नमस्कार मंडळी,
दसर्यानिमित्त शिवाजी पार्कावर झालेल्या ५० डेसिबलच्या मेळाव्याबद्दल बरीच वर्तमानपत्र, वाहिन्या, मराठी आंतरजालावरील धागाकर्ते वगैरे लोकांनी खूप लिहून बक्कळ चर्चा केली. अर्थातच आम्हालाही मळावे वगैरे गोष्टीत भयंकर इंटरेस्ट! त्यामुळे बेसिंगस्टोकात झालेल्या नवरात्र-नवमी मेळाव्याबद्दल लिहून ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ, अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, बेसिंगस्टोक म्हैला मंडळ, आणि 'क्लब बेल्जियम' यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त कराव्यात हा मानस आहे!
बेसिंगस्टोक म्हैला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मा. पुष्करिणीतै यांनी सुमारे २ विकांतापूर्वीच या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून स्थानिक महाभागांचा सहभाग निश्चित करून जय्यत तयारी केली. दिनांक १७ ऑक्टोबर रोजी दसर्यानिमित्त एक मेळावाच आयोजित करावा असे मत आजचे धडाडीचे, तरुण रक्ताचे वगैरे वगैरे कार्यकर्ते आणि 'अँग्री इंग्लंड युवा मोर्चा'चे अध्यक्ष श्री. मेघवेडा यांनी मांडल्याने हा छोटेखानी कार्यक्रम न राहता दसरा मेळावा झाला. कुठल्याही सार्वजनिक आणि देशव्यापी अशा महत्वाच्या कार्यक्रमाला परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करायची आपल्या महान देशाची 'परंपरा' असल्याने श्री. व सौ. मितान यांना सस्नेह आमंत्रण धाडण्यात आले. इतकी जय्यत तयारी झाल्यावर साहजिकच ऐनवेळी कार्यक्रमाचा दिवसच बदलण्यात आला. याबद्दल जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या खर्या, पण मा. पुष्करिणीतैंना विरोध करायचा नसतो हे सर्वांनाच माहिती असल्याने विरोध लगेच मावळला आणि १६ तारीख नक्की झाली.
ठरल्याप्रमाणे नवरात्र-नवमी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला श्री. मेवे यांनी श्री. व सौ. मितान यांची सदिच्छा भेट घेतली. दुसर्या दिवशी मितान कुटुंबीय श्री. मेवे यांच्यासहित मु.पो. बेसिंगस्टोकला गेले. हेच ते श्रीक्षेत्र बेसिंगस्टोक जिथे पुष्करिणीतैंच्या म्हैला मंडळाचे हेडक्वार्टर आहे. अल्पावधीतच जहाल आणि कट्टर विचारांची, कडवी आणि लढाऊ संस्था म्हणून नाव कमावलेल्या या संस्थेच्या बांधणीत पुष्करिणीतैंचा सिंहीणीचा वाटा आहे. असो! नवरात्र-नवमी मेळाव्याचे ठिकाण हे संपूर्ण बेसिंगस्टोकला प्रदक्षिणा घातल्याशिवाय सापडत नाही हा वैयक्तिक अनुभव आहे. परंतु श्री. मेघवेडा यांचे समर्थ मार्गदर्शन असल्यावर काहीही अवघड नाही याचादेखील प्रत्यय आला.
पुष्करिणीतैंच्या घरी स्नेहभोजनाची सोय केली होती. स्वत: पुष्करिणीतैंनी बनवलेला स्वयंपाक, त्याबद्दल म्या पामराने काय बोलावे, जिव्हेची शक्ती तोकडी पडते. बीटाचा भात, साधा भात, पुरणपोळी, साधी पोळी, विविध प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, आहाहाहा! खाण्याचे टेबल नुसते भरून गेले होते. परंतु पदार्थांची दाटी वाटत नव्हती. तैंनी सगळी तयारीच अशी जय्यत केली होती, की घरी पोहोचताच ५-१० मिनिटात भोजनास सुरुवात झाली. मुद्दलात सर्वांना पुरणपोळी अतिप्रिय असल्याने त्यावरच आडवा हात मारणेत आला. कोण काय जेवलं, किती जेवलं हे तपशीलात सांगत नाही, परंतु भोजनाच्या अखेरीस पोटाचा आकार कमी पडल्याची भावना प्रत्येकाच्याच मनी होती. जेवणाचे फोटो उपलब्ध नाहीत, याचे कारण अतिशय उत्तम जेवण आणि अतिश्रमानी लागलेली भूक असू शकते असा विचार सौ. मीतान यांनी चर्चेदरम्यान मांडला. बाकीच्यांनी त्याला लगेच अनुमोदन दिले. अहो, म्हैला मंडळाच्या हेडक्वार्टरमध्ये बसून म्हैलांना विरोध करणारा अजून जन्माला यायचाय!
असे सुग्रास जेवण झाल्यावर पान असलेच पाहिजे असा श्री. मेघवेडा यांचा दंडकच आहे मुळी, त्यामुळे त्यांनी स्वत:हून तांबुलभक्षणाची सोय केली होती हे विशेष. हा विडा खाऊन संपेपर्यंत त्याना समाधी अवस्था प्राप्त झाली होती, भक्तजनांनी आणि कार्यकर्त्यांनी त्याचेही फोटो काढले. जे दिवसाढवळ्या डोळ्यांनी नीट दिसते आहे ते तसेच पहायचे सोडून लोक कॅमेराच्या मागे का धावतात काही काळात नाही बुवा!
श्री. मेघवेडा यांचा समाधी अवस्थेतील फोटो -
पुरणावरणाचे पोटभर जेवण, एक मस्त विडा, बरोबरीला गप्पीष्ट मित्र, मैफिल जमायला अजून काय पाहिजे? त्यानंतर ज्या गप्पा रंगल्यात महाराजा, संपूर्ण दिवस उलटून गेला तरी चर्चा (कॉरा: मितानतै) संपेनात. संध्याकाळी प्रयाण करण्याचा बेत पुढे ढकलण्यात. परतीची सिद्धता आहे हे लक्षात आल्यावर रात्रीचे भोजन आटोपूनच निघावे अशी प्रेमळ सूचनावजा आज्ञा पुष्करिणीतैंनी देऊन टाकली. अर्थात कुणीच त्यांना कधीच विरोध करीत नसल्याने पुन्हा एकदा गप्पा रंगल्या. श्री. व सौ. मितान हे दोघेही मोठे विलक्षण आहेत. समाजसेवेचे व्रत दोघांनीही अंगिकारले आहे. अफाट वाचन आणि भाषेवरील प्रभुत्व या दोनही गोष्टींची आपणास जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. श्री. मेघवेडासुद्धा अतिशय तैलबुद्धीचे (डान्रावांची तैलबुद्धी आणि मेघवेडा यांची तैलबुद्धी यात सूक्ष्म फरक आहे. अनुभवातून तो जाणवतोच!) म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेतच. संस्कृत आणि मराठीवर त्यांचा गाढ अभ्यास आहे. सुरेल गळा आणि स्पष्ट वाणी यांची सुरेख सांगड या ठिकाणी जमलेली आपणास दिसेल. पुष्करिणीतैबद्दल तर मी काय बोलावे. कुठल्याही कामाची आखणी, नियोजन आणि अंमलबजावणी यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. अधिक, सुस्पष्ट विचार आणि मोजकेच पण नेमके प्रश्न विचारायची त्यांची हातोटी आपणास त्वरित लक्षात येते.
गप्पांचा फड रंगलेला -
अरे हो, अजून एका व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे राहूनच गेले. ती म्हणजे सगुणा! स्वभावाने अतिशय लाघवी, आणि हुशार मुलगी आहे ही. मराठी भाषेचे या वयातील ज्ञान पाहून कुणीही थक्क होईल. अनेको गाणी आणि कविता तोंडपाठ असणारी सगुणा म्हणजे चैतन्याचा झराच आहे. तिच्या 'डराव डराव' गाण्याने अतिशय अल्प काळात प्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. श्री. मेघवेडा यांना तिची गायनप्रियता पाहून इनो घ्यावे लागले हे वेगळे सांगायची गरज नाही!
सगुणा एका फोटोत -
असे सुहृद जमून जर एकेच ठिकाणी दंगा घालत असतील बाकीच्यांची काय बिशाद आहे की येऊन रसभंग करतील. त्यामुळे पुष्करिणीतैंच्या सख्या फक्त एक-दोन वेळाच दर्शन देऊन गेल्या. यामुळे श्री. मेघवेडा यांचा थोडा हिरमोड झाला खरा, पण यास काही पर्याय नाही. मोठ्या मोठ्या मेळाव्यात अशा छोट्या गोष्टी होताच राहतात. बरीच रात्र झाल्यावर सर्वांनी लंडन शहराप्रती प्रस्थान ठेवले. तेथेही गप्पांचे फड रंगले. रात्र उलटून जायला आली पण गप्पा संपल्या नाहीत की मन भरले नाही हीच या कट्ट्याची फलश्रुती असावी.
पूर्वीच ठरवल्याप्रमाणे मा. पुष्करिणीतै आणि श्री. मेघवेडा यांचे शिष्टमंडळ पुढील आठवड्यात बेल्जियमला सदिच्छा भेटीवर जाणार आहेत. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'क्लब बेल्जियम' तर्फे त्यांस सस्नेह आमंत्रण आलेले आहेच. सर्व गोष्टींची सिद्धता झालेली असून आता केवळ प्रस्थानाची प्रतीक्षा आहे. श्री. मेघवेडा व पुष्करिणीतै यांस प्रवासासाठी अनेक शुभेच्छा! नवरात्र-नवमी प्रमाणेच कोजागिरी-कट्टाही यशस्वी होईल याची आम्हास खात्री आहे. असे कट्टे वारंवार व्हावेत, जेणेकरून तीनही देशातील सांस्कृतिक जिव्हाळा वाढीस लागेल.
बहुत काय लिहिणे, लेखनसीमा!
--असुर
प्रतिक्रिया
22 Oct 2010 - 5:21 am | असुर
कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बेसिंग्स्टोक म्हैला मंडळ, वृत्तांत लिहीणेस प्रोत्साहन दिल्याबद्दल क्लब बेल्जियम, वृत्तांत लिहिणेस सर्व प्रकारची तांत्रिक मदत केल्याबद्दल अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, आणि लेखनास पेन, कागद, पेन्सिल, खोडरबर, संगणक, किबोर्ड वगैरे उपयुक्त व बहुमूल्य चिजा पुरवल्याबद्दल ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ, सर्वांचे जाहीर आभार! वरील लेखात हे लिहायचे राहून गेले होते!
--असुर
22 Oct 2010 - 5:28 am | चित्रा
अल्पावधीतच जहाल आणि कट्टर विचारांची, कडवी आणि लढाऊ संस्था म्हणून नाव कमावलेल्या या संस्थेच्या बांधणीत पुष्करिणीतैंचा सिंहीणीचा वाटा आहे.
हाहा!
मस्त वृत्तांत. मितान यांचे पिल्लू गोड दिसते आहे.
पुष्करिणीताईंच्या हातची पुरणपोळी खायला बेसिंगस्टॉकला गेले पाहिजे एकदा.
22 Oct 2010 - 1:15 pm | पुष्करिणी
बघा आता सर्टिफिकेट पण आहे, कधी येताय :)
22 Oct 2010 - 5:35 am | मराठमोळा
वृत्तांत एकदम मस्त खुसखुशीत आला आहे.
पण फोटुमधे नेमकं कोण कोण आहे हे ओळखता येत नाहीये. अजुन फोटु डकवले तर सोप्प होईल.
पुढच्या कट्ट्यास शुभेच्छा!!
22 Oct 2010 - 5:39 am | बेसनलाडू
वृत्तांत धमाल! कट्टा मस्तच झाला असणार यात शंकाच नाही!
(नि:शंक)बेसनलाडू
22 Oct 2010 - 5:40 am | रेवती
वेगळ्याच प्रकारचा कट्टा वृत्तांत मजेशीर वाटला.
हे हे हे! अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, बेसिंगस्टोक म्हैला मंडळ भारीये राव तुमचं!;)
आमचाही निर्वृत्तांत कट्टा दोन अठवड्यापूर्वी प्राजुच्या घरी झाला.
लंबूटांग, प्रभो हेही कट्ट्यात सहभागी झाले होते.
दुपारी जेवायला म्हणून गेलो ते रात्री गप्पाष्टकं हाणत, दुसर्या दिवशीचा ब्रेकफास्ट उरकूनच आलो.
हसून हसून सगळ्यांचे गाल दुखत होते. आमचा वृत्तांत संपला. ;)
22 Oct 2010 - 2:21 pm | पुष्करिणी
फाउल फाउल फाउल...
रेवतीतै, फोटो आणि वृत्तांत पाहिजेच
22 Oct 2010 - 6:21 pm | असुर
पुष्कातैंशी बाडीस!
उसाच्या देशातून लवकरात लवकर वृत्तांत यावा. प्रभ्याला कामास लावावे! तसेही फटू डकवण्यपलिकडे त्याने बर्याच दिवसात काही लिहिले नाहीये!
प्राजुतैच्या घरी झालेल्या कट्ट्यात सहभागी लोकांसाठी विशेष सूचना: वरील विनंतीसंदर्भात आपण त्वरीत अंमलबजावणी करायचे मनावर घ्यावे, अन्यथा मितान यांच्यातर्फे दबावतंत्राचा वापर करणेत येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी!
--असुर
22 Oct 2010 - 6:36 pm | रेवती
अरे बाबांनो, हसण्याच्या नादात फोटू काढायचे राहून गेले.
आमचा फोटूकुमार अर्थात प्रभो सध्या गायबलाय वाटतं!;)
22 Oct 2010 - 6:58 pm | प्रभो
फटू फक्त अथर्वचेच (प्राजुतैचा मुलगा) आहेत...बाकी कुणाचेच नाहीत..
म्हणून ' ना फटू ना वृत्तांत' या तत्वाने वृत्तांताला फाट्यावर मारले आहे.. ;)
बाकी बातमी मस्तच हो असूर पेपरवाले.. :)
22 Oct 2010 - 7:07 pm | असुर
फटु नसलेला वृत्तांतसुद्धा चालेल. या प्रभ्याला कष्ट म्हणून नकोत काही! क्यामेरा पण दुसर्याला धरायला लावत असेल!
छे, आमच्यावेळी हे असं नव्हतं!
प्रभो, मित्रा, तुझी खरडवही कुणी चोरुन नेली का रे?
22 Oct 2010 - 5:48 am | मराठमोळा
>>दुपारी जेवायला म्हणून गेलो ते रात्री गप्पाष्टकं हाणत, दुसर्या दिवशीचा ब्रेकफास्ट उरकूनच आलो.
>>हसून हसून सगळ्यांचे गाल दुखत होते. आमचा वृत्तांत संपला.
बरं झालं हा फास्ट फुड वृत्तांत नाही लिहिलात, नाहीतर उगाचच धोरण क्रमांक ६ अन्वये उडाला असता. ;)
हॅ हॅ हॅ...
वृत्तांत नाही तर प्रभोला कमीत कमी फोटु तरी टाकायला सांगा. :)
22 Oct 2010 - 6:27 am | सहज
असुरपाशवीसंस्कृतीदेशांतरइतिहाससमाजजीवनमानमौजमजाप्रकटनअनुभवसमीक्षाविरंगुळामेळावाआवडला!
22 Oct 2010 - 7:43 am | अनामिक
जबरा झालेला दिसतो आहे मेळावा.
मितानने लाडू आणले होते कि नाही?
22 Oct 2010 - 11:31 am | मितान
श्री असुर यांनी अत्यंत खुसखुशीत शब्दात मेळावा वृत्तांत सादर केला याबद्दल त्यांचे अभिनंदन.
अर्थात त्यांनी आपल्या सोयीने जे तपशील गाळले आहेत ते इथे टाकायचे की त्याचा वेगळा हिशोब करायचा याची चर्चा क्लब बेल्जियम कट्ट्यावर करण्यात येईलच ! तरीपण झलक म्हणून पुढील मुद्दे-
श्री असुर यांची उमेदवारी जाहीर झालेली असल्याने त्यांना बायको शोधण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पत्रिका, ग्रहयोग याविषयी जमलेल्या विद्वानांनी आपापले मौलिक विचार मांडले.
नुकत्यात भारतभेटीला जाऊन आलेल्या असुराने तिकडे भेटलेल्या काही महान व्यक्तींचा परिचय करून दिला.
वेळेचे नियोजन, आळसावर मात यावर पुष्कातैंनी एक बौद्धिक घेतले.
अजून एका , इथे सांगण्यास बंदी असलेल्या विषयावर मेघवेडा आणि पुष्करिणीतै यांनी युती करून श्री असुर यांना खूपच टॉर्चर केले ! मग नाईलाजाने माझ्यासारख्या परदेशी पाहुणीला मधे पडून वाद शांत करावा लागला.
या सर्व चर्चांमध्ये चर्वण करण्यासाठी पुणेरी असुर यांनी चितळेंची बाकरवडी आणि काजूकतली उपलब्ध करून दिली होती.
असुर यांनी सर्वांची स्तुती केली असली तरी मला खरे सांगावेच लागेल ( कारण मी समाजसेवेचे व्रत घेतले आहे नं ;) )
श्री मेघवेडा हे क्रिकेट, खाणे आणि गाणे याविषयीच केवळ उत्साही असून इतर बाबतीत अत्यंत आळशी आहेत. आणि मेघवेडा पेक्षा बोलघेवडा हे नाव त्यांच्यासाठी योग्य वर्णन करणारे ठरेल. :))
पुष्करिणीतै या अत्यंत शूर आणि धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. त्या बेसिंगस्टोकात जवळजवळ एका जंगलात राहातात. रात्री अपरात्री तिथल्या भुताखेतांशी गप्पा मारत एकट्या फिरतात. आणि त्यांना दांडिया खेळणे खूप आवडते. दिवसभर सैपाक, नंतर खादाडी आणि बकबक करूनही ही पोरगी साडेदहा वाजता टिपर्या घेऊन दांडियाला गेलीच !!
श्री असुर हे एक पुणेरी प्रकरण असून त्यामुळेच पहिल्याच भेटीत ते कसे आहेत हे सांगणे अवघड आहे. पण ते खूप सहिष्णू आणि मदतीस तत्पर असणारे आहेत. जेवणानंतर भांडी वगैरे आवरण्यात त्यांनी मोलाची मदत केली. त्यांच्या हातचा ठरलेला रंभा सुधा हा पदार्थ मात्र यावेळी खाता आला नाही.
आता पुढची भर मेवे आणि पुष्कातै टाकतीलच.
@ अनामिक, मी लाडू नेले होते. :) आणि मेतकूटसुद्धा !
22 Oct 2010 - 11:39 am | अस्मी
मस्त वृतान्त.
जबरदस्त झालेला दिसतोय कट्टा...
22 Oct 2010 - 12:22 pm | बिपिन कार्यकर्ते
काय फालतूपणा आहे हा? असे खाजगी भेटींचे वृतांत इथे टाकून ब्यांडविड्थ वाया घालवणे चांगले नाही. असल्या फुटकळ गोष्टींवर लिहायला पैसे खर्च न करता जीमेलची सुविधा केलीच आहे.
खुद के साथ बातां: आख्खी इनोची बाटली घ्यावी लागतेय आज. हे लोक भारतात आले की चांगला इंगा दाखवायला फिट राहिले पाहिजे.
22 Oct 2010 - 1:18 pm | गणपा
जळवा जळवा लेको आम्हाला असले भारी कट्टे करुन आणि वर परत अस डिट्टेल वर्णन वाले वृतांत लिहुन मिठ चोळा. :(
22 Oct 2010 - 1:42 pm | परिकथेतील राजकुमार
ओ हो हो हो... अखिल आर्यावर्ताचे लक्ष लागुन असलेली चांडाळचौकडीची भेट अखेर झाली तर.
वृत्तांत आणि फोटु भारीच. बाकी मितानतैने पाठवलेले पार्सल मला अजुन न पोचल्याने प्रतिक्रीया इथेच आटोपती घेण्यात येत आहे.
22 Oct 2010 - 2:00 pm | पुष्करिणी
मस्त वृत्त्तांत लिहिल्याबद्दल असूरराज यांचे आभार.
आणि ७ लोकांऐवजी २२ लोकांचा स्वयंपाक झाल्याने पाहुण्यांना रात्रीच्या जेवणासाठी कोंडून ठेवण्यात आलं होतं ह्याची वाच्यता न केल्याबद्दल परत एकदा आभार.
असूरानं वेळोवेळी आवराआवर, भांडी घासणे, ताटं घेणे इ. सगळी महत्वाची कामं हूं की चूं न करता केली.
( विशेष माहिती : असूर हे आयटीत असून त्यांना घरकामाची आवड आहे, ते सांगितलेलं ऐकतात, खूप वेळा आभार मानतात, त्यांना चहा करता येतो. )
आदल्या रात्रीच मी जंगलातल्या वाटेवरच्या झाडांवर विविध फूल्या / धोक-४४०/ झाडाच्या आत्म्याची कविता अशा निरनिराळ्या खूणा करून ठेवल्या तरीही रात्रभरच्या पावसात त्या पुसट झाल्या, पण तरीही धडाडीचे युवा नेते श्री मेवे यांनी जंगल पथदर्श्काची भूमिका बखुबी निभावली आणि माग काढलाच.
पान आणि विडा यांवर तुलनात्मक गहन चर्चा केल्यावर त्यांनी आणलेले विडे हे स्नेहमेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले. यांबद्द्ल मी त्यांचे आभार मानते.
विदेशी पाहुण्यांचे तर विशेष आभार. त्यांच्या ४ दिवसांच्या भरगच्च लंडन भेटीच्या कार्यक्रमातून त्यांनी लंडन मंडळ स्नेहमेळाव्यासाठी आख्खा एक दिवस काढला. त्यांनी आणलेल्या लाडूंची चव अजूनही रेंगाळतेय, त्यातूनही श्री मेवे त्यांच्या वाटचे लाडू बेसिंगस्टोकातच विसरून गेल्याने बहारच आलेली आहे...( मेवे: लाडू संपले, मागून काहीही उपेग नाही ).
मेवे, असूर आणि मितानला दुसर्यादिवशीही भरगच्च कार्यक्रम होता तरीही रात्री १०-१०.३० पर्यंत माझ्याकडे राहिले, मला खूप आनंद झाला.
माझ्या मैत्रिणींमधे मेवे आणि असूर यांचा इंटरेष्ट याकडं गडबडीत थोडं दुर्लक्षच झालं त्याबद्दल ते ला माफ करतीलच अशी आशा आहे :)
22 Oct 2010 - 4:16 pm | पर्नल नेने मराठे
मस्तच.... आज पण हे लोक मायाच्या घरी धमाल करत असावेत्..आज कोजागिरि ना!!!
येउ द्या अजुन फोटो न व्रुत्नात.
22 Oct 2010 - 4:30 pm | पैसा
याची माहिती कळली होती, पण पुष्कीला वाइट वाटू नये म्हणून गप्प होते!
मेघवेडा यांचे ड्वॉले बुद्धाप्रमाणे अर्धे उघडे आहेत आणि असुर यांचीच पूर्ण समाधि लागलेली दिसते आहे.
बेल्जम मधल्या आजच्या कट्ट्यानंतर वृत्तांत आणी फटु पुष्करिणी आणि मेवेच्या कृपेने येणार असल्याची खबर आहे.
22 Oct 2010 - 4:54 pm | धमाल मुलगा
>>मेघवेडा यांचे ड्वॉले बुद्धाप्रमाणे अर्धे उघडे आहेत
बुध्द ??? हा हा हा...तिकडं 'आणि बुध्द रडला' असेल ह्या तुलनेमुळं. ;)
>>आणि असुर यांचीच पूर्ण समाधि लागलेली दिसते आहे.
हा हा...ती उन्मनी अवस्था झालेले सिध्दयोगी ज्ञानेश आहेत, असूर नव्हे.. (असूर्या बहुतेक तेव्हा पुष्कावती मैय्यांना किचनमध्ये मदत करत असावा. हो! आयटीवाला आणि किचननिपुण आहे तो.)
22 Oct 2010 - 9:41 pm | पैसा
असुरश्री यांचा एखादा फटु असला तर द्या म्हणजे पुन्हा अशी चूक होणार न्हाय.
ता.क. मेव्या हरवला आहे अशी बातमी आताच मितान यांच्याकडून आली आहे!
22 Oct 2010 - 10:02 pm | धमाल मुलगा
सोफ्यावर बसलेला, शर्टाच्या बाह्या मुडपून मेव्याला हुल देणारा तोच तो बहाद्दर 'क्याप्टन असुर, १०१ सिंहलद्वार रेजिमेंट, लंका(रावणाची) बु.| '
>>मेव्या हरवला आहे अशी बातमी आताच मितान यांच्याकडून आली आहे!
त्याचा इथलाच फोटू प्रिंट काढून 'आपण यांना पाहिलंत का?' मध्ये दाखवाहेत.
22 Oct 2010 - 4:53 pm | गुंडोपंत
मस्त मजा करता तुम्ही! तुमचे सगळ्यांचे असे मस्त झकास असणे आवडले!
22 Oct 2010 - 6:30 pm | धमाल मुलगा
ह्या निमित्ताने श्री.रा.रा. असूर लिहिते झाले हे पाहून ड्वॉले पानावले.
भारी लिहीलंय बे. :) (सगळे संदर्भ परफेक्ट आलेत. ;) )
ह्या आनंदसोहळ्यास उपस्थित नसल्याचं वाईट मात्र वाटलं हो.
ती सगुणा एव्हढं वाकुन वाकुन काय पाहते आहे उत्सुकतेनं? :)
आणि फोटोमध्ये (तरी निदान) तो रव्या खवीस इतका शांत असलेला पाहुन पुष्करिणीच्या पाककौशल्यापुढे आम्ही नतमस्तक झालो आहोत.
अवाम्तरः ती पुष्करिणी यंदा कितवीत गेली रे? =))
22 Oct 2010 - 6:46 pm | असुर
>>> ह्या आनंदसोहळ्यास उपस्थित नसल्याचं वाईट मात्र वाटलं हो. <<<
इनो हा सर्वोत्तम उपाय आहे!
>>> ती सगुणा एव्हढं वाकुन वाकुन काय पाहते आहे उत्सुकतेनं? <<<
मेव्या विडे घेऊन आला होता. त्याचं कौतुक!
>>> आणि फोटोमध्ये (तरी निदान) तो रव्या खवीस इतका शांत असलेला पाहुन पुष्करिणीच्या पाककौशल्यापुढे आम्ही नतमस्तक झालो आहोत. <<<
पुरणपोळी काय झाली होती धम्या. काय सांगू तुला. असो! उभा पेटशील तू जळजळीने!!
>>> अवाम्तरः ती पुष्करिणी यंदा कितवीत गेली रे? =))<<<
काही कल्पना नै बुवा. पण ती पुढल्या वर्षी चौथीच्या स्कॉलरशीपला बसणार आहे असं म्हटल्याचं ज्ञानेशने मितानला सांगितल्याचं मेव्याने ऐकलं असं कानावर आलंय!
--असुर
22 Oct 2010 - 6:38 pm | सूड
मस्त वर्णन !!
22 Oct 2010 - 9:57 pm | Nile
असुरा हलकटा लेका काय हे! अंमळ अॅसीडीटी झाली, आता मॅगीशिवाय दुसरा पर्याय(च नसल्याने) नाही!
बाकी ते खाण्याबद्दलचा तो पॅरा नीट का नाही लिहलास रे? कीती टायपो करायचे काहीच वाचता नाही आलं!
आयच्या गावात दहिबटाटाशेवपुरी! मेव्या गातो!
अरे युरोपातील पौंडाधीशांनो, अश्या मैफीलीला आमच्यासारख्या गरिबालाही आंमत्रण झाडत जा की रे लेकांनो! पोश्टात एक जाडजुड (तिकिटासह) आलेले नुसते आंमत्रण पाहुनच कळसाचे दर्शन झाल्याचे सुख लाभेल(म्हणुन आम्ही गाभार्यात यायचो नाही असे नाही) आम्हाला!