काहूनची लढाई....मराठ्यांनी लढलेली ...भाग -४............ शेवटचा

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Jun 2011 - 3:57 pm

काहून भाग-१
काहून भाग-२
काहून भाग-३

.................बलुची टोळ्यांनी किल्ल्यातील सैनिकांचा समाचार नंतर घ्यायचा ठरवला होता कारण त्यांना माहीत होते की एक ना एक दिवस मराठ्यांना बाहेर यावे लागणार...............

किल्ल्यातील सामग्री संपल्यावर त्यांना दुसरा तरणोपाय नव्हता. या कल्पनेने ते अजून किल्ल्यावर हल्ला करत नव्हते. त्यांच्या दृष्टीने ही योजना बरोबरच होती. त्यामुळे कधी छोटा हल्ला तर कधी नुसती हूल, कधी रात्री गोळीबार तर कधी एकदम शांतता असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण या सगळ्याला मराठे तोंड देत होते आणि ते करताना त्यांच्या मनाला पराभव शिवतही नव्हता कारण त्यांच्याकडे अजून थोडा तांदूळ आणि काही बैल शिल्लक होते.

१० तारखेला शेर बेग नावाच्या व्यापार्‍याने किल्ल्याला भेट दिली आणि सगळी बातमी खरी आहे हे सांगितले. या हल्ल्यात संपूर्ण तुकडी आणि तीन अधिकारी गारद झाले होते. मुरींची ८० ते १०० माणसे ठार झाली होती आणि त्यात किल्ल्याचा शेजारी हैबत खान आणि त्याचा मुलगा व करीम खान हे मारले गेले असेही सांगण्यात आले. अर्थात या माणसावर कितपत विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच होता. त्याने अधिक चौकशा आरंभल्यावर कॅ. ब्राऊनने त्याला तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला.

१२ तारखेला एक आनंदी दृष्य मराठ्यांना दिसले. ते म्हणजे मुरींनी त्या तोफा सुट्या केल्या होत्या आणि ते त्या जागेवरून हलवत होते. नशिबाने बलुची टोळ्यांना त्या तोफा कशा वापरायच्या हे माहीत नसल्यामुळे मराठ्यांना त्याची काळजी करावी लागली नाही. पहाटे १ वाजता मुरींच्या तळावर बरीच गडबड चालू झाली आणि दुपारपर्यंत एकही मुरी त्या तळावर राहिला नाही. सगळा तळ उठवून ते गायब झाले होते. मराठ्यांना त्यामुळे जरा शारीरिक आणि मानसिक शांती मिळाली.

१४ तारखेला शेरबेगला एक पत्र घेऊन मेजर क्लिबॉर्नकडे पाठवण्यात आले.

१७ तारखेला त्या पत्राचे उत्तर आले त्यात ब्रिगेड मेजरने क्लिबॉर्नच्या सैन्याच्या वाताहतीबद्दल सर्व सविस्तर लिहिले होते.
त्यात मुख्य म्हणजे असेही लिहिले होते की आता कॅ. ब्राऊन यांनी आता सुखूरहून कुठल्याही मदतीची अपेक्षा करू नये. योग्य वेळी योग्य वाटेल तो निर्णय घेण्याचा अधिकारही कॅ. ब्राऊन याला देण्यात आला होता. ह्या पत्राचा अर्थ स्पष्ट होता. कॅ. ब्राऊनने आता स्वत:च्या जबाबदारीवर या वेढ्यातून सुटका करून घ्यावी.
काय करावे हे कॅ. ब्राऊनला कळेना. रात्री आजारी सैनिकांना घेऊन रपेट मारून खाली पोहोचणे त्याला अवघड वाटत होते. तसेच जर शरण गेलो तर बलुची सन्मानाने त्यांची पाठवणी करतील याची त्याला खात्री नव्हती. कॅ. ब्राऊनने दुसरा मार्गाची चाचपणी करायची ठरवली. पण त्यासाठी पहिल्यांदा मूरींना असे वाटायला पहिजे होते की मराठे असेतोपर्यंत हा किल्ला जिंकणे अशक्य आहे. त्यासाठी किल्ला अजून लढवावा लागणार होता. हिशेब केल्यावर १० ऑक्टोबर पर्यंत हा किल्ला लढवू शकू असा विश्वास मराठ्यांनी त्याला दिला. पण त्या साठी शिधेचा अजून त्याग करावा लागणार होता. सगळ्यांनी तयारी दर्शवल्यावर मिळणारा शिधा अजून निम्म्याने कमी करण्यात आला.

सगळ्यांचे एकागोष्टींवर एकमत झाले ते म्हणजे शरणागतीच्या अटी या सन्मानीय असल्याच पाहिजेत त्यासाठी काय पाहिजे ते करण्यात येईल. समजा असे झाले नाही तर लढता लढता खाली सपाट प्रदेशात कसे जायचे व माघारीच्या योजनाही ठरवण्यात आल्या. हे सगळे ब्रिगेड मेजरला कळवण्यात आले.

२३ तारखेला शेरबेग, ज्याच्याबरोबर पत्र पाठवण्यात आले होते तो परत आला. पण तो त्या पत्राबद्दल काहीच बोलला नाही. परंतु त्याने एक महत्वाचा निरोप आणला होता. तो होता मूरीं जमातीच्या प्रमुखाचा-डोडाखान याचा. त्याने असा निरोप पाठवला होता की मराठ्यांनी किल्ला सोडण्यासाठी तो तहाच्या कुठल्याही अटी मान्य करायला तयार आहे. त्याने असेही पुढे सांगितले की त्याने दोनदा त्याचा वकील पाठवायचा प्रयत्न केला पण त्यांना बंदूकीने प्रत्युत्तर देऊन पळवून लावण्यात आले. ते ऐकून कॅ. ब्राऊनला हसू फुटले. पण कॅ. ब्राऊनला ही एक चांगली संधी वाटली. कारण डोडाखान या सरदारानेच किल्ल्यावर पहिला हल्ला केला होता आणि गेल्या चार महिन्यात आत काय झाले असेल याची त्याला पूर्ण कल्पना होती. असे असताना सुध्दा तो या तहाची मागणी करतोय म्हणजे त्यासाठी निश्चितच दुसरे काहीतरी महत्वाचे कारण असणार. कदाचित त्याच्या टोळीलाच काहूनचा ताबा पाहिजे असेल. असेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही की १७६१ला झालेल्या पानिपतच्या युध्दाच्या कथा अजूनही त्या भागात ताज्या असाव्यात आणि मराठे ही काय चीज आहे हे त्यांना एकून पण चांगले माहीत असावे. पण कॅ. ब्राऊनच्या दृष्टीने आता त्याच्या सैनिकांची सुरक्षिता, मानसन्मान महत्वाचा होता. त्याने ही संधी सोडायची नाही असे ठरवले. त्याने त्याला शेरबेग बरोबर तहाच्या अटी पाठवल्या –

डोडाखान मुरी,

मी काहूनचा ताबा आपल्याला द्यायला तयार आहे पण खालील अटींवर.
१ मी व माझ्या सैनिकांना सुरक्षितपणे व मानाने खाली सपाट प्रदेशात जाण्याची परवानगी. या दरम्यान आमच्या संरक्षणाची जबाबदारी आपली राहील, हे मान्य नसल्यास आम्ही काहूनमधे अजून चार महिने सहज काढू शकतो.

कॅ. ब्राऊन.

बस ! या पत्रात फक्त ही एकच अट होती.
हे पत्र मिळाल्यावर सगळे टोळीप्रमुख एकत्र जमले आणि सर्वांनी पवित्र कुराणावर हात ठेऊन शपत घेतली की जर तीन दिवसाच्या आत मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा सोडला तर ते सगळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतील. हा तह मान्य केल्यावर त्यांनी असेही म्हटले की किल्ला सोडल्यावर त्यांची प्रत्येक इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असेल. :-)

२५ तारखेला कॅ. ब्राऊनने डोडाखानला होकार कळवला. दोन तासाने डोडाखानचा माणूस त्याचे पत्र घेऊन आला त्यात तहाच्या अटी मान्य करण्यात आल्याचे व त्या बैठकीत काय ठरले याचा वृत्तांतही लिहिला होता. डोडाखानाने त्याच्या पुतण्याला कॅ. ब्राऊनची भेट घेण्यासाठी पाठवायचेही त्याच पत्रात कबूल केले होते. संध्याकाळी जमालखान किल्ल्याच्या जवळ आला. त्याने आत निरोप पाठवला की तो आत यायला घाबरत आहे पण जर कॅ. ब्राऊन सैन्य बरोबर न घेता बाहेर आला तर तहावर शिक्कामोर्तब करता येईल. त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही यावर बरीच चर्चा झाली या प्रकारातून एवढी सहज सुटका होईल असे मराठ्यांना वाटले नव्हते. यात मुरींचा काही डाव तर नाही ना या शंकेने प्रत्येकाला घेरले होते.

शेवटी कॅ. ब्राऊन, तोफखान्याचा अधिकारी ले. अर्स्काईन व चार मराठा सुभेदार त्याची भेट घ्यायला किल्ल्याबाहेर एक मैलभर दूर गेले. कॅ. ब्राऊनने त्या भेटीचे मस्त वर्णन केले आहे.
तो म्हणतो “ एवढा घाबरलेला माणूस मी केव्हाही पाहिलेला नव्हता. त्याच्याकडे ३० शस्त्रसज्ज घोडेस्वार होते आणि आम्ही फक्त सहाजण. आमच्याकडे येताना तो दोनदा परत फिरला आणि शेवटी धीर धरून आमच्याकडे आला. त्याला वाटत होते की आम्ही आमची माणसे कुठेतरी दडवून ठेवली असणार. आमचे बोलणे चालू असतानासुध्दा त्याने घोड्याचा लगाम धरून ठेवला होता. काही दगाफटका झाला तर पळून जाण्यासाठी. आम्ही सर्वजण मग जमिनीवर गोल करून बसलो. माझ्या मनात ते दृष्य अजून ताजे आहे. थोड्याच अंतरावर त्याचे तगडे, बंदूका धारण केलेले सैनिक तगड्या घोड्यावर होते आणि आम्ही हाडाचे सापळे बरे असे त्यांच्या समोर ताठ मानेने बसलो होतो”.

बोलणी सुरू झाल्यावर जमालखान फारच धोरणीपणाने बोलत होता. त्याने जे काही झाले त्याबद्दल माफी मागितली मग कॅ. ब्राऊननेही झालेल्या हानीबद्दल त्याची माफी मागितली. तो म्हणाला “इग्रजांच्या विरूध्द लढण्याचे आम्हाला काहीही कारण नव्हते पण नफूसच्या खिंडित आमच्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी लढावेच लागले. आमचा नाईलाज झाला. आम्ही सर्व ब्रिटीश सैनिकांना सोडून दिलेले आहे आणि आता आपल्यात शांतता नांदेल अशी मी आशा करतो. आपण किल्ला सोडून जायच्या वेळी मी स्वत: किल्ल्याच्या जवळपास राहीन आणि खाली जाताना मी माझी विश्वासू माणसे तुमच्या बरोबर देईन”

कॅ. ब्राऊननेही त्याच्यावर विश्वास टाकण्याचे मान्य केले आणि ती बैठक संपली. मराठ्यांचा त्यांच्या डोळ्यावर अजून विश्वास बसत नव्हता की हे बलुची इतके सुसंस्कृत वागतील आणि हा प्रश्न एवढ्या लवकर सुटेल. शेवटी पाच महिने मराठ्यांनी त्यांना झुंजवले होते. पण त्या एका तासात ते सगळे एकामेकांचे चांगले मित्र झाले. खरेतर त्यांना ही ब्याद गेल्याचे समाधान होते तर यांना मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याचा आनंद होता त्यामुळे दोस्ती व्हायला वेळ लागला नाही.

२६ तारखेला किल्ला सोडण्याची तयारी सुरू झाली. १० उंट शिल्लक होते पण त्यांची अवस्था अशी होती की त्यांनाच उचलून न्यावे लागते की काय. आजारी माणसासांची संख्या होती ४०. यांच्यासाठीच २० उंट लागणार होते. मग उरलेले सामान, दारूगोळा, तोफा, बंदुका हे सगळे शिल्लक होतेच. परत जातानाचा प्रवास मोठा होता त्यामुळे त्यासाठी लागणारे पाणीही बरोबर न्यायला लागणार होते. हे सगळे न्यायचे म्हणजे सगळ्यांना आपल्या खाजगी सामानावर पाणी सोडावे लागणार होते. त्याला सगळ्यांनी आनंदाने मान्यता दिली. बंदुका आणि तोफा मात्र बरोबर नेण्याबाबत सर्वांचे एकमत झाले कारण शत्रुवत्‌ बुगताईजमातींच्या हद्दीतून त्यांना जवळजवळ ४० मैल अंतर कापायचे होते. तोफ ओढायला उरलेल्या मरतुकड्या बैलांचा उपयोग नव्हता म्हणून शेवटी ती तेथेच निकामी करून टाकायची असे ठरत असताना मराठा सैनिकांनी ते स्वत: ती तोफ ओढतील असे सांगून ती खाली न्यायचा हट्ट धरला. जसे पायदळातील सैन्याला आपला झेंडा प्राणाहून प्रिय असतो त्याच प्रमाणे तोफखान्याच्या सैनिकांना तोफ ही प्राणाहून प्रिय असते आणि ती शत्रूच्या हातात पडणे हा ते स्वत:चा अपमान समजतात. त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या ३० जवानांनी ही कामगिरी अंगावर घेतली आणि पार पाडली. काही अनावश्यक वस्तूंना आग लावली असताना बलूचींनी पाहिली आणि ते पळत आले. त्यांनी किल्ल्याला आग न लावायची विनंती केली. हे सगळे अजब होते. कदाचित मराठ्यांच्या पराक्रमाचा हा परिणाम असावा. का मागे म्हटल्याप्रमाणे पानिपतच्या युध्दामुळे मराठ्यांची कीर्ती त्या भागातही पसरली होती ? तीही शक्यता नाकारता येत नाही.

२८ तारखेला पहाटे २ वाजता कॅ. ब्राऊन आणि त्याच्या शूर मराठ्यांनी काहूनच्या किल्ल्याला शेवटचा सलाम केला आणि त्यांनी खाली उतरायला सुरूवात केली. उतरतानाही त्यांना खूप त्रास झाला. विशेषत: जखमी सैनिकांना. अशा सैनिकांना उंटांना बांधून घातले होते. त्यातला एक सैनिक तर उंटावरच मृत्यूमूखी पडला. परत पाण्याचा तुटवडा भासत होताच. तोफ चढवताना, उतरवताना ३००/४०० बलुची सतत टेकाडावरुन पहाणी करत होते. तहानेने व्याकुळ झालेल्या सैनिकांना ते चिडवत व ती तोफ तेथेच सोडून जायला सांगत. पण मराठ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. कॅ. ब्राऊनने पाणवठा दाखवण्यासाठी त्यांना बक्षीस जाहीर केले पण कोणीही तयार झाले नाही. शेवटी एका मुलाने १०० रुपये घेऊन एक पाणवठा दाखवला.त्यात सगळ्यांच्या वाट्याला एक ओंजळभर पाणी आले असेल. एक चढ चढून वर पोहोचले तर त्यांची वाट अनेक मूरींनी अडवली होती. ते म्हणे हैबतखानाच्या टोळीचे होते. त्यांनी वाट सोडायला नकार दिला आणि त्या जनावरांच्या कळपासाठी पैसे मागितले. अर्थातच त्याला नकार देण्यात आला. तोफेकडे बघून त्यांनीही शेवटी माघार घेतली आणि हैबत खानच्या कुटूंबियांसाठी मदत म्हणून काही रुपयांची मदत मागितली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हैबत खान हा फार गरीब होता. या सगळ्या प्रकारात नुफूस खिंडीत पोहोचायलाच त्यांना दुपारचे चार वाजले. पाण्याचा एक मोठा साठा पायथ्यापासून एक मैलावर असल्याचे कळताच सगळ्यांचाच वेग वाढला. उतरताना, एक फारच मनाला डागण्या देणारे दृष्य त्यांना दिसले. ३१ ऑ,. च्या लढाईत मृत्युमूखी पडलेल्या सैनिकांचे मृतदेह अजूनही तेथेच पडले होते. त्या प्रेतांवरचे गणवेषही तसेच होते. या सगळ्या प्रेतांचे नुसतेच ढीग लावून ठेवले होते तर काही दूरवर पडले होते. मुरींनी त्यांच्या माणसांचे व्यवस्थित दफन केले होते आणि ही प्रेते तशीच टाकली होती. कॅ. ब्राउनने ती प्रेते पुरण्यासाठी पैसे देऊ केले पण ती कुजली असल्यामुळे त्यांनी या कामाला नकार दिला आणि त्यांच्या तुकडीला थांबायला वेळ नव्हता. ( यांचे व्यवस्थीत दफन करायची व्यवस्था कॅ. ब्राऊनने नंतर केली. त्यासाठी त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेत. सात वाजता त्या छोट्या झर्‍यावरच्या पाणवठ्यावर पोहोचल्यावर मराठ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि तेथेच रात्रीचा मुक्काम टाकला. जेवणाची कोणालाही आठवणही झाली नाही. सगळे ताबडतोब झोपी गेले. गेले १९ तास त्यांनी विश्रांतीशिवाय काढले होते. असा खडतर प्रवास करत ते बुगताईंच्या प्रदेशात पोहोचले. त्याच दिवशी त्यांना निरोप आला की बुगताईच्या हल्ल्याला तोंड द्यायची तयारी ठेवा. पण निम्मे सैनिक जखमी अवस्थेत उंटावर बांधलेले असताना तयारी तरी काय करणार ?

३० तारखेला पहाटे परत कूच करण्यात आले. यावेळी जो दारूगोळा अनावश्यक वाटत होता तो फेकून देण्यात आला. त्यामुळे जखमी सैनिकांना उंटावर चढवण्यात आले. मूरी वाटाड्याही आता त्यांचा चांगला मित्र झाला होता. त्याने तर एका मागे राहिलेल्या सैनिकाला ८ मैल मागे जाऊन त्याच्या घोड्यावर बसवून, स्वत: चालत परत आणले.

१ ऑक्टोबरला हा अत्यंत खडतर प्रवास संपवून ही सेना सपाट प्रदेशात पोहोचली. तोफेचा एक बार काढून त्यांनी लेहेरेमधील इंग्रजाना त्यांच्या आगमनाची सूचना दिली. आणि त्यांच्या मुख्य छावणीत प्रवेश केला.

या सर्व मोहिमेबद्दल कॅ. ब्राऊन लिहितो –
“अशा रीतीने आमचा काहूनमधील पाच महिन्यांचा तुरूंगवास आणि त्यातून सुटका झाली. या दरम्यान आमचे जे हाल झाले त्याला हसतमुखाने तोंड ज्या जवानांनी दिले त्यांच्या पराक्रमाला दाद द्यायला पाहिजे. मदत म्हणून येणार्‍या मेजर क्लिबॉर्नच्या सैन्याची वाताहत झाल्यावर आता येथेच मृत्यू पत्करायचा हे माहीत असूनही कुठल्याही मराठा सैनिकाने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. या पाच महिन्यात एकाही सैनिकाच्या वागणुकीत वा पराक्रमात मला एक कणाचाही दोष काढता आला नाही. एवढ्या अडचणीत, डोक्यावर मृत्यूची सतत टांगती तलवार असताना हसतमुखाने येणार्‍या प्रसंगाला सामोरे जाणार्‍या या सैनिकांचेच हे यश आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. या यशस्वी माघारीचे सगळे श्रेय मी “काळी पाच” या बटालियनच्या शूर सैनिकांनाच देत आहे.”

मुंबई प्रांताच्या त्या वेळेच्या गव्हर्नरांनी या शौर्याची दखल घेतली नसती तर नवलच. तसेच ब्रिटीश लोक या बाबतीत अजिबात हयगय करत नाहीत. हे हकीकत कळाल्यावर खालील आदेश काढण्यात आला. त्याचा काही भाग खाली देत आहे.
असा आदेश देण्यात येत आहे की –

काहूनमधे काळी पाचने जो पराक्रम गाजवला त्याप्रीत्यर्थ त्यांना त्यांच्या झेंड्यावर काहून असे लिहिण्यास सांगण्यात येत आहे.

सर्व सैनिकांना व जे शहीद झाले आहेत त्यांच्या वारसांना सहा महिन्याचा पगार ताबडतोब बक्षीस म्हणून देण्यात येत आहे.

प्रांतातल्या सर्व रेजिमेंटसने खास परेड भरवून त्यांच्या समोर हा आदेश वाचून दाखवायचा आहे.

म्हणून यांच्या झेंड्यावर “ काहून” असे लिहिलेले असते.

मला नेहमी कुतूहल वाटते कोण असतील हे मराठा सैनिक ? काय असतील त्यांची नावे, ते कुठल्या गावाचे असतील ? त्यांनी येथे आल्यावर त्यांच्या गावात या युध्दाच्या कहाण्या सांगितल्या असतील का ? निश्चितच सांगितल्या असणार. मग त्यांच्या पुढच्या पिढीत या कहाण्या माहीत झाल्या असतील का? का काळाच्या उदरात हा सर्व पराक्रम गडप झाला ? माझे तरूणांना आवाहन आहे- शोधा यांची नावे, गावे आणि कळू द्या त्या गावाला त्यांचा पराक्रम. पुण्यात कॅंटोनमेंट्मधे काहून नावाचा जो रस्ता आहे तो याच युध्दामुळे. हा रस्ता रेसकोर्सच्या रस्त्यावर जो फील्ड्मार्शल माणेकशॉ यांचा पुतळा आहे, तेथे आहे.

शेवटी यावर का नाही एक चांगला सिनेमा निघू शकत ?... पण त्याला स्पिलबर्गच पाहिजे....

ही मराठ्यांच्या पराक्रमाची हकीकत आपल्याला आवडली असेल असे गृहीत धरतो खरे म्हणजे म्हणजे ही लढाई मी माझ्या आगामी पुस्तकात देण्यासाठी लिहिलेली आहे तरीही मिपांच्या वाचकांसाठी ही खास मेजवानी.....(अर्थात ज्यांना आवडले आहे...त्यांच्यासाठी..

जयंत कुलकर्णी.

इतिहासकथाविचारलेखअनुभवमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

17 Jun 2011 - 4:25 pm | शैलेन्द्र

खुपच छान............

युद्धात किंवा तहात ज्याला "प्रतिकाराचा फायदा" म्हणतात तो असा//

अप्रतिम इतिहास अप्रतिम शैलित सांगितल्याबद्दल विशेष आभार.
पुस्तकासाठी खुप शुभेच्छा

आनंद's picture

17 Jun 2011 - 6:58 pm | आनंद

अप्रतिम लिहल आहे.
आणि खरच एक चांगला सिनेमा निघू शकतो.
( मराठीचे स्पिलबर्ग नितीन देसाइ यांनी यावर सिनेमा बनवला तर तो कसा असेल असा विचार करुन पाहीला त्यात नेहमीचेच यशस्वी मराठी कलाकार आले( पाट्या टाकु) आणि विचार पुसुन टाकला)

जयंत कुलकर्णी's picture

17 Jun 2011 - 9:52 pm | जयंत कुलकर्णी

सर्व वाचकांचे आभार !

आनंदयात्री's picture

17 Jun 2011 - 10:21 pm | आनंदयात्री

धन्यवाद. कथा अतिशय आवडली.

>>बुगताईच्या हल्ल्याला तोंड द्यायची तयारी ठेवा. पण निम्मे सैनिक जखमी अवस्थेत उंटावर बांधलेले असताना तयारी तरी काय करणार ?

मग बुगताईंनी हल्ला केला होता का ?

जयंत कुलकर्णी's picture

18 Jun 2011 - 1:34 pm | जयंत कुलकर्णी

बुगताई जमातीने हल्ला केला नाही. पण थोडेफार सतावले. त्या एका तोफेला घाबरले ते. परत मूरी आणि त्यांचे ही पटत नव्हतेच. कदाचित म्हणून त्यांनी ब्रिटीशांची थोडिफार बाजू घेतली असेल.

नगरीनिरंजन's picture

18 Jun 2011 - 6:37 am | नगरीनिरंजन

_/\_. खूप आवडली शूर मराठ्यांची गोष्ट! आणि यावर चित्रपट काढायला पाहिजे हे ही खूप पटले. अशा गोष्टी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आपले आभार!

जगड्या's picture

18 Jun 2011 - 4:35 pm | जगड्या

धन्यवाद. कथा अतिशय आवडली.

गोगोल's picture

18 Jun 2011 - 5:17 pm | गोगोल

भागापर्यन्त उत्कंठा लागून राहीली होती.
मस्त जमलय.

पैसा's picture

18 Jun 2011 - 8:34 pm | पैसा

मराठेशाहीतल्या अनेक वेढ्यांच्या हकीकती आठवल्या.

निनाद's picture

19 Jul 2011 - 5:48 am | निनाद

लेख अतिशय आवडला. मराठ्यांच्या या इतिहासाची माहिती फारशी दिसून येत नाही हे आपले दुर्दैव आहे. असे लेख खरे तर शालेय अभ्यासक्रमातही असले पाहिजेत असे वाटले.

मला नेहमी कुतूहल वाटते कोण असतील हे मराठा सैनिक ? काय असतील त्यांची नावे, ते कुठल्या गावाचे असतील ? त्यांनी येथे आल्यावर त्यांच्या गावात या युध्दाच्या कहाण्या सांगितल्या असतील का ? निश्चितच सांगितल्या असणार. मग त्यांच्या पुढच्या पिढीत या कहाण्या माहीत झाल्या असतील का? का काळाच्या उदरात हा सर्व पराक्रम गडप झाला ? माझे तरूणांना आवाहन आहे- शोधा यांची नावे, गावे आणि कळू द्या त्या गावाला त्यांचा पराक्रम. पुण्यात कॅंटोनमेंट्मधे काहून नावाचा जो रस्ता आहे तो याच युध्दामुळे. हा रस्ता रेसकोर्सच्या रस्त्यावर जो फील्ड्मार्शल माणेकशॉ यांचा पुतळा आहे, तेथे आहे.

काहूनच्या लढाईतील वीर जवानांची नावेही आपल्याकडे नाहीत हे आपले दुर्दैव आहे!

पेकींग शहराची शरणागती आणि शांघाईची लढाई तसेच
शरकातचे घनघोर युध्द या लेखांच्या प्रतीक्षेत आहेच...

सहज's picture

19 Jul 2011 - 7:34 am | सहज

चांगली ऐतिहसीक कथा आमच्यपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

19 Jul 2011 - 10:25 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! पुढे भेटूच :-)

सतीश कुडतरकर's picture

23 Jul 2015 - 5:21 pm | सतीश कुडतरकर

अप्रतिम लिहिले आहे. डोंगर दऱ्यांमध्ये फिरत असल्याने वाचता वाचता तसाच परिसर मनामध्ये तयार करीत होतो.

चांदणे संदीप's picture

9 Jul 2019 - 11:24 am | चांदणे संदीप

परत एकदा ही अचाट काहूनची लढाई वाचून काढली. वाचायला सुरूवात केली की संपवल्याशिवाय खाली ठेवता येणे अशक्य आहे.

यावर सिनेमा बनवण्यापेक्षा मिनी सिरीज चांगली बनू शकते.
कुणी फायनान्स करत असेल तर मी तयार आहे या प्रोजेक्टवर काम करायला.

Sandy

ब्रिटिश सैन्याच्या ऐतिहासिक नोंदी असतील, त्यातही ह्या काळी ५ मधील सैनिकांची नावे नाहीत का?

diggi12's picture

13 Oct 2023 - 12:34 pm | diggi12

अप्रतिम

मुक्त विहारि's picture

14 Oct 2023 - 8:52 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद

विवेकपटाईत's picture

14 Oct 2023 - 4:45 pm | विवेकपटाईत

सर्व लेख आवडले. यावर एक उत्तम सिनेमा बनू शकतो. आज ही त्या भागात शोध घेतला तर काही किस्से निश्चित कळतील. सर्व मराठा वीर सैनिकांना मानाचा मुजरा.