नशीब - भाग ४६ ते ५० एकत्रित
माझ्या पहिल्या माझदा गाडीला अपघात झाला त्यानंतर मला गाडी मिळायला चार महिने लागले. माझी नवीन गाडी माझदा ३२३च होती, रंग आम्हा सगळ्यांनाच आवडला होता. सि मिस्ट समुद्राच्या पाण्याचा हिरवा रंग, गाडीचा आकार फार आकर्षक होता. ही गाडी घेऊन ६ महिनेच झाले असतील दुबईला पुन्हा कामा निमित्त पाहाटे जाऊन दुपारी एकला परत येत होतो. गाडीत एकटाच होतो. मी युएई सीमेच्या आत होतो. गाडीचा वेग थोडा कमी केला व एका हाताने पाण्याची बाटली पकडायचा प्रयत्न केला. ति सरकून खाली पडली म्हणून उचलायला गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकही गाडी नव्हती मी एकटा रस्त्यावर होतो. पाण्याची बाटली हातात आली पण गाडी बंदुकीच्या गोळी सारखी एकदम सुटली. उजव्या बाजूने गाडी चालवण्याची पद्धतअसल्याने माझी गाडी उजव्या रस्त्यावरून डाव्या रस्त्यावर हवेत फेकली गेली. योग कसे जुळून येतात. त्याच क्षणी एक गाडी काही सेंटी मीटर अंतराने माझ्या गाडी खालून गेली थोडक्यात तो चालक बचावला. गाडीने एक कोलांटी घेतली व चारी चाके वर करून पालथी एका झुडपाला अडकली. त्या क्षणी मला सिनेमात गाडी पेट घेते हे आठवले म्हणून मी समोरच्या काचेला पाय मारून बाहेर पडलो होतो.
मागची काच पण फुटली होती. माझा चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) आडवा पडलेला बघितला. सुरू करून बघितला चांगल्या स्थितीत होता. १५ मिनिटे उलटून गेली लोक जमा झाले अरबी मधून आश्चर्य व्यक्त करत होते. एक रहदारी पोलीस आला, बलूची असल्याने हिंदीतून चौकशी झाली. माझ्या हातात चलचित्र ग्राहक बघून मी अपघाताचे चित्रीकरण केले का व वाहन चालकाचे प्रेत कुठे आहे म्हणून मलाच विचारले होते. गाडीतले सगळे सामान बरोबर घेऊन मला जवळच्या दवाखान्यात नेले होते. दोन तीन ठिकाणी रक्त येत होते त्यावर उपाय करून सगळे ठीक असल्याचे सांगण्यात आले. पण पोलिसाने मला तुरुंगात टाकले. असा युएईचा कायदा आहे. थोड्या वेळाने मला घरी व माझ्या स्पॉन्सरला फोन करायला परवानगी मिळाली. मी स्पॉन्सरला आधी कळवले व त्यालाच घरी कळवायला सांगितले. माझा स्पॉन्सर काय होता ते त्या वेळेला जाणवले. त्याने मस्कतहून त्या पोलिसाला फोन केला व पोलिसाने मला तुरुंगातून बाहेर काढून जवळच्या एका हॉटेल मध्ये ठेवले होते. पोलिसाने अपघात कसा घडला असावा ते सांगितले. कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या धारदार कडेमुळे पुढच्या चाकाचे टायर कापले गेले व स्फोट झाला म्हणून गाडी फेकली गेली होती, असे आधी घडले होते असे त्याने सांगितले. दुसर्या दिवशी न्यायाधीशासमोर चूक माझी आहे असे कबूल केल्याने फक्त २५ रियाल दंड झाला. माझी सुटका झाली. पोलिसाने मला त्याच्या गाडीतून ओमानच्या हत्ता सीमेवर आणून सोडले होते. हा अपघात १९८९ ला झाला होता तेव्हा डाव्या हातात एक जखम झाली होती त्या जखमेत एक मोठा काचेचा तुकडा राहिला होता. तो तुकडा १९९६ ला पुण्यात आलो तेव्हा, दारावर हात आपटल्याने वेदना झाल्या म्हणून दवाखान्यात गेल्या वर क्ष किरण तपासणीत दिसला. मग छोटीशी शल्यक्रिया करून तो काढून टाकला होता.
नवीन गाडी हातात यायला दोन महीने लागले होते. पुन्हा माझदा कंपनी व गाडीच्या विमा कंपनीने नगास नग म्हणून पुन्हा एक पांढरी माझदा ३२३ मला मिळवून दिली. ह्या गाडीने मी संपूर्ण ओमानचा महिनाभर सहा हजार की.मी. प्रवास केला. माझदा च्या ओमानच्या मुख्य विक्रेत्याचा एक माहितीपट तयार केला होता. प्रत्येक गावात असलेले माझदा विक्री / सेवा केंद्र कसे, कुठे, किती कार्यरत होते ह्याची प्रत्यक्ष माहिती त्या माहिती पटात होती. त्याच काळात एका थंड पेय उत्पादकाची माहिती पुस्तिका तयार करण्याचे काम मिळाले. त्या करता महिना भर विविध जागांची, पेयांची छायाचित्रे मी घेतली होती. त्यातील दोन छायाचित्रा करिता मी एक प्रयोग केला कारण महागडी छत्रीक्षप्र (अंब्रेला स्ट्रोब / फ्लॅश) व्यवस्था नसल्याने तो प्रयोग करणे आवश्यक होते. दुकानातील छताला लावतात तसल्या दोन फूटाच्या चार प्रकाश नळ्यांची एक प्रकाशपेटी अशा दोन पेट्या मी विकत घेतल्या व त्याचा वापर करून पुढील दोन छायाचित्रे मी तयार केली. प्रकाश नळी छायाचित्रा करता आवश्यक असणारा पांढरा रंग देत नाही. ही छायाचित्रे चित्रफितीवर असल्याने छपाई करताना छायाचित्रातील पांढरा रंग निळसर हिरवा रंग दिसतो व बाकीचे सगळे रंग मूळ रंगापेक्षा वेगळे दिसतात. म्हणून पुन्हा त्या माझ्या मित्राच्या छपाई प्रशाळेचा उपयोग केला. त्या चित्राचे हे दोन नमुने इथे देत आहे. हे मी निकॉन पी ९० ने अंकित केले आहेत.
सापाने घातला घोळ - त्या पुस्तिकेकरता काही निसर्ग चित्रांची आवश्यकता होती म्हणून मी व त्या कंपनीचा पुस्तिका नियोजन अधिकारी त्याच्या टोयोटा गाडीने रुस्ताक ह्या गावी एका झर्याचे उगम स्थान व तिथल्या किल्ल्याची पाहणी करण्याकरता गेलो होतो. झर्याची पाहणी करून आम्ही किल्ल्याकडे जाताना एका मशीदी जवळच्या गतिरोधकावर वेग कमी केला होता. माझे लक्ष दूर दिसणार्या किल्ल्याकडे होते. गाडी चालावणारा तो अधिकारी जोरात ओरडला "खिडकीच्या काचा नीट बंद कर, समोरच्या काचेवर साप आहे." मी तो हिरवा गार ३ फूट लांब साप बघितला. गाडी थांबून नीट तपासणी केली पण साप दिसला नाही. हा प्रसंग दुपारी एकला घडला होता. चित्रीकरण आवश्यक तयारीनिशी परत यायचे ठरवून आम्ही मस्कतला संध्याकाळी पाचला माझ्या घरी आलो. मी दाराची बेल वाजवणार तेवढ्यात तो अधिकारी व जवळ उभे असलेले शेजारी साप साप म्हणून ओरडले. गाडी वर गरम पाणी टाकले, अर्धा तास शोधाशोध झाली पण साप सापडला नाही. अती दाबाच्या पाण्याच्या फवार्याने गाडी धुण्या करता नेली. त्याला तेलाचा फवारा मारून गाडी धुवायला सांगून आम्ही तासाभरात येतो असे सांगून घरी गेलो. दीड तासाने परतलो, त्या जागेचा मालक मुख्य दरवाजा बंद करून निघून गेला होता.
दुसर्या दिवशी त्याला कंपनीची गाडी मिळाली नाही म्हणून माझ्या गाडीने जायचे ठरले. माझी माझदा ३२३ गाडी घेऊन आम्ही तयारी निशी रुस्ताकला जायला निघालो. त्या अधिकार्याची सकाळची कामे संपवून १२ च्या सुमाराला रुस्ताक गावात माझी गाडी शिरली, मी माझ्या डाव्या आरशावर हिरवा साप विळखा घालून बसलेला बघितला. प्रग्रा (कॅमेरा) गळ्यात अडकवलेला होता छायाचित्र घेतली. आजूबाजूचे लोक आम्हाला गाडी थांबवू नका असा इशारा करीत आम्हाला पुढे जायला सांगत होते. गाडी त्या मशिदी जवळच्या गतिरोधकाजवळ येताच सापाने हवेत लांब उडी घेतली व नाहीसा झाला. छायाचित्रणाचे काम संपवून आम्ही परतलो. झाले हे सगळे योगायोग होते का काही गूढ होते. टोयोटा गाडीतून १८० की.मी. रुस्ताक - मस्कत सापाने प्रवास केला. माझी माझदा २०० फुटावर घरापासून दूर एका दुकानासमोर पार्किंग जागेत होती. तिथे कितीतरी पांढर्या गाड्या होत्या. माझ्या घरासमोर सापाला १० जणांनी संध्याकाळी पाच वाजता बघितले होते. दुसर्या दिवशी मी माझी गाडी घेऊन परत रुस्ताकला जाणार हे सापाला केव्हा / कसे समजले? मस्कत मधली कामे संपवण्यात आम्हाला तीन तास लागले होते. गाडी बर्याच ठिकाणी बर्याच वेळ उभी होती त्यात त्या ४० अंशाच्या उष्ण तापमानात गाडीच्या तापलेल्या पत्र्यात साप कुठे लपून बसला असणार? १८० की.मी. रुस्ताकचा प्रवास व तो गतिरोधक जवळ आला आहे हे सापाला कसे समजले? सापाची तिन्ही छायाचित्रे काळी का झाली? त्याच चित्रफितीची बाकी सगळी चित्रे उत्तम छापली गेली होती. सगळ्यात धक्कादायक, १५ दिवसात त्या टोयोटा गाडीचे मस्कतच्या रहदारीत एका खांबा वर आपटून एंजीन भागाचे तुकडे झाले होते. त्या रस्त्याला गाडीला वेग घेणे शक्य नसताना ते घडले होते. योगायोग, नशीब की भुताटकी? - क्रमश:
प्रतिक्रिया
25 Feb 2010 - 9:32 am | मदनबाण
छान लिहले आहे,
पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
25 Feb 2010 - 10:16 pm | पक्या
जबरदस्त ...काय एकेक अनुभव आहेत तुमचे. हाही भाग वाचनीय झाला आहे.
सापाने एवढ्या लांबवर प्रवास केला असेल काय? हा दुसरा साप असेल कदाचित. ..सहज आपला एक तर्क बरंका. तुमचा अनुभच मात्र विलक्षण आहे.
छायाचित्रे सुंदर आली आहेत. मला १ ले खूपच आवडले.
>>मागची काच पण फुटली होती. माझा चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) आडवा पडलेला बघितला. सुरू करून बघितला चांगल्या स्थितीत हो.
एवढा मोठा अॅक्सिडेंट झाला तरी आपण उठून आधी कॅमेरा कसा आहे ते पाहिले :) . यावरून आपली कामावरची निष्ठा दिसून येते.
-जय महाराष्ट्र , जय मराठी !
26 Feb 2010 - 5:47 am | मीनल
एक एक प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत.
आपण अधिक लिहिलेत तर आत्मचरित्र पुस्तक तयार होईल आणि ते नक्की वाचनिय राहिल असं वाटतं.
मीनल.
26 Feb 2010 - 2:54 am | प्राजु
बापरे!!
काय विलक्षण अनुभव आहेत एकेक.
मीनलशी सहमत आहे.. तुम्ही आत्मचरित्र लिहाच.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
26 Feb 2010 - 3:29 am | शेखर
सहमत...