काहूनची लढाई - मराठ्यांनी लढलेली...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
13 Jun 2011 - 11:25 pm

काहून ! काहून !

१८४१ मधे तात्कालीन ब्रिटीश राजवटीत अफगाणिस्तानमधे काहून नावाच्या गावाच्या वेढ्यात व बलुचीस्तानमधील दादर नावाच्या शहराच्या संरक्षणात मराठ्यांनी जे शौर्य गाजवले ते भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारे होते. त्यानंतर लगेचच त्यातून मराठा लाईट इन्फंट्रीची निर्मिती करण्यात आली.

याच काहूनच्या लढाई दरम्यान १०५ मराठा लाईट व नंतर या बटालियनला २/५ मराठा लाईट इन्फंट्री असे ओळखू जाऊ लागले.

५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या काळात यांचे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्‍यामुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जाई व अजूनही हेच नाव प्रचलित आहे.

मित्रहो, या लढाईचे वर्णन आपण वाचलेच पाहिजे. सैनिकांमधे जे गुण आवश्यक असतात हे सर्व गुण मराठा सैनिकांनी या वेढ्यात दाखवले. आणि हे सर्व आपल्या नशिबाने लिहून ठेवलेले आहे. ते आपल्या समोर आणत आहे. ही कहाणी मला वाटते फार कमी लोकांना माहीत असावी.

बलुचिस्तानमधील मुरीच्या डोंगररांगात एका डोंगरावर हे छोटे शहर वसलले आहे. आपल्यासमोर शहर म्हणजे कदाचित आत्ताचे शहर येईल. पण सध्याच्या तुलनेत हे अगदी छोटे गाव असेल. या गावाला तटबंदी होती आणि तसे हे फार प्राचीन गाव असावे. ८ एप्रिल १८४०ला कॅ. ब्राऊन याला काहूनचा ताबा घेण्यासाठी कूच करण्यास सांगण्यात आले. जेव्हा तो निघायच्या ठाण्यावर पोहोचला तेव्हा त्याला खालील फौज कूच करण्यासाठी तयार दिसली.
३०० काळी पाचचे मराठा सैनिक
२ हॉव्हिट्जर तोफा
५० सिंध घोडदळाचे सैनिक
५० पठाण घोडेस्वार.
याबरोबर त्याला चार महिने पुरेल एवढे अन्न, दारूगोळा इ.इ. ६०० उंटांवर लादून घेऊन जायचे होते. सिंध घोडदळाचा प्रमुख ले.क्लार्क हा हे उंट घेऊन परत जाणार होता आणि लगेच पुढच्या चार महिन्याचे सामान घेऊन परत येणार, असे ठरले होते. त्यासाठी त्याला संरक्षणासाठी ८० जवान आणि ५० घोडेस्वार लागतील असे गृहीत धरले होते. घाईघाईने त्याने सुखूर सोडले आणि तो या सगळ्यांना घेऊन पुलाजी नावाच्या गावापर्यंत आला खरा पण पुढचे आदेश न मिळाल्यामुळे त्याला १५ मे पर्यंत येथेच अडकून पडावे लागले. १५ एप्रिलच्या सुमारास गरम वार्‍याची वादळे सुरू झाली. तपमानमापक तंबूतच तपमान ११२ फॅ दाखवत होता. बरेच जण या हवेमुळे आजारी पडले आणि एका मराठी सुभेदाराचा मृत्यू झाला. ले. अर्स्काईन व टेलरही तापाने फणफणले होते. एप्रिल २० ला त्याने ले. क्लार्क आणि त्याच्या घोडदळाला शापूर नावाच्या गावाकडे पाठवले. तेथे ले. वरडॉन आणि त्याचे १०० बलुची सैनिक त्यांना भेटणार होते. या सर्वांना दक्षिण-पूर्व दिशेला गडबड करत असलेल्या बुगताईंचा बंदोबस्त करण्याची कामगिरी त्यांना देण्यात आली. ही मोहिम दगाबाज वाटाड्यामुळे पूर्णपणे फसली. उपासमार, व पिण्याचे पाणी संपल्यामुळे या तुकडीचे फार हाल झाले. १०० पैकी २५ बलुची सैनिकांना वाटेत सोडून यावे लागले. ले. अर्स्काईन्च्या आजारपणामुळे ब्रिगेड मेजरने त्या तोफा परत पाठवायला सांगितल्या आणि फक्त पायदळ आणि घोडेस्वार घेऊन काहूनला कूच करायचा आदेश दिला पण त्याला अशी पक्की खबर मिळाली की मूरी टोळ्या नफूकच्या खिंडीत त्याच्यावर हल्ला करणार आहेत. हा हल्ला एकवेळ परतवता येण्यासारखा होता. पण काहून जर लढवायचे असेल तर तोफांची अत्यंत गरज भासणार होती. त्यासाठी त्याने कमीतकमी एक तरी तोफ ताबडतोब परत पाठवायला सांगितली. त्याचा हा निर्णय अत्यंत योग्य कसा ठरला हे आपल्याला समजेलच. नशिबाने अर्स्काईनचीच तब्येत सुधारली आणि तोच तोफ घेऊन आला. १९३९ मधे कॅ. ब्राऊनला पठाणांचा अत्यंत वाईट अनुभव आला होता. तो भाग घेत असलेल्या एका युद्धात पठाणांनी म्यानातून तलवारीही बाहेर न काढता पलायन करून त्याचा विश्वासघात केला होता. तसेही एवढ्या चढावर एवढी रसद चढवण्यासाठी त्यांचा उपयोग नव्हताच. ( हे त्याचे म्हणणे आहे माझे नाही ) त्याने ताबडतोब त्याच्या तुकडीतील पठाणांना रजा दिली. रसदीची पूर्ण तयारी झाल्यावर त्याने पूर्वेकडे डोंगराच्या दिशेने कूच केले. आता त्याच्या बरोबर ३०० मराठे होते. ले. टेलरही आजारी पडल्यामुळे माघारी गेला आणि आता त्याच्या अधिपत्याखाली ३ कंपनी झाल्या. ६ मेला २५/३० मैल चालून, ते एका नदीच्या काठावर पोहोचले. येथून काहूनला दोन रस्ते होते. एक होता चांगला पण अंतर होते ७४ मैल तर दुसरा अत्यंत खडकाळ आणि चढ्या डोंगरातून जात होता. हे अंतर होते २० मैल. या मार्गावरून तोफा न्यायचे कामच फार कटकटीचे होते. येथेच एक सैनिक उन्हाने मृत्यूमूखी पडला. शेवटी लवकर पोहोचणेच इष्ट असा विचार करून त्याने जवळचा पण खडतर मार्ग निवडला. पहिलाच चढ इतका वाईट होता की शेवटचा उंट वरती पोहोचेतोपर्यंत १२ तास उलटून गेले होते आणि अंतर होते फक्त १ मैल. यावरून तोफा वर चढवायचे काम किती अवघड असेल व मराठ्यांनी ते कसे केले असेल याची कल्पना येऊ शकते. तोफांना जोडण्यात आलेल्या बैलांनी पुढे जायचा नकार दिल्यावर सैनिकांवर ही जबाबदारी पडली. याच ठिकाणी बलुची टोळ्या त्यांच्या भोवती घिरट्या घालू लागल्या. त्या टेकाडावर पोहोचल्यावर पाणी व चारा नसल्यामुळे सर्व जनावरांना काही जवानांबरोबर खाली पाण्यापाशी पाठवण्यात आले. दुसर्‍या दिवशी खाली बरीच गडबड ऐकू आली. जवळ जवळ १५० बलुची टोळीवाले त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत दिसल्यामुळे ले. क्लार्कला ब्राऊनने १०० जवान खाली पाठवले. त्यांना बघताच ते टोळीवाले पळून गेले. १० मेला नफूस खिंडीत पहिली तुकडी पोहोचली. त्यांना शत्रूचा काही सुगावा लागला नाही पण त्यांनी बर्‍याच ठिकाणी रस्त्यांवर अडथळे उभे केले होते. ते दूर करून संध्याकाळी ४ वाजता ते खिंडीत पोहोचले. वजनाखाली दबलेले उंट, अवजड तोफ, निरुपयोगी बैल याचा हा परिणाम होता. शिवाय ७ उंटांच्यामागे एकच माणूस होता त्यामुळे त्यांना हाकलणे कर्मकठीण होऊन बसले होते. नंतर थोड्याच वेळात तोंडाला फेस येऊन उंट खाली पडू लागले. त्याच्यावरचे सामान खाली पडल्यावर ते मिळवण्यासाठी बलुची टोळ्या अधिकच आक्रमक झाल्या. त्या टोळ्या दिवसभर शांतपणे यांची धडपड पहात योग्य संधीची वाट बघत उभ्या होत्या. सामान पडायचा अवकाश, त्यांनी हल्ले करायला चालू केले. रात्र झाल्यावर या हल्ल्यांची तीव्रता खूपच वाढली. पण ब्राऊनला आणि त्याच्या मराठ्यांना त्या टोळीवाल्यांना पिटाळण्यात यश आले पण याच्यात खूपच दारूगोळा वाया गेला. ही त्यांची असल्या प्रवासाची तिसरी रात्र होती. नशिबाने सगळे सामान वाचवण्यात त्यांना यश आले पण ले. क्लार्क हाताला गोळी लागून जखमी झाला. संध्याकाळी ७ वाजता ते काहूनला पोहोचले. ते गाव पूर्णपणे ओसाड पडले होते आणि त्या तटबंदीची दारे काढून टाकलेली होती.

नुफूस्क किंवा नफूसच्या खिंडीचे चित्र-

काहून हा एक छोटासा किल्ला आहे म्हणाना. खरे तर याला किल्ला म्हणणेही अवघड आहे. सह्याद्रीतील किल्ल्याच्या तुलनेत तर नाहीच नाही. हे एक तटबंदी असलेले गाव आहे.

त्याचा परीघ साधारणत: ९०० यार्ड असेल. त्याच्या तटबंदीत ६ बुरूज होते. तटबंदीची उंची २५ फूट पण काही ठिकाणी इतकी पातळ होती की त्यावर उभे रहायलाही भीती वाटे. या किल्ल्याला खंदक नाही पण मुख्य दरवाजाच्या समोर एक छोटा तलाव होता जो पावसाळ्यातच भरत असे. आतली व्यापार्‍यांची घरे तशी बर्‍यापैकी सुस्थितीत होती. मुरीजमातीचे लोक मात्र या तटबंदीच्या बाहेरच आपला मुक्काम तंबूत ठोकत असत आणि थंडीत रहायला खाली जात असत. काहूनचे पठार १५ मैल लांब व ६ मैल रूंद आहे. हवा अत्यंत सुंदर आणि या पठारावर उष्णतेचा त्रास कमी व्हायचा. त्यामुळे ब्राऊन व त्याचे मराठे खूष झाले. दुसर्‍या दिवशी या किल्ल्याची पहाणी करण्यात आली. सगळे बुरूज आतून जाळून टाकण्यात आले होते. या तटबंदीच्या बाहेर एक सैनिक त्याच्या हत्याराशिवाय गेला असता टोळीवाल्यांनी त्याचे शीर धडावेगळे करून धड तेथेच टाकले. ही घटना घडली भिंतीच्या बाहेर ५०० यार्डच्या आत. ले. क्लार्कने त्या टोळीचा पाठलाग केला. ते काही त्यांच्या हाती लागले नाहीत पण पाठलाग करताना त्यांनी बातमी आणली की काही शेतात अजूनही गहू उभा आहे. ते कळाल्यावर सैनिक पाठवून ५० उंटावर लादता येतील तेवढा गहू तोडून आणण्यात आला. बुरजाचे दरवाजे ही जळालेल्या अवस्थेत पडले होते त्याची काही लाकडेही परत आणण्यात आली. दुसर्‍या दिवशी बलुची टोळ्यांनी उभ्या शेतातील गहू जाळायचे चालू केलेले बघताच त्याच रात्री मराठ्यांनी अजून ५० उंट लादून गहू आणला. तसेच किल्ल्यातील विहीरही साफ करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे १६ तारखेला पहाटे २ वाजता ले. क्लार्क ७०० उंट घेऊन परत निघाला. त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या सैनिकांव्यतिरिक्त कॅ. ब्राऊनने सुभेदार जाधवांच्या हाताखाली ५ हवालदार, ८० जवान, दिले. नफूसच्या खिंडीत पोहोचल्यावर त्याने आता गरज नाही असे समजून ही तुकडी परत पाठवली.

दुपारी १२ वाजता सुभेदार जाधवांच्या तुकडीतील एक हमाल अर्धमेल्या स्थितीत काहून मधे परतला आणि त्याने जे सांगितले ते फारच भयंकर होते.

“साहेब, सुभेदार जाधवांनी शेवटचा ऊंट दृष्टीआड होताना पाहिला आणि ले. क्लार्कच्या सांगण्यावरून ते आपल्या तुकडीसह परत यायला निघाले. तेवढ्यात त्यांना वरती आणि खाली बलुची टोळ्या दिसल्या. त्यांना कळून चुकले की ते आता वेढले गेले आहेत. त्यांनी लगेचच मोर्चे बांधणी केली पण बलूचींची संख्या होती २०००. मराठ्यांना पूर्णपणे वेढल्यावर त्यांनी या सैनिकांची कत्तल करायला सुरुवात केली. मी सुभेदारसाहेबांना शेवटपर्यंत लढताना बघितले पण त्यांनी त्यानाही ठार मारले. मी पळून जाऊन एका ओढ्यात लपलो म्हणून वाचलो. एका म्हातार्‍या बलुचीने माझे सगळे सामान काढून घेतले आणि सोडून दिले.”

पुढे काय झाले ते पुढच्या भागात...
क्रमशः

जयंत कुलकर्णी.

इतिहासकथालेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

14 Jun 2011 - 5:14 am | अभिज्ञ

वाचतोय. रोचक इतिहास आहे.
पुढचा भाग लवकर टाका.

अभिज्ञ.

नीलकांत's picture

14 Jun 2011 - 8:43 am | नीलकांत

पुढे काय आणि कसे झाले याची उत्सुकता आहे. लवकर येऊ द्या.

- नीलकांत

पाषाणभेद's picture

14 Jun 2011 - 9:53 am | पाषाणभेद

नेहमीप्रमाणेच यशस्वी

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 10:09 am | मृत्युन्जय

वाचतोय. रोचक इतिहास आहे

किसन शिंदे's picture

14 Jun 2011 - 10:13 am | किसन शिंदे

पुढे काय होणार आहे याची उत्सुकता आहे.

पु.भा.प्र

अमोल केळकर's picture

14 Jun 2011 - 10:53 am | अमोल केळकर

खुप छान

अमोल केळकर

मनराव's picture

14 Jun 2011 - 11:36 am | मनराव

वाचतो आहे.....

इंटरनेटस्नेही's picture

14 Jun 2011 - 2:44 pm | इंटरनेटस्नेही

वाचतोय. रोचक इतिहास आहे.
पुढचा भाग लवकर टाका.

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 6:24 pm | धमाल मुलगा

जयंतराव,
तुमची लेखमाला प्रचंड माहितीप्रद असते हे आवर्जुन नमुद करावसं वाटतं.
आणि मराठी सैनिकांच्या अचाट शौर्याची एकेक घटना वाचताना अंगावर काटा येतो.

सुहास..'s picture

14 Jun 2011 - 6:29 pm | सुहास..

ज ब र द स्त !

वाचतो आहे

रणजित चितळे's picture

15 Jun 2011 - 9:10 am | रणजित चितळे

मस्त इतिहास आहे.

छान! लढाईची अतिशय तपशील वार माहीती देण्या साठी. धन्यवाद.

गामा पैलवान's picture

18 Jul 2015 - 2:24 am | गामा पैलवान

जयंत कुलकर्णी,

अंगावर काटा आला वाचतांना. डोंगरात बागडणाऱ्या मराठ्यांची अशी हालत झाली तर इतरांची काय कथा!

एक शंका आहे. काहून, सुखूर, पुलाजी, शापूर ही नावे अनुक्रमे Kahan, Sukkur, Phulji, Shahpur Jahania अशी सापडली (जय नकाशेवाले गुग्गुळाचार्य). पुलाजी आणि शापूर ही स्थाने सुखूरच्या दक्षिणेस आहेत. तर काहून उत्तरेस आहे. तर मग सुखूरहून काहूनास जाण्यासाठी उलट्या बाजूकडे पुलाजीला यायची गरज काय?

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2015 - 1:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीसारखीच जबरदस्त ऐतिहासिक कथा !

पुभाप्र.

सतीश कुडतरकर's picture

18 Jul 2015 - 1:58 pm | सतीश कुडतरकर

rochak aahe

बोका-ए-आझम's picture

18 Jul 2015 - 7:35 pm | बोका-ए-आझम

पण मराठ्यांनी आपलं इमान परकीय ब्रिटिशांसाठी खर्चलं म्हणून वाईटही वाटलं.

पद्मावति's picture

18 Jul 2015 - 8:49 pm | पद्मावति

इतिहासातील काही हरवलेली ,काही विसरलेली पाने तुमच्या लेखांमुळे आमच्या समोर येतात त्याबदद्ल धन्यवाद.

अभिजित - १'s picture

18 Jul 2015 - 9:19 pm | अभिजित - १

जबर्दस्त .. पुढचा भाग ? लिंक मिळेल का ?

जयंत कुलकर्णी's picture

18 Jul 2015 - 11:03 pm | जयंत कुलकर्णी

शेवटच्या भागाची लिंक देत आहे त्यात इतर भागाच्या लिंक्स आहेत...... पण हे मागवे धागी कोण उकरुन काढते आहे ? ;-)

जयंत कुलकर्णी's picture

18 Jul 2015 - 11:40 pm | जयंत कुलकर्णी
खटपट्या's picture

19 Jul 2015 - 12:28 am | खटपट्या

पेज नॉट फाउंड येतय.
रन्गा धाव रे मला पाव रे

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2015 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे

हा घ्या शेवटच्या भागाचा दुवा, त्यात इतर सर्व भागांचे दुवे आहेत...

http://www.misalpav.com/node/18301

महासंग्राम's picture

3 Jan 2021 - 12:26 am | महासंग्राम

जबरदस्त ...

diggi12's picture

13 Oct 2023 - 12:18 pm | diggi12

जबरदस्त