दिल्ले दान... घेतले दान...

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
2 Apr 2008 - 10:25 am

आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)

डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!

चित्रपट पाहणार्‍या अवघ्या देशाचा 'आयकॉन' असलेले अमितशेठ आता शेतकर्‍यांचेही आयकॉन होणार आणि अमिताभचं खत, अमिताभचं बेणं बियाणं, अमिताभची कीटकनाशकं यांचा खप सर्वत्र वाढणार याची खात्रीही झाली. गेला बाजार आत्महत्या करण्यासाठी तरी शेतकरी 'रीड अँड टेलर' चे सूत वापरलेले दोरखंड वापरतील आणि त्यांच्या जीवनाचा नाही तर निदान मृत्यूचा दर्जा तरी उंचावेल या विचाराने समाधान पावलो.

एखाद्या सकाळची वेळ - किंवा मंगलप्रभात म्हणूया - होती. कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला. परसाकडे गेलेले अमितशेठ अजूनही घरी न आल्याने जयावैनींना काळजी वाटू लागली होती. वयोमानानुसार अमितजींना वेळेवर 'होत' नसे. थोडा जास्तच वेळ लागत असे. आणि 'इसबगोल' घ्या म्हटलं तर डाबरच्या उत्पादनांची जाहिरात करतो आणि इसबगोल घेतलं तर व्यावसायिक नीतीमत्तेचं काय होईल असं काहीसं अमितशेठ बोलून गेले होते. आयुष्यभर पर्वा न केलेल्या नैतिकतेचं गळू अमितशेठना आताच कसं झालं या काळजीनं जयावैनींना पोखरलं होतं. नाहीतरी उतारवयात विस्मरण होतंच म्हणा. फिल्मी आयुष्य आणि खरे आयुष्य यात गल्लत होतेच. चित्रपटातील संवाद चुकून बोलून गेले असतील या भावनेनं त्यांना काडीचा आधार दिला. मात्र हे शेतकर्‍याचं जीवन जगताना त्या पुरत्या वैतागल्या होत्या.

अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला आणि जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या. कोनाड्याजवळ अभिषेक उभा होता. सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते. मात्र आपण उजव्या हाताने दाढी खाजवत आहोत आणि बाप तर डावखरा आहे हे त्याच्या अचानक ध्यानात आले आणि कोणाचे लक्ष नाही असे वाटून त्याने झटकन हात बदलला. तरी ऐशूने हे पाहिलेच आणि नाराजीने नाक मुरडले. बिच्चारा अभिषेक खजील झाला!

सुपरष्टार 'काम' आटोपून घराकडे येताना दिसत होते. मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले. सुपरष्टार आत आल्याआल्या जयावैनी सुरू झाल्या.

'काय हे मानूस म्हनायचं का सोंग? पुरता वैताग आला मला आता.'
'अगं.'
'चला बगू परत 'जलसा' ला इथं मला जमत नाही. चुलीच्या धुरानं डोळ्याचा धबधबा झाला पार!'
'अगं पन.'
'ते काही नाही. चला म्हंते ना!'
'तू जरासंक ऐक तरी!'
'काय जगनं म्हनायचं का काय हे. सकाळी उठल्यावर शेनाने सारवून घ्या. बंब पेटवा. दुपारच्याला टकुर्‍यावर टोपली घेऊन उन्हातान्हात शेतात जा.'
'अगं जरा समजून घे.'
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
’आता, बैल मागवलेत की तिकडून. आनी बैलांस्नी म्हराटी यायला पायजेल असं कोनी म्हनू बी शकत न्हाई ना.’
’अहो पर मानसान्ला कुठेबी राहायची परवानगी अस्ते असं बैलांच्या बद्दल राज्यघटनेत लिव्हलेलं हाये का?’
'हे बघा कारभारनी. तुमच्या डोक्यात अक्कल कमी असं आम्ही म्हनून गेलोय ते काही खोटं नाही.'
'ऑ? आता काय झालं. चांगला मुंबईतला बंगला सोडून हितं घानीत राहायचं दळभद्री लक्षन तुम्हास्नी सुचलं तर तुम्ही शहाने आनी आम्हाला अक्कल न्हाई व्हय.'
'अहो, आता कसं सांगू.'
'काय ते'
'थोडं गप्प बसाल तर आम्ही बोलनार ना.'
'बोला की. म्या काय त्वांड धरलंय काय तुमचं!'
'अगं, सरकारनं शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी?'
'व्हय तर.'
'हांग्गाश्शी. मातुर येच्यासाठी आपल्याला थोडी कळ काढायला लागंल. घुसलं का आता टकुर्‍यात!'
’आता गं बया! व्हय व्हय. आता कुठं समजलं’

बापाच्या अचाट बुद्धीची ही युक्ती ऐकून अभिषेक अवाक झाला आणि आश्चर्याने तोंडात घातलेले बोट उजव्याच हाताचे आहे याचे त्याला भानही राहिले नाही!

व्यंगचित्र सौजन्य desicartoonist.blogspot.com

औषधोपचारसंस्कृतीविनोदविडंबनसमाजजीवनमानमौजमजाचित्रपटसद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

जुना अभिजित's picture

2 Apr 2008 - 10:53 am | जुना अभिजित

पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार

अभिषेकने मारलेले दगड चुकवण्यासाठी थोडी हालचाल करावी लागली तर पाखरे समजून जातील की हे बुजगावणे नाही आणि मग खुशाल चरतील.

पण ऐश्वर्याच्या डोळ्यात धूर जातोय हे पाहून डोळ्यात पाणी आले. निदान तिला सावलीत बसून पिकांची राखण करू द्यावी ही नम्र विनंती. (का म्हणाल तर ती कुठे गंगाकिनारेवाली आहे?)

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

आनंदयात्री's picture

2 Apr 2008 - 10:54 am | आनंदयात्री

खळखळुन हसवणारे चिमटे !! अमरसिंगाना बुजगावणे म्हणुन उभे करण्याची कल्पना विशेष !!

बेसनलाडू's picture

2 Apr 2008 - 10:55 am | बेसनलाडू

अप्रतिम कल्पनाविलास! चित्र उभे राहिले डोळ्यांसमोर!
(प्रेक्षक)बेसनलाडू

केशवसुमार's picture

3 Apr 2008 - 11:32 am | केशवसुमार

ज ह ब ह रा हा
अप्रतिम कल्पनाविलास! चित्र उभे राहिले डोळ्यांसमोर!
(वाचक)केशवसुमार

धमाल मुलगा's picture

2 Apr 2008 - 10:58 am | धमाल मुलगा

अ॑गराज कर्ण,
ज ह ब ह र्‍ह्या !

कस्सल॑ हाणल॑य रे... नुसत॑ ठकाठक ठकाठक!!!

पाइ॑ट अन् पाइ॑ट १०० न॑बरी.

गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार
ह.ह.मु.व. चित्र डोळ्यापुढे आल॑. नाहीतरी त्याला दुसर॑ काही जमेल अस॑ नाही वाटत :-))
अगदीच झाल॑ तर दारी धरायला पाठवता येइल त्याला. नाहीतर युरीया उधळायला !!!

अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले.
ह्याला म्हणतात वास्तववादी लेखन (ए..कोण आहे रे तो "समाजवादी" म्हणतोय..करु का राडा?)

अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला

अग॑ आई ग॑.....छातीत कळ आली हो!!! सक्काळी सक्काळी चुलीशी बसून ऐशूराणी अ॑बाड्याची भाजी करत्येय आणि बशीतला थे॑बभर चहा मी उगाच अर्धा अर्धा थे॑ब करुन पितोय आणि हा वेळकाढूपणा तिला निरखत सत्कारणी लावतोय..तीही इरकली लुगड्याच्या पदराचा शेव दातात धरुन लाजर॑ लाजर॑ हसतेय अस॑ काहीस॑ "फिल्ली॑ग" आल॑ हो क्षणभर!!!!

सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते.

हा हा हा...पण मग तो

-(न्हावी) अजानुकर्ण

ह्या॑च्याकडे का नाही जात? का त्याचा बा त्याला "भादरायला पैशे घालवायला तू काय झागिरदार हैस का?" अस॑ विचारतो की दाढीसाठी पैसे मागितले की जयामावशी "खायला कहार आन् भुईला भार" म्हणून उडवून लावतात?

'अगं, सरकारनं शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग

हाण तिच्याआयला !
टोला न॑बर वन! पण खर॑ आहे बॉ...आधीची देणी चुकवायला अनिवासी भारतीय होता येत॑ तर मग हे का नाही होणार?

-(जयामावशीचा भाचा, अभिदाद्याच॑ लगिन होण्यापुर्वी ऐशूपायी झुरणारा) ध मा ल.

मनस्वी's picture

2 Apr 2008 - 11:06 am | मनस्वी

>> (स्वतःचे) हात खसाखसा धुतले <<
चपखल

>> जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या <<
कधी..?? केव्हा..??

(रेखाची फ्यान) मनस्वी

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 12:01 pm | विसोबा खेचर

झक्कास रे कर्णा! :))

डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!

हा हा हा!

मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले.

हे बाकी जस्ट मार्व्हलस! :)

बर्‍याच दिवसांनी तुझा एक उत्तम लेख वाचला रे कर्णा! जियो...!

बच्चन फ्यॅमिलीची आणि अमरसिंगाची सह्हीच करून टाकली आहेस! तो अमरसिंग तर साला एक नंबरचा भिकारचोट माणूस आहे!

आपला,
तात्याभैरू!

प्राजु's picture

3 Apr 2008 - 12:16 am | प्राजु

खूपच छान लेख.. एकदम जबरा.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

विसुनाना's picture

2 Apr 2008 - 12:10 pm | विसुनाना

एकदम झकास.
आजानुकर्णा, फक्त तुझ्या जानुतच नव्हे तर प्रत्येक सांध्यात मेंदू आहे.
वा!वा! फारच छान.

आणि हो-
ते 'दिल्ले दान घेतले दान' राहिलेच की!
त्यामुळे दोन गोष्टी सिद्ध झाल्या -
१. 'दिण्हले गहिल्ले तत्थ मरहट्टे' या उक्तीप्रमाणे अमित'जी' मराठीच आहेत.
२. ते सर्वधर्मसमभावावर आत्यंतिक श्रद्धा ठेवतात म्हणून पुढच्या जन्मी मुसलमान होण्यासाठी जमतील ते सर्व प्रयत्न करीत आहेत.
:):)

छोटा डॉन's picture

2 Apr 2008 - 12:14 pm | छोटा डॉन

आजानुकर्णा, तोडलसं रे भावा ...
च्यायला हे खरचं "अमिताभ" ने वाचलं तर तो सगळे उद्योगधंदे सोडून, सगळी संपत्ती "अमरसिंगाला" दान करून [ म्हणजे बुजगावण्याच्या नावावर करून ...] सोमालियाच्या अथवा झांबियाच्या जंगलात शेती करायला निघून जाईल ....

"जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार ...."
हा हा हा. च्यायला जबरा टोले मारलेत...
आणि काय हो "आभिषेकच्या दगड मारण्याने " पाखरे ऊडून जातील असे तुम्हालातरी वाटते का ? मरणाचं बावळट राव ते, पाखराला दगड मरायचे सोडून चूकून बापाचेच डोके फोडायचा आणि वर अमरसिंगजी यात सुद्धा कॉग्रेसचा हात आहे म्हणून बोंब मारायचे.
बाय द वे, आमच्या अमिताभचे दुसरे अंगवस्त्र " रेखाआंटीचे" काय ???

"सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता...."
हे मात्र खरं हा ... पण दाढी असलेलचं बरं कारण बिनादाढीचं ते ध्यान अतिशय बावळट दिसतं ...

बाकी ऐशू शेतात उन्हातानात पिकाची राखण करताना पलिकडच्या बांधावरून सलमान खाटीक व विवेकभाऊ तंबाखूवाले तिच्यावर लाईन मारणार, ऐशू चिडून काही बोलल्यावर त्याच रागात सलमान बेरदकारपणे बैलगाडी हाकून २-४ शेतातल्या कुत्र्यांचे तंगडे मोडून ठेवणार व शेवटी गाडीसगट हिरीत पडणार .... सगळी मज्जाच मजा ...

"'अगं, सरकारनं शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी? '"
हाय तिच्यायला एकदम "अनिवासी भारतीय डोकं" ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

2 Apr 2008 - 12:33 pm | धमाल मुलगा

आणि काय हो "आभिषेकच्या दगड मारण्याने " पाखरे ऊडून जातील असे तुम्हालातरी वाटते का ? मरणाचं बावळट राव ते, पाखराला दगड मरायचे सोडून चूकून बापाचेच डोके फोडायचा आणि वर अमरसिंगजी यात सुद्धा कॉग्रेसचा हात आहे म्हणून बोंब मारायचे.
हा हा हा... सध्या कॉ॑ग्रेसच्या जागी म.न.से. अस॑ येइल बहुधा.

बाय द वे, आमच्या अमिताभचे दुसरे अंगवस्त्र " रेखाआंटीचे" काय ???
दुसरे? म्हणजे पहिल॑ अ॑गवस्त्र कोण आहे रे?
असो,आर॑ येड्या ती आस्ती तालुक्याच्या गावाला. तालुक्याच्या बाजाराच्या दिवशी अमितकाका जात्यात ना, तवा सा॑च्याला भेटत्यात तिला, म॑ग काय राजेहो, एकदम पेश्शल खाजगी बैठक हो! तुमच्या आमच्या आटवनीतली समदी मुजरा-पेश्शल गानी होत्यात तिथ॑. घे ना भौ मला इच्चारुन!

छोटा डॉन's picture

2 Apr 2008 - 1:43 pm | छोटा डॉन

"दुसरे? म्हणजे पहिल॑ अ॑गवस्त्र कोण आहे रे""
बस का ? च्यायला "परवीनबाबी" ला विसरलात का ? [ जरा जपून, आतल्या गोटातली बातमी आहे ... आम्हीपण डॉन असल्याने मला माहित इतकेच ...]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 2:02 pm | विसोबा खेचर

तुमच्या आमच्या आटवनीतली समदी मुजरा-पेश्शल गानी होत्यात तिथ॑. घे ना भौ मला इच्चारुन!

हो रे बाबा धमाल्या! आम्ही तुझ्यापुढे आमची करकमळे जोडली आहेत, तेव्हा अश्या बातम्या आम्ही तुलाच इचारणार! :)

तात्या.

--
बुगडी माझी सांडली गं, जाता सात्तार्‍याला जाता सात्तार्‍याला!

मनस्वी's picture

2 Apr 2008 - 12:36 pm | मनस्वी

त्याच रागात सलमान बेरदकारपणे बैलगाडी हाकून

मस्त :)

सगळे दृष्य डोळ्यासमोर उभे राहीले...
मोठे शेत - शेतातले घर - मागे परसदार - तिकडून येणारा अमिताभ आणि अमरसिंग - दगडे मारणारा अभिषेक - भाजी टाकणारी ऐश - शेतात मधोमध हात आडवे करून उभे राहीलेले अमरसिंग - डोक्यावर भाजी भाकरी घेतलेली आणि चुलीमुळे डोळ्यातून भळाभळा पाणी येतेय म्हणून बोटे मोडणारी जया... हो आणि शेजारच्या शिवारात रागात बेदरकारपणे बैलगाडी हाकणारा सलमान - आणि काय चाललेय ते समजेनासे होउन एरंडेल तेल प्यायल्यासारखा चेहेरा झालेला विवेक!

मजा आली.

झकासराव's picture

2 Apr 2008 - 12:22 pm | झकासराव

लयी भारी हाणल आहे. :)
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
>>>>
हा सगळ्यात जास्त आवडला :)

प्रभाकर पेठकर's picture

2 Apr 2008 - 1:08 pm | प्रभाकर पेठकर

श्री. आजानुकर्ण....

नुसता 'अप्रतिम' कल्पनाविस्तार. मजा आली. जरा एखादी फुल ष्टोरीच टाका की राव.

अभिनंदन.

सन्जोप राव's picture

2 Apr 2008 - 2:20 pm | सन्जोप राव

म्हणतो. एखादी अधिक लांबीची गोष्ट वाचायला आवडेल...
सन्जोप राव

भोचक's picture

2 Apr 2008 - 1:49 pm | भोचक

आयला फूल टेरिफिक. अजानुकर्ण धमाल आणलीत राव. कसलं झोडपलंय, त्या 'बिग्ब्या' ला. मानलं राव.

चतुरंग's picture

2 Apr 2008 - 4:42 pm | चतुरंग

गेला बाजार आत्महत्या करण्यासाठी तरी शेतकरी 'रीड अँड टेलर' चे सूत वापरलेले दोरखंड वापरतील आणि त्यांच्या जीवनाचा नाही तर निदान मृत्यूचा दर्जा तरी उंचावेल या विचाराने समाधान पावलो.
ही ब्लॅक कॉमेडीसुध्दा मनात घुसली!
कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला.
हे ही झकास!
दोन्ही हातानी दे दणादण झालाय लेख.

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

2 Apr 2008 - 5:55 pm | मुक्तसुनीत

अजानुकर्णा ....तुम्हाला सा. न. वि. वि. !! :-)

सर्किट's picture

2 Apr 2008 - 9:41 pm | सर्किट (not verified)

कर्णा, मानलं तुला !!!

- (नतमस्तक) सर्किट

सहज's picture

3 Apr 2008 - 4:12 pm | सहज

तुक्याचे अभंग जिभेवर मात्र केवळ नावाला

मध्यमाने टोकावे मग शोभाला कधी बच्चनला

चड्डीत रहा ना भौ सुनाव सार्‍या जगाला

दुट्टपी गुरुजीने हेच शिकवीले मज मंचरला

बारकू गडचढे यांच्या संग्रहातुन साभार

आनंदयात्री's picture

9 Apr 2008 - 1:18 pm | आनंदयात्री

हा हा हा ! भारी टोला !

कोलबेर's picture

2 Apr 2008 - 9:21 pm | कोलबेर

खो खो खो!!!!!!!!!!
अमरसिंगचे बुजगावणे, ऐशूच्या हातची अंबाडीची भाजी, परसातला बिग्ब्या, दाढी खाजवणारा बैलोबा..इ.इ.इ.... लैच भारी!!!

बाकी

"..या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले.."
याओळी कुठेतरी वाचल्यासारख्या वाटतात.. एकतर योगायोग असावा नाहीतर आपला संस्थळांचा अभ्यास जबरदस्त असला पाहिजे ;-)

जबरी लेख्...सकाळ्ची सुरूवात छान झाली इसबगोल नघेता.

सृष्टीलावण्या's picture

3 Apr 2008 - 8:22 am | सृष्टीलावण्या

तुम्ही त्या बोलबच्चनचा पार चुथडा उडवलात हो. धुव्वा उडवलात म्हणा ना. असे तिरशिंगी विचार त्या तोंडशिंदळ ढालगज मायावतीच्या मनांत पण आले नसतील. तुम्ही तर हरिपुत्राला जाम आडवे तिडवे घेतलेत. लेख वाचताना दुर्दम हसू फुटले.

त्याच्या आधी भूमीहीन शेतकर्‍याला आधी जमीन दान करणे आणि नंतर घुमजाव
ह्या रांडचालीचा खरपूस समाचार घेतलात. अमिताभचा फोटो पाहिल्यावर काही तरी खुमासदार वाचायला मिळेल अशी अटकळ होतीच पण तुम्ही तर अगदी मार्मिकपणे त्याची अंडीपिल्ली बाहेर काढलीत. खद्द अमिताभने जर तुमचा लेख वाचला तर हसू लपवताना त्याची तारांबळ उडेल.

>
>
मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..

आजानुकर्ण's picture

3 Apr 2008 - 9:13 pm | आजानुकर्ण

वाचकांचे प्रेम पाहून फार आनंद झाला. प्रतिसाद दिलेल्या व न दिलेल्या ;) सर्वांचे हार्दिक आभार!

(आभारी) आजानुकर्ण

शैलेन्द्र's picture

5 Apr 2008 - 12:06 pm | शैलेन्द्र

वा वा ग्रेट्च हो ..........

शरुबाबा's picture

5 Apr 2008 - 3:36 pm | शरुबाबा

पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार लायकि प्रमाणे एकदम सहि

तळेकर's picture

5 Apr 2008 - 3:46 pm | तळेकर

हा अमरसिंह ऐश्वर्याचा मानलेला भाऊ आहे, असं ऐकतो खरं काय आहे.

सुर's picture

10 Sep 2008 - 3:52 pm | सुर

अमरसिंह ऐश्वर्याचा मानलेला भाऊ नाहीये... तो जया बच्चन चा मानलेला भाऊ आहे.

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

ऐश्वर्या राय's picture

6 Apr 2008 - 10:52 pm | ऐश्वर्या राय

मिसळपाववर आजवर आलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक. मराठीत गेल्या कित्येक वर्षांत इतके जबरदस्त उपहासात्मक लिखाण वाचायला मिळाले नाही. आपल्याकडून अपेक्षा वाढल्या.

बुजगावण्याला भाऊ मानणारी(?)
ऐश

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 12:50 am | भडकमकर मास्तर

काय हाणलंय्...मस्तच...

आंबोळी's picture

9 Apr 2008 - 6:35 pm | आंबोळी

वा!
इतकी अचूक नेमबाजी करत प्रत्तेकाच्या दुखर्या नसेवर हाणलात राव.
मस्तच!

ऋषिकेश's picture

9 Apr 2008 - 8:52 pm | ऋषिकेश

अमरसिंगचे बुजगावणे, ऐशूच्या हातची अंबाडीची भाजी, अमरसिंगचे स्वतःचे हात धूणे, दाढी, सगळंच फ्क्लास!!
हसून हसून दमलो.. घरी मोठ्याने वाचून दाखवला.. सगळ्यांची ह ह मु व :))))))))

जियो!!!!!!!!!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभिज्ञ's picture

9 Sep 2008 - 7:20 pm | अभिज्ञ

कर्णा,
जबरि लिहिले आहेस.
सध्याच्या घडामोडींवरहि नवीन काहितरी येउ द्यात.

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2008 - 8:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच! आजानुकर्ण, तुमचा लेख, आणि डान्या, धम्या, मनस्वी, सहज या सगळ्यांच्या प्रतिसादांमुळे तर आणखीनच धमाल आली.

आजानुकर्ण's picture

11 Sep 2008 - 1:06 am | आजानुकर्ण

प्रतिसाद देणार्‍यांचा मी आदर करतो.

आपला,
(प्रतिसादांचे खडे टाकून लेखन वर आणण्याचा प्रयत्न करणारा कावळा) आजानुकर्ण