नशीब भाग ३६ ते ४० एकत्रित

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
24 Jan 2010 - 1:09 pm

नशीब भाग ३१ ते ३५
नशीब हे शिकलो - भाग ३६ 11/11/09
विदेशी नोकरी मिळवून देणार्‍या काही संस्था उमेदवाराला मोफत सेवा देतात. निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराचा खर्च निवड करणारी कंपनी देते. मला प्रथम इराण आणि नंतर ओमान ह्या दोन्ही नोकर्‍यांच्या उमेदवारीचा खर्च करावा लागला नाही. मात्र बर्‍याच संस्था दोन्ही बाजूने लुटा ह्याच मार्गाने मासे (उमेदवार) पकडण्याचा धंदा करतात. मी अशा "दो.बा.लु."संस्था फार जवळून अनुभवल्या, सुदैवाने जाळ्यात अडकलो नाही. सिडनीला जाण्याचे विसरलो व विदेशी नोकरी शोधात प्रयत्न सुरू केले. निवड होत असे, पण माझ्या पासपोर्टवर इराणी शिक्के व त्यात इराणी पासपोर्ट धारक बायको बघून मला पाच कंपन्यांनी नकार दिला होता. आम्ही दोघे दिवस रात्र भांडण शोधू लागलो, इतकेच नाही तर घटस्फोटाचे विचार . . जावे त्याचा वंशा . . शेवटी बायकोला भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. एकाने माझा जुना पासपोर्ट नवीन करून दिला.

वर्ष १९८२, इंडियन असण्याची घृणा यावी असे अजून एक कारण ... इट हॅपनस ओन्ली इन इंडिया . . . अगदी खरे आहे. सचिवालयातील अधिकार्‍यांनी मला व बायकोला भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न करण्या बद्दल चक्क वेड्यात काढले होते. नागरिकता अर्ज शोधण्यात दीड महिना गेला, कोणालाच माहीत नव्हते, एका लेखनिकेला माहीत होते ति तीन महिन्याच्या सुट्टीला गेली होती. कसाबसा अर्ज मिळाला. १९५३ सालची पिवळी झालेली टंकलिखित प्रत होती. पार्ल्याच्या माझ्या मेव्हण्यांनी अनमोल मदत केली, फार थोड्या मुदतीत बायकोला भारतीय नागरिकत्व मिळवून दिले.
ओमानची कंपनी युनीलीव्हर युके व एक ओमानी, अशा सहकार तत्त्वावर बरीच वर्ष कार्यरत होती. ह्या कंपनीचे विविध विभाग होते. बहूखणी दुकान (डिपार्टमेंट स्टोअर), विदेशी दारू दुकान, कार्यालय व्यवस्थापन व उपकरणे / साधने विभाग. शीत पेटी / हवा विभाग (एसी / फ्रीज), सामान्य / खास विमा विभाग वगैरे. युनीलीव्हर युके कंपनी प्रत्येक आखाती देशातून सहकार तत्त्वावर कार्यरत होती. कार्यालय व्यवस्थापन व उपकरणे / साधने विभागाला सेवा व्यवस्थापकाची निवड करायला एक इंग्रज मुंबईला आला होता, तो युनीलीव्हर बाहरिनला व्यवस्थापक होता. माझा अनुभव तपासून त्याने माझी त्या क्षणाला एक तंत्रज्ञ म्हणून निवड केली. ओमानला गेल्यावर माझी व्यवस्थापक म्हणून निवड होईल असे सांगण्यात आले. मला नोकरीची फार गरज होती मी लगेच करार पत्रावर सही केली. बायको व मुला करता सदाशिव पेठ पुण्यात एक भाड्याची खोली घेऊन राहण्याची सोय केली.
१९८३ एके सकाळी १० वाजता मस्कत विमान तळावर उतरलो. कंपनीचा एक बलूची वाहन चालक हातात नावाचा फलक घेऊन उभा होता. त्याच्या जवळ माझ्या सारखे इतर विभागात कामावर रुजू होणारे दोघे उभे होते, त्यातला एक वसईचा होता, एक केरळी होता. विचारपूस झाली बलूची वाहन चालक माझ्या कडे बघत, " आओ, कंपनीमे ईंडीयासे और एक गधा आया, तुमको कौन, कहांसे, क्यों पकडके लाते है?" बाकी दोघे दोन शिव्या घाकून मोकळे झाले, मी - "मुझे खुशी हुई, यहा पैर रखतेही, मेरी जबान जाननेवाला कोई मिला, एक लंबासा गधा आया था, उसने बताया था, ओमानमे गधे है लेकीन कहने केभी लायक नही है, इसलीए मुझे चुना गया." (बलूची हिंदी - उर्दू बोलतात) तो जे चुप झाला ते ५० की.मी अंतरात, विमानतळ ते कंपनी कार्यालया पर्यंत एक शब्द बोलला नाही. तोच वाहन चालक माझा चाहता बनला.

कार्यालय व्यवस्थापकाच्या खोलीत जाऊन उभा होतो. जरा वेळ वाट बघितली आणि मी पाणी मागितले, व्यवस्थापक मुंबईचा सिंधी होता, त्याने मदतनिसाला ओरडून सांगितले, "अरे मुंबईहून भुका प्यासा कोणी आला आहे ह्याला पाणी पाजा." मी त्याला सिंधी पाहुणचाराची आठवण करून दिली, बाहेरून आलेल्याला आधी भाजलेले पापड व पाणी देतात. देश सोडल्या बरोबर विसरून गेलात काय ? त्याने हात जोडले, "मैने तुम्हारे बारेमे सुना था, ठीक है, देखो आगे क्या होगा." कार्यालय वातानुकूल असल्याने थंड होते परंतु बाहेर रस्त्यावर ४० अंश तापमान अंगाला पोळत होते. संध्याकाळचे पाच वाजले. कंपनी वाहनातून राहण्याच्या जागी गेलो, मी आणि वसईवाला एकाच ठिकाणी होतो एका खोलीत दोन पलंग होते, पलंगावर स्प्रिंगची गादी, चादर नाही, उशीला अभ्रा नाही, वातानुकूल यंत्र नावाला होते. थंड करत नव्हते. राहण्याची सगळी व्यवस्था कंपनी देईल असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात "रॅगिंगचा" व्यवसायी प्रकार होता. त्या उघड्या गादी वर टॉवेल टाकून केव्हा, कसा झोपलो कळले नाही.

सकाळी उठल्यावर कळले कंपनी जरी ब्रिटिश असली तरी चालवणारे इंडियन गुलाम होते. तो दिवस एका नवीन शिक्षणाची सुरुवात होती, एका गुलामाची गुलामी करून सुखाचा शोध कसा करायचा? हे मी शिकलो.

नशीब हे शिकलो - भाग ३७ 11/13/09
१९८३ ला ओमानी चलन १ रियाल = ५६ रुपये होते. मला २०० रियाल पगार मिळत होता. रुपयाची किंमत बदलली की माझा रुपयातला पगार बदलायचा. ५० रियाल माझ्या करता ठेवून मी १५० रियाल बायकोला पाठवीत होतो. मस्कतला जाताना मी मुद्दामच रिकाम्या खिशाने गेलो होतो. कंपनीने ५० रियाल पगारातून खर्चाला दिले. सकाळच्या चहा नाशत्या पासून मला खर्च होता. ५० रियाल महिन्याचा खर्च फार सांभाळून करावा लागत असे.

तर, दुसर्‍या दिवशी सकाळी आधी माझ्या विभाग प्रमुखाला भेटायला गेलो. चादर, अभ्रे व वातानुकूल यंत्रा विषयी माझी तक्रार ऐकण्याचे त्याने छानसे नाटक केले, व्यक्तीविषेश (पर्सनल) विभागाच्या प्रमुखाला बोलावले, तो एक विचित्र दिसणारा केरळी माणूस होता. माझी तक्रार ऐकून म्हणतो "हे मुंबईहून येणारे लोक स्वतः:ला राजे समजतात, कंपनीने तुम्हाला जागा दिली आहे मुकाट्याने राहा, २० वार्षा पूर्वी मी ह्या कंपनीत आलो तेव्हा छोटा लाकडी खोका माझी खुर्ची होती, मोठा खोका टेबल होते." मी मुलाखतीत मिळालेला कागद दाखवला, मुलाखत काराचे नाव सांगितले, त्याला विचारले "३० वर्षा पूर्वी तू कपडे न घालता रस्त्यावर भटकत होता, मग आज कोट, गळ्यात पट्टा, वातानुकूल गाडीत बसणे चूक आहे, हो ना?" वाचकहो, मागच्या भागात म्हणून मी लिहिले होते, इंडियन गुलामाचा गुलाम होणे.

आजच मित्राशी बोलताना आठवले, एकदा ओमानला जाण्या आधी एका मित्राने मला एका मासिकाच्या संपादकाकडे आमंत्रण दिले, माझी व बायकोची मुलाखत मासिकात छापणार होते. संपादकाच्या घरी, पुरुषी थाटातील एक महिलेने स्वागत केले. तिच संपादिका होती. पुण्यातील एका ब्राम्हणाने धर्मांतर केले हा विषय मासिकाची विक्री वाढवेल व तिची समाजवादी, निधर्मी प्रतिमा उंचावेल अशी तिची योजना होती हे थोड्याच वेळात तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. (निधर्मी = कर्तव्य विसरलेले, कारण धर्म = गूण / कर्तव्य). त्या बाईने आधी बायकोला बरेच प्रश्न विचारले पण उत्तरे बाईला हवी असलेली चमचमीत नव्हती, तसे तिने बोलून दाखवले. तिचे लक्ष लिहिण्यात होते, मला प्रश्न विचारला, "तुम्हाला धर्मांतर केल्यावर काय वाटले?" मी "बायकोच्या पालकांना व आप्तांना कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली. माझे धर्माविषयीचे विचार व कल्पना रास्वसंघाने फार सरळ व सोपे केले आहेत . ." हे वाक्य संपताच संपादीकेच्या नाजूक जागी भले मोठे इंजेक्शन टोचल्यासारखी ति एकदम खुर्चीतून उभी झाली, डोळ्यावरचा चस्मा खाली आला, लिहितं असलेली वही बंद झाली, एका महत्त्वाच्या कामाची आठवण तिला झाली म्हणून तिने मुलाखत थांबवल्याचे सांगत आम्हा दोघांचा निरोप घेतला. त्या "इंजेक्शनचा" परिणाम अजून ओसरला नसावा कारण मी त्या अर्ध्याच मुलाखतीला पूर्ण करण्याची वाट पाहतो आहे. वाचकहो, ह्या भारतीय समाजाला परकीयांची भिती नसून विविध माध्यमातून विराजमान असलेल्या अशा स्वकीय धेंडांचीच जास्त भिती आहे.

असो, तर ओमान - तीन - चार दिवस सेवा विभागाच्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात गेले. यांत्रिकी / विद्युत / इलेक्ट्रॉनिक टंक लेखन उपकरणे दुरुस्ती, लहान - मोठे क्षमतेचे प्रत छपाई (फोटोकॉपी) यंत्र दुरुस्ती, अमोनियाने तयार होणारे नकाशे छपाई यंत्र दुरुस्ती व महत्त्वाचे मायक्रोफिल्म संबंधीत ग्राहक / प्रक्रिया / वाचन / छपाई यंत्रांची दुरुस्ती अशी विविध कामे व सेवा आमच्या विभागात होत्या. सहा महिन्यात मायक्रोफिल्म सोडून सगळ्या यंत्रसामुग्रीचा अनुभवी तंत्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. ह्या यंत्र सामुग्री दुरुस्ती कामाचे दर दिवशीचे वाटप आमचा गटप्रमुख करीत असे. त्यात त्याचा कुचटकटपणा व स्वार्थ समजायला जरा वेळ लागला.

आमच्या सेवा विभागात मी एकटाच असा होतो की मस्कतला येताच दुसर्‍या महिन्यात वाहन चालकाचा परवाना मिळवू शकलो. माझी नवीन कोरी माझदा चौथ्या महिन्यात मी घेतली, त्या करता कंपनी जास्तीचे १०० रियाल देत असे, गाडीचे कर्ज मात्र माझ्या स्वतः:च्या नावाने बॅन्केतून घ्यावे लागले होते. ७५ रियाल हप्ता असायचा व २५ रियाल मध्ये पेट्रोल खर्च व दुरुस्ती सांभाळायची अशी ती एक कसरत होती. माझ्या बरोबरच्या बाकी गाडीवाल्यांच्या जुन्या गाड्या होत्या पण त्यांना देखील १०० रियाल खर्च मिळत होता त्यातले २० रियाल पेट्रोल व दुरुस्ती ते सांभाळत होते. तर गटप्रमुखाचा कुचटकटपणा असा की सगळ्यात लांबची कामे माझ्या नावाने जुळवायची व जवळची कामे आपल्या मित्रांना ठेवायची. ३० ते ५० की.मी.कार्यालयापासून दूर, त्यामुळे रोज ६० ते १०० की.मी. जाये होत असे. माझा महिन्याचा पेट्रोल खर्च २५ रियाल पेक्षा जास्त असायचा. लांब अंतरावर जाण्याने जेवणाच्या वेळा बरोबर जमत नव्हत्या, खर्च जास्त होत असे. मायक्रोफिल्म कामे फक्त गटप्रमुख करीत असे. एकदा त्याने मला मदतनीस म्हणून नेले, त्या उपकरणात झालेला बिघाड मी सहज दुरुस्त केला. ते काम मी करणे चूक की बरोबर हे बघूया.

नशीब हे शिकलो - भाग ३८ 11/16/09
माझे काम मायक्रोफिल्मींग ( सुक्ष्मचित्रांकन ) पद्धतीच्या साधनांची - प्रतिमा ग्राहक, प्रक्रियक, वाचक व मुद्रण (कॅमेरा, प्रोसेसर, रिडर व प्रिंटर) - दुरुस्ती व निगा राखणे असे होते. मायक्रोफिल्मींग म्हणजे रोजच्या वापरात असणार्यार कागद पत्रांची फार छोटी प्रतिमा बनवून साठवण करणे असे आहे. ही छोटी प्रतिमा कृष्ण - धवल पद्धतीचा वापर करून, पारदर्शी भाग पांढरा व अपारदर्शी भाग काळा, म्हणून धन प्रतिमा (पॉझिटिव्ह इमेज) असते. ह्या फितीचे दोन मुख्य प्रकार आहेत. १६ मी.मी. हे अंतर एका आयताकृती चौकटीच्या दोन विरुध कोनातील आहे, तर ३५ मी.मी. हे अंतर फितीच्या एका आयताकृती चौकटीच्या दोन विरुद्ध बाजूतील असते. ह्या फितीचे दोन उपविभाग होते. १६ मी.मी. पट्टीचे ७२ फुटाचे रीळ होते तर ३५ मी.मी. फितीचा एक तुकडा संगणक विदाप्रवेशन पत्रकावर (डाटा एन्ट्री कार्ड) बसवलेलेला होता, त्यामुळे दोन वेगळे प्रतिमा ग्राहक (कॅमेरा) प्रकार होते. एका सेकंदाला एका ए४ कागदाची प्रतिमा ग्रहण करण्याची क्षमता १६ मी.मी. फीत प्रग्राची होती. प्रतिमा ग्रहणाचे काम पूर्ण झालेले रीळ एका रासायनिक प्रक्रिया उपकरणातून वाचन सुलभ होत असे. १६ मी.मी. प्रतिमा वाचना करता विशेष वाचक उपकरण होते. हे सगळे एका टेबलावर मावत असे. तसाच काहीसा प्रकार ३५ मी.मी. फीत प्रग्राचा होता, परंतु रासायनिक प्रक्रिया उपकरण विशिष्टं पद्धतीने जोडलेले होते. प्रतिमा ग्रहण व रासायनिक प्रक्रिया क्रमाने एकाच जागी होत असे. हा प्रतिमा ग्राहक १० फूट लांब, १० फूट रुंद व १० फूट उंच जागेत ठेवणे आवश्यक होते. ह्या ग्राहकाच्या साहाय्याने ए३ ( १३.९० * १९.६८ इंच ) ते ए० ( ३९.३७ * ५५.६७ इंच ) मापाच्या नकाश्याची प्रतिमा ३५ मी.मी. आयताकृती चौकटीत ग्रहण होऊन त्याच जागी रासायनिक प्रक्रियेने वाचन सुलभ होत असे. ३५ मी.मी. प्रतिमा वाचन व पुन:मुद्रणा करिता विशेष उपकरणे होती.

ह्या दोन्ही प्रग्रांनी चित्र प्रतिमा चित्र फितीच्या मापाची दोन आरशांच्या साहाय्याने होत असे, ह्या प्रकाराला प्रतिमा घडी (इमेज फोल्डींग) करणे म्हणतात. एका मोठ्या आकाराच्या आरशातील पूर्ण चित्र प्रतिमा थोड्या अंतरावर असलेल्या लहान आरशात पूर्ण दिसते, ती परावर्तित प्रतिमा भिंगाच्या साहाय्याने चित्र फितीवर मुद्रित होते. हे दोन्ही आरसे दर्शनी भागावर पारा लावलेले असतात, त्यामुळे परावर्तित प्रतिमा दोष रहित असते. परंतु सामान्य आरसा पार्श्वभागावर पारा लावल्याने त्यात दोन परावर्तित प्रतिमांचा दोष असतो.
ओमानच्या ह्या कंपनीच्या एका विभागात एक मराठी माणूस गट प्रमुख होता, त्यामुळे त्याची एक पातळी (लेव्हल) होती. मी एक तंत्रज्ञ म्हणजे कामगार पातळीचा होतो, एका मराठी कार्यक्रमाला जाताना मला बरोबर नेशील का असा प्रश्न मी त्याला केला असताना कळले की, त्याला त्याची पातळी सांभाळावी लागते, त्यामुळे तो मला " एन्टरटेन " करू शकणार नाही. ही व्यावसायिक जातपात मला नवीन होती, हे असले अनुभव पचवणे मी शिकलो.

मस्कतला १९८३ च्या काळात चार रस्ते मिळतात तिथे रहदारी नियंत्रक दिवे नव्हते तर गोल मैदान होते अजूनही आहे. मला गाडी घेऊन तीन महिने झाले असताना एका अशाच गोल मैदानात मी असताना मला डावीकडे वळायचे होते, मी डावा दर्शक दिवा सुरू केला. माझ्या मागून येणार्‍या गाडीचा डावा दर्शक दिवा सुरू बघून मी वळलो पण डाव्या बाजूने जाणार्‍या गाडीने न वळता सरळ जायचे ठरवल्याने माझ्या गाडीच्या डावीकडच्या दोन्ही दाराच्या मधोमध जोरदार धडक दिली. माझ्या डाव्या खांद्याला मुका मार बसला. रहदारीला अडथळा नको म्हणून गाडी घेऊन सरळ पोलिस ठाण्यात जाऊन थांबलो. माझ्या मागून पोलिसाची गाडी आली, मी अपघात स्थळ सोडले म्हणून तो पोलीस माझ्यावर चिडला होता. मी नवीन चालक आहे हे समजल्यावर तो शांत झाला होता. पूर्णं विमा असल्याने पैशाचा त्रास फारसा नव्हता परंतु गाडी हातात मिळेस्तोवर महिना भर कंपनी वाहन, भाड्याचे वाहन हा त्रास मात्र झाला. एक वर्ष संपले. बायकोला व मुलाला कधी एकदा भेटतो असे झाले होते. त्यांच्या ओमान प्रवेश परवान्याचे अर्ज भरून झाले होते. परंतु हातात येण्यास वेळ लागणार होता. रिकाम्या हाताने एका महिन्या करता पुण्याला आलो.

नशीब हे शिकलो - भाग ३९ 11/17/09
घरात पाय ठेवताच बायकोने मुलाला मराठीतून लवकर ऊठ बघ बाबा आला असे म्हणताच मी एकदम गारच झालो, फारसी बोलणारी बायको मराठी केव्हा शिकली ? मला तर गोड धक्का बसला होता. दोन तासातच बायकोचे डोळे भरून आले. मी ओमानला गेलो तेव्हा तिला सदाशिव पेठेतल्या त्या जागेत सोडून गेलो होतो. तिथे त्या मालकिणीने कसा त्रास दिला, भाषेचा कसा त्रास झाला. शेजारी नव्याने झालेल्या मैत्रिणीने कशी मदत केली होती ह्याचे वर्णन ति करीत होती. मी स्वतःवर चिडण्या शिवाय काहीच करू शकत नव्हतो. त्या मालकिणी बरोबर दोन हात करायची वेळ आली होती. शेवटी नळ स्टॉपला माझ्या दूरच्या मावसं बहिणीने तिची एक खोली माझ्या बायकोला भाड्याने दिली होती. भाजीवाल्या बाईबरोबर बोलता यावे म्हणून ती "आमची माती आमची माणसे" कार्यक्रम रोज ऐकत होती, दिवस भर मराठी रेडिओ ऐकून तिने मराठी शब्द बोलायला सुरू केले होते. एक महिना कसा संपला कळलेच नाही. मी मस्कतला परतलो. बायको येणार म्हणून घर बघणे वगैरे तयारी सुरू झाली. १९८४ ला ति मुलाला घेऊन मस्कतला आली. माझा पगार ४१० रियाल होता. १०० रियाल गाडीचा खर्च होता. नीटनेटके साधे जुने घर टेकडीच्या पायथ्याशी २५० रियाल महिना भाडे असे सापडले. एक मोठी खोली, दोन थोड्या लहान खोल्या, एक स्वैपाकाची खोली, एक संडास / अंघोळीची जागा, वर मोकळी गच्ची, घरापुढे उंचसखल माती, एकच गाडी मावेल एवढीच जागा, गाडी आत बाहेर करणे एक कसरतीचे काम होते. घर घेण्या आधीच निम्मे भाडे, टॅन्करचे पाणी वीज आकार देणारा सहभागी मराठी मित्र मिळाला होता. त्यामुळे १२५ रियाल भाडे, ५ रियाल पाणी, २० रियाल वीज असा खर्च मी देत असे. १६० रियाल महिना हातात उरत होते.तीन महिन्यात सहभागी मित्राला त्याच्या कंपनीने चांगली जागा दिली, तो ते घर सोडून जाताना त्याने दुसरा मराठी सहभागी शोधून दिला होता. हे मित्र मराठी मित्र मंडळामुळे मला मिळाले होते. ह्या काळात नव्याने ओळख झालेल्या मित्रांनी अनमोल मदत केली. एके दिवशी १४ इंची टीव्ही चे पूर्ण पैसे त्यांनी देऊन माझ्या घरी आणून ठेवला, मी ६० रियाल / महिना देऊन ते फेडले. त्याच काळात कंपनीने नवीन गाडी वापरणार्‍याना गाडी खर्च व घर भाडे वाढवून दिले. त्यामुळे महिन्याच्या खर्चात काही बचत करणे शक्य झाले. मला कामातील वेळ, घर खर्च ह्याचे नियंत्रण करणे बर्‍याच प्रमाणात सुलभ झाले. पुढील सहा महिन्यात घरात दोन सहभागी बदलले. त्या घरातील शेवटचा सहभागी एक वेगळाच अनुभव देऊन गेला.

त्या सहभागी कुटुंबात नवरा बायको दोघे नोकरी करीत होते, दोन शाळेत जाणारी लहान मुले होती. सकाळी ७.३०ला ते सगळे बाहेर जात असत. दुपारी ३ ला सगळे घरी परत येत होते. ति बाई शाळेत शिक्षिका होती. पहिल्याच महिन्याचा विजेचा व पाण्याचा खर्च एकदम वाढला. मी त्या सहभाग्याशी वाढलेल्या खर्चा विषयी बोलत असताना त्याची बायको एकदम चिडून बाहेर आली. तिची तक्रार होती ७ तास त्यांची खोली बंद असते व माझी बायको घरात असते म्हणून वीज / पाण्याचा एक तृतिअंश खर्च ते देणार दोन तृतिअंश खर्च आम्ही द्यायचा. वाद वाढला, माझ्या बायकोने मुद्दा काढला, आम्ही तीन होतो त्यांच्या कडे चार आहेत, म्हणून निम्मा खर्च प्रत्येकाने दिला पाहिजे. गॅस वापरण्या वरून वाद झाले. तो विषय संपला असे वाटले, पण दुसर्‍या दिवसांपासून एक वेगळाच प्रकार सुरू झाला. ति बाई मुलांना सोबत घेऊन अंघोळीला जात असे त्यात नळ दोन तास पूर्ण उघडा ठेचीत असे. पाण्याच्या खर्चात अजून वाढ झाली. बायकोचा हा खेळ नवर्‍याच्या लक्षात आला. मग लक्षात आले ती बाहेर जाताना दाराला कुलूप लावताना वातानुकूल यंत्र चालू ठेवून निघून जात असे. एकदा ति नसताना नवर्‍याला आम्ही कामावरून घरी बोलावले त्याने ते ओळीने तीन दिवस पाहिले. पुन्हा त्या दोघांचे भांडण झाले.

एक दिवस बायकोला मासे तळण्याचा वास आला, त्या वेळेला शेजारीण कामाला गेलेली होती, तिला शंका आली म्हणून दार उघडून बाहेर बघायला गेली. तिसर्‍या खोलीचे दार उघडे होते, एक तरुणी त्या खोलीत स्वैपाक करण्यात मग्न होती, माझी बायको तिच्याशी बोलायला गेली, तेव्हा कळले, शेजारणीने तिला बाहेर स्वैपाक करायला मनाई केली होती. त्या खोलीत तिच्या लग्नातला दोघांचा फोटो होता. त्या नवीन शेजारणीने सगळी माहिती दिली. रात्री सगळे मला समजले, दुसर्‍या दिवशी मी घराला आतून कुलूप लावले, गच्चीला कुलूप घातले व त्यांची वाट बघत घरात थांबलो. शेजारी मित्र घेऊन आला होता. मी सरळ दोन महिन्याचे भाडे रोख मागितले, नाहीतर पोलिस ला बोलवतो असे सांगताच, सगळे प्रश्न सुटले. मी ते घर सोडले. व एक स्वतंत्र १२० रियाल भाड्याचे घर मिळवले. त्या नवीन जागेत २५० प्रयोगाची विनोदी मालिकाच घडली.

नशीब हे शिकलो - भाग ४० 11/19/09
मी १९८५ ला त्या नवीन जागेत गेलो. त्या इमारतीचा तो दुसरा मजला एक आंतर्राष्ट्रीय भाडेकरू संमेलन होते. २ पाकिस्तानी, १ इजिप्शियन, २ श्रीलंकांना व ३ भारतीय सगळे मिळून आठ भाडेकरू होतो. मी क्रमांक ६च्या जागेत होतो. ह्या सगळ्यात माझे कुटुंब आगळे वेगळे होते. मी पुणेरी पण बायको इराणी. बाकीची मंडळी एकेमेकाच्या गावाच्या जवळपास राहणारी होती. त्या प्रत्येक महिलेचे माझ्या बायकोशी फार चांगले संबंध होते म्हणजे किती ते बघू या.

एका सुटीच्या दिवशी सकाळी क्र.एक मधली पाकिस्तानी महीला आली. त्यांच्या घरी पाहुणे आले होते, पण चहा साखर कमी असल्याने, एक कप चहा पावडर व एक कप साखर घेऊन गेली तेही कप आमचेच होते. ते कप, चहा पावडर व साखरेने भरून तीन दिवसाने आम्हाला परत मिळाले. दोनच दिवस गेले असतील तिच बाई चिरलेली भाजी घेऊन दुपारच्या जेवणाच्या वेळेला आली, गॅस संपला म्हणून आली होती, फोडणी, मसाला, कढई आमचीच. हक्काने येऊन आमच्या कडे भाजी शिजवून नेली त्यातलीच थोडी चवीला आमच्या कडे ठेवण्याचा शेजार धर्म . . कारण मीठ आमचेच वापरले होते. खरंच ह्यांच्या रक्तातच शेजारधर्म नाही.
मला व बायकोला कधीही कोणतीही वस्तू दुसर्‍या कडे मागण्यात फार लाज वाटते. घरातल्या वस्तू संपल्या असतील तर त्या वस्तूला दुसरा काही तरी पर्याय शोधू पण मागायला जायचे नाही. त्यामुळे माझ्या घरात माझी पूर्ण कार्य शाळा होती व आजही आहे.क्रमांक २ च्या जागेत इजिप्शियन जोडपे होते. त्या बाईचे फक्त डोळेच आम्हा पुरषांना दिसत होते, हातपायाच्या बोटा पासून सगळे झाकलेले असायचे. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ति बाई मुलाला घेऊन आली होती. आलेल्या प्रत्येक मुलाचा फोटो मी काढला होता. त्या मुलाचे दोन जास्तीचे फोटो त्या बाईला तिच्या आईकडे पाठवायचे होते म्हणून मी काढून दिले. तिच्या नवर्‍याने ते फाडून फेकून दिले होते, त्याने दिलेले कारण फार हास्यास्पद वाटले, मुलाचा फोटो काढणे धर्मा विरुद्ध होते. त्याला इंग्रजी बोलाता येत होते, मी लगेच विचारले "तुमच्यात पासपोर्ट, परवान्यावर काय चिकटवता?"
तिथेच एक मुंबईकर जोडपे व त्यांची दोन लहान मुले माझे शेजारी होते. माझ्याच कंपनीत तो एका वेगळ्या विभागात होता, त्याला माझ्या पेक्षा बराच जास्त पगार होता पण ह्याची प्राथमिकता आगळी वेगळी होती, फक्त पैसा साठवणे, मात्र मार्ग ? ? महिना दोन महिन्याच्या सुट्टीवर घरी जाणार्‍या मित्रांची यादी त्याने तयार केली होती. ते मित्र सुट्टीवर गेल्यावर त्यांच्या सामानाची सुरक्षा हा घेत असे. त्यामुळे टीव्ही, घरातील आवश्यक सामान व उपकरणे त्याने तिथे असे पर्यंत कधीच विकत घेतली नव्हती. मित्रमंडळ खूप मोठे होते, महिन्यातील बर्‍याच रात्रीचे जेवण सह कुटुंब त्या मित्रांच्या घरी होत असे. त्याची बायको दर दोन दिवसांनी चटणी बनवण्या करिता ग्राइंडर आमचाच वापरायची.

क्र. ७ आमच्या डावीकडच्या जागेत एक मुंबईकर १७ - १८ वर्षाची नववधू होती. दुपारच्या जेवणाला आम्ही बसलो होतो, तिने आमची बेल वाजवली, मी दार उघडले, हाताला भात लागलेला, तोंडात घास, " दीदी थोडे दही आहे का, जेवायला सुरुवात केली, उशिरा लक्षात आले . . " मग तिचे माझे कडे लक्ष गेले, पण ति बिनधास्त, दही घेऊन निघून गेली. अहो एका रात्री १२ वाजता तिने सगळ्या शेजार्‍याना तिला वेड्यात काढायचे आमंत्रणच दिले. " दिदि, आमच्या कडे पाहुणे आले आहेत, त्या बाई तुझ्या मापाची आहे तुझी मॅक्सी रात्री करिता दे ना मी सकाळी धुऊन आणून देईन." मी स्वत:ला आवरू शकलो नाही, एकतर आमच्या नाजूक वेळेला अडथळा. . वरून हे. ." ए माझ्या मापाचे काही हवे असेल तर आताच सांग . . "नंतर सहा महिने आम्ही नुसते" हे मापाचे आहे .." एवढेच म्हणून सगळे शेजारी पोट धरून हसत होतो. अहो एकदा त्या इजिप्शियन जोडप्याने तर आम्हा सगळ्यांना तुरुंगात जाण्याचे आमंत्रण दिले. शहरात जंगलाचा अनुभव दिला.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jan 2010 - 2:25 pm | बिपिन कार्यकर्ते

हे गल्फातले जीवन ओळखीचे असल्याने वाचताना मजा वाटली. छान. वाचतोय.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

24 Jan 2010 - 3:26 pm | ऋषिकेश

छान चालु आहे.. येऊ दे अजून

-ऋषिकेश

सनविवि's picture

24 Jan 2010 - 5:15 pm | सनविवि

पूर्ण मालिका एका दमात वाचून काढली आत्ता. भन्नाटच आहे हे सगळे!! पुढचा भाग लवकर लिहा :)