झिंग थिंग..!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 6:09 pm

ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे..

आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली ..

पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!!

संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली..

हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !!
मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने..
गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!!

कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला..

लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं..

त्याचा पुनर्जन्म झाला..

आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !!

ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही..

लाईम अँड लेमोनी लिम्का.. ही जुनी लाइन तर आजही नव्यानं जागी झाली आहे..

"ये नोकझोंक शरारतें" वाल्या फ्रेश अ‍ॅडसोबत तो परत आलाय..!!

मला लिम्का "प्यायला" फार आवडायचा नाही. पण त्याच्या बुचाच्या आत रबरी स्टिकर मिळायचा..डिस्ने चा..

आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश वर्तन करून, तिथल्या स्टाफकडे फेकलेली लिम्काची बुचं मागायचो..मी लाज सोडायचो आणि आई बाबाना लाज आणायचो..

कधी चुकून कोल्ड्रिंक पिण्याची ऑफर मोठ्यांकडून झालीच तर लिम्का मागवायचा...दोन घोट पिऊन निर्लज्जपणे टाकून द्यायचा (म्हणजे बिचार्‍या आईला प्यायला लावायचा..आई हे देवाचं रूप..!!)

..आणि (मुद्द्याचं..!!) बूच मिळवायचं..

नजर भंगारवाल्यासारखी सदैव होटेलातल्या खाली पडलेल्या बुचांच्या ढिगावर..लाल बुचात स्टिकर नसतो.. हिरव्या बुचातच असतो हे मी लवकरच शोधून काढलं होतं.. माझी बोटं आणि नखं पत्र्याची बुचं खरवडून खरवडून कुरतडल्यागत दिसायची..

डोनाल्ड डक मला जाम आवडायचा...मऊ मऊ रबरावर छापलेले रंगीत मिकी, डोनाल्ड, स्क्रूज, लुई, ह्युई, ड्युई..त्यांची मऊ थप्पी बोटांत दाबून भाव मारायचा मित्रांमधे.... त्या स्टिकर्सची एक्सचेंज व्हैल्यूही खूप होती..चार पाच स्टिकर्सच्या "बदली" एखादं मॅग्नेट (त्या वेळच्या पोरांच्या भाषेत "लवचिंबक") सुद्धा मिळू शकायचं..कोण म्हणतं की वस्तुविनिमय फार जुना झाला.. आमच्या शाळेत तर त्याचं "कमोडिटी एक्सचेंज" होतं..

अमुक एक इतके स्टिकर्स जमा केले की काहीतरी बक्षीस मिळतं अशीही एक बोलवा होती.. पण मी कधीच माझे स्टिकर द्यायला तयार झालो नसतो..
............

कॅडबरीजचं "डबल डेकर" हे माझं अगदी पहिलं प्रेम..थोडं कुरकुरीत..खुटखुटीत आणि बरंच बरंच टेस्टी..हे जर कोणाला आठवत असेल तर मला खूप ग्वाड वाटेल.

..त्याचं जाणं मला खूप धक्का देऊन गेलं..मिलिंद बोकिलांच्या "शाळा" मधल्या शिरोडकरच्या जाण्यासारखं..

पण आयुष्य पुढं जात राहातं.. (.. फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी...!!!)

..तसंच मग कधीतरी कॅम्पको चॉकलेट आलं.. कॅडबरीजच्या जगात काही नाही तरी फक्त एक चेंज म्हणून ते सॉलिड आवडलं..

कुठे गेलं ते काय माहिती..शोधतोय शोधतोय.. मग काही वर्षांनी नाद सोडून दिला..

.....

डबल कोला.. हे एक पेय .. आणि रोला कोला नावाच्या गोळ्या..

रोला कोला..रोला कोला..इसमें कोला का मजा अलबेला..!! रोला कोला...कोला का गोला.. !!

बघा अजूनही जिंगल आठवतेय मला...

साल्या या जिंगल्स ही गायब झाल्या..नवीन विजुअल अ‍ॅड्सच्या तंत्रामधे..
...
नोगा जाम.. मस्ती भरा स्वाद खरा..
...
लाईफबॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां..
...

माल्टोवा मम..

...
दातों को सडने से बचाता है कोलगेट..

पेस्ट आहे पण जिंगल गेली.
...

सुधा सुधा सॉफ्ट ड्रिंक काँन्सेन्ट्रेट
अड़तीस गिलास एक पैकेट से बने..
तेरा तरह के स्वाद नये नये..
...

शार्प नावाचं पेन...रेनोल्ड्स ०.४५ फाईन कार्ब्युअर ..

न्युट्रामूल..अंकल चिप्स..(बोले मेरे लिप्स..आय लव्ह अंकल चिप्स..).लॅक्टो किंग..

"O.K. च्युईंग गम".."डबल बबल गम"..

एक्स्ट्राँग गुलाबी पेपरमिंट..पॉपिन्स.. रावळगाव..

हे सर्व ब्रँड एकतर संपले..किंवा त्यांचा चार्म तरी गेला..

अनब्रँडेड चिजा तर मोजण्यापलिकडच्या..

मनोज पान शॉपच्या बरणीतल्या लाल गोळ्या..किंवा पांढर्‍या दूधगोळ्या..
लिमलेट्च्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या गोळ्या (५ पैसे..!!)..
चंदा आईस्क्रीम नावाच्या ढकलगाडीतली गार गार लाल कांडी..
कालाखट्टावाला पेप्सीकोला..खारट बर्फाळ प्लॅस्टिकच्या पिशवीचं टोक दातांनी तोडून गार गोड थेंब जिभेवर चोखायचे..

प्रत्येक brand कड़े स्वत:चं काही ख़ास होतं..आहे..!!
प्रत्येक brand कड़े स्वत:ची काही बात होती.. आहे..!!

आणि आपल्यातही ...

कुछ ख़ास है हम सभी में..
कुछ बात है हम सभी में..
बात है..ख़ास है..
क्या स्वाद है जिन्दगी में..!!
...

अर्थकारणविचारलेखमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

1 Feb 2012 - 3:24 pm | प्रास

तुझी सुपारी मी काढतो. (दातांचा नसलो तरी मी पडलो वैद्यकिय व्यावसायिक ना, हे जमलंच पाहिजे ;-))

असो. तो अभिनेता होता सी. एस्. दुबे.


या चित्रामध्ये तरुण विजु खोटे बरोबर खुर्चीवर बसलेले दिसतात तेच ते सी. एस्. अर्थात चंद्रशेखर दुबे.

झालं समाधान? खुश? :-)

परफेक्ट प्रासदादा.. यहीच्च है वो...

जुनाट दातदुखी एकदम थांबली.. :)

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 9:56 pm | वपाडाव

लै दिसांनी ह्या धाग्यावर रिप्लाय द्यायला आलोय.....
आम्ही सुद्धा उकंडे-नाल्या-गटारं सर्वतोपर फिरुन काडेपेटीचे कव्हर गोळा करत असु...
लै भारी वाटायचं तेव्हा.... (लवचिंबक मस्त)

काही अ‍ॅडिशन्स माझ्यातर्फेही...

१. लिसन्सी सोप = राहुल पानी चला जायेगा...
२. सौंदर्य साबुन निरमा = तुम हुस्नपरी, तुम जाने जहॉ, तुम सबसे हसीं, तुम सबसे जवॉ...
--(आता ह्या अ‍ॅडमध्ये सोनाली बेंद्रेच्याऐवजी हंसिका मोटवानीला घेतले आहे.)
३. निरमा सुपर = ओ हो, दिपिकाजी. आइये, आइये. ये लिजिये आपका सब सामान तैयार...
ये नही वो...लेकिन आप तो हमेशा वो महेंगीवाली टिकिया... लेती थी... लेकिन वही सफेदी वही झॉग कम दामों मे मिले, तो कोइ ये क्युं ले, वो न लें... मान गये, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनों को...

एक प्रश्न ::
४. दुरदर्शनवर एक गाणं यायचं. त्याचे बोल पुर्ण आठवत नाहीत. (१९९५च्या आसपास असेल कदाचित)
==> सौरमंडलमे टिमटिम करते तारें अनेक है... XXXX XXXX गीत सुनाते पक्षी अनेक है....पर निराकार निर्विकार अनंत गगन एक है...

कुणाला माहिती असेल तर या खाली पोस्ट करा प्लीज....

तू "एक चिडिया , अनेक चिडिया" या अ‍ॅनिमेटेड गाण्याविषयी म्हणत आहेस का? ("फिल्म्स डिव्हिजनची भेट" बहुधा)

त्याचेही शब्द असे अनेक / एकवाले होते..

या चित्रावरुन बघ आठवून..

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 4:19 pm | वपाडाव

हे गाणे तर मला माहिती आहे... पारध्याची कथा अन एकीचे बळ वाली कंसेप्ट आहे ह्यात....

मी म्हणतोय ते गाणे खुप वेगळे आहे... व्हिडो मध्ये जे पुसटंसं आठौतंय ते असं की...

भारतातील वेगवेगळ्या चालीरिती (मराठीत कल्चरल डायव्हर्सिटी) एकत्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय...
(मंदिरातील पुजेपासुन = काकडआरती सदृश, मशिदीतील अजान, सुवर्णमंदिरातील गुरवाणी वेग्रे वेग्रे)

गाण्याचा शेवट असा होतो की,
गुंजती है चहु दिशा मे, दिल की धडकन एक है.
अपना चमन एक है, अनंत गगन एक है...
दिल की धडकन एक है !

सांजसखी's picture

31 Jan 2012 - 10:48 pm | सांजसखी

खूपच छान धागा आहे.. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारा...
मे महिन्याच्या सुट्टिला चुलत- आत्ये भावंडे घरी आल्यावर जणू सगळ्या जाहिराती म्ह्णून दाखवून आपल्या ऊत्तम स्मरण शक्तीची प्रचिती देण्याची चढाओढच असायची..
अजून एक जाहिरात आठवली..
जरूरत है..जरूरत है..जरूरत है..
हां हां मिस मेरी कुकर की..
कलावती की सेवा करे जब पती जी !!!!

पाषाणभेद's picture

31 Jan 2012 - 10:55 pm | पाषाणभेद

अरे दुरदर्शनवरील अनेकता में एकता - (एक चिडीया, अनेक चिडीयां), अन्न का हर दाना बचाओ आदींबाबत कुणीच बोलत नाही?

येथे पहा

मामच्या कमोडीटी एक्स्चेंज मध्ये काय होते ? वाचा :-

१. सिगारेट पा़कीटे - चांदी सहीत.
२.भिंग
३.लोहचुंबक
४ बेचकी / गलोल
५. चाक / चक्र / गाडा ( लोखंडी रिंग व एक अँग्युलर काठी घेऊन ऊग्गाच फिरवत फिरवत फिरणे )
६. बोर / चिंचा / आवळे /कैरी
७. चिक्की (१पैसा एक )
८.फुगे / शिट्टी / पाणफुगा / चाकु-ब्लेड (पात )
९. एम. आर. आय. चा बॉल ( इ. ८ वी ते १० वी )
१०. इ़को - स्केच पेन.
११ . गोट्या - ह्याचा भाव क्रुडतेलाच्या भावासारखाच कधी कधी भलताच वधारायचा. माझ्याकडे इ . ७ मध्ये ४० गोट्या होत्या. तेव्हा मी खूप श्रीमंत होतो . अकरावीत "आईने " फेकुन दिल्या -१०-१५ च असतीत , त्यावेळच्या भावना काय सांगाव्या ? गर्भपातच की हो तो !!!

मारकेट , शाळेपूर्वी व नंतर १ तास जोरात असे . मधली सुट्टी हे मिनी मारकेट.
चालू तासाला क्वचित " अकाऊंट "सेटलंमेंट ही होत . ऊधारी होती , वायदा बाजार होता , गॅरेंटर होते , मारामारी होती . पण हलकट / बुडवेगीरी नव्हती .

जाहिराती विषयी थोडेसे

१.माला वेंगरकर ( आमचे एक आजोबा त्याला "वेंगसकर" म्हणायाचे!) कुटुंवाची "विजिल" ची अ‍ॅड आठवली.
आमच्या कमोडिटी एक्स्चेंज मधे पुढील गोष्टी असत.
२ .पामोलीव दा जबाब नही - फावड्या
३.शेविंग आणि मी - गोदरेज शेविंग राऊंड ( काय साल प्रॉडक्ट !!! )
४. निकी - ताशा नावची काय भानगड होती , आठवत नाही .
५.प्रकाश म्हाका तेल - ह्याने केस तर गळतातच पण झोपही लागत नाही , ह्या विडंबना सहित.
६. एक तितली , अनेक तियलीया - हे पण काही तरी होतेच.
७. प्रणय रॉय चे वॉट द गूड वर्ड प्रायोजित करणारी ब्रिटिश एअर वेज ची " इट्स बॉय " ही जबरा अ‍ॅड ...ग. वी . बरोबर आहे की गल्ली हुकली .
८. विनोद खन्नाची सिंथोल ची अ‍ॅड
९. एशिअन पेंट्चा "गट्टु "
१०. नजरा वळ्ती परत अशी सुपर रिन्ची चमक.
११. ऊत्तम लाकुड मजबुत शिसे - नटराज (कि अप्सरा ) पेन्सिल फक्कड दिसे.

थोडा चावटपणा - जुन्या काळातला आहे , समजुन घेणे

१. पाच मिनीटे काम , तिन वर्षे आराम - तांबी बसवा ( काही कळायचच नाही हो ! )
२. वी . आय . पी अंडर वेअर बनियान .........." फीलिंग्स " (येथे एक डोळा मारणारी स्मायली ) जाणकाराना पोहोचल्या का ?

आणि हो , ज्यानी विचार कसा करायचा ह्याची शिंगे फोडली ते दोन महाभाग होतेच .
१.कुणीही प्रायोजित न केलेले पण नेमके / अचुक / तर्क-शुध्द असे गोविंद तळवलकरांचे मटाचे ( पत्र नव्हे , मित्र (कुत्र! ))अग्रलेख.
२. लोकसत्ते मधिल माधव गडकरींची "चौफेर ".

श्रीरंग's picture

1 Feb 2012 - 12:10 am | श्रीरंग

"अय्या! टारझन बाळाराम मधे..."
कैक वर्षांपुर्वी रेडीयोवर सतत लागायची ही बाळाराम मार्केट ची जाहिरात. नुकतीच त्याची नवीन आव्रुत्ती ऐकली कोणत्यातरी रेडीयो वाहिनी वर. जुन्या जाहिरातीचा चार्म जरी त्यात नसला तरी जुनी आठवण जागी होऊन मस्त वाटले.

"साडीमें साडी, पराग साडी" ही भाग्यश्रीची जाहिरात अशीच विनाकारण लक्षात राहणारी.

"काय झालं?...बाळ रडत होतं" या ग्राईप वॉटरच्या जाहिरातीवर शालेय दर्जाचे असंख्य पाचकळ विनोद प्रचलित झाले होते.

ट्रंप कार्ड वगैरेंच्या अनेक वर्षं आधी "बिग फन" नावाचं चुइंग गम मिळायचं. त्याबरोबर क्रिकेटपटूचे छोटेसे व अत्यंत अस्पष्ट फोटो आणी ट्रंप कार्ड वर अस्ते त्याप्रमाणे संक्षीप्त माहिती असायची..

'निकि ताशा किचनेट' नावाच्या फरीदाबादच्या स्वयंपाकघरातील मल्टी-गॅस-बर्नर, मायक्रोवेव्ह वगैरे उपकरणांची जाहिरात असायची ती..."Anything is possible with Niki Tasha Kitchenette" अशी जिंगल असे. (त्यावेळी!) प्रचंड खर्चिक पण आकर्षक वगैरे असायच्या त्यांच्या शेगड्या.

जुना पण वाचनखूण करून ठेवायला हवा असा नॉस्टॅल्जिक धागा वरती आणल्याबद्दल धन्यवाद!

चतुरंग's picture

1 Feb 2012 - 12:34 am | चतुरंग

एकतर आमच्याकडे टीवीच नव्हता. मी कॉलेजसाठी घराबाहेर पडलो आणि टीवी घरात आला! :( मग कधी बघेन तेव्हा त्यावरच्या प्रोग्रॅम्सपेक्षा झैरातींसाठीच अधिक बघितला जायचा.

डबल मजा है और कम दाम
एम आर कॉफी जिसका नाम
इस कॉफी के सर पे ताज
एम आर कॉफी लाना आज!
ही एक जिंगल डोक्यात बसली आहे मस्त वाटायचं ऐकायला

आणि ती कोणत्या रिफाईंड तेलाची जाहिरात? छोट्या रुसून निघून जायचा रेल्वे स्टेशनवर मग आजोबा त्याची समजूत काढायला जायचे आणी म्हणायचे "आज तो गरमागरम जिलेबियां बनीं है!" आणि छोट्या मोठ्ठे डोळे करुन म्हणायचा "जलेबी!!" फार मस्त वाटायचं ऐकायला.

प्रेस्टीज कूकरची -
जो बीवी से करे प्यार
वो प्रेस्टीज से कैसे करें इन्कार!!

------------
कमोडीटी एक्स्चेंज लै भारी गवि! :)
मी काड्यापेटीचे छाप जमवायचो. माझ्याकडे ६५० वेगवेगळे छाप होते. बाबा सिग्रेट आणायला निघाले की मी बरोबर जायचा आणि पानवाल्याकडे रिकाम्या पेट्या मागायचा. येता जाता रस्त्यात 'खाली मुंडी अन पाताळ धुंडीच' असायचे. दिसला की उचल, दिसला की उचल. काही 'दुर्मीळ' छाप तर त्यावरच्या पानाच्या पिचकार्‍यांची तमा न बाळगता गोळा केलेले आठवतात (काय डेडीकेशन होतं! ;) ) मग घरी येऊन छापांची धुलाई आम्ही करायचो आणि वडील आमची शाब्दिक धुलाई! अंगी निव्वळ कोडगेपणा असल्याशिवाय अशी कलेक्शन्स होत नाहीत! ;)
तसंच गोट्यांचं. ५०० पेक्षा जास्त साठवलेल्या आठवतात. मग त्यांच्या दुर्मिळ रंगसंगती नुसार त्यांची किंमत ठरायची. एका स्पेशल गोटीकरता साध्या ५ किंवा १० असं. रिंगण तर केवढालं खेळायचो. शंभर गोट्या टाकायच्या आणि नेमकी एकच उडवायची! गली करुन बैदूल खेळायचो.
भोवरा. सर्रर्र करून हवेत फिरवून तळाहातावर घ्यायला ज्यांना जमायचे ते हीरो होते! मला बरेच दिवस जमेना. शेवटी एकदाचा अथक प्रयत्नाने जमला तेव्हा काय आनंद झाला होता! मग काय विचारता तळहातावर आरीने जखम होईल की काय असे वाटेपर्यंत प्रॅक्टीस चालली होती.
'लवचिंबक' पण होते वेगळाल्या आकाराचे.

(आठवणीत रमलेला) रंगा

मला वाटत ती रिफाईन्ड तेलाची जाहिरात धारा तेलाची असावी
चुभुदेघे

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 2:31 pm | वपाडाव

धारा धारा शुद्ध धारा.... अशी अ‍ॅड होती त्यांची....

अजुन एक खाद्यतेलाची अ‍ॅड आठवते आहे....
एक मुलगा घराबाहेर खेळत असतो... अन त्याची आइ सैपाक बनवत असते... मग तो कोलांट उड्या मारुन घरात येतो... ३-४ पुर्‍यांना छेडत डायनिंग टेबलावर बसतो...
सनड्रॉप तेल का हो ते ???

सनड्रॉपच असाव बहुतेक

सुहास झेले's picture

3 Feb 2012 - 9:05 am | सुहास झेले
मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 3:33 pm | मी-सौरभ

कुणला ती अतुल परचुरे ची चिकलेटस ची अ‍ॅड कशी नाही आठवली, आणि एक त्या हवेत उडणार्‍या पत्र्यांची पण जाहिरात असे.

विसुनाना's picture

1 Feb 2012 - 4:36 pm | विसुनाना

हॅप्पी डेज आर हिअर अगेन- (कोरस : थम्स अप, थम्स अप)
रिफ्रेशिंग कोला - थम्स अप..!

खेडूत's picture

3 Feb 2012 - 1:29 am | खेडूत

झकास!!
एकदा इथे पण भेट द्या. पुन्हा एकदा मागच्या शतकात जाऊन या!

-----------------------जाने कहां गये वो दिन!

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 2:42 am | वपाडाव

आपले कोटी कोटी आभार खेडुतराव.....

बहुगुणी's picture

3 Feb 2012 - 3:11 am | बहुगुणी

धन्यवाद हो, खेडूतराव!

भारी हां खेडूतजी.
ग्रेट!

बहुगुणी's picture

3 Feb 2012 - 3:59 am | बहुगुणी

आणि या काही जुन्या दीर्घकाळ चाललेल्या पण अतिशय आतुरतेने वाट पाहून दर्शकांनी पाहिलेल्या काही दूरदर्शनच्या मालिका, दुर्दैवाने कालौघात यांच्यापैकी बर्‍याचशा सिरियल्स च्या master printsच नष्ट झाल्या आहेत असं ऐकलं :-(

हम लोग

बुनियाद

रजनी

ये जो है ज़िंदगी

नाही म्हणायला 'भारत एक खोज' या मालिकेचे बरेचसे भाग यू ट्यूब वर उपलब्ध आहेतः

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

भाग ७

भाग ८

भाग ९

भाग १०

याखेरीज हे दोन दुवे सापडले:

दूरदर्शन जाहिराती १


दूरदर्शन जाहिराती २

---------------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------------

समीरसूर's picture

18 Jan 2014 - 12:47 am | समीरसूर

मस्त लिहिलंय. लहानपणी 'रामायण' सुरु व्हायच्या आधी शेकडो जाहिराती लागायच्या. त्यापैकी 'टोबी' सायकलची जाहिरात लक्षात आहे. आता मिळते की नाही ही सायकल माहित नाही.

रेडिओवर 'झंडु बाम्...टिकलान् टिकलान (तबल्याचा आवाज) पीडाहारी बाम, सर्दी, डोकेदुखी, वेदना झटपट दूर करी, झंडु बाआआआआआम, झंडु बाम!' अशी जाहिरात नेहमी यायची.

लायसिलची जाहिरात कॉमेडी होती. "डोक्यात सुटली खाज, तर लायसिल लावा..."

'पुरे घर के बदल डालूंगा...लक्ष्मण सिल्वेनिया'

'इस सिमेंट में जान है...' अंबुजा सिमेंट

'खाये जाओ, खाये जाओ, लिज्जत के गुण गाये जाओ...लिज्जत पापड हीहीही हीहीही'

'ससा डिटर्जेंट टिकिया लाओ, बहुत देर चले, कीमत भी मुनासिब, पैसे भी बचाओ, ससा डिटर्जेंट टिकिया लाओ...' यात अजय वढावकर नोकर दाखवला होता. मराठी कलाकार त्याकाळी नोकराचीच कामे करीत.

'जळणाला लाकूड, गुरांना चारा, गाठीला पैका, घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येता दारी'

खूप आठवणी दाटून आल्या...

मिथुन आणि (बहुतेक) रति अग्निहोत्री येकदम बॉटम्स अप इष्टाईलने ते ड्रींक प्यायचे. कह तुम और थ्रील हाय मेरा दील असं काहिसं जींगल होतं. तेंव्हा आमचे काका-मामा लोक्स असच काहितरी पीत असणार घराबाहेर म्हणुन खुप अप्रुप वाटायचं... मिथुनची फाईट आणि रतिचं सौंदर्य या थ्रीलमुळे उजळुन आल्यासारखं वाटायचं.

सीमा बल्ब और ट्युब म्हणत श्रीदेवी अशी काहि दिलखेचक अदा दाखवायची कि आपण येकदम फ्लॅट. आम्हि छोटे पोट्टे नुसतं बघुन आनंदीत व्हायचो तर मोठे पोट्टे त्यानंतर नेमकं काय कुजबुजतात आपापसात याबद्द्ल प्रचंड उत्सुकता असायची.

निकीताशा किचनेट का काहितरी अ‍ॅड होती.. बहुतेक फुड प्रोसेसरची. त्यात एक कुत्रं भारी उड्या मारायचं. दिल्ली-बॉम्बेकडे (तेव्हा बॉम्बेच) असली भारी लाईफ स्टाईल असते याची खात्री असायची व आपल्याकरता ते एक स्वप्नच आहे याची जाण असायची (खंत अजीबात नाहि... बाबारे तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं)

भारी दिवस होते राव.

चॉकलेट च्या चांद्या कुठुनही कचर्‍यातुन गोळा करायचो. आई-बाबांनी खुपच दम दिला म्ह्णुन बंद करावं लागलं नाहीतर अश्या चांद्या गोळा करुन बहुतेक त्याला तेल लावायचो, जेणे करुन ते परत गुळ्गुळीत होण्यासाठी खटाटोप, किंवा खुप प्रेस करुन जाड पुस्तकांमध्ये ठेवुन द्यायचं.... काहीही येडचाप उद्योग केले आहेत. आता कदाचीत स्वतः च्या मुलांना असं करताना बघुन आपलं डोकं फिरु शकेल.
दुसरी एक मजेशीर आठवण म्हणजे बाकिच्या जाहीरातींची कशी जोर्-जोरात गाणी म्हणायचो... तसचं सेम टु सेम्...माला डी..माला डी जोर-जोरात गायचो... त्यात कॉये मोठ्ठसं... त्यात आई चा ओरडा खाण्यासारखं काय आहे, हे कळण्यासाठी तेव्हा आजच्यासारखी बाकीची साधनं उपलब्ध नसल्यामुळे वाट बघायला लागली होती.
आपण दुरचित्रवाणीवर उठता-बसता ज्या जाहीराती बघतो,त्याचे प्रत्यक्ष प्लँट किंवा ऑफिसेस पहिल्यांदा बघताना अगदी धन्य धन्य झालेलं आठवतयं.
कांजुर स्टेशन वरुन दिसणारं क्रॉम्प्ट्न ग्रिव्ज, विक्रोळीची गोदरेज कॉलनी, दादर चं बाबुभाई जगजीवन दास्.अजुनही बरचं काही.
नंतर नंतर ह्या सगळ्या गोष्टी सवयीच्या होउन गेल्या, पण प्रथम दर्शन डोक्यात फिट्ट बसुन आहे.

--
मयुरा.