१५ तारखेला असा निरोप आला की रसद पोहोचवायचे काम ज्योतसिंग आणि मीर हुसेन या दोन इसमांच्या मदतीने पार पाडण्यात येईल. त्यातला ज्योतसिंग हा एक प्रतिष्ठीत व्यापारी होता आणि मीर हुसेन हा एक गद्दार होता. ले. क्लार्कच्या मृत्यूला तोच जबाबदार होता आणि पहिल्यांदा उल्लेख झालेला तो गद्दार वाटाड्याही हाच होता. दोघांना काळी पाचचा पराभव झाला तर पाहिजेच होता. ज्योतसिंग तर पळवलेले उंट विकत घेऊन दुसर्या ठिकाणी इंग्रजांना विकायचा. नशिबाने दुसर्यां निरोपामधे ही योजना रद्द केली असल्याचा निरोप आला.
एका जवानाची बंदूक याच सुमारास बलुची घोडेस्वाराने पळवली. हा जवान बंदूक बाजूला ठेऊन आराम करत बसला असताना. हा घोडेस्वार विजेच्या वेगाने तेथे आला, घोड्यावरून उतरला आणि बंदूक घेऊन घोड्यावरून नाहीसा झाला. छोट्या छोट्या चकमकी चालूच असताना अजून एक गंमत झाली. तीन बलूचींनी एका व्यापाराची तीन गाढवे पळवली. हीच गाढवे आत्तापर्यंत चार वेळा इकडून तिकडे पळवण्यात आली होती.
२१ तारखेला शत्रूकडून आता लढाईला आणि मृत्यूला तयार रहा असा निरोप आला आणि त्याच दिवशी यांच्या मदतीसाठी एक फौज येत आहे असाही निरोप आला. त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. हा आनंद आपल्याला कळायचा नाही. उपाशी पोटी चार महिने एका जागेत कोंडून काढणार्यांना, झोपेसाठी जमिनीला पाठही टेकू न शकणार्यांनाच तो कळावा.
२८ तारखेला मराठ्यांना अजून एक गम्मतशीर बातमी कळाली. ती ही त्या हैबत खानानेच दिली. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा सगळ्या टोळ्या एकत्र झाल्या होत्या त्याच वेळी मोठा हल्ला करायचे ठरले होते. सय्यदनी पण या हल्ल्याला दैवी पाठिंबा आहे असे सांगितले होते. तेवढ्यात त्यांच्या एका हेराने ( जो कॅ. ब्राउनचाही हेर होता ) त्यांना किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल सांगितल्यावर सय्यदमहाराजांनी घुमजाव केले आणि सोयिस्कररीत्या स्वप्नात अल्लाने हा हल्ला करू नये असे सांगितले आहे असे सांगितले. या वरून बरीच भांडणे झाली आणि बलूचींची एकजूट भंग पावली. हैबत खानाने येणार्या कुमकेशी बलुची कसे लढणार आहेत याची योजनाही तपशीलवार सांगितली.
ते त्या येणार्या फौजेवर तीन ठिकाणी हल्ला करणार आहेत. त्यासाठी ३००० कडवे बलुची एकत्र जमले आहेत. पहिला हल्ला हा नफूसच्या खिंडीत, दुसरा आत्ता ते ज्या ठिकाणी जमले आहेत तेथे करण्यात येईल. या पहिल्या दोन हल्ल्यात जर त्यांचा पराभव झाला तर ते मीर हाजीच्या किल्ल्यावर माघार घेऊन तेथून तिसरा हल्ला करतील. एवढी चांगली योजना त्यांनी प्रथमच केली असावी नाहीतर सगळे हल्ले ते कुठल्याही नियोजनाशिवाय करत असत. या चांगल्या बातमी बरोबर मराठ्यांना बलुचींचे दोन बैल पकडता आले. त्यांचे ताबडतोब जेवण बनविण्यात आले. आता येणारी कुमक फक्त दोन मुक्कामाचे टप्पे ओलांडले की काहूनला पोहोचणार या कल्पनेने सगळे निश्चिंत झाले होते.
३० तारखेला संध्याकाळपासून सभोवती वेगळेच दृष्य दिसायला लागले.. बरीच गडबड चालली होती. रात्री सभोवतालच्या टेकड्यांवर खुणेच्या आगी पेटताना दिसत होत्या. त्याच्या प्रकाशात सगळा परिसर उजळून जात होता. चित्र तर भयभीत करण्यासारखेच होते. पण मराठे न डगमगता तयारीत होते. पहाटे पहाटे अनेक न मोजता येण्याएवढे बलुची सैनिक आरडाओरडा करत नफूसच्या खिंडीकडे कूच करताना दिसले. थोड्याच वेळात रसद घेऊन येणारी फौज त्या खिंडीत पोहोचली असा निरोपही कॅ. ब्राऊन आणि त्याच्या मराठ्यांना मिळाला. त्या पलटणीने एक तोफेचा बारही काढला. ही खूण अगोदरच ठरलेली होती. सूर्य उगवल्यावर त्या प्रकाशात मराठ्यांना त्या खिंडीच्या डोंगरावर २००० ते ३००० बलुची सैनिक दिसले. तसे हे अंतर सरळरेषेत फक्त ४ मैल होते. किल्ल्यावरून सगळे स्पष्ट दिसत होते. बलुची आतुरतेने शत्रूच्या फौजेची वाट बघत होते. इकडे मराठे त्या खिंडीकडे नजर लावून बसले होते. बराच वेळ झाला तरी त्यांचा पत्ताच नव्हता. यांना वाटले की त्या मोठ्या तोफांमुळे वेळ लागत असेल. रस्ताही तसा खराब होता आणि बलुची टोळ्यांनी अडथळेही उभे केले असतील. साधारणत: ३ वाजता एक तोफेचा गोळा बलूचींवर जाऊन आदळलेला दिसला, पण सैन्य काही दिसेना. किल्ल्याच्या समोरून अजूनही बलुची घोडेस्वार मराठ्यांना चिडवत खिंडीकडे जात होते. त्यांच्यावर एक तोफ डागण्यात आली. साधारणत: रात्री आठच्या सुमारास गोळाबारीचा व तोफांचा बराच धूमधडाका ऐकू आला. दहा एक मिनिटात तो संपला आणि त्या डोंगरात नीरव शांतता पसरली.
हीच ती नफूसची भयानक खिंड
सप्टेंबरचा पहिला दिवस उजाडला आणि त्या पठारावर एकही बलुची दिसेना. किल्ल्यावरच्या सैनिकांना आता येणार्या फौजेची काळजी वाटू लागली. काही मराठ्यांनी जाऊन बघून यायची तयारी दाखवली पण ती परवानगी देण्यात आली नाही. कॅ. ब्राऊनला वाटले की बहुधा ते या खराब रस्त्याला कंटाळून लांबच्या पण चांगल्या रस्त्याने येत आहेत की काय ! दुसर्यादिवशी मात्र पठारावर बलूचींची बरीच हालचाल दिसू लागली. त्यांनी एक तंबूही तेथे उभारला. बहुतेक तो त्यांना त्या खिंडीत सापडला असावा. कदाचित घाईघाईत त्यांनी तो टाकूनही दिला असावा. काही सांगता येत नव्हते. वातावरण तंग होते. दुपारी १२ ते २ दरम्यान परत बंदुकींचे आवाज ऐकू आले. हे आवाज त्या दुसर्या रस्त्याच्या बाजूने येत असल्यामुळे मराठ्यांना खात्री वाटली की त्यांनी तो लांबचा रस्ता पकडला असणार. त्यामुळे आता त्यांची ७/८ दिवस वाट बघण्यात काही अर्थ नव्हता. इकडे किल्ल्यावरही परिस्थिती फार बिकट होत चालली होती. अन्नाच्या दुर्भिक्षामुळे मराठे अशक्त होत चालले होते. आता फक्त पिठाच्या सहाच गोण्या शिल्लक राहिल्या होत्या.
तीन तारखेला, सामान लादलेले बरेच उंट जाताना दिसले. काही बलुची सैनिक चारपाईवर जखमींना नेतानाही दिसले. अचानक पणे दीड मैलांवर त्यांनी एक चौकी उभारायचे काम चालू केले. त्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या सेनेचा तंबू वापरला होता. बर्याच संख्येने त्यांना जमलेले पाहून त्या रात्री सर्व मराठे लढाईच्या तयारी बसले. त्या रात्री काहीच झाले नाही. दुसर्या दिवशी मात्र काही बलुची सैनिक किल्ल्यापाशी दौडत आले आणि त्यांनी मराठ्यांना त्यांच्या येणार्या कुमकेची कशी वाताहत झाली व त्यांनी सगळ्या साहेबांची कत्तल केली आहे हे सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्या तोफाही काबिज करून आणल्या आहेत हेही सांगितले. याच्यावर अर्थातच विश्वास ठेवण्यात आला नाही. हा निरोप घेऊन येणार्यांना बंदूकीच्या गोळीने निरोप देण्यात आला. कॅ. ब्राऊन त्यांच्या सगळ्या हालचाली दुर्बिणितून न्याहाळत होता. शेवटी त्याला वाटणारी भीती खरी ठरली. त्या बलूचींच्या गोंधळात त्याला एका तंबूतून डोकावणारी तोफांची तोंडे दिसली. ते बघताच त्याला येणार्या मदतीचे काय झाले असेल याची कल्पना आली. अन्नावाचून जनावरांची स्थिती फारच बिकट झाली होती. माणसांनाच खायला अन्न नव्हते तर यांना कोण देणार ? तांदुळाची २/३ पोती आणि पिठाची २/३ पोती एवढेच अन्न आता किल्ल्यावर शिल्लक राहिले होते. काही जवानांना पिठाची १० पोती सापडली. ती ताबडतोब उघडण्यात आली पण ती खानसाम्याने वाळू मिसळली आहे म्हणून फेकून दिलेली होती. शेवटी त्याचाही उपयोग करण्यात आला. या दुर्भिक्षामुळे, व भुकेमुळे एका उंटाच्या मालकाने तांदुळाची चोरी केली पण पकडले गेल्यावर त्याच रात्री त्याने आत्महत्या केली.
७ तारखेला सगळ्या बलुची टोळ्या आपले चंबूगबाळे आवरून एकदम नाहीशा झाल्या होत्या. मेजर क्लिबॉर्न जो येणार्या फौजेचा प्रमुख होता त्याचे काय झाले आणि त्याच्या जवानांचे काय झाले हे समजायला काहीच मार्ग नव्हता. मराठ्यांना हे कळत होते की काहीतरी भयंकर घडले असणार. सगळे चिडिचूप होते आणि कामात गर्क असल्याचे दाखवत होते. कॅ. ब्राऊनने लिहून ठेवले आहे ते त्याच्या शब्दात –
“ हे सगळे मराठ्यांना कळत नाही असे समजण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. त्यांना, येणार्या मदतीची कत्तल झाली हे माहीत होते. पण एकाही सैनिकाने त्या बद्दल एक अवाक्षरही काढला नाही की त्यांना हे माहीत आहे हे मला जाणवूनही दिले नाही. खरंच धन्य ते जवान”
बलुची टोळ्यांनी किल्ल्यातील सैनिकांचा समाचार नंतर घ्यायचा ठरवला होता कारण त्यांना माहीत होते की एक ना एक दिवस मराठ्यांना बाहेर यावे लागणार.........
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
16 Jun 2011 - 10:23 am | इरसाल
काय झाले असावे ?
16 Jun 2011 - 10:30 am | रणजित चितळे
आपला लेख वाचत आहे. पण त्या भयानक खिंडीचा फोटो अपलोड झालेला दिसत नाही तेवढे करा.
16 Jun 2011 - 11:40 am | विश्वनाथ मेहेंदळे
अफलातून लेखमाला आहे. पुढील भागांची वाट बघतो आहे.
17 Jun 2011 - 8:58 pm | शैलेन्द्र
काहुनची लढाई संपली हो.. आता पुढचे भाग काहुन टाकतिल?
16 Jun 2011 - 4:30 pm | चाणक्य
आत्ताच तिन्ही भाग वाचून काढले. पुढचा भाग लवकर येऊद्यात.
स्वाक्षरी-
16 Jun 2011 - 6:44 pm | गणेशा
अप्रतिम...
आत्ताच सर्व भाग न थांबता वाचुन काढले...
मस्त लेखन ...
16 Jun 2011 - 10:18 pm | आनंदयात्री
पुढला भाग उद्या टाकाच्च !!
17 Jun 2011 - 12:35 pm | डॉ.श्रीराम दिवटे
चित्राने लढाईला रंगत आली आहे. त्यात हे उत्तम लेखन झाल्याने उत्कंठा वाढली आहे...