नशीब भाग ४,५,६ एकत्रित

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
4 Dec 2009 - 7:19 am

भाग १,२,३ एकत्रित
नशीब माझे - भाग - ४ १२ / ०९ / २००९
मी ८ वी - ९ वी (१९६२ -६३) शिकत असताना माझा मोठा भाऊ इलेइट्रीकल इंजीनीरींग शिकत
होता. एका सुट्टीत तो घरी तालुक्याच्या जागी आला असताना आम्हा मुलांना इलेक्ट्रॉनिक
शास्त्रातील नवीन शोधांचे वर्णन सांगत होता. गेरार्डी ह्या लेखकाचे रेडिओ इंजीनीरींग हे २००० पानी
इंग्रजी पुस्तक वडिलांच्या मदतीने मी शिकत असल्याने, व्हॉल्व्ह, ग्रीड, कॅथोड, इलेक्ट्रॉनिक
सर्किट हे प्रकार मला अवगत होते. माझा भाऊ ट्रान्झीस्टर, डायोड वगैरे प्रकारांची माहिती
सांगण्यात मग्न होता. शुद्ध सिलिकॉन वीज प्रवाह रोधक आहे परंतु अशुद्ध सिलिकॉनच्या
पी आणि एन अशा दोन चकत्या एकमेकांना विशिष्ट पद्धतीने जोडल्यास डायोड तयार होतो,
त्याचा आकार टाचणीच्या डोक्या एवढा असतो. तसेच पी एन पी अशी विशेष जोडणी केल्यास
ट्रायोड तयार होतो.

मला चूप बसवेना मी लगेच बोलून गेलो. जर टाचणीच्या डोक्या एव्हढ्या दोन चकत्यांचा एक
डॉयोड तर कपॅसिटर सुद्धा तयार होईल, एका चकतीचा रेझीस्टर होईल, तीन चकत्यांचा ट्रायोड
आहेच, हे सगळे एकत्र जोडणे जर शक्य झाले तर २ फूट बाय २ फूट चा हा एव्हडा मोठा रेडिओ
हातातल्या घडाळ्या एव्हडा सहज तयार होईल. भावाला माझे बोलणे तेव्हा फार हास्यास्पद
वाटले. परंतु पुढील १० वर्षात एल एस आय आणि व्ही एल एस आय चे उत्पादन जगभर किती
प्रमाणात वाढले हे जगजाहीर आहे. इथे मुद्दा हा आहे की तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रता व
डोकं जगभर उपलब्ध आहे परंतु मोजक्याच व्यक्ती ते विचार जगभर प्रसारित करण्यात यशस्वी
होतात. त्यांच्या साथीला असते नशीब त्यांचे.

माझे बोलणे हास्यास्पद ठरले. पण ताजी केळी खाणारा त्या आजीचा त्या नातवाचे (भाग १)
बोलणे "स्मार्ट, इंटेलीजंट" गणले जात असे. माझ्या तुलनेत तो नातू श्रीमंत बापाचा एकुलता
एक मुलगा, गोरा गोमटा, एका थंड हवेच्या ठिकाणातल्या इंग्रजी माध्यमातून शिकवलेला,
आंग्लयुक्त मराठी लाडगोड बोलणारा होता. त्याची आई माझी दूरची आत्या होती. आजूबाजूच्या
स्त्रियांच्या तुलनेत गोरी, चपळांग होती. त्या काळांत त्या नातवाला "आम्ही ही सुंदर झालो
असतो वदले...” हे वाक्य मला (माहीत असून), एका "रड्याला" बोलायचे धाडस नव्हते.

असो, माझे बालपण संपले. आजार, औषधं, पट्ट्या, गंडे, धागे सगळे संपले. पण त्याचे घाव
व दुष्परिणाम खोलवर रुजवून गेले. माझे सतत रडण्याचे कारण माझेच मला उमजले. कस
हायसं वाटलं, आत्मविश्वासाची कमी जाणवू लागली, ह्यात वाढ करणारे प्रसंग, घटना घडत
गेल्या. त्या कळांत एका संस्थेच्या कामात झोकून दिले, इतके की एसेस्सीच्या परीक्षेत नापास
झालो. संस्थेच्या मंडळींनी दोष माझा असल्याचे सांगून जखमेवर छानसे मीठ रगडले.

त्या धक्क्यातून मी पुढल्या ६ महिन्यातच सावरलो. चांगल्या गुणांनी एसेस्सी परीक्षा पास झालो.
आत्मविश्वासात भर पडली. १६ वर्ष माझ्या अपयशाचा दोषी मी नाही असे न समजता मीच दोषी
असणार असे ठरवून आत्मपरीक्षण सुरू केले ते पण - नशीब माझे - भाग - ५ (१५ / ०९ / २००९)
१९६५ एसेस्सी झालो आणि आप्तांना मला वेडे ठरवायला जास्त विषय मिळाले. प्रत्तेकाने
आपापल्या कुवती नुसार त्यांनी निवड केलेले विषयच कित्ती महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्याचा
प्रयत्न केला. मी ते विषय हाताळू शकणार नाही ह्याची कबुली दिल्याबद्दल वेडा ठरलो. वडिलांनी
चक्क १५० रुपये महिना पगाराची रेल्वेची नोकरी करायला पाठवले. ती नोकरी दोन महीने मी
केली. रेल्वे सिग्नलींग खात्यातील एक भांडार, त्यातल्या एका कारकुनाचा मी मदतनीस होतो.
आत येणार्‍या व बाहेर जाणार्‍या नगांची मोजणी, जवळच्या टपरीतून चहाचे ग्लास, विड्या /
सिगरेट / पान / गुट्गा आणणे, कामगारांच्या शिव्या ऐकणे, त्या वयात नको ती लफडी ऐकणे
वगैरे कामे त्या दोन महिन्यांत मी केली. हा माझा दोष की नशिबाचा भाग ?

त्याच काळात माझ्या बाबांनी " बॉक्स वॅगन" नावाची १५० पानी पुस्तिका रेल्वे दुरुस्ती विभागा
करता लिहिली होती, त्यात काही रेखाचित्र मी काढली होती. त्या पुस्तिकेच्या छपाईचे यंत्र
जुळवणीत त्या छापखान्याचे मालकाला महत्त्वाची मदत करून सर्वांना चकित केले होते.
आमच्या घरा समोरच्या गाळ्यातून स्वतंत्र व्यवसाय करणारे ते सिंधी मला आदर्श वाटत होते.
कारण सचोटीने वागत माझे सगळे नातेवाईक महिन्याला ८०० रुपयापेक्षा कमीच पगार
मिळवत होते. परंतु घरासमोरचे ते दुकानदार दिवसाला १००० रुपये मिळवत होते.
त्यांच्यातील एकही एसेस्सी झालेला नव्हता.

त्या काळात गावा कडे इलेक्ट्रीकल वायरींग व मोटर दुरुस्ती व्यवसायात चांगली कमाई होती.
मी त्या कामात पैसे मिळवत होतो पण परवाना नव्हता, आय. टी. आय चे इलेक्ट्रिशियन
प्रशिक्षण आवश्यक होते. १९६६ जिल्ह्याच्या ठिकाणी जागा मिळाली पण ६ महिन्यात काही
घटना घडल्या. मी ते प्रशिक्षण सोडले. त्या प्रशिक्षण गटात मी एकटा को.ब्रा. होतो. मास्तर
राखीव जागावाला होता. पहिल्या महिन्यातली पहिली चाचणी परीक्षा मला १०० टक्के गुण
असूनही त्याने खोडून ९५ टक्के केले. एका राखीव जागावाल्याला एक उत्तर चूक असूनही ९६
टक्के गुण देऊन प्रथम घोषित केले त्या राखीव जागावाल्या मास्तराने. लागोपाठ तीन चाचणी
परीक्षेत हाच प्रकार घडल्याने वादविवाद झाले. मोठ्या भावाने मुख्याधापकांना पत्र लिहून
मदत मागितली. त्या मास्तराला कारण दाखवा नोटीस दिली गेली. प्रकरण जास्त चिघळले.
मी मास्तराला वर्गात ओरडून सांगितले " तुम्ही असेच विहिरीत बसून जग कित्ती मोठे आहे
त्याची कल्पना करण्यात आनंद माना. मला ह्या विहिरी बाहेरचे जग मोकळे आहे तिथे तुमचे
हात पोहचणार नाही." मी प्रशिक्षण सोडून जाण्याची कारणे लिहून बाहेर पडलो.

१९६७ पुण्यात आलो. रेडिओ दुरुस्तीचे ६ महिन्याचे रोज १ तासाचे प्रशिक्षण, मी रोज १२
तास बसण्याची परवानगी घेऊन १५ दिवसांत पूर्ण केले. गावाला परतलो. आमच्या शाळेत
माझ्या शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझा आत्मविश्वास वाढवला. शाळेत वापरात
असलेली ध्वनीक्षेपण, रेडिओ, प्लेअर वगैरे साधने एकत्र जुळवून एक सुंदर कनसोल
बनवण्याच्या माझ्या कल्पनेला साकार करण्याचे कंत्राट मला दिले. कोणताही मदतनीस
न घेता मी एकट्याने जोडणी व सुतारकाम १० दिवसात पूर्ण केले. वयाच्या १७व्या वर्षी
स्वबळाने केलेल्या कमाईचे अप्रूप मला आजही आहे.

माझे ते काम बघून कन्न्याशाळेचे काम मला मिळाले. कनसोल बरोबर प्रत्येक वर्गात
स्पीकर बसवण्याचे कंत्राट मला मिळाले त्याच्या ६ हजार रुपयाच्या पहिल्या हप्त्याचे पैसे
व दोन किलो पेढे घेऊन मी घरी गेलो. देवापुढे पेढे ठेवले व मला जनावर ठरवणार्याल
आईच्या हातात ६ हजाराची रोख रक्कम दिली. ती "कुठून चोरी करून आणलेस ? कोण
तुझ्यावर विश्वास ठेवणार ? जा मित्रांनबरोबर सिगरेटी, पान, हॉटेलात उडव ते पैसे,
माझ्या समोर काय मिरवतोस हे पैसे ?” - नशीब माझे - भाग - ६ (१७ / ०९ / २००९)
कन्न्याशाळे करता ४ फूट उंच ३ फूट रुंद दीड फूट खोल असा कनसोलचे सुतारकाम मी
एकट्याने पूर्ण केले. सगळ्या उपकरणांची जोडणी पूर्ण झाली. कनसोल सुरू झाला. माझे
कौतुक झाले पण माइकच आवाज पातळीचा दोष हलूहळू वाढू लागला. माइक केबल ५
फुटापेक्षा जास्त लांबीची वापरल्यास आवाज वाढताना शिट्ट्या वाजायच्या. ह्या दोषावर
उपाय शोधण्याचे खूप प्रयत्न केले. टिका करणारेच आनंदाने पुढे धावले. पण कंत्राट ठरल्या
प्रमाणे शाळेने कंसोल बनवण्याचे माझे पैसे दिले.

काही वर्षांनी त्या दोषाचा उपाय मला सापडला. कमी रोधकाचे ( लो ईंपीडन्स ) माइक,
एक्स. एल. आर. पद्धतीची माइक केबल आणि ईंपीडन्स मॅचिंग ट्रान्सफॉरमर वापरल्यास
हा दोष काढता येतो, ही माहिती १९६७ ला मला मिळाली नाही - - नशीब माझे.

१९६८ ला मी रेडिओ दुरुस्तीचे दुकान सुरू केले. मोठ्या भावाने त्या काळात ५०० रुपयाची
मदत केली. पाण्याचे पाइप कापून ४ पायर्यांच्या ५ शिड्या वेल्ड करून आणल्या, त्यात
दीड इंच जाड ८ फूट लांबीच्या लाकडी फळ्या टाकल्या. रेडिओ व इतर सामान ठेवण्याचे
रॅक तयार केले. त्याच पद्धतीने बसण्याची जागा, कामाचे टेबल वगैरे छान जुळवाजुळव
केली. रोज एक दोन रेडिओ येत असत पण कमाई करण्याच्या धंद्यात मी अजून मुरलो
नव्हतो. त्यात मला आठवत नसलेले, काका / काकू कंपनी दुकानाचा पत्ता शोधीत यायचे,
मी त्यांच्या खांद्यावर कसा खेळलो होतो हे वर्णन करण्याचा विफल प्रयत्न करीत असत.
कारण, मी कमी पैशात त्यांचा जळलेला रेडिओ दुरुस्त करून द्यावा. असल्याच एका काकाने
पैसे देण्याचे चक्क नाकारले, म्हणे त्यांनी मला खांद्यावर बसवून दर सुट्टीला मला गोळ्या
बिस्किटे खायला घातली होती. मी "काका मी आता खांद्यावर बसायला तयार आहे. पण
तुमच्या पायात दम नाही आणि खिशात पैसा नाही." जे कधी घडले नाही ते सांगण्याचा उद्देश
मला समजला आहे. जेव्हां पैसे घेऊन याल तेव्हाच रेडिओ दुरुस्त होईल.

एके दिवशी शेजारी राहणारा इसम रेडिओ घेऊन आला, म्हणतो "सकाळ पासून चालू होता,
थोड्या वेळापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण सुरू झाला नाही, जरा बघता का ?" मी
सवयी नुसार सांगितले सेवा शुल्क द्यावे लागेल. तो "हो, हो जरूर !" मी रेडिओ लगेच
उघडला, स्विच दुरुस्त करून रेडिओ सुरू केला, "सर १५ रुपये झाले". तो कडाडला " दोन
मिनिटाच्या कामाचे १५ रुपये ?". मी "माझे सेवा शुल्क द्यावे लागेल, नाही तर रेडिओ बंद
स्थितीत घेऊन जा" बाकी शेजारी मध्यस्ती करायला पुढे सरसावले. मी नमत घेऊन
विचारले तुम्ही किती देणार ? त्याने ३ रुपये भिरकावले. मी जोडलेल्या वायर काढून टाकल्या
बंद अवस्थेत रेडिओ परत केला, माझ्या खिशातून दोन रुपयाचे नाणे काढून त्याचा हातात
३ + २ असे ५ रुपये ठेवले आणि त्या जमलेल्या गर्दीला ओरडून सांगितले "मी दारात
आलेल्या भिकार्याला ५ रुपये देतो. पुन्हा माझ्या दारात भीक मागायची नाही." त्या वेड्याने
ते ५ रुपये घेतले नाही, पण शिव्या घालितं रेडिओ घेऊन गेला.

दोन महिन्यानंतर माझ्या एका मित्राला घेऊन तो शेजारी व त्याची बायको माझ्या दुकानात
आले. त्याच्या बायकोने बोलायला सुरुवात केली "माफ करा, त्या रेडिओला आम्ही
विक्रेत्याकडून दीड महिन्यानंतर दुरुस्त करून आजच आणले, ४५० रुपये द्यावे लागले . . . "
मी माझ्याच डोक्यात मारून घेतले - - नशीब माझे

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

फारच संक्षिप्त लिखाण होत आहे.. जरा विस्तृत करा की साहेब

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विनायक रानडे's picture

4 Dec 2009 - 9:11 am | विनायक रानडे

आता दुवा दिला आहे. सविस्तर लिहिण्याची सवय नाही, थोड्क्यात मुद्दा व प्रसंग मांडण्याची चलचित्र व छाया चित्रकार असल्याने सवय झाली आहे.