानाविध रंगानी नटलेल्या बोगनवेली एका-पाठोपाठ मागे पळताना पाहून गमंत वाटायची. कोणाचं लक्ष नाही हे पाहून हळूच गाडीच्या बाहेर काढला कि लागलीच आईचा एक धपाटा माझ्या पाठीत पडायचा. पनवेल येईतो, 'कुठे आलोय आपण?', 'आलं का आपलं गाव?' यांसारख्या प्रश्नांनी आई-बाबांना भंडावून सोडणे हा ठरलेला कार्यक्रम असायचा. गाडीत चिक्कार गर्दी, तर्‍हेवाईक प्रवासी, भरपूर अस्वच्छता, वस्सकन अंगावर ओरडणारा कंडक्टर आणि विमानाचा पायलट असल्याप्रमाणे गाडी चालवणारा ड्रायव्हर!! पण मी या कशातच नसायचो. शरीराने मी गाडीने प्रवास करत असलो तरी मन मात्र खुप चपळ! मळ्यातल्या आंब्याच्या झाडाला झोके घेत बसलेलं असायचं!!

पहाटे पाच वाजता सुरू झालेला प्रवास दुपारी बारा वाजता संपायचा. रस्त्याने जाताना अचानकच चहुबाजूंनी धुळीचे लोट उठू लागले म्हणजे आपलं गाव जवळ आलं आहे अशी माझ्या बालमनाची समजूत असायची. गावापासून वाडी तीन कोस. गावी सायकल जवळ बाळगणं हिच श्रीमंतपणाची लक्षण मानली जायची त्यामुळेच कि काय दुचाकी-चारचाकी गाड्यांचा दुरदूरपर्यंतही संबंध नसायचा. काका किंवा मामा घरून सायकल घ्यायला आले असतील तर ठिक, नाहीतर चालतच वाडी गाठण्याशिवाय काही पर्याय नसायचा. गावातून वाडीला जाणारा एखादा सायकलवाला भेटला कि कोण आनंद व्हायचा. दिड-दोन तासांची पायपीट टळायची ना! पण प्रत्येक वेळी नशीब जोरावर नसायचं. मग अंगाची काहिली करणार्‍या उन्हात त्या धुळभरल्या वाटांवरून वाडीकडे चालत जाण्यावाचून गत्यंतर नसायचं.

फार जास्त नाही पण शे-सव्वाशे उंबर्‍यांची आमची वाडी! वेशीवरचा मारूतीराया आणि अंबाबाई अनादी काळापासून वाडीचं रक्षण करत उभे. चैत्रप्रतिपदेनंतर पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला अंबाबाईची पालखी निघायची. खुप मोठी यात्रा भरायची, तशी ती आत्ताही भरते पण आता ती मजा येत नाही. वाडीला लागूनच बारमाही नदी वाहत असल्यामुळे शेतीसाठी पाणी मुबलक मिळायचं, त्यामुळे सुबत्ता भरपूर होती. सगळी वाडी गुण्यागोविंदाने एकत्र नांदायची. आधुनिकीकरणाचा स्पर्शही वाडीला झाला नव्हता आणि म्हणूनच शेतावरून परतल्यानंतर संध्याकाळचा मोकळा वेळ घालवण्याचं लोकांचं हक्काचं ठिकाण म्हणजे वाडीच्या मधोमध असणारा पार! भरथोरलं वडाचं झाड. किती तरी मुळ्या-पारंब्या लटकलेलं. किती वर्षापासून होतं कोणास ठाऊक?! कदाचित माझ्या आज्या-पणज्यापासूनच किंवा त्यांच्याही आधीचं!!

उन्हाने रापलेला काळा चेहरा धुळीने माखलेले पांढरे पाय घेऊन घरांच्या पाऊल पडायचं. चुलते-चुलत्या, त्यांची मुलं, आजी-आजोबा सगळे आनंदून जायचे आम्हाला पाहून. गेल्यासरशी आजी आम्हा मुंबईवाल्या नातवांना मायेने जवळ ओढायची. प्रेमाने मुके घ्यायची. चुलत भाऊ-बहिणी आमच्याभोवती कोंडाळ करून उभं राहत. थोडासाही आराम न करता डोक्याला टॉवेल गुंडाळत अंघोळीसासाठी आम्ही सगळे नदीकडे सुसाट पळत सुटायचो. गावच्या बाकीच्या दोस्त मंडळींचीही तिथेच भेट व्हायची. अश्या, सुर्‍या, महिंद्र्या, भर्‍या, सुभ्या, पोपट्या, नवन्या असं अगणित मित्रमंडळ! नदीत मनसोक्त डुंबल्यानंतर सात-आठ तासाच्या प्रवासाने किटलेलं ते शरीर आणि शिणलेलं मन अगदी प्रफ्फूलित व्हायचं. अंघोळीनंतर मळ्यातल्या आंब्याच्या आणि चिंचेच्या झाडांवर तुटून पडणे हे वानरसेनेचे नित्याचे काम. आंबा आणि चिंचा खाल्लेली आंबटढोण तोंड घेऊन मंडळी जे खेळायला सुरूवार करत ते पार सुर्य समोरच्या डोंगरात गुडूप्प होऊन जाईपर्यंत. खंड्या दिसायचा कधी कधी नदीच्य वर एकाच ठिकाणी पंख फडफडवत. त्याला पाहताच चुलत भाऊ मोठ्ठ्याने ओरडायचा, 'गण्या मार बुडी' कि लागलीच एखाद्या आज्ञाधारकाप्रमाणे खंड्या नदीत सुर मारायचा. अशा अनेक गमती जमतीबरोबरच लपाछपी, डोंगर का पाणी, सुरपारंब्या, विटीदांडू, गोट्या अशा नानाविध खेळांचा धडाका उडवण्यात येई. तो पर्यंत एखादा चुलता घरून कंदील घेऊन आम्हाला शोधायला आलेला असे. संध्याकाळच्या वेळी सगळी मोठी मंडळी बाहेरच्या अंगणात पीक-पाण्याच्या गोष्टी करत असताना आम्ही सगळी नातवंडं माजघरात आजीच्या अवती भोवती कोंडाळं करून बसायचो. तिच्या कुशीत शिरून वाडीतल्या जुन्या घटना ऐकणं पुस्तकांमधल्या गोष्टींसारखं वाटायचं.

रात्री कुस्करलेल्या बाजरीच्या भाकरी आणि त्यावर दुधसाखर असं जेवण दणकून खायला मिळायचं. जेवणानंतर अंगणातच गोधड्या टाकून झोपत असू. थंडगार वार्‍यात, मोकळ्या आकाशाखाली, चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ बघत झोप कधी लागायची हेच कळायचं नाही. सकाळी डोळे उघडायचे तेच मुळी घराच्या पडवीत. मोठ्या लोकांची कामाची धांदल पाहत आम्ही निवांत अंथरूणात लोळत पडायचो. निवांतच. कारण परीक्षेचं, अभ्यासाचं, रिझल्टचं कसलंच टेंशन डोक्यावर नसायचं. एखाद्या संध्याकाळी आम्ही चुलत भावंड घरातल्या घरात लपाछपीचा खेळ खेळत असू, तेव्हा धान्याने भरलेल्या पोत्यांमागे, घराच्या तुळईवर, ज्वारीच्या सुकलेल्या ताटांमध्ये लपायला मजा येई. काका-काकींसोबत गोठ्यात गाईचं दुधं काढायला शिकणं हा मोठा दिव्य कार्यक्रम असायचा. पायखुटी घालणे, गाईच्या आचळांवर पाणी मारून दोन बोटांत व्यवस्थित पकडत दुध पिळायला शिकणे अशी काम चुलते आणि चुलत्या हौसेने करत. सुट्टीतल्या अशाच एखाद्या दुपारी किसलेल्या कैर्‍या आणि गुळ एकत्र करून चविष्ठ असा 'गुळांबा' आज्जी तयार करायची. त्यातल्या जास्तीच्या वाटेसाठी भांडणं हि ठरलेली. व्यायलेल्या गाईच्या पहिल्या दुधाचा चिक, डेअरीतून परत आलेल्या दुधाला आटवून केलेले पेढे, पिकलेल्या आंब्यांचा आमरस आणि जाण्यापुर्वी एखाद्या दिवशी आजीने स्वतःच्या हाताने आवडीने बनवलेल्या पुरणपोळ्या... दरवेळच्या सुट्टीतल्या आमच्या चंगळवादाच्या गोष्टी.!! याच्या व्यतिरीक्तही खूप मजा मिळायची, पण आजीने स्वहस्ते बनवलेल्या पदार्थांची सर कशालाच नसायची. सुट्टीतले बहुतांश दिवस मी आमच्याच घरी घालवत असे आणि थोडेसेच दिवस आजोळी मामाच्या घरी जायचो. कंटाळा यायचा खूप तिकडे.

या सगळ्या गमती-जमतीमध्ये सुट्टी केव्हा संपायची हे कळायचं सुध्दा नाही. जाण्याचा एखादा दिवस नक्की करून त्या दिवशी सकाळी निघायची तयारी सुरू होई. शेतातला कोवळा लसून, कांदा, मसाल्याचे पदार्थ आज्जी आवर्जून बांधून देई आमच्यासोबत. ते सगळं नेण्यावरून काही काळ आज्जी आणि बाबांचा वादही चाले. शेवटी निघायच्या वेळी सगळ्यांच्या पाया पडून जेव्हा घराच्या बाहेर पडायचो तेव्हा रडणं अनावर व्हायचं. मग आज्जी मायेने जवळ घेऊन पुढच्या सुट्टीत लवकर ये असं काही बाही समजवून सांगायची. मुंबईकडे येणारी गाडी आम्हाला घेऊन सुसाट निघालेली असायची आणि माझ चपळ मन मात्र नदीकाठी असलेल्या चिंचेच्या खोडात लपून बसायचं...

वावरसमाजजीवनमानराहणीप्रवासराहती जागाप्रकटनविचारअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 May 2013 - 5:19 pm | यशोधरा

मस्त!

कुंदन's picture

3 May 2013 - 5:28 pm | कुंदन

लेख अंमळ ४ मिंटं उशिरान आला.
तिकडं स्पा कासावीस झाला व्हता.

स्पा's picture

3 May 2013 - 5:32 pm | स्पा

=))

विसोबा खेचर's picture

3 May 2013 - 5:39 pm | विसोबा खेचर

सुंदर...!

मूकवाचक's picture

5 May 2013 - 9:29 pm | मूकवाचक

+१

मराठमोळा's picture

3 May 2013 - 5:55 pm | मराठमोळा

मस्त!!!!
आधी थोड्याफार फरकाने जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात अश्याच पद्धतीने उन्हाळी सुटी सत्कारणी लागत असावी. सध्याच्या परिस्थितीबद्दल कल्पना नाही.

ढालगज भवानी's picture

3 May 2013 - 5:58 pm | ढालगज भवानी

कय लिवलय कय लिवलय!!! टू गुड!!!

आतिवास's picture

3 May 2013 - 6:01 pm | आतिवास

लहानपणीचं वाडीचं चित्र सुरेख रंगवलं आहे.
आता तिथं काय दिसतं तुम्हाला - हेही नंतर कधीतरी जरुर लिहा.

पैसा's picture

3 May 2013 - 6:15 pm | पैसा

खूपच छान!

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2013 - 6:24 pm | अत्रुप्त आत्मा

मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना??? .............. मस्त मस्त मस्त!

जेनी...'s picture

3 May 2013 - 7:34 pm | जेनी...

+१

लेख सुरेख....

स्मिता.'s picture

3 May 2013 - 6:31 pm | स्मिता.

काय योगायोग म्हणावा, आताच लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्यांची स्मृतीत रमले होते आणि लगेच हा लेख वाचला. छान वाटलं.

फिरंगी's picture

3 May 2013 - 8:20 pm | फिरंगी

सु....रे...ख....च.....

या पुढ़े शब्द नाहीत...............

मी_आहे_ना's picture

3 May 2013 - 8:42 pm | मी_आहे_ना

किस्ना...मस्त एकदम. कल्पना करूनच मस्त वाटलं. (आमची परिस्थिती उलटी, रहायचो गावात, अगदी वाडी/खेड्यात नाही...आणि मामाचं गाव पुणे, त्यामुळे अगदी असेच अनुभव नाही घेऊ शकलो कधी)

अहाहा.. संपूर्ण लेख वाचायला दिलास म्हणून आभार!
शेवटचं वाक्य एकदम खास!

उपास's picture

3 May 2013 - 8:53 pm | उपास

सुंदर लिहिलय! एकदम नॉस्टेल्जिक वाटलं. मला मात्र काही दिवस झाले की मुंबई आठवायला लागायची (अजूनही लागते..)

मुक्त विहारि's picture

3 May 2013 - 9:06 pm | मुक्त विहारि

छान...

आवडले..

सुहास झेले's picture

3 May 2013 - 9:08 pm | सुहास झेले

सुरेख.... मनातल्या सुंदर भावना शब्दात व्यक्त केल्यास रे :) :)

या किसनदेवाचं लेखन असं साधं सरळ अन प्रांजळ असतं की वाचता वाचता मन त्या विश्वात कधी जातं समजत नाही.

इनिगोय's picture

3 May 2013 - 11:28 pm | इनिगोय

टोटली सहमत!

प्यारे१'s picture

3 May 2013 - 10:16 pm | प्यारे१

मस्तच रे किस्ना!

- किस्नाचा सरळ्पणा मिळावा ह्या अपेक्षेत प्यारे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2013 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे.....!!!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

4 May 2013 - 1:54 am | अभ्या..

मस्त रमलायस रे गावात किसना. :) छान लिहिलेस.
.
(पण खर्र खर्र सांग असं रमताना एकदापण बापलेकरची अन आकांक्षाची आठवण नाही का आली? ;) )

सामान्य वाचक's picture

4 May 2013 - 9:39 am | सामान्य वाचक

...

स्पा's picture

4 May 2013 - 9:42 am | स्पा

लेख आवडलाच
पण आता स्मरणरंजनपर न लिहिता काहीतरी वेगळे लिही अस निदान मला तरी वाटत.

चायला अजून वयाची तिशी पण झाली नाही आणि "कसले ते गेले ते दिन गेले" चे सूर आळवतो आहे :(

मी कस्तुरी's picture

4 May 2013 - 10:23 am | मी कस्तुरी

खरच बालपणाचे दिवस कित्ती अनमोल होते हे आत्ता मोठे झाल्यावर कळतंय,
बाकी लेख आवडला, छान लिहिलयस :)

हरेश मोरे's picture

4 May 2013 - 10:43 am | हरेश मोरे

मस्त ले़ख.

अग्निकोल्हा's picture

4 May 2013 - 11:01 am | अग्निकोल्हा

मिपा सारख एखाद संस्थळ असतं तर किती बरं झालं असत. आज हे वास्तव आहे बघूनच इतका आनंद होतोय की तो शब्दातही मावत नाही.

प्रचेतस's picture

4 May 2013 - 11:51 am | प्रचेतस

लिखाण अतिशय आवडले.
अगदी सहजसुंदर असे लेखन

श्रिया's picture

4 May 2013 - 1:02 pm | श्रिया

सुंदर लिहिलय!!

अगदि सुरेख मांडलय किसन द्येवा..अवघ्या म्हाराष्ट्रातील शाळकरी मुलांचे १५,२० वर्षां पुर्विची उन्हाळ्याची सुट्टी उभी केलीत, अत्ताच २ दिवस गावि जाउन आलो अन् हा लेख वाचला...हुरहुर लागली बघा

तुमचा अभिषेक's picture

4 May 2013 - 4:51 pm | तुमचा अभिषेक

छान लिहिले आहे.. त्या परीक्षेनंतरच्या खर्‍या अर्थाने टेंशनफ्री सुट्ट्या पुन्हा आयुष्यात कधी यायच्या नाहीत आता..

चित्रगुप्त's picture

4 May 2013 - 5:09 pm | चित्रगुप्त

वाहवा.
अगदी मर्मबंधातल्या आठवणी.

स्पंदना's picture

4 May 2013 - 6:16 pm | स्पंदना

निवांत वाचायचा हा लेख अस ठरवुन ठेवल होत. अन सत्कारणी लागला तो निर्णय. शब्दा शब्दात एक चित्र उलगडत जातय. अगदी आजीच्या मायेसह. मस्त हो किसनद्येवा! मस्तु.

दशानन's picture

5 May 2013 - 1:15 pm | दशानन

सुंदर लेखन!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 May 2013 - 4:36 pm | निनाद मुक्काम प...

मस्तच

सूड's picture

5 May 2013 - 9:05 pm | सूड

लहानपणाचे दिवस आठवत असतात पण मागितले तरी परत मिळणार नसतात त्यामुळे त्यावर लिहू तेवढं कमी वाटत असतं. लिहीत रहा.