वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती. (इथे 'अपेक्षा उंचावली होती' असे म्हणालेले नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.) अगदी फुल्ल्टू धमाल नसेल पण निदान दोन अडीच तास जो काय चित्रपटाचा कालावधी असेल तो झकास जाईल ह्या कल्पनेने रेडीला हजेरी लावली.
सलमान, असीन, परेश रावल, पुनीत इस्सर, मनोज जोशी हे शिलेदार, महेश मांजरेकर, आर्य बब्बर, अनुराधा पटेल हे सैनिक आणि पाहुण्या भूमिकेत संजु बाबा, चंकी पांडे, आरबाज खान, अजय देवगण आणि झरीन खान अशी फौज असताना मस्त झणझणीत भेळेचा बकाणा भरायला मिळणार ह्या आशेने आम्ही स्थानापन्न झालो. खरंच सांगतो तुम्हाला चित्रपट सुरु झाल्यापासून १५ व्या मिनिटाला आम्ही 'चित्रपटालाच नाही तर पृथ्वीवरच का आलो ?' असा प्रश्न स्वतःला विचाराण्यायेवढे निराश आणि हताश झालो.
खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे. आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल. सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार, म्हणजे खरेतर १०/१२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी. पटकथा = कथाच नाही हो, पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे. आणि सलमान तर असह्यच होतो. देव आनंद.. अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःच्या चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर कॅमेरा सलमानवर केंद्रित आहे. (मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे.)
बरं आता तुम्हाला स्टोरी सांगायची म्हणली तर ती चार ओळीत देखील मावायची बोंबाबोंब. सलमान एक 'मासूम चेहरेवाला कमींना' असतो आणि त्याचा बाप महेश मांजरेकर हा करोडपती असतो आणि विनाकारण विनोद निर्मितीसाठी तो विसराळू देखील असतो. तो नक्की काय धंदा करत असतो हा भाग अलाहिदा. तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ. कुटुंबाचे एक गुरुजी देखील असतात, ज्यांच्या सल्ल्यानेच घरातली काडी इकडची तिकडे हालत असते. हे गुरुजी सलमान अर्थात प्रेम साठी पूजा नावाची एक कन्या निश्चित करतात आणि तीला एयरपोर्ट वरून आणायची जबाबदारी अर्थात प्रेमवर येते. मग साहेब मुद्दामून वेगळ्याच टर्मिनलवर जाऊन उभे राहतात आणि पूजा विषयी काकाशी गप्पा मारत बसतात. इकडे स्वतःचे लग्न मान्य नसल्याने पळून आलेली आणि माफिया कुटुंबाशी निगडित असलेली असीन अर्थात संजना ह्याचे बोलणे ऐकते आणि पूजा असल्याचा बनाव करून प्रेमच्या घरात आश्रय घेते.
मग सलमानचे असीन वर आणि असीनचे सलमानवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अॅज युज्वल सुरु होतात. मग अचानक सलमानला असीनच्या सच्चाईचा पत्ता वैग्रे लागतो आणि मग लवकरच दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार देखील होतो. मग हळूहळू संजनाच्या कुटुंबाची ओळख होते. तीचे दोन्ही मामा तिच्या २०० करोड रुपायाच्या फॅमिलीसाठी तीचे लग्न आपापल्या साल्यांबरोबर लावायच्या तयारीत असतात. हे दोन्ही मामा सख्खे भाऊ असूनही पक्के वैरी असतात बरे. पण अॅज युज्वल त्यांच्या बायका सोशिक, प्रेमळ आणि परिवाराला एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या वैग्रे असतात. ह्या दोन्ही मामांचा अकाउंटंट म्हणजे परेश रावल. ह्या परेश रावलचा भाचा कम असिस्टंट बनून सलमान ह्या परिवारात प्रवेश करतो आणि मग पुढे काय होते ते सांगायची आवश्यकता नाहीच...
सलमाननी चित्रपटभर अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे जो अॅज युज्वल जमलेला नाही. सौथ फायटींग पुरता तो एकदम झकास, पण चित्रपटात अॅक्शन देखील चवीपुरतीच आहे. मुळात चित्रपट अॅक्शन करावा, रोमॅंटीक करावा का विनोदी करावा हेच लक्षात न आल्याने दिग्दर्शकाची प्रचंड गोची झाल्याचे चित्रपटभर जाणवत राहते. शेवटी त्याने हे सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे हे सतत जाणवत राहते. ना धड विनोद जमलाय, ना धड रोमांस. अभिनयाचा शंख कसा वाजलाय ते सांगायलाच नको. असीनचे १/२ क्लोजअप घेऊन बाकीच्या चित्रपटभर तिच्या ऐवजी राखी सावंतला घेतले असते तरी खपून गेले असते येवढी असीन ह्यात दुर्लक्षित आहे. महेश मांजरेकरला प्रत्येक वाक्यात एक शब्द विसरायला लावून काय विनोद घडवायचा प्रयत्न केला आहे ते शेवटपर्यंत समजत नाही आणि हसवत त्याहून नाही. परेश रावल एखाद दोन प्रसंगात मस्त धमाल करून जातो पण इतर दगडांची साथ न मिळाल्याने शेवटी फिकाच पडतो. पुनीत इस्सरच्या भूमिकेला देखील पाहुणी भूमिका का म्हणू नये हा अजून एक प्रश्न. अनुराधा पटेलचे बर्याच दिवसानंतरचे रुपेरी दर्शन सुखावह हेच त्यातल्या त्यात एक नशीब.
सर्वात डोक्यात जातो तो सुदेश लेहरी. ह्या माणसाची भूमिका अक्षरशः विनाकारण आणि पाचकळपणासाठी घुसडलेली आहे हे स्पष्ट जाणवते. कॉमेडी सर्कस गाजवलेला हा कलाकार इथे अक्षरशः फुकट गेला आहे. अभिनयातला तोचतोचपणा आणि मूर्खासारख्या चेहर्याने केलेला वावर अतिशय भिकार. जॉनी लिव्हरची जागा घ्यायला त्याला अजून काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत हे मात्र निश्चित.
चित्रपटाला विनोदी म्हणता येईल असा एकही प्रसंग चित्रपटात नाही. तसा रोमँटिक प्रसंग देखील नाहीचे म्हणा. पात्राचे विचित्र हावभाव, एकमेकांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणे, माफिया म्हणवले जाणारे आणि जोकर्स सारखे वावरणारे, बोलणारे गुंड आणि पाण्यात पडल्यावर 'मेरा वो गीला हो गया...' ह्या सारख्या संवादांना जर विनोदी म्हणले जात असेल तर मात्र आमचा साष्टांग नमस्कार आहे. अजय देवगण, संजुबाबा, झरीन सारख्या पाहुण्या कलाकारांना तर चित्रपटाच्या पहिल्या ५ मिनिटातच टाटा बाय बाय करण्यात आलेले आहे.
'ढिंक चिका..' हे एकमेव गाणे जे सतत ऐकून ऐकून कान किटलेत, ते सोडले तर एकही गाणे लक्षात राहतं नाही. प्रितम आणि देवी श्री प्रसाद ह्या दोन दिग्गजांनी दिलेले संगीत सतत ह्या आधी कुठेतरी ऐकले असल्याचे मात्र सतत जाणवत राहते. अनिस बझ्मी ह्याचेच ह्या चित्रपटाला डायरेक्शन आहे हे काय मनाला पटत नाही बॉ ! साफ फसला आहे हा माणूस.
एकूण काय तर अपेक्षा ठेवून अथवा न ठेवून देखील रेडी मनोरंजन करण्यात साफ अपयशी ठरतो.
प्रतिक्रिया
21 Jun 2011 - 3:00 pm | प्रचेतस
अगदी योग्य परी़क्षण केलेस रे परा. सिनेमा पाहून हेच विचार मनात आले होते. शिवाय कधी नव्हे तो मल्टीप्लेक्सला जाउन इतका भिकार सिनेमा पाहून आणि पैसे फुकट जाउन मनस्ताप पदरी आला.
21 Jun 2011 - 3:04 pm | इरसाल
धन्यवाद.
सुटलो अशीपण सलमानची अक्टिंग म्हणजे............ह्या ह्या ह्या ....
रुपये पैसे वाचले.
21 Jun 2011 - 3:13 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!! कशाला करतोस असले फालतू धंदे? पस्तावलास ना? तुला वॉर्निंग मिळाली होती. ;)
21 Jun 2011 - 3:18 pm | चिरोटा
छान परिक्षण. जेवताना टी.व्ही.वर कधी लागला तर पाहू.
21 Jun 2011 - 4:39 pm | अमोल केळकर
सहमत , लागेलच १-२ महिन्यात लागेल तो टीव्हीवर . दिवाळी पर्यंत तर नक्की
अमोल
21 Jun 2011 - 3:22 pm | यकु
>>>तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ.
=)) =))
=)) =))
=))
21 Jun 2011 - 3:24 pm | गणपा
वाचले म्हणायचे पैसे. :)
एकाने चांगला आहे चित्रपट जा पहायला असा सल्ला दिला होता.. पण सलमानच्या कर्तुत्वावर इतका जबरदस्त विश्वास होता की त्या ऐवजी 'स्टॅनली का डब्बा' पहाणे पसंत केले.
21 Jun 2011 - 3:25 pm | स्वैर परी
थोर भाग्य आमचे कि आम्ही नाही पाहिला. यापेक्षा 'शैतान', 'भिन्डी बाजार' का बघु नये? :)
21 Jun 2011 - 3:45 pm | मृत्युन्जय
चला एक भिक्कार चित्रपट थेटरात जाउन पाहण्याचे कष्ट वाचले म्हणायचे.
21 Jun 2011 - 4:09 pm | गणेशा
बरे झाले यावेळेस पाहण्याचा विचार होता.. आता रद्द.
२०१४ राज का रन कसा आहे... ? दोन्ही पैकी एक पाहणार होतो..
बहुतेक हा पन चांगला नसेल असेच वाटायला लागले आहे आता ..
कोणी सांगेन का ?
21 Jun 2011 - 4:34 pm | किसन शिंदे
२०१४ राज का रन कसा आहे... ?
शीssssईईई!!!!
नको पाहुस तो चित्रपट.
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय या सर्वच बाबतीत अगदी टुकार आहे तो चित्रपट.
त्यापेक्षा रेडी डॉउनलोड कर आणी घरीच बसुन बघ.
21 Jun 2011 - 4:14 pm | रेवती
अग्गाग्गायाया....
अरे बाबा, मागच्या अठवड्यात का नाही ल्हिलेस परिक्षण?
गेले १० दिवस डिव्हीडी पडून आहे पण पहायला वेळ घावला नव्हता.
आता तर धाडसच होणार नाही.
वाईट्ट!
21 Jun 2011 - 4:15 pm | माझीही शॅम्पेन
छान परीक्षण आहे ! रेडी बघण्याचे पैसे वाचले !
पण का कोण जाणे पुढच एक जून वाक्य आठवल :)
पराच्या लेखांना इथे चांगले म्हणायची पद्धत आहे !
(कृ ह घ्या )
21 Jun 2011 - 4:24 pm | इरसाल
उगाच : जून कि जुनं ?
21 Jun 2011 - 4:30 pm | सहज
संगणक प्रशिक्षण,,,
.. जालावरच्या गमती जमती / ज्ञान-
विज्ञानाची भां..
डारे उघडी करणे व हे असे परि
क्षण वरिक्षण ,..इतके सगळे कसे मस्त जम
ते हो तुम्हाला परासर जी??
21 Jun 2011 - 4:46 pm | गवि
धन्यवाद.. पण आमचे नुकसान आगोदरच झाले आहे.. :(
पाहताना हेच विचार जागोजागी येत होते.
21 Jun 2011 - 5:05 pm | सूड
तर परा'सरां'नीच !!
21 Jun 2011 - 5:10 pm | छोटा डॉन
परिक्षण अजिबात नाही आवडले.
सलमानच्या कुठल्याच गोष्टीवर टिका करणारी कुठलीच गोष्ट आम्हाला आवडत नाही.
मात्र जाता जाता राजकुमारांनी पिक्चर पाहण्याच्या हेतुबद्दल जरा 'आत्मपरिक्षण'करुन मग पिक्चरबद्दल आपले प्रामाणिक मत द्यावे असे सुचवतो, व्यनी केला तरीही हरकत नाही.
- (सल्मानचा फॅन) छोटा डॉन
21 Jun 2011 - 7:12 pm | आनंदयात्री
ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे एवढे नमूद करु इच्छितो. माननीय श्री सलमान खान मुंबईतल्या दंग्याधोप्याबद्दल कितीही वादग्रस्त असले तरी ते एक कलाकार आतेत याची जाण आपण ठेवली पाहिजे, परा यांच्या सामान्य बुद्धीला त्यांच्या अभिनयातले बारकावे कळले नाही यात अनपेक्षित ते काय ?
21 Jun 2011 - 5:25 pm | स्वाती दिनेश
मस्त लिहिले आहेस,परा..
भिक्कार चित्रपटांमुळे अशी मस्त परीक्षणे वाचायला मिळतात हा एक फायदा ह्या सल्लूपटाचा आहे असे समजता येईल.
स्वाती
21 Jun 2011 - 5:57 pm | मीली
फालतू पिक्चर आहे अगदी ! घरचाच म्हणून काहीही संवाद ,काहीही विनोद !
असीन चा मेकप तर हाय राम ! तिला कुरूप दिसावण्यात तिचा मेकप करणारा यशस्वी ठरला आहे.अनुराधा पटेल तर सल्लू ची आई बिलकुल दिसत नाही ..
२ गाणी बरी आहेत म्हणून पाहायला गेलो तर डोकेदुखी पदरी आली ...घरी पहिला असता पिक्चर तर निदान त्यातून तरी सुटका झाली असती !
मागे एकदा फालतू नावाचा सिनेमा आला होता तेच नाव दिले असते तरी चालले असते !
तरी बॉक्स ऑफिस वर भरपूर पैसा कमवला !
21 Jun 2011 - 8:17 pm | तिमा
धन्य ते हल्लीचे चित्रपट काढणारे आणि धन्य ते बघणारे!!!
21 Jun 2011 - 8:38 pm | ऋषिकेश
तसही थेटरात बघणार नव्हतोच.. आता घरीही बघणार नाही.
बरं झालं त्रास, ताप वगैरे वाचला
धन्यु! :)
21 Jun 2011 - 8:42 pm | चतुरंग
मुळात तू 'खानावळी'तल्या एका तद्दन मेंबराचा चितपट, तो ही थेटरात जाऊन, पाहण्याचे धाडस केलेस त्याबद्दलच कौतुकास पात्र आहेस! बाकी फसणे वगैरे काय अनपेक्षित म्हणता येणार नाही! ;)
-रेडीकथेतील रेडाकुमार
21 Jun 2011 - 8:48 pm | नगरीनिरंजन
रेडीची रेवडी अपेक्षितच होती. चित्रपट टीव्हीवर असेल आणि तेव्हा करण्यासारखं दुसरं काही सुचत नसेल आणि झोपही येत नसेल तर पाहीन म्हणतो. बाकी परिक्षण नेहमीप्रमाणेच उत्तम. थोडी अजून रेवडी उडवली असती तरी चालली असती.
21 Jun 2011 - 9:04 pm | अप्पा जोगळेकर
वॉन्टेड सारख्या दर्जेदार आणि दबंग सारख्या मसालेदार चित्रपटांनंतर रेडी सारखा चित्रपट करुन सलमान खान स्वतःच्या लायकीवर उतरला असे म्हणू शकतो.
सलमान खानचे चित्रपटातले पहिलेच वाक्य 'तस्वीर मे जो नर हैं वो मेरे पिता हैं और जो मादा हैं वो मेरी माता हैं' चित्रपटाची पातळी काय आहे याचा अंदाज देऊन जाते.
असल्या फालतू चित्रपटाचे परीक्षण लिहिण्याची अजिबात गरज नव्हती असे सांगावेसे वाटते.
21 Jun 2011 - 9:04 pm | रामदास
अनुराधा पटेलला -
राजकुमार ही ती मन क्यु क्यु बहेका बहेका रे आधी रात को वालीच आहे ना की दुसरी कोणी ?
22 Jun 2011 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
@ रामदास काका :- हो तीच आहे.
@ जोगळेकर :-
चालायचेच हो. आता बघा ना, काही पुरुष सदस्यांना भोवतालच्या स्त्री सदस्यांना फसवुन त्यांच्याशी गुलुगुलु बोलण्यासाठी गुगल वरती मुलीच्या नावानी सदस्यत्व घ्यायचा फालतुपणा करायची देखील गरज नसते :) पण ते घेतातच की. नाही का ?
23 Jun 2011 - 11:05 pm | अप्पा जोगळेकर
काही पुरुष सदस्यांना भोवतालच्या स्त्री सदस्यांना फसवुन त्यांच्याशी गुलुगुलु बोलण्यासाठी गुगल वरती मुलीच्या नावानी सदस्यत्व घ्यायचा फालतुपणा करायची देखील गरज नसते
सदस्यांची चमडी वृत्ती या थराला पोहोचली आहे म्हणजे कमालच झाली. हा प्रकार खरडवह्या, व्यनि आणि फोनपर्यंतच मर्यादित होता असे समजून आणि ऐकून होतो.
21 Jun 2011 - 9:52 pm | आत्मशून्य
पैसे वाचलेबाबा......
21 Jun 2011 - 10:18 pm | अनामिक
चित्रपट फालतू आहे यात वाद नाही.
मुळच्या तेलगु 'रेडी'ची कॉपी आहे. तेलगु म्हंटल्यावर अतिरंजीत फॅमेली ड्रामा पहायला मिळतो. मी तेलगु रेडी पाह्यलाय, तो ह्या हिंदी रेडीपेक्षा कैक पटीने बराय. शिवाय त्यातले कॉमेडी प्रसंग ओढून्-ताणून बसवल्यासारखे वाटत नाहीत. सुदेश लेहेरीच्या जागी जो़ कुणी तेलगु रेडीमधे आहे त्याने मला तेलगु समजत नसूनही नुसत्या अभिनयाने हसवलंय.
22 Jun 2011 - 2:59 pm | मालोजीराव
च्यायला तरीपण हा चित्रपट ऑल टाइम हिट झाला राव....१०८ कोटींचा गल्ला जमवला.....म्हणजे उत्सुकतेपोटीच इतक्या जणांनी चित्रपट पाहिला कि हिट झाला ;)
22 Jun 2011 - 7:38 pm | पप्पु अंकल
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका रे ए ए
22 Jun 2011 - 8:32 pm | इंटरनेटस्नेही
मस्त१ परा रॉक्स अॅज युझ्युअल!
22 Jun 2011 - 10:18 pm | ajay wankhede
मी तर दबन्ग पण नाहि पाहिला
थियेटरात.
अजय
23 Jun 2011 - 12:00 pm | दिपक
दोन गाणी सोडली तर काही नाही चित्रपटात.
23 Jun 2011 - 1:21 pm | नितिन थत्ते
अनुराधा पटेल (सलमानची आये) हीच काय ती चित्रपटातली प्रेक्षणीय गोष्ट आहे.
23 Jun 2011 - 8:58 pm | रेवती
काल एका तासात सगळा सिनेमा उरकला. याहीपेक्षा लवकर संपवला असता पण चित्रपट थांबवून शांतपणे जेवण, इतर कामे उरकून पुन्हा बघितला. शिवाय मुलाने मध्येच येऊन स्विमिंग पूलात सगळेजण एकमेकांना ढकलात तेंव्हाचा प्रसंग आणि लहान मुले 'शू' करतात असे दोन प्रसंग पुन्हा पाहिल्यामुळे त्यात वेळ गेला.;) त्याला त्यातच गंमत वाटली.;)
गाणी पळवली. इतके बिनडोक प्रसंग कोणत्या क्रमाने लावले तर लोक फसतील हा अंदाज करून त्याबरहुकूम शिनेमा बनवलाय. हे असले प्रकारही चालून जातात..........
असीन मला तरी अतिषय थकलेली वाटली. तशीच ती ऐश्वर्या रायही आजकालच्या शिनेमात बटबटीत वाटते (हे वाक्य अवांतर आहे.). मेक अप तर काहीतरीच. सहज अभिनयापेक्षा जास्त काहितरी अपेक्षा केल्यामुळे आजकाल या अभिनेत्र्या भावनिक दृष्ट्या गळून गेल्यासारख्या वाटतात.
23 Jun 2011 - 9:24 pm | इंटरनेटस्नेही
असीन मला तरी अतिषय थकलेली वाटली.
असीन ही मुळातच अॅक्र्टेस वाटत नाही.. (आमच्या) मुंबईतील कोणत्याही 'अ' दर्जाप्राप्त महाविद्यालयात याच्यापे़क्षा कितीतरी सुंदर सुंदर मुली असतात.
24 Jun 2011 - 10:11 am | प्यारे१
'ज्येष्ठ' आणि 'अणुभवी' समीक्षक इन्टरनेटस्नेही यांनी व्यक्त केलेले मत वाचून ड्वाळे पाणावले. आपली अभ्यासू मते अशीच प्रकट करीत रहा.
चित्रपटाविषयी: रेडी चित्रपट पाहिला नाही. दीड महिन्याच्या आत चित्रपट घरबसल्या पाहायला मिळत असल्यास थेटरात जाऊन कशाला पहा?
एका बैठकीत पाहता आला नाही तरी रतीब सुरु असतोच. 'वॉन्टेड' स्टार गोल्ड वर कुठल्याही रविवारी दिवसात एकदा तरी असतोच की....! ;)
बाकी पराच्या लिखाणाबद्द्ल आम्ही पामरांनी काय बोलावे? ;)
24 Jun 2011 - 5:01 pm | इंटरनेटस्नेही
हा हा हा.. धन्यवाद..!
-
(ज्येष्ठ आणि अनुभवी) इन्टरनेटस्नेही.
24 Jun 2011 - 6:53 am | आत्मशून्य
तसं न्हाय व ते. ती मस्त आहेच पण किंचीत सावळी आहे इतकच. आणी हे हींदी चीत्रपट्वाले दाक्षीणात्य टॉप हीरोइन ना का काय माहीत पण अशा प्रकारे पडद्यावर भंकस प्रेझेंट करतात ना उदा. श्रीया, त्रीशा यांचे कोणतेही हीदी चीत्रपट बघा कसल्या बकवास आणी आउट ऑफ फॉर्म व स्पार्कलेस वाटतात, तर तेच त्यांचे तीकडचे चीत्रपट बघा त्यातील अभीनयही बघा व सौदर्यही अन मग नाय वय कमी झालं नाव ठेवा कूनालाबी.....
बाकी रेडी पाहण्याच धाडस नसल्याने आसीन कशी दीसली माहीत नाही, तसही सलमान आहे म्हणजे त्याची मैत्रीण झरीनला जास्त चांगल दाखवल असणार यात शंकाच नाही. आसीन सध्याच्या फॅटलेस बॉडी मेंटेन करून प्लास्टीक अभीनय करणार्या (दिपीका, सोनम ...) नट्यांपेक्शा नक्कीच जास्त नैसर्गीक अभीनय करते असं प्राजळ मत आहे.
अवांतर :- अनूश्का ही छान पण तीच्या एक्स्प्रेशनमधे प्रमाणाबाहेर स्टीफनेस जाणवतो त्यामूळे ती थोंडी कृत्रीम व अंगावर आल्यासारखी वाटते, पण सूधरेल हळू हळू :)
23 Jun 2011 - 9:55 pm | पैसा
हा सिनेमा बघितल्याबद्दल पराला काय शिक्षा द्यावी ?
23 Jun 2011 - 10:05 pm | आनंदयात्री
त्याचा आयडी बदलुन 'परायक पाचलग' असा करावा.
24 Jun 2011 - 2:13 pm | मृत्युन्जय
त्याल १० वेळा देशद्रोही बघण्याची शिक्षा द्यावी आणि त्यानंतर त्याला त्यावर चांगले परीक्षण लिहायला लावावे. ;)
24 Jun 2011 - 2:19 pm | माझीही शॅम्पेन
परातशत्रू चालेल का ?
ह. घ्या !
24 Jun 2011 - 2:34 pm | मृत्युन्जय
गुन्ह्याच्या मानाने शिक्षा जास्तच कडक आहे हो. त्याने रेडी फक्त बघितल्याय, दिग्दर्शित नाही केलेला. ;)