आटपाट नगर होतं, खेडेगाव म्हंटलं तरी चालेल. लोक खाऊन -पिऊन सुखी होते कारण गरजेपुरते उत्पन्न जवळ जवळ प्रत्येकालाच मिळत होते.या गावात एका जोडप्याचा संसार सुरू झाला -रामराव व जनाबाई. रामरावांच्या वडिलांची वडलोपार्जित शेतजमीन होती (क्षेत्रफळ ४ एकर). शेताच्याच एका कोपऱ्यात एक झोपडीवजा घर होते. रामराव व जनाबाई स्वतःच्याच शेतात राबत असत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. रामराव व जनाबाईंच्या संसारवेलीवर फुले उमलली मोठा रमेश, मग जाई व जुई या जुळ्या मुली व या सर्वांच्या पाठीवर धाकटा सुरेश.
अर्थातच स्वतःच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी पडू लागले. मग रामराव व जनाबाई इतर लोकांच्या शेतात जमेल तशी मजुरीची कामे करू लागले. रामरावांचे म्हातारे आई - वडील वृद्धापकाळाने देवाघरी गेले. मुले मोठी होत होती. मोठा रमेश अभ्यासात तसा बरा होता पण तो अभ्यासात स्वतःला कधी झोकून देऊ शकला नाही. शाळा सांभाळून घरच्या शेतीतील कामे. आई - वडिलानं वेळ नसल्यामुळे भावंडचा अभ्यास घेणे,घरातील कामे करणे. १० वी ची परीक्षा काही तो एका दमात उत्तीर्ण होऊ शकला नाही. बहिणी मात्र कला शाखेत १२ वी उत्तीर्ण होऊन तालुक्याच्या ठिकाणी स्नातक अभ्यासक्रमात प्रवेशकर्त्या झाल्या.
धाकटा सुरेश हा फारच चुणचुणीत मुलगा होता, शाळेत नेहमीच त्याचा वरचा क्रमांक असे. खेळ व इतर स्पर्धांमध्येही त्याची कामगिरी कौतुकास्पद असे. अर्थातच रमेशचे मार्गदर्शन व पाठबळ त्याला वेळोवेळी मिळायचेच. दोघा बहिणींसाठी चांगली स्थळे (एकदमच) सांगून आल्याने व दोन्हीकडले लोक एकाच मांडवात विवाहसोहळ्यास तयार झाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या आनंदास पारावार उरला नाही. परंतु नाईलाजाने का होईना रामरावांना सावकाराकडून थोडे कर्ज घ्यावे लागले.
काही वर्षांनी धाकटा सुरेश १० वी मध्ये प्रावीण्य यादीत आला अन रामरावांच्या कुटुंबाचेच नव्हे तर आटपाट गावाचेच नाव मोठे केले. त्याचे हे यश पाहून जिल्हयाच्या ठिकाणच्या एका संस्थेने त्याला प्रोत्साहन म्हणून नाममात्र शुल्कावर वसतिगृहात प्रवेश देऊ केला. घरात आजवर एवढे शैक्षणिक यश मिळाले नसल्याने रामराव व रमेश यांनी कुठल्याही परिस्थितीत सुरेशच्या शिक्षणास काही कमी पडू द्यायचे नाही असे ठरवले व त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला पाठवले.
सुरेश मराठी माध्यमात शिकला असल्याने त्याला ११ वी विज्ञान अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकणे अवघड जात होते. त्याला इंग्रजीसाठी शिकवणी लावावी लागली. रामरावांनी स्वतःच्या पोटास चिमटा लावून व रमेशने क्षमतेपेक्षा जास्त मजुरी करून सुरेशच्या शिक्षणास पैसे कमी पडू दिले नाही. यथावकाश सुरेशने १२ वीतही उत्तम गूण मिळवून राज्यातील एका मोठ्या शहरातील नामांकित सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
रामरावांना जुने कर्ज फेडणे अवघड झाल्याने त्यांनी दीड एकर शेती सावकारास विकून टाकली. रमेशनेही भावाचे शिक्षण सुरू असल्याने आलेली स्थळे नाकारून स्वतःचे लग्न लांबणीवर टाकले. रामराव व जनाबाई आता थकले होते. समाजरितीप्रमाणे मुलींची पहिली बाळंतपणे त्यांना करावी लागली. तरीपण सुरेशच्या यशाच्या बातम्या ऐकून त्यांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत असे. थकलेल्या आईच्या आग्रहाखातर रमेश लग्नास तयार झाला. अर्थात त्याची होणारी बायकोही गरीब कुटंबात वाढलेली व कमी शिकलेली होती.
इकडे सुरेश अभियंता झाला व त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीही लागली. पगारातून पैसे वाचवून तो घरी पाठवत असे. हे सर्व पाहून रामराव व जनाबाई कृतकृत्य होत. आता त्यांच्याकडून मोल-मजुरी व शेतीची कामे होत नव्हती. त्यामुळे रमेश व त्याच्या बायकोवर सर्व भार पडला होता. लौकरच त्यांनाही मूल झाले.
सुरेशच्या कामगिरीवर खूश होवून त्याच्या कंपनीने त्याला त्यांच्यातर्फे प्रायोजित एम बी ए करण्याचा सल्ला दिला. ते महाविद्यालय दुसऱ्या राज्यात असणार होते. अर्थातच शिष्यवृत्ती जरी मिळणार होती तरी पगार बंद होणार होता. सुरेशने खटपट करून शैक्षणिक कर्ज मिळवले व एम बी ए ला प्रवेशकर्ता झाला. त्यामुळे पुढील दोन वर्षे तो घरी पैसे पाठवू शकला नाही.
इकडे जनाबाईंचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला व संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. सुरेशच्या परीक्षेमुळे तो आईच्या अंतिम दर्शनालाही येऊ शकला नाही. या धक्क्याने रामराव ही खंगले व अंथरुणाला खिळले. काही महिन्यांतच त्यांचाही मृत्यू झाला. यावेळी मात्र सुरेशने हजेरी लावली. वडिलांच्या आजारपणात रमेशवर बरेच कर्जही झाले. दुर्दैवाने सुरेश काही मदत करू शकत नव्हता कारण त्याचा पगार बंद होता.
यथावकाश सुरेश एम बी ए मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन नोकरीवर परत रुजू झाला. यथावकाश त्याला बढतीपण मिळाली व अधून मधून परदेशी जाण्याची संधी पण मिळू लागली. कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागात काम करणाऱ्या एका सुंदर तरुणीच्या प्रेमात तो पडला. तीचे नाव प्रिया. सुरेशचे कर्तृत्व पाहून प्रियाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली व धूमधडाक्याने लग्न लावून दिले. रमेश कुटूंबासह विवाहास उपस्थित होता पण त्यांचा गावठी अवतार पाहून त्यांच्याशी फारसे कुणी बोललेही नाही. त्यामुळे ते लग्न झाल्या झाल्या गावी परतले.
सुरेश व प्रिया नव्या संसारात रमले. वाहन कर्ज घेऊन नवी चारचाकी, गृहकर्ज घेऊन ३ शयनकक्षाचा गाळा त्यांनी घेतला. वर्षभरात त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी मुग्धा ठेवले. तिला शहरातील नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेत शिकवण्यासाठी ते पैसे वेगळे काढून ठेवू लागले. बऱ्याच कर्जांचे मासिक हप्ते, वेगवेगळ्या विम्यांचे शुल्क , शहरातील जीवनमान या साऱ्या घटकांमुळे त्यांचे मोठे उत्पन्नही कमी पडू लागले.
वर्षामागून वर्षे गेली, रमेश व सुरेश आपापल्या संसारात रमले होते. सुरेशची बायको मोठ्या शहरात लहानाची मोठी झालेली असल्याने तिला रमेशच्या कुटुंबाचा तिटकारा होता. त्यामुळे त्यांचे संबंध चार सहा महिन्यांतून एखादा दूरध्वनी एवढेच उरले होते. तसाही सुरेश मोठ्या हुद्दयावर असल्याने त्याला रिकामा वेळ नसायचाच.
एके दिवशी अचानक रमेशची बायको आजारी पडली. गावातल्या डॉक्टरांकडून निदान न झाल्यामुळे तिला जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या इस्पितळात न्यावे लागले. तेथे गेल्यावर कळले की तिला कर्करोग झालाय व उपचाराचा खर्च १० लाखांच्यावर असणार आहे. अर्थातच गावातले पडके घर व संपूर्ण शेती विकूनही एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नव्हते.
मदत करू शकेल असे दुसरे कुणीच नसल्याने रमेशने धाकट्या भावास आर्थिक मदतीची याचना करणारा दूरध्वनी केला. त्याला खात्री होती की आपला भाऊ नक्कीच मदत करेल. परंतु दुर्दैवाने मदत करणे तर दूरच सुरेश मोठ्या भावावरच चिडला. तो म्हणाला इतकी वर्षे तुम्ही आर्थिक नियोजन केले नाही, बचत करून मोठा लाभ देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले नाहीत, आरोग्य विमा काय कुठलाही विमा काढला नाही अन आता मला पैसे मागताय? माझाही संसार आहेच. कर्जांचे हप्ते, घरातील खर्च व मुलीचे शिक्षण यालाच पैसे अपुरे पडतात तर तुम्हाला कसे देऊ?
हताश मनाने रमेशने दूरध्वनी ठेवला व विचार करू लागला आपले काय चुकले.
मित्रांनो हि एक काल्पनिक कथा आहे. आता या कथेचा तौलनिक अभ्यास करूया आपल्या देशाचे उदाहरण घेऊन.
- रामराव अन जनाबाईंचे हे कुटुंब म्हणजे आपला देश.
- रमेश म्हणजे ज्यांच्या समस्या कधीच संपत नाही असे शेतकरी बांधव.
- रामरावांच्या मुली म्हणजे निम्न मध्यमवर्गीय असणारी आपल्या देशातील बहुतांश जनता.
- अन सुरेश म्हणजे तुमच्या माझ्या सारखे, मोठ्या शहरांत राहणारे, जालावरील सामाजिक माध्यमांवरून इतरांना शहाणपणा शिकवणारे, स्वतः अथवा स्वतःच्या कंपनीला परदेशी चलनात उत्पन्न मिळवून देणारे लोक.
आपल्या पैकी बहुतेक जणांचा आक्षेप असतो की आमच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा कर-रूपाने आम्ही सरकारला देतो. सरकार त्यातून आमच्यासठी सुविधा निर्माण करण्याऐवजी (जसे चांगली नागरी सार्वजनिक दळण-वळण व्यवस्था) ते पैसे शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात वाया घालवते. ज्यातून मूळ समस्या कधीच सुटत नाही.
मित्रांनो यावर अधिक अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की सरकार शहरांत नागरी सुविधा पुरवण्यासाठी जसे की रस्ते, उड्डाणपूल, नवे रेल्वेमार्ग, सरकारी अनुदानावर चालणारी मोठाली महाविद्यालये व इतर अनेक गोष्टी (ज्या बांधा, वापरा व हस्तांतरित करा या धोरणात बसत नाहीत) जेवढे पैसे खर्च करते तेवढे नक्कीच ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांवर (जसे की सिंचन) खर्च करीत नाही.
जर खरंच तसे करत असते तर देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले नसते.
आपल्या प्रगतीमागील इतर काही घटक
- आज फार मोठे झालेल्या अनेक उद्योगांना ते बाल्यावस्थेत असताना सरकारने अनेक सवलती दिल्या. यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यासुद्धा आल्या.एक मोठी करसवलत २०१० मध्ये संपणार होती म्हणून ती अधिक १० वर्षाने वाढवून घेण्यास नॅसकॉमने जोरदार मागणी केली होती.
- तीन वर्षांपूर्वी जागतिक मंदीमुळे सरकारने उद्योग क्षेत्राला मोठे बेल आऊट दिले होतेच याचे विस्मरण होऊ देऊ नका.
- एकंदरीत असे म्हणायला हरकत नाही की आपल्या प्रगतीमागचे एक कारण म्हणजे इतर अनेकांनी केलेला त्याग व गमावलेल्या संधी.
शेतकरी व आपण एकाच मातेची मुले आहोत. अडचणीत असणाऱ्या आपल्या भावांसाठी थोडी कळ सोसून आपण कोणतेही मोठे काम करत नाही आहोत. कारण तसे करणे आपले कर्तव्यच आहे. कुणास ठाऊक उद्या आपणही असेच अडचणीत असू, तेव्हा मदत करायला आपला शेतकरी भाउ मजबूत असायला हवा ना.
मित्रांनो आपण जे अन्न धान्य खातो ते जरी आपण आपल्या पैशांतून विकत घेत असलो तरी ते पिकवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी अपार कष्ट घेतलेले असतात. प्रसंगी निसर्गाशी लढा दिलेला असतो. बरेचदा स्वतः अर्धपोटी राहून ते शेतात श्रम करीत असतात जेणेकरून आपल्यासारख्यांच्या पोटाला कमी पडू नये म्हणून.
आपल्या सारख्या विद्वान मंडळींना हात जोडून विनंती आहे की करमाफी, कृषी कर्जमाफी या विषयांवरून शेतकऱ्यांना हिणवू नका. अखेर आपणही संवेदनशील माणसे आहोत, आपल्या भावाचे कुटुंब अर्धपोटी राहत असताना आपल्याला सुखाची झोप लागणार नाही.
टिप: या लेखनामागील प्रेरणा जरी शेतकऱ्यांबद्दल 'आंतरजालावर होणारे नकारात्मक मतप्रदर्शन' असली तरी याचा उद्देश हे कुणाच्याही भावना दुखावणे नसून आपल्या देशापुढील या आव्हानात्मक समस्येच्या दुर्लक्षित पैलूंकडे आपले लक्ष वेधणे हा आहे. अर्थातच माझे या विषयातील मर्यादित ज्ञान पाहता वर वापरलेल्या माहितीच्या अचूकपणाबद्दल मी साशंक आहे. तरीही आपण उदारपणे त्या चुकांकडे दुर्लक्ष करावे व मुळ मुद्द्यावर लक्ष द्यावे अशी आपणांस नम्र विनंती.
प्रतिक्रिया
10 Jun 2012 - 3:47 am | भरत कुलकर्णी
'आंतरजालावर होणारे नकारात्मक मतप्रदर्शन' एवढे मनावर लावून घेवू नका.
शेतकर्यांच्या प्रश्नाबद्दल सहानुभुती आहेच. खरे पाहता खेड्यांवरच शहरे 'पोसली' जात असतात. शहरातील बहूतेक सेवा खेड्यांवर अवलंबून असतात. तरीही खेड्यांचा व्हावा तसा विकास होत नाही हे सत्य आहे.
आपल्याकडील राजकीय उदासीनता, जेथे पैसा येतो तेथला विकास करण्याची वृत्ती आदी असंख्य कारणे या मागे आहेत.
10 Jun 2012 - 3:56 am | कौतिक राव
त्याद्वारे तुमचे शल्य कमी होईल..
10 Jun 2012 - 11:40 pm | मोदक
मायक्रोफायनान्स संस्था खूप व्याजदर आकारतात असे वाटते.. नक्की माहिती नाही. :-(
मिपावर कोणी आहे का मायक्रोफायनान्स वाले..?
10 Jun 2012 - 7:48 am | अशोक पतिल
अतिशय मार्मिक लेख !
मिपा वर फार थोड्या प्रकाशीत अमुल्य लेखा पेकी एक लेख !
10 Jun 2012 - 9:23 am | नितिन थत्ते
आवडले.
सध्या ही पोच समजावी. प्रतिसाद येतील त्यानुसार भर घालेन.
11 Jun 2012 - 10:33 am | सहज
मांडणी आवडली.
नियोजनाला पर्याय नाही. सरकारला ग्रामीण, शहरी, खाजगी, सार्वजनिक सर्वच क्षेत्रांना अधून मधून मदत करण्याशिवाय पर्याय नाही. आणि यापुढे सर्वांनाच जादा कर देण्याशिवाय (कमी सबसिडी घेण्याशिवाय) पर्याय नाही. सध्या तरी हेच चित्र दिसते आहे. महागाईला तोंड देण्यासाठी खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे याशिवाय पर्याय नाही.
व हे सर्व असतानाच सर्वच गोष्टी पैशामधे न मोजता, एकमेकांना समजून घेउन मदत करण्याशिवाय (यात निदान दुसर्याचे डोके न खाणे हेही येते) दुसरा चांगला उपाय नाही.
10 Jun 2012 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा चांगली रंगवली आहे आणि तात्त्पर्याकडे घेऊन जाणारी आहे. शेतक-यांची कोणी टींगल केलेली मला आठवत नाही, आणि फार नकारात्मक कोणी बोलत नाही, नसते. आता वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येतात म्हणाल्यावर विचारात उन्नीस-बीस असणारच आहे. एक मिपाकर श्री गंगाधर मुट्यांनी तर शेतक-यांविषयी नेहमीच तळमळीने लिहिले आहे. कविता असो की काथ्याकूट. असो.
शेतीला मिळणार्या वेगवेगळ्या पॅकेजचे सोडून द्या. शेतकरी मिळालेल्या पैंशांचे आणि शेतीचे योग्य नियोजन करतो का ? इतकाच विषय घ्या. मोठ्या शेतकर्याचे जाऊ द्या. माझ्या जवळच्या गणगोतातलं एक उदाहरण देतो. माझ्या या नातेवाईकाला चार मुलं आहेत. कुटुंब मोठं आहे. सर्व मुलं-सुना अगदी मरोस्तर शेतीची कामं करतात. शेती पाच एकर आहे. वांगे, मिरच्या, वाडी (टरबूज/खिरे, काकड्या/खरबूज) करतो. उसाचे पीक घेतो. कैर्या, जांभळं, असं किडूक-मिडूकही उत्तम चाललेलं असतं. आले-गेलेल्यांसाठीचा खर्च सढळ हाताने. एकदम मजेत.
मी त्या पाहुण्याला म्हणतो, दहा वर्षापूर्वी तू बैलं जुंपून नांगरणी, वखरणी, आणि शेतीची काम करतो. तू पैसे शिल्लक टाकून शेती का वाढवत नाही, शेतीसाठी ट्रॅक्टर का घेत नाही. कमी खर्चात अधिक पैसे देणारे पीक का घेत नाही. त्याचं आपलं एक ठरलेलं उत्तर.आत्ता आपलं बरं चालू आहे ना. पुढचं पुढं पाहू. मला वाटतं त्याचं आज मर्यादित कुटुंब आहे, म्हणून जमतंय. कुटुंब वाढल्यावर भविष्याचं नियोजन नाही. शेतीचे नियोजन नाही.वर्षाला कमीत कमी लाखभर शिल्लक राहू शकतो. एक पगारदार म्हणून माझी इतकी शिल्लक राहू शकत नाही. आज मिळालं त्यात समाधान. हे मला आवडत नाही, आणि आपल्या सांगण्याला मर्यादा असतात. असो.
टू व्हीलर, डिश, मोबाईल तर त्यांची गरज झालेली आहे. आता पोरं म्हणे कॉम्पूटर घेणार आहेत. मोबाईलमधे गाणी भरायला आम्ही त्याचा तो विचार धुडकावून लावला. अशी ही साठोत्तराची कहाणी काय बोलायचं ?
-दिलीप बिरुटे
10 Jun 2012 - 11:51 pm | शिल्पा ब
प्रा.डॉं. शी सहमत आहे.
मी खेड्यात काही वर्ष राहीलेले आहे अन नंतर बराच काळ दरवर्षी भेट दिलेली आहे.
लोकं पुढचं नियोजन करत नाहीत. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते. त्यामुळे पाउस नाही. सरकार तर खेडं हा प्रकार अस्तित्वात नसल्यासारखंच सुधारणा करतं.
आलेल्या संधी घालवायची प्रचंड खोड आहे हे मी पाहीलेलं आहे.
जरा मानसिकता बदलली तर थोड्या फार प्रयत्नांनी सकारात्मक बदल नक्कीच होउ शकतो. पण हे व्हाट इफ प्रकारातलं झालं.
10 Jun 2012 - 2:36 pm | तर्री
अप्रतिम व मार्मिक.
10 Jun 2012 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर
मिपा व्यतिरिक्त माझा आंतर्जाला वर वावर कोठेही नाही.
हा:...हा:....! पुण्याच्या पाट्या आठवल्या. 'आमची कोठेही शाखा नाही.'
10 Jun 2012 - 4:27 pm | सुधीर
आजच्या लोकरंग मधला हा लेखही विचार करायला लावणारा आहे.
10 Jun 2012 - 6:59 pm | पैसा
रूपक कथा आवडली.
11 Jun 2012 - 6:41 am | सातबारा
धन्यवाद सुरेश आपलं, श्रीरंग जोशी,
- रमेश.
11 Jun 2012 - 12:17 pm | निश
श्रीरंग_जोशी साहेब, खरच डोळे उघडणारा लेख आहे.
11 Jun 2012 - 2:35 pm | गणेशा
श्रीरंग, मस्त समजावुन सांगितले आहे.
11 Jun 2012 - 3:12 pm | परिकथेतील राजकुमार
प्रायोजित एम बी ए ला कर्ज कशाला काढायला लागते ?
बाकी कथा वाचताना आशा काळे, रविंद्र महाजनी, रमेश भाटकर, मोहन गोखले, प्रिया तेंडूलकर इ . इ. उगाच डोळ्यासमोर तरळले.
12 Jun 2012 - 4:49 am | श्रीरंग_जोशी
प्रकाशनापूर्वी या लेखाचे अवलोकन करताना हा मुद्दा माझ्याही लक्षात आला होता की शैक्षणिक कर्ज व प्रायोजित एम बी ए हे काही जुळत नाही. परंतु अधिक विचार केल्यावर जाणवले की बिनपगारी व्यक्तीला शिक्षण घेताना पैशाची किती निकड असते (कंपनी केवळ मूळ शिक्षणशुल्क देणार). व काही बँका त्यांच्या शैक्षणिक कर्जात शिक्षणशुल्काखेरीज इतरही खर्चांचा समावेश करतात. तरीही २-४ शब्द जसे की पूरक खर्चांसाठी त्याने शैक्षणिक कर्ज घेतले असे लिहिले असते तर अधिक समर्पक वाटले असते.
बाकी वाढत्या वयात सह्याद्री वाहिनीवर (जेव्हा इतर लोक एम वाहिनी वगैरे बघत असत) जुने मराठी चित्रपट पाहिल्यामुळे ग्रामीण जीवनाबद्दल लिहिताना त्यांचा प्रभाव जाणवणारच ;-).
11 Jun 2012 - 3:30 pm | निनाद मुक्काम प...
राजकीय पुढारी त्यांच्या संघटना व त्यांना निधी पोहोचवणारे दलाल
आणि हे दलाल शेतकर्यांना नाडून पैका कमावणार
आणि म्हणूनच शेतकऱ्यांना संघटीत होऊ दिले जात नाही व त्यांच्या मालाला कवडीमोलाचा भाव मिळतो.
ह्यास मध्यमवर्ग जबाबदार नाही कारण तो सुद्धा एका वेगळ्या पातळीवर ह्याच पुढार्यांकडून नाडला जातो.
माझ्या मते टाटा सारख्या मोठ्या व अनेक लहान उद्योग समूहांना शेती व्यवसायात उतरू द्यावे. व शेतीत परदेशी गुंवणूक येवू द्यावी
आज चहाचे मळे जर हे उद्योग समूह हातात घेऊन भारतात सर्वांना चहा वाजवी किमंतीत
देऊ शकतात. तर ते इतर शेत्रात सुद्धा होऊ शकतो. हे समूह त्या श्रीमंत बागायतदार व शेतकऱ्यांपेक्षा नक्कीच चांगले असतील.
शेतीला निर्यातप्रधान बनवायचे असेल तर हाच एक मार्ग आहे.
आज आपण कोण एका शेतकर्याने नापीक जमिनीत संशोधन करून पिक घेतल्याचे वाचतो. आज अश्याच अनेक नापीक जमिनींवर नंदनवन फुलविण्याचे कार्य हे उद्योग समूह करू शकतील.
आणि जर ह्या समूहांवर जर आरोप होणार असेल की ते शेतकऱ्यांना लुबाडतील तर मी इतकेच म्हणेन की शेतकर्यांना लुबाडण्यासाठी आजकाल काहीच उरले नाही आहे.
त्यांच्या विदारक परिस्थितीने तळ गाठला असून आता तेथून फक्त त्यांची प्रगती होऊ शकते.
उद्योग समूहामुळे शहरीभागातील जीवनमान उंचावले. जगाला हेवा वाटेल असा मध्यमवर्ग निर्माण झाला ( ज्यासाठी अनेक परकीय कंपन्या आपल्या देशात येण्यास आतुर आहेत,) मग ह्याच मध्यमवर्गीय लाटेत शेतकरी वर्ग सामील झाल्यास काय हरकत आहे. आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या जमिनी उद्योग समूहांच्या हाती देणे हाच एकमेव मार्ग त्यांच्यापुढे आहे.
12 Jun 2012 - 4:37 am | श्रीरंग_जोशी
ज्या भावनांना आपल्यापर्यंत पोचवायचे होते त्याची पोचपावती या प्रतिसादांतून मिळालेली आहे.
दूरध्वनीवरून मिळालेला एक उल्लेखनीय प्रतिसाद - आपल्या देशात प्रत्यक्ष शेती न करणारे पण सरकारदफ्तरी शेतकरी म्हणून नोंद असणारे अनेक लोक सरकारी योजनांचा लाभ सामान्य शेतकऱ्यांपर्यंत न पोचू देता मधल्यामधे गिळंकृत करतात. अन आपल्यासारख्यांचा समज होतो की सरकारने शेतकऱ्यांना कितीही मोठे पॅकेज दिले तरी शेतकऱ्यांच्या समस्या कधी सुटत नाहीत.
12 Jun 2012 - 8:45 am | शिल्पा ब
हे जगजाहीर आहे हो! नविन माहीती नाही.
12 Jun 2012 - 8:42 am | स्पंदना
बरच खर बोलताय.
पण एक कृषक कन्या म्हणुन सांगते, बराच फरक झालाय २० वर्षापुर्वीच्या खेड्यात अन आताच्या खेड्यात. अर्थात अति तिथे माती म्ह्णण्तात तसा काहिसा प्रकार नव्या टेक्नॉलॉजीन झालाय. पण येइल त्यातही समतोल येइल अशी अपेक्षा बाळगुन आहे मी.