अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल.
प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्या गावच्या जमिनीच्या बखेड्याच्या पहिल्या कहाणीपासूनच मराठेशाहीच्या मधल्या काळातल्या प्रवासाचा अंदाज येतो. जमिनीवर अंताजीचा हक्क असतो; पण त्याच्या अनुपस्थितीत गावातल्या एका शहाण्णव कुळी मराठ्यानं जमिनीचा ताबा मिळवलेला असतो. रामशास्त्री प्रभुणे कज्जा सोडवायला बापट नावाचा मामलेदार देतात. अंताजी खरे चित्पावन आणि मामलेदार बापटही चित्पावन. नक्की काय झालं याची शहानिशा न करताच, ‘मी तुमच्या जातीचा की नाही यापेक्षा मामला पाहून माझी बाजू तपासा’ असं म्हणणाऱ्या अंताजीकडे दुर्लक्ष करून, लाच खाऊन आपल्या जातीच्या माणसाच्या बाजूनं बापट निवाडा लावतो, वर ‘आपण एकमेकांना धरून राहिलो नाही तर ही कुणबटं आपल्या डोक्यावर मिरी वाटतील’, असा सल्लाही अंताजीला देऊन जातो. खरं तर, कुशा पाटलानं जमीन खरेदी करण्यासाठी पंचायतीला दिलेले पाच रुपये त्याला अंताजीनं जर देऊ केले असते, तर अंताजीच्या मते काम झालं असतं. पण ‘तापल्या नांगराचं दिव्य करावं लागेल’ असं ‘शास्त्रार्थाचं’ भय कुणब्याला दाखवून मामलेदार बापट अंताजीच्या बाजूनं निकाल लावतो आणि बदल्यात पाच रुपये स्वत: खातो!
उत्तर पेशवाईत ज्या जातीयतेचा सुळसुळाट झाला होता त्याचा असा प्रत्यक्षदर्शी पुरावा पाहून अंताजी हैराण होतो. त्याला आधीच्या मराठेशाहीतल्या रघूजी भोसल्यांसारख्या नेतृत्वाची आठवण होते. कोणत्याही जातीच्या माणसाला समान वागणूक देऊन, ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे, लायकी पाहून कामं देऊ करून मग अशा सर्वांच्या कर्तृत्वावर मोठ्या झालेल्या मराठेशाहीचं आजचं भ्रष्ट रूप पाहून अंताजी कष्टी होतो. ‘एकदिली, तडीस नेणे, आपापले स्वार्थ एकुणांच्या स्वार्थात बुडवणे’ हे इंग्रजांचे गुण तर त्यानं आधीच पाहिलेले असतात. मग शनिवारवाड्यावर ‘युनिअन जॅक’ फडकणार असंच त्याचा अनुभव त्याला सांगत असतो. एकविसाव्या शतकात आपल्याला तर हे माहीतच असतं. तरीही तिथपर्यंत अंताजीसोबत जायची मजा काही वेगळीच!
‘वीतभर (पोटाची) खळगी आणि टीचभर (कमरेखालचं) इंद्रिय यांच्या सुखासाठी किती धावायचं’, असा विचार करणारा मध्यमवयीन अंताजी एका परित्यक्ता प्रभू स्त्रीला अंगवस्त्र म्हणून ठेवतो. दोन्ही सुखं मिळतात आणि शिवाय गाण्या-बजावण्याचा शौकदेखील पुरा होतो! मात्र ‘प्रभू रक्षा चालेल, पण पत्नी नव्हे’ हा मराठेशाहीतल्या जातीयतेचा अजून एक गुण त्याला व्यक्तिगत आयुष्यात भोवतो. (रक्षा = रखेल) त्यामुळे चित्पावनाघरच्या काशीशी तो लग्न करतो. आता अंताजी पडला रसिक आणि देव-धर्म न करणारा, त्यामुळे धर्म-कर्मकांडात गुंतलेल्या आणि कसलंच सुख धड न देणाऱ्या या आपल्या बायकोला तो फार कंटाळून जातो. मग पुन्हा मुलुखगिरी करायला घराबाहेर पडतो. (हे म्हटलं तर व्यक्तिगत वास्तव, म्हटलं तर सामाजिक टिप्पणी ;-))
व्यक्तिगत आयुष्यापासून ते मराठेशाहीच्या ऱ्हासापर्यंत सर्वत्र पसरलेली ही जातीयता अंताजीला पदोपदी जाणवते आणि बोचते. त्याशिवाय, शिवाजीसारखे राज्यकर्ते हे जनतेचं हित पहात असत; पण आताच्या राज्यकर्त्यांना जनतेचं काय चाललंय यात रसच नाही, हेसुद्धा त्याच्या लक्षात येऊ लागतं. रयतेला जास्त उपजाऊ करण्यापेक्षा आपसांत कुरघोड्या करण्यात सत्ताधारी दंग असतात. मग सर्वसामान्य माणसाला त्यांच्यावर जीव ओवाळून द्यावासा वाटणार नाही हेदेखील अंताजीला साहजिक वाटू लागतं. मग भाडोत्री सैनिक घेऊन युद्धं खेळली जाणार यात काय नवल? आणि मग ते मोलानं आणलेले गारदी वगैरे स्वराज्याच्या निष्ठेसाठी लढणार ही अपेक्षा सोडाच; उलट आपल्या मागण्यांसाठी अडवून धरणार आणि प्रसंगी घात करणार, हेही मग ओघानं आलंच.
अशा सगळ्यात दानधर्म करणारी अहिल्याबाई होळकर शहाणी, पण तिचं नशीब म्हणूनच ती सती जाण्यापासून वाचली हे अंताजीला कळत असतं. एकंदरीत मागल्या भागातल्या सती आणि पुरबी प्रकरणांतून अंताजी शहाणा झाला आहे हे जाणवतं. त्याचाच पुढचा भाग म्हणता येईल असा, राधा आणि तिच्या महार कुटुंबाशी अंताजीचा स्नेह जमतो हा भाग तर फार परिणामकारक झाला आहे. एकीकडे गावकीत महारांना असणारा मान, त्यातून येणारा त्यांचा उपजत स्वाभिमान, त्यांची जीव लावणारी आणि प्रसंगी जीवावर उदार होणारी वृत्ती या गोष्टी त्याला भावतात, तर दुसरीकडे स्वत:च्या सद्य परिस्थितीतून उद्भवलेला राज्यकर्त्यांविषयीचा त्यांचा रोषही त्याला जाणवतो. (महार अस्पृश्य, म्हणून पेशव्यांच्या पुण्यात त्यांना थुंकीसाठी गाडगं घेऊन हिंडावं लागे). दुष्काळाची हलाखीची परिस्थिती आणि त्यात देशोधडीला लागलेले, कुटुंबियांना विकून पोटाची आग भरणारे लोक... अशा वेगवेगळ्या कारणांनी सर्व थरांतली जनता पेशवाईतल्या गचाळ कारभाराला वैतागलेली आहे हे त्याला दिसतं.
अंताजीची गंमत अशी की जात-पात न पाहता तो मित्र जोडत जातो. मग गेल्या भागात जसे बंगालातले कायस्थ महाशय आणि त्यांची बाणेदार पुरबी होते, तसे या भागात पोतनीस (प्रभू), तोफगोळ्यांचं शास्त्र शिकवणारे सुलेमान आणि (अर्धा फ्रेंच) दुबुक, धडाडीचा पण इंग्रजांना जाऊन मिळणारा जानोबा (महार) यांपासून ते अगदी नाना फडणवीस, एल्फिन्स्टन असे थोरही त्यात येतात.
याउलट पुण्यातली ऐशोआराम आणि रमणे यांत गुंतलेली ब्राह्मण मंडळी त्याला खुपतात. युद्धात नेहमी मागे राहणारे आताचे पेशवे आणि शूरवीर पहिला बाजीराव यांच्यातला फरक अनेक युद्धं पाहिलेल्या अंताजीला चांगलाच जवळून दिसतो. पेशवाईतले साडेतीन शहाणे त्याला भेटतातच, पण दारूच्या नशेत त्यांचं शहाणपण (आणि त्यातलं फोलपण) समजावून देणारा ब्राह्मणसुद्धा भेटतो. (शहाणपणाविषयीचं हे विवेचन अप्रतिम आहे!) मागच्या भागानुसार या भागातही अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा अंताजी साक्षी आहे. पण हे सर्व अंतत: त्याला आणि वाचकाला अंतर्मुख करत जातं. ‘जर असं झालं असतं तर मराठेशाही न बुडती’ असं हे निव्वळ स्वप्नरंजन नाही, तर अनेक ऐतिहासिक ग्रंथांच्या अभ्यासातून मांडलेला मराठेशाहीचा तो लेखाजोखा आहे. उदा: लढाईच्या तंत्रात मराठे तेव्हाच्या इंग्रजांना भारी पडू शकत होते याचे पुरावे त्यात खुद्द एल्फिन्स्टनच्या साक्षीनं दिलेले आहेत.
पण या सगळयाच्या पलीकडे लक्षात राहणारा कादंबरीचा गुण म्हणजे निरनिराळ्या जातींची, पंथांची, प्रांतांची रसरशीत माणसं! त्यात राधा-रखमा यांसारख्या स्वतंत्र बाण्याच्या स्त्रिया येतात, तसेच व्यंकटनाक-जानोबा यांसारखे महार येतात; त्यात इंग्रजांची लोकशाही प्रक्रिया समजावून सांगणारा एल्फिन्स्टन येतो आणि महारणीशी लग्न लावायला तयार होणारा जिगरबाज चिमणाबापू भोसलाही येतो. यल्लम्माला वाहिलेल्या आईची जिगरबाज राधा हीसुद्धा महार-मराठा-ब्राह्मण संकरातून उत्पन्न झालेली, आणि म्हणून समाजपुरुषाच्या चार कोपर्यांतल्या त्या चौघांनी लाडाकोडात वाढवलेली असते. सर्वांचं मिश्रण असणारा आणि सर्वांच्या आशा-आकांक्षांना जागा देणारा एक आधुनिक हिंदुस्थान बनू शकतो याविषयीची आशा त्यात दिसते, आणि ते आताच्या मराठेशाहीत होणे नाही याविषयीचा विषादही दिसतो. मग अखेर ‘बारा-चौदा आण्यांस नीट राखणारा’ इंग्रज ‘दो-चार आण्यांसाठी’ वाईट का म्हणावा, ही आधुनिक वास्तवाबद्दलची अंताजीची जाण भावू लागते.
नेमाड्यांना ‘हिंदू’मध्ये अठरापगड जमातींच्या उबदार भारतीय वास्तवाला काहीसं भिडता आलं खरं, पण आधुनिकतेला मात्र त्यांनी अस्पृश्य मानलं. त्यामुळे ते फार स्मरणरंजनात्मक झालं आणि त्याला उघड मर्यादाही पडल्या. त्याउलट अशा मिश्रणातच भारताचं भविष्य आहे हे इथे जाणवतं. सर्वसमावेशक असेल तेच इथे टिकेल; त्याउलट वजाबाकीचं राजकारण करणारे थोड्या काळात नष्ट होतील, ही जाणीव अंताजीला अठरा-एकोणिसाव्या शतकात रसरशीत जगून येते. तीच जाणीव शिवाजी किंवा अहिल्यादेवी होळकर (किंवा नंतरचे गांधीजी) यांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमागे आहे. खास भारतीय म्हणता येईल अशी ही समज सर्वसामान्यांत असते म्हणूनच या व्यक्ती जनतेनं लोकोत्तर ठरवल्या; पण म्हणजे अशी जाण ज्या राज्यकर्त्यात नसेल त्याला या लोकोत्तर मिथकांच्या जवळपासदेखील पोहोचता येणार नाही हे ओघानं आलंच.
एका कळीच्या कालखंडात घडलेल्या इतिहासाला साक्षी मानून असा व्यामिश्र आणि कालातीत आशय मांडणं आणि त्याला रसाळही करणं, ही तारेवरची कसरत नंदा खरे यांना सुरेख साधली आहे. समकालीन मराठी कादंबऱ्यांत मानाचं स्थान पटकावेल अशी गुणवत्ता ‘बखर अंतकाळाची’मध्ये नक्कीच आहे.
बखर अंतकाळाची
लेखकः नंदा खरे
मनोविकास प्रकाशन (पहिली आवृत्ती: डिसेंबर २०१०)
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 8:06 pm | श्रावण मोडक
नका लिहित जाऊ हो असं काही. आता दोन्ही पुस्तकं घेऊन वाचणं आलं. :)
12 Apr 2011 - 8:33 pm | मुक्तसुनीत
जंतूंचे लिखाण = रोचक आणि तितकेच मर्मस्पर्शी लिखाण. या लेखाने हा पायंडा मोडलेला नाही.
अंताजीची दोन्ही पुस्तकं वाचलेली नाहीत. काही प्रश्न पडले.
अंताजी सरळसरळ लिबरल विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे. दोनशे वर्षांनंतर हा जो लिबरॅलिजम आहे तो आकर्षक वाटतो , योग्य वाटतो. पण जातीपातीपलिकडे जाऊन पाहणारा अंताजी वास्तव वाटतो का ? फुल्यांनी आणि नंतर आगरकरांनी अपरिमित कष्ट सोसून महाराष्ट्रामधल्या - आणि विशेषकरून पुण्यातल्या - अभेद्य वाटत असलेल्या सनातनपणावर जे प्रहार केले, त्याकरता आयुष्याची किंमत मोजली त्या मूल्यांच्या संदर्भात अंताजीची एन्लाइटनमेंट अर्थातच अत्यंत आकर्षक, स्पृहणीय वाटते , परंतु , इट इज अ ह्यूज लीप ऑफ फेथ.
असं म्हण्टलं जातं की ज्या काळामधे आपण जगत असतो त्या काळाचं नेमकं मूल्यमापन करणं ही एक अत्यंत कठीण , अशक्यप्राय गोष्ट आहे. पेशवाई का बुडाली नि त्याच्या आगेमागे घडलेल्या घटनांचा धांडोळा राजवाडे/शेजवलकर/फाटक/पोतदार आणि अन्य अनेकानेक विद्वानांनी घेतला आहे. यामागे , गतकाळच्या घटनांना निरनिराळ्या साधनांच्या द्वारे मापन करण्याचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांचे कष्ट आहेत. अंताजीने हे सगळे ज्ञान इंटर्नलाईज तर केलेले नाही ना ? तसे असल्यास , एरवी रंजक असलेला हा सर्व प्रवास काहीसा अविश्वसनीय वाटेल अशी एक वाचक म्हणून भीती वाटते.
अर्थात माझे वरचे विवेचन म्हणजे हवेतल्या गप्पा आहेत कारण मी पुस्तके वाचलेली नाहीत. आणि हा दोष आहे असे घटकाभर धरले तरी या पुस्तकांचे महत्व रेषाभरही उणावू नये.
12 Apr 2011 - 10:14 pm | आळश्यांचा राजा
अगदी हेच म्हणतो.
हाइंडसाइटचा फायदा अंताजीला नाही. कादंबरी वाचूनच कुतुहल शमेल, की अंताजीला या भविष्यात झालेल्या आकलनाचा फायदा लेखक/ लेखिकेने भूतकाळातच(समकाळातच) दिलेला आहे की कसे ते.
साडेतीन शहाणे/ तत्सम शहाण्या विद्वान मंडळींना अंताजीच्या काळात अंताजीला झाले ते आकलन झाले होते का, आणि तसे त्यांनी कुठे लिहून ठेवले होते का, याचेही कुतुहल आहे. कुणाला काही संदर्भ ठाऊक असल्यास लिहावेत.
12 Apr 2011 - 8:44 pm | पैसा
आता हे पण पुस्तक वाचणं भाग आहे!
12 Apr 2011 - 9:18 pm | धनंजय
चांगली ओळख. मुक्तसुनीत यांना वाटणारे कुतूहल मलाही वाटले.
लेख वाचताना सुचलेले थोडे अवांतर खरडवहीमध्ये...
12 Apr 2011 - 9:27 pm | आत्मशून्य
.
12 Apr 2011 - 10:41 pm | प्राजु
क्लास!! हे पुस्तकही घ्यावेच लागेल.
12 Apr 2011 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मागचा धागा वाचूनच पुस्तक घेतलं आहे, फक्त पुस्तक-वाचनाचा ठरवलेला क्रम बदलावासं वाटत आहे.
13 Apr 2011 - 12:49 am | चिंतातुर जंतू
‘कल्पित वाङमय, त्यात अंतर्भूत/विवक्षित/अपेक्षित कट-सहकार्य (कॉम्प्लिसिटी), त्याचे आशयावर होणारे साधक-बाधक परिणाम आणि विसाव्या शतकातील साहित्यविचारांमुळे त्यांत झालेले बदल – स्वरूप, विकास व चिकित्सा’... मुक्तसुनीत यांच्या शंकानिरसनासाठी प्रस्तुत नावाचा एखादा भारदस्त शोधनिबंध प्रसवावा लागेल की काय अशी तूर्तास भीती वाटते आहे ;-)
असो. मुळात विसाव्या शतकातला लेखक अनंत (उर्फ नंदा) खरे जेव्हा ‘माझ्या अनंत (उर्फ अंताजी) नावाच्या पूर्वजाच्या कागदपत्रांवरून थोडा हात फिरवून ती सटीप सादर करीत आहे’ असे जाहीर करतो तेव्हा एक मोठा मिश्कील (टंग-इन-चीक) आवेश त्यात अंतर्भूत आहेच. त्याला अनुसरून ‘तुमचा अविश्वास खुंटीला टांगून आत या’ (सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ) ही सूचनासुद्धा त्यात आलीच. (त्यामुळे अंताजी हा बेभरवशाचा निवेदक आहे हेही ओघाने आलेच.) मराठीतले सर्व प्रथितयश ऐतिहासिक कादंबरीकार जो आवेश आणतात त्यात ही मिश्किली तर नसतेच; उलट विभूतीपूजेची, संस्कृतीरक्षणाची आणि स्मरणरंजनाची दाट आणि धीरगंभीर छाया त्यावर असते. त्यावर उपाय म्हणून पहाता हा अंताजी रोचक वाटतो हे सर्वप्रथम नमूद करतो!
‘जातीपातीपलिकडे जाऊन पाहणारा अंताजी वास्तव वाटतो का’ याचा विचार करण्यासाठी मुळात हे लक्षात घ्यायला हवे की आपण जो काळ पाहतो आहोत त्यात ज्ञानेश्वर-तुकाराम कधीच होऊन गेले आहेत. त्यामुळे ‘भूतां परस्पर जडों मैत्र जिवांचे’ हे काही नवीन नाही. दुसरा (आणि माझ्या मते अधिक महत्त्वाचा) मुद्दा असा आहे की ही उदारमतवादी विचारसरणी कमीअधिक प्रमाणात भारतीय जनसामान्यांत एका दैनंदिन सहजपणाद्वारे वावरत होती असे म्हणायला वाव आहे. त्यामध्ये तर्ककठोर (ब्राह्मणी?) जातविचारांपेक्षा एक सोय आणि मानवी उब होती. (अगदी नेमाड्यांनासुद्धा गतकाळ आणि गावगाडा प्रिय आहे त्याचं हे एक मुख्य कारण आहे.) ‘जोवर महार माझ्या माजघरात येत नाही (किंवा माझ्या पोरीबाळी नासवत नाही) तोवर मी त्याचा आदर करतो. इतकंच नव्हे तर त्या व्यवस्थेत शक्य होईल तशी मायाही त्याज देतो; अन तो मला (आणि गावाला) त्याजकडील सर्वात मूल्यवान चीज म्हणजे त्याचे इमान देतो.’ ही तर सर्वसंमत आणि अधिकृत बाब होती. मग ज्या व्यवस्थेत तो अभिमानी महार नाडला जाऊ लागला त्या व्यवस्थेविषयी त्याला किंवा कुणबी/बलुतेदार/उच्चवर्णीय या त्याच्या सहवासात असलेल्या घटकांना व्यक्तिगत पातळीवर चीड वाटणे साहजिक वाटते. अंताजीचे तसेच होते.
स्त्रियांच्या बाबतीतदेखील 'बळजबरी न करता स्त्री भोगली तर अधिक सुख प्राप्त होते' हा साधा शहाणा विचार कुणाच्याही मनात येऊ शकेल. त्यापुढे जेव्हा प्रिय स्त्रीची बारगिरांकडून विटंबना होते किंवा तिला मर्जीविरुद्ध सहगमन करणे भाग पडते तेव्हा त्यांद्वारे पुरुषाला आपल्या असहायतेची जाणीव होते. मग तो आपोआप रुढी टाळणे पसंत करू लागतो हेही साहजिक वाटते. अंताजीचा उदारमतवाद हा त्याच्या मनातला इतरांविषयीचा स्नेह आणि रुढींच्या पायी त्याच्या स्नेहींचा पडलेला बळी अशा कडवट अनुभवांती आलेला आहे. हे अनुभव त्यावेळी सहज येत असत, तद्वत अंताजीचा उद्वेग आणि त्यातून येणारा व्यापक विचार साहजिक वाटतो.
शिक्षण आणि थोडे स्वातंत्र्य प्राप्त झालेली पुरबीसारखी हुशार स्त्री आणि काशीसारखी (त्याची पत्नी) मूर्ख स्त्री अशा दोन्ही पाहून त्याला स्त्रीमधल्या शक्यता मारून टाकणारी चौकट जाचक वाटू लागते. याला ऐतिहासिक किंवा साहित्यिक आधार आहेत. उदा: वसंतसेना ही गणिका आहे म्हणून स्वतंत्र आहे, अनुभवी आहे, बहुश्रुत आहे. त्यामुळे तिच्यावर हुशार चारुदत्ताची प्रीती जडते. स्वतंत्र वृत्तीची स्त्री वेश्या बनणे पसंत करते (पत्नीत्वात स्वतंत्र वृत्तीच मरून जाते); वेश्या पुरुषाला मोहण्यासाठी अनेक विद्या प्राप्त करते आणि मग बौद्धिक सहवासाची भूकही वेश्येत शमते (पत्नीत नाही) हे फार पूर्वापार चालत आले आहे.
असो. थोडक्यात, लेखक अनंत खरे यांनी ऐतिहासिक साधनांचा फडशा पाडलेला आहेच, पण त्यांचा मानसपुत्र अंताजी स्वानुभवातून शिकत जातो. वेगवेगळे अनुभव घेण्याची (पक्षी: मुलुखगिरीची) त्याची इच्छा ही मातृछायेला लवकर मुकल्याने येते. म्हणजे एक प्रकारे मुक्त स्त्री (वेश्या), कुटुंब वाऱ्यावर सोडणारे जिगरबाज कर्तृत्ववान पुरुष आणि कुटुंबसंस्थेत उब न मिळाल्याने बाहेर पडलेला अंताजी हे एकमेकांकडे आकर्षित होतात आणि स्नेहाचे धागे त्यांना एकत्र ठेवतात. हा साहित्यिक परवाना (पोएटिक लायसन्स) म्हणता येईल कदाचित; पण मला तरी ती कालातीत गोष्ट वाटते ;-)
13 Apr 2011 - 2:19 am | मुक्तसुनीत
जंतूंनी बर्याच बाबींचा परामर्ष घेतलेला आहे. धन्यवाद.
पोएटीक लायसन्स बद्दल दुमत नाही. शेवटी काहीही झालं तरी हे एक फिक्शन आहे. त्यात लेखकाचा स्वतःचा असा अजेंडा हा असणारच. एकंदर मूर्तीभंजन , खट्याळ, मिष्किल असा दृष्टीकोन बाळगणे हे समजण्यासारखेच नव्हे तर अशा स्वरूपाच्या कृतीचे शक्तिस्थान आहे याबद्दलही शंका नाही. मुद्दा, हा शेवटी विश्वसनीयतेचे रबर कितपत ताणायचे असा आहे. लिहित असलेल्या कृतीची प्रतिज्ञा "विश्वसनीयता" अशी नसून , "एकंदर घडामोडीबद्दल , समाजातल्या घुसळणीबद्दलचा एका उदारमतवादी दृष्टीकोनाच्या लोलकातून घेतलेला धांडोळा" अशी आहे, हे उघड आहे. हेच रबर जर का अति ताणले गेले तर त्याचा फार्स होऊन बसता. नंदा खर्यांना इतपत निश्चित माहिती आहे.
महार (किंवा एकंदर पददलित समजल्या गेलेल्या जातीप्रजाती) यांना "नाडण्याची" प्रक्रिया पेशवाई किंवा उत्तर पेशवाई च्या कालखंडात सुरू झाली असे जंतूंनी ध्वनित केलेले आहे. ते मला फारसे पटलेले नाही.
असो. अंताजीच्या बखरीमध्ये निश्चितच नावीन्य आहे आणि ते नावीन्य एकंदर घटनांकडे "हरहर गेली ती पेशवाई आणि बुडला तो धर्म आणि रसातळाला गेला एक वैभवशाली समाज" या "प्राचीन-ते-हिरण्मय" या दृष्टीकोनाला धोबीपछाड घालण्यात सामावलेला आहे हे निश्चित. मात्र , "घाशीराम कोतवाल" लिहिताना तेंडुलकर ज्या आर्ग्युमेंटच्या आड दडले तेच या अल्ट्रालिबरल अंताजीच्या बाबतीत लागू करणे अपरिहार्य आहे या निष्कर्षाला मी येतो आहे.
13 Apr 2011 - 9:25 am | सहज
कादंबरी नक्कीच रंजक व रोचक आहे. यावर मराठी मधे छान टिव्ही सिरीयल निघेल का? अवघड वाटते पण बघायला मजा येईल.
चिंतू यांचे रसग्रहण, समीक्षा वाचणे म्हणजे मेजवानीच!!
13 Apr 2011 - 9:48 am | नगरीनिरंजन
सुंदर समीक्षा आणि रसग्रहण!
चिंजंचे आभार!
वरील चर्चाही उपयुक्त! कल्पनाचित्रच असल्याने त्या काळातच स्वानुभवाने म्हणा अथवा बंडखोर स्वयंभू बुद्धीमत्तेमुळे म्हणा त्याच काळाचे योग्य मूल्यमापन करणारा अंताजीसारखा एखादा मनुष्य असल्यास त्याचे विचार कसे असतील अशी कल्पना लेखकाने केली हे योग्यच वाटते आणि चिंजंच्या समीक्षेवरून या कल्पनेचा वापर करून लेखकाने अतिरंजित असे काही न लिहीता गतकालातील घटनांचा पश्चातदृष्टीने उमगलेला अर्थ अंताजीच्या तोंडून वदवला असावा असे वाटते.
अंताजीसारखे लोक तेव्हा नसतीलच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ब्राह्मण परिवारात जन्माला येऊन लावण्या लिहीणारे शाहीर झालेच की तेव्हा.
13 Apr 2011 - 5:33 pm | चिंतातुर जंतू
‘सुरू झाली’ असे ध्वनित झाले असल्यास ती माझी चूक समजावी. पेशवाईआधीदेखील महार हा गावकुसाबाहेरच होता. पण गावकीत महाराला काही मान असे. स्वाभिमानी आणि इमानी अशी महारांची वर्णने इतिहासात दिसतात. चोखामेळा (चौदावे शतक) महार होता. एकनाथ महाराचे मूल वाचवतात असा प्रसंग प्रसिद्ध आहे. एकनाथांनी अनेक रचना स्वत:ला महार मानून केल्या. त्यामुळे वारकरी पंथात महारांना काही स्थान प्राप्त झाले असे दिसते. सर्व जातीच्या लोकांना त्यांचे गुण ओळखून स्वराज्यात स्थान देणे हा शिवाजीच्या राजवटीचा एक महत्त्वाचा भाग होता. तद्वत महारांचे गुण ओळखून त्याने आपल्या सैन्यात मोठी महारभरती केली. वारकरी पंथ असो किंवा शिवाजीची राजवट, सर्वसमावेशकता हा त्यांना मिळालेल्या व्यापक लोकाश्रयामागचा एक मोठा घटक होता असे मानले जाते. या प्रक्रियेत उत्तर पेशवाईमध्ये मात्र खंड पडला. शिवाजीसाठी लढणारा जिगरबाज महार पेशवाईच्या विरोधात इंग्रजांच्या बाजूने का लढला त्याचे कारण या वाढीला लागलेल्या जातीयतेत होते. जालावर महार रेजिमेंटविषयी माहिती पाहता त्यातही शिवाजी आणि इंग्रज यांचे उल्लेख दिसतात. इथे तर चक्क उत्तर पेशवाईत महारांना सैन्यात घेणे बंद झाले असा उल्लेख दिसतो. नंतर १८५७मध्येदेखील महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. यासाठी महात्मा फुले यांनी त्यांचे कौतुक केले असेही सांगतात.
असो. उत्तर पेशवाईमधली वाढलेली जातीयता ही केवळ गावकुसाबाहेरच्या समाजापुरती मर्यादित नव्हती. देशस्थ-कोकणस्थ वाद, प्रभू ग्रामण्य असे अनेक पदर त्याला होते. याची परिणती अशी झाली की पेशवाईच्या बाजूने (आणि इंग्रजांच्या विरोधात) लढावे अशी कळकळ मराठेशाहीतल्या जनसामान्यांना (म्हणजे बहुसंख्यांना) वाटेनाशी झाली. शिवाजी-बाजीरावाच्या वेळची एकी नंतर नष्ट झाली. खरे यांनी आपल्या कादंबरीच्या अखेरीस एका लेखात याचा आढावा घेतला आहे. अगदी राजवाडे किंवा न.चिं.केळकर (संदर्भ: ‘मराठे व इंग्रज’; १९१८) अशांचा उल्लेख करून खरे हे दाखवतात की मराठेशाही बुडण्याची कारणे धुंडाळतानासुद्धा बऱ्याचदा ब्राह्मणेतर जातींना अनुल्लेखानेच मारले जाते. लोकसंख्येच्या तुलनेत बहुसंख्य असलेला समाजाचा एक मोठा भाग आणि त्यांच्या जाणिवा मग या इतिहासातून वगळले जातात. ही तत्कालीन समाज आकळण्यातली एक मर्यादा म्हणावी लागेल.
विश्वसनीयतेचे रबर कितपत ताणायचे – इथेही माझ्या विवेचनामुळे कदाचित थोडा गैरसमज झालेला असण्याची शक्यता आहे. मुळात अंताजी मराठेशाहीत किरकोळ भूमिका बजावत असतो. फक्त तो पुणेकर पेशवे आणि नागपूरकर भोसले यांमध्ये हेर (डबल एजंट) असल्यामुळे काही मोठी माणसे त्याला जवळून पहायला मिळतात एवढेच. कादंबरीतला बराचसा भाग त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या किंवा मोहिमेवर भेटलेल्या माणसा/प्रसंगांविषयी आहे. हेरगिरीसाठी गरज लागेल त्याप्रमाणे भाषा त्याला अवगत होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे प्लासी लढाईअगोदरच्या बंगालात तो बंगाली आणि इंग्रजी शिकतो. नंतर (दुसऱ्या भागात) इंग्रज जसा मराठी मुलखात येतो तसा तो इंग्रजाकडे दुभाषा म्हणून लागतो. यातला किरकोळ योगायोग सोडता यात फार अविश्वसनीय असे काही मला तरी जाणवले नाही. चार ठिकाणी हिंडून, अनेक वेगवेगळे धंदे करून रोचक ओळखी आणि लोकसंग्रह बाळगणारी अशा प्रकारची अनेक माणसे व्यक्तिगत आयुष्यात भेटलेली असल्यामुळे कदाचित मला त्यात काही विशेष वावगे वाटले नसेल. पण अर्थात हे माझे सापेक्ष मत झाले, हे खरेच.
याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.
6 Jan 2014 - 10:14 am | संभाजी
चिंतातुर जंतु यांची नंदा खरे यांच्या पुस्तकावरील परीक्षणे आवडली. त्यांनी आणखी कुठल्या पुस्तकांवर लिहिले आहे?
9 Jan 2014 - 1:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जंतू यांचं मिसळपाववरील अन्य लिखाण इथे मिळेल. जंतूंनी अन्यत्र पुस्तकांबद्दल लिहीलेलं हे काही मिळालं:
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (या लेखाच्या खाली आणखी दोन दुवे आहेत.)
'द हेअर विथ अॅम्बर आईज' - वस्तू, व्यक्ती आणि सृजन यांच्यातलं तलम नातं
जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो? (हा एक वाचन संबंधित लेख आहे.)
आणखी एका फ्रेंच पुस्तकावरही लिहीलेलं वाचल्याचं आठवतं. पण तो दुवा आत्ता सापडत नाहीये. पुस्तकाचं नाव Indignez-Vous!
6 Jan 2014 - 11:57 am | राही
धागा वर आणल्याबद्दल संभाजी यांचे आभार. इतके सुंदर रसग्रहण आणि त्यावर इतके सुंदर प्रतिसाद. चिं.जं. आणि मु.सु. या दोन्ही मातबरांनी हा धागा पुढे का नाही नेला असे वाटून गेले.
6 Jan 2014 - 3:20 pm | रघुपती.राज
सदर पुस्तक वाचकाला हलवुन सोडते. वाचताना अनेक वेळा मी थाम्बलो. नव्हे थाम्बावेच लागले. भयाण वास्तव की अतिरन्जीत इतिहास या वादात न पडता हे पुस्तक वाचा. काय मिळेल ते शब्दात सान्गणे कठिण आहे. पण जे काही मिळते ते डोळ्यात अन्जन घालुन जाते. जीवनाकडे बघण्याचा एक नवा द्रुश्टीकोन देउन जाते.
6 Jan 2014 - 7:38 pm | चित्रगुप्त
चिजंचा हा धागा वाचूनच ही दोन्ही पुस्तके घेऊन वाचली, आणि अतिशय आवडली होती. या पुस्तकांचा परिचय करून दिल्याबद्दल चिजंचे शतशः आभार.