नशीब भाग १५ ते २०

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
27 Dec 2009 - 11:25 pm

"नशीब भाग १० ते १४"

नशीब त्यांचे - भाग १५ 10/12/09
माझा मोठा भाऊ वीज तंत्रज्ञानाचा पदवीधर होता. एका नावाजलेल्या संगणक कंपनीत ग्राहक सेवेत काम करीत होता. आम्हा सगळ्यांना त्याचे खूप कौतुक होते. १९७३ चा हा प्रसंग आहे. एका शनीवारी मी नेहमी प्रमाणे त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या गाडीतून एक वस्तू घरात आणण्या करता मी त्याला मदत केली. त्या वस्तूचे नांव होते मॅगनेटीक कोअर मेमरी - चुंबकीय स्मृती. फेराईट चुंबकीय धातूचा मणी त्यातून तीन तारा ओवलेल्या होत्या. एका तारेने माहिती लिखाण, दुसर्‍या तारेने माहिती वाचन व दिसर्‍या तारेने ह्या मण्याचा स्मृती क्रमांक, असे ६४ X ६४ मण्यांची एक चौकट, अशा १० ते २० चौकटींचे एक स्मृती साधन ज्याचा वापर त्या काळात संगणकात होत असे. त्यातील एक निकामी झालेली चौकट त्याला बदलायची होती. शुक्रवारी ते स्मृती साधन निकामी झाले होते. सोमवार शिवाय नवीन साधन मिळणार नव्हते. भावाला माझी मदत घेऊन ते साधन दुरुस्त करून कमी वेळात संगणक सुरू करण्याची धाडसी कल्पना सुचली होती. असे करून त्याला वरिष्ठ अधिकार्‍यांची शाबासकी मिळवायची होती.

चुंबकीय स्मृती चौकट व त्यातील फेराइट धातूच्या मण्यांची रचना.

हे त्याने मला न सांगता मी जर हे काम करू शकलो तर ह्यापुढे तो असे काम मला मिळवून देईल, त्या कामाचा मोबदला काही हजार असतील व असे महिन्यातून पाच सहा प्रसंग घडतात, शिवाय माझे काम आवडले की इतर कामे सुद्धा मिळतील. मला त्या काळात महिन्याला ७०० रुपये पगार मिळत होता त्या तुलनेत काही हजार महिन्यात जास्तीचे मिळतील, फार चांगली संधी होती. मी दोन तासात निकामी स्मृती चौकटीच्या ४०९६ तारांचे जोड काढून नवीन चौकटीच्या ४०९६ तारांची जोडणी पूर्ण केली.
वाचक हो फेकाफेकी वाटते ना ? वाटणारच, एसेस्सी झालेला, संगणक अनुभव नसलेला एक मुलगा असे करू शकणे शक्यच नाही. पण हे घडले. त्या वस्तूची चाचणी करणे आवश्यक होते. त्याचे दोन मित्र ते काम बघायला त्याच्या बरोबरीने ती वस्तू घेऊन गेले. त्या नंतरच्या शनवारी नेहमी प्रमाणे नातेवाईकाला मी भेटायला गेलो, पैसे मिळतील अशी खुळी कल्पना करीत दार वाजवले. दार त्याच्या मित्राने उघडले, आत इतर मित्र पण जमले होते. सगळ्यांनी माझे कौतुक केले. बदल केलेल्या स्मृती चौकटीने संगणक व्यवस्थित काम करीत होता असे कळले. मी पैशाचा विषय काढण्याचा प्रयत्न केला. भावाचीची बायको पुढे धावली व खाण्याचे पदार्थ पुढे करीत विषय टाळला. मला चूप बसण्याचा इशारा केला.
मी दुसरा विषय सुरू केला. संपूर्ण स्मृती चौकट एक दोन भाग निकामी झाल्याने बदलण्यापेक्षा एकेक स्मृती भागाची छोटी पट्टी बनवून बाहेरून जोडली तर संगणक फार कमी वेळात सुरू करणे शक्य होईल. सगळ्यांना कल्पना एकदम पटली सगळ्यांनी चाचणी करण्याचे ठरवले. मी बरेच दिवस माझ्या भावाला पैशा बद्दल विचारले, त्या सूचनेचे पुढे काय झाले ? त्याने कंटाळून एकदा सांगून टाकले, कंपनीचे काम बाहेरून करून घेणे कंपनीला मान्य नव्हते. एकाबाबतीत माझा विश्वास वाढला. शिकवलेल्यांना दुसर्‍याला फसवण्याचा परवाना असतो.
एकदा सगळे नातेवाईक एकत्र जमलो होतो. भावाने मोठ्या दिमाखात एक पत्र वाचून दाखवले. स्मृती साधनाची यशस्वी दुरुस्ती व फार चांगली महत्त्वाची सूचना त्याचे ते प्रशस्तिपत्र होते व त्या सोबत एक जोडलेली रक्कम होती. ती त्याने वाचून दाखवली नाही. मी ते काम केले होते असे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, कोणी ते मान्य केले नाही. असो अशी प्रशस्तिपत्र / रक्कम मिळणे व न मिळणे असते एखाद्याचे नशीब.
नशीब त्यांचे - भाग १६ 10/13/09
१९७६ बरेच महिने एका मोठ्या प्रकल्पावर राहून मी परतलो होतो. मित्रानं बरोबर मौज मस्ती, खाणे-पिणे चालू होते. थकून घरी गेलो आणि कळले गावा कडे माझ्या बाबांचे निधन झाले, त्याच घटकेला माझी मौज मस्ती चालू होती. बाबा गेले तेव्हा त्यांच्या जवळ फक्त मोठा भाऊ व वहिनी होती. आम्ही बाकी भावंड बाहेर गावी होतो. सकाळच्या वेळात जरा आडवा होतो असे सांगून जे पलंगावर झोपले ते कायमचे. आम्ही सगळे गावा कडे आपापल्या राहत्या गावातून पोहोचलो तोवर ४८ तास उलटून गेले होते. बाबांचा मृत देह बर्फाच्या लादीवर ठेवावा लागला होता. काय बघा नशीब त्यांचे.
त्याच महिन्यात मी एक जाहिरात वाचून नोकरी करता अर्ज केला होता त्याचे बोलवणे मला आले. नोकरी इराणच्या एका बिस्किट कंपनीत इलेक्ट्रॉनिक टेक्नीशीयन म्हणून होती. अर्जात मी माझे तांत्रिक विषय घेऊन माध्यमिक शिक्षण झाल्याचे लिहिले होते त्याच बरोबर " यू नेम इट आय डू इट " - तुम्ही म्हणाल ते काम मी करतो / मी केलेले आहे - १९६५ पासून केलेल्या कामाचा अनुभव नमूद केला होता. मुलाखत घेणारा इराणी अमेरिकेत वीज तंत्रज्ञानातील पदवीधारक / सुवर्ण पदक विजेता होता. माझे वरील वाक्य त्याला उर्मटपणाचे वाटले होते, म्हणून मुद्दाम मला धडा शिकवायचा ह्या उद्देशाने मुलाखतीला बोलावले होते तसे त्याने बोलून दाखवले. मुलाखत मुंबईच्या ताज मध्ये होती.
प्रश्न १ - तुझ्या अनुभवातून तू बिस्किट प्लान्ट मध्ये काम केल्याचे दिसत नाही. वगैरे.
उत्तर - बिस्किट प्लान्ट मध्ये मोटर विजेवरच चालत असणार त्याचे वेग नियंत्रण थायरिस्टरनेच होत असणार त्याचे प्रश्न व दोष विचारा मी सांगू शकेन.
प्रश्न २ - एखाद्या मोटरचा फ्यूज जळल्यास मोठा फ्यूज बदलणे योग्य आहे का ?
उत्तर - नाही. त्याच क्षमतेचा फ्यूज बदलून जर लगेच जळला तर दोष कशामुळे निर्माण झाला ह्याचा शोध घेणे आवश्यक आहे.
त्याला इलेक्ट्रॉनिक भागातील माहिती कमी होती ह्याची कबुली त्याने दिली. त्याने मला मोटर वेग नियंत्रण कसे होते हे समजवून देण्यास सांगितले, शिक्षण संस्थेत हा प्रकार समजवून सांगण्यात मी प्रसिद्धी मिळवली होती, त्यामुळे सरळ साध्या भाषेत त्याला मी सांगू शकलो. त्याने मला शाबासकी दिली. मीच त्याला सांगितले, मुलाखती करता वीज उपकरणांचे नियंत्रण नकाशे आणले असतील तर इथे बसून मी तुमच्या कंपनीत ह्या घटकेला वीज उपकरण विषयीचा बिघाड दुरुस्त करून देईन. योग बघा जुळून आले होते, त्याचा फोन वाजला, त्याने फारसी भाषेतून संभाषण केले. त्याचा चेहरा खुलला. माझे म्हणणे पडताळून पाहण्याची संधी चालून आली होती. बिस्किट थंड करणार्‍या पट्ट्याची एक मोटर जळली असे समजून मोटर बदली केली परंतू सारखा फ्यूज जळत होता व शेवटी नियंत्रक जळला होता. " तू हा प्रश्न सोडवला तर लगेच तुला इराणला घेऊन जाईन नाहीतर खोटे बोलून फसवणूक केली म्हणून पोलिसाला बोलवीन." मी मोटर आणि पट्ट्याविषयची अधिक माहिती त्याच्या कडून मिळवली. त्याला तीन गोष्टी मोजायला सांगितल्या.
१ - गिअर बॉक्स पासून मोटार वेगळी करून वीज प्रवाह व वेग माहिती पत्रका प्रमाणे आहे का?
२ - गिअर बॉक्सचा मोटरला जोडणार्‍या भागावर टॉर्क मीटर लावून अपेक्षीत टॉर्क आहे का? तोच जास्त असणार असे माझे मत होते. ३ - पट्ट्याशी संबंधीत सगळे फिरणारे भाग सहज फिरत आहेत का ? ह्या सगळ्याची चाचणी करण्यात बराच वेळ लागणार होता. त्याला अजून बर्‍याच जणांच्या मुलाखती संपवायच्या होत्या. माझ्या पेक्षा जास्त शिकलेले व अनुभवी अर्जदार मुलाखतीला बोलवले होते. दोन दिवसांनी निश्चित परत भेटायला येण्याचे आश्वासन देऊन मी बाहेर पडलो - बघूया त्याच्या व माझ्या नशिबात काय लिहिले आहे.
नशीब त्यांचे - भाग १७ 10/14/09
ठरल्याप्रमाणे त्या इराण्याला भेटायला गेलो. माझे निरीक्षण बरोबर होते की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता मला पण होती. मला बघताच त्याने चेहरा वाकडा केला. कदाचित तिथल्या टेक्निशियनने घोळ केला असावा अशी कल्पना मी केली. त्याने चहा, नाश्ता मागवला व विचारले लवकरात लवकर मी किती दिवसात इराणला येऊ शकेन. मी जास्त साशंक झालो. मग तो हसला, त्याला माझी प्रतिक्रिया बघायची होती. तो पदवीधर असूनही त्याला मी सांगितलेल्या तीन गोष्टी का सुचल्या नाहीत म्हणून त्याने मला बघताच तोंड वाकडे केले होते.
२५०० रुपये महिना पगार ७०० रुपये महिन्याच्या तुलनेत चांगले वाटले. राहणे, खाणे, विमानाचे तिकीट सगळे कंपनीच्या खर्चाने. एक पानी करारावर मी हस्ताक्षर केले. किती मोठी चूक केली हे पुढे कळेलच, पण सगळ्यात महत्त्वाचे मला सगळी कडून नाकारलेल्या ह्या इंडीयातून बाहेर जाण्याची संधी मिळाली होती. व्हिसा, तिकीट हातात येइस्तोवर महिने कसे निघून गेले कळलेच नाही. घरात कोणाला सांगितले नाही एका शुक्रवारी संध्याकाळी हा देश सोडला. पुन्हा परतायचे नाही असे ठरवले होते.
इराण एअरच्या विमानात मीच एकटा मराठी, साधी राहणी उच्च विचार अशा थाटात जाऊन बसलो. एप्रिल १९७७. माझे सामान एक छोटी सुटकेस जी विमानात नेण्याची परवानगी होती. त्या काळात माझे शिवण यंत्र होते, माझे शिवण काम चांगले होते. मित्रांना कपडे शिवून देत असे. इराणाला जायचे म्हणून मीच शिवलेले दोन नवीन जोड एवढेच कपडे. मला बघून हवाई सुंदरी मिश्किल हसली होती. मी त्याचा अर्थ " ह्या पात्राचे विमानात स्वागत असो " असाच घेतला. कारण माझ्यातच दोष असेल असे समजण्याची सवय होती. पण नंतर कळले की ते हास्य एक कामाचा भाग होता, प्रत्येकाशी बोलताना ते हास्य कायम तिच्या चेहर्‍यावर मी बघितले.

विमानातील स्वागत पुस्तिका चाळायला सुरू केले. त्यात इराणी इतिहासाचे थोडेसे वर्णन होते. आर्य त्यांचे वंशज होते. मूळ भाषा संस्कृत पुढे अपभ्रौंष होवून फारसी झाली. माझे खिसे रिकामे होते त्यामुळे जे काही फुकटात मिळत होते ते खाण्या पिण्यात मी समाधानी होतो. आजूबाजूला दारूचे ग्लास एका पाठोपाठ रिकामे होत होते. काही तासात विमान जमिनीवर उतरले. सगळ्या चाचण्या संपवून मी बाहेर आलो. एक उंच माणूस माझ्या नावाची पाटी घेऊन उभा होता. मी त्याच्या कडे गेलो व माझे नाव सांगितले, त्याने त्याच्या जवळ असलेला माझा फोटो बघितला मला दाखवला, माझे मनगट धरले, पुढे तो मागे मी, असे मला खेचत गाडी जवळ घेऊन गेला. गाडीत दोन माणसे बसली होती त्यातला एक हसत बाहेर आला. स्वच्छ इंग्रजीत माफी मागत माझे स्वागत झाले. तो दुभाषी होता.
माझे मनगट धरून आणणारा आमचा वाहनचालक होता. मी दुभाष्याला माझे मनगट धरण्याचा प्रकार सांगितला, "उद्या वर्तमानपत्रात माझा फोटो येईल, रात्री विमानतळावर एक चोरटाव्यापर करणारा पकडला." त्याने ते फारसीत बाकी दोघांना सांगितले. सगळे पोट धरून हसले. मला बघून दोघांना अगदी तसेच वाटले म्हणूनच ते हसत होते. दुभाषी सांगत होता, माझ्या आधी जे भारतीय आले ते फार नाखूश होते, त्यांना घरच्यांची आठवण येत होती. पण मी त्यांना वेगळा वाटलो होतो.
विमानतळापासून कंपनीचे ठिकाण ३०० की.मी. दूर होते आमचा प्रवास सुरू झाला मी इराणी गाण्यात रमलो होतो. थोडेसे गुणगुणत होतो. मग मराठी हिंदी गाणी म्हणून दाखवली. दुभाषाने एका फारसी गाण्याचे उच्चार सांगितले मी देवनागरीत लिहून काढले. गाडीतल्या ध्वनी फितीवर दोंदा ऐकले. थोड्याच वेळात ते गाणे त्यांना म्हणून दाखवले. वाहनचालकाने तर भविष्यवाणी केली, इतर नग नीघून जातील पण हा इथेच राहील, त्याला मागे बसलेल्या दोघांनी दुजोरा दिला. बघूया इराण मला लाभदायक ठरले का? भेटू पुढच्या भागात.

नशीब त्यांचे - भाग १८ 10/15/09
हॅन्डब्रेकच्या करकरीत आवाजाने जाग आली. गाडी मेहमान सार्‍याच्या (गेस्ट हाउस) समोर येऊन थांबली होती. बाहेर अंधार होता. दुभाष्याने माझ्या राहण्याची जागा दाखवली व सकाळी भेटू म्हणत निघून गेला. ८ इंचाच्या स्प्रिंगच्या गादीवर बसण्याचा झोपण्याचा अनुभव नव्हता, त्यात मृदू मुलायम उशीच्या स्पर्शाने झोप उडाली होती. चाय / सुभाने ( सकाळचा नाश्ता ) असे म्हणत दारावर थाप पडली. मी दार उघडले त्याने मला चहाची खूण करत हाजेर असल्याची सूचना दिली.
पंचतारांकित व्यवस्था पाहून आनंद झाला. अर्धनग्न अवस्थेत एक इंग्रजी तरुण, चपले सकट, टेबलावर पाय ठेवून कॉफीचे घोट घेत होता. आधुनिक जंगली पणाचे निरीक्षण मी करीत होतो तेवढ्यात एक मध्यम वयीन इंग्रज त्याच्या जवळ येऊन बसला. त्याने निदान कामगाराचे कपडे घातले होते. त्या दोघांचे बोलणे माझ्या बाबतीतच होते ह्याची जाणीव झाली तेवढ्यात उंच, प्रौढ, तिसरा इंग्रज वेगळ्या टेबलावर जाऊन बसला. त्याने एकसंध हिरव्या रंगाचे कामगाराचे कपडे घातले होते. एका हातात वर्तमानपत्र दुसर्‍या हातात चहाचा कप, सिगरेट नळीत अडकवलेली तोंडात अशा रितीने धरली होती की नेहमी पाइप ओढण्याची सवय पण तडजोड म्हणून सिगरेट ओढतो, माझे निरीक्षण चालू होते एवढ्यात माझ्या मागून वेलकम असा मोठा आवाज आला. मी मराठीची ग्वाही देत एक हसरा चेहर्‍याचा तरुण समोर आला. आम्ही जुने मित्र भेटल्या सारखे खूप काही बोलत नाश्ता संपवला व कार्यालयात जाण्याच्या तयारीला लागलो.
उत्पादन प्रकल्प जिल्हा झांजांन , तालुका अभार , खोर्राम दार्रेह ( हिरवीगार दरी ) ह्या गावाच्या हद्दीत होता. महत्त्वाची कागद पत्रे कार्यालयात जमा केली व दुभाष्या बरोबर माझ्या कार्यक्षेत्राची ओळखयात्रा सुरू झाली.

माझा कामाचा अनुभव ह्याचा अर्थ जरा हटके होता, आजही आहे. ज्या कामाकरता माझी निवड होते त्या संबंधात जे काही मी करतो ते माझे वैयक्तिक गुण असतात पण त्याच कामाशी संबंध असणार्‍या व्यक्ती कोण, त्यांची पात्रता सगळ्याच बाबतीत, त्यांचे बरे वाईट योगदान, त्यांचे त्या कंपनीत / प्रकल्पात असणारे महत्त्व, ह्या सगळ्याच्या गोळाबेरजेमुळे घडणारे पेचप्रसंग हाच खरा अनुभव. ह्या अनुभवात क्षणाक्षणाला बदल होत असतो. ह्याच पार्श्वभूमीने मी ओळख प्रकार सुरू केला. हसत खेळत माझे बोलणे कोणाला आवडले, कोणी आंबट, लांबट, चौकोनी चेहरे केले त्याची मी नोंद घेतली. त्याची जाणीव झाल्याने दुभाष्याने माझ्या ओळख प्रकाराचे कौतुक केले.

बिस्किट प्रकल्पात उत्पादनाच्या चार शृंखला होत्या. प्रथम कणीक तयार करणारे यंत्र, कणकेची चादर बनवणारे मोठे लाटणे, चादरीची जाडी कमी करणारी अधिक तीन लाटणी, चादरीतून बिस्किटे कापणारे साचे, बिस्किटांना भाजून काढणार्‍या सात शेगड्या त्यातून फिरणारा लोखंडी जाळीचा पट्टा, पुढे ओळीने बिस्किट थंड करणारे कापडी पट्टे व शेवटी पट्ट्याच्या दोन्ही बाजूला असणारी पुडे बनवणारी यंत्रे, अशी योजना प्रत्येक शृंखलेची होती. या सगळ्या यंत्र सामुग्रीला एकसंध नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक साधने, त्यांची जुळणी, नकाशे ह्याचा अभ्यास मी सुरू केला. शृंखला क्र. ३ काही कारणा करता बंद असल्याने मला बारकाईने अभ्यास करणे जमले.
१५ दिवसात कामाचे स्वरूप लक्षात आले. ५० टक्के अडथळे मुद्दाम घडत होते. ५० टक्के इंग्रजी - फारसी भाषेमुळे होते. त्यात मनुष्य स्वभावाचा फार मोठा वाटा होता. हे मला कसे समजले? भेटू पुढच्या भागात.
नशीब त्यांचे - भाग १९ 10/16/09
प्रौढ इंग्रज बिस्किट प्रकल्पाचा वीज दुरुस्तीवाला ( इलेक्ट्रिशियन ) होता त्याला इलेक्ट्रॉनिक्सची फारच कमी माहिती होती. परंतु ३५ वर्षाचा ह्याच बिस्किट प्रकल्पाचा ब्रिटन मधला अनुभव होता, दुरुस्ती कामाचा तितकाच त्रास देण्याचा देखील. मला वीज दुरुस्तीची फारच कमी माहिती आहे अशी कबुली देत, झाडावर चढवत, त्याच्याशी मी मैत्री केली, जेणे करून त्याचा माझ्या कामात त्रास कमी होईल. मुंबईत बसून मुलाखतीत एका पट्ट्याची मोटर जळली नसल्याचे सांगणारा मीच होतो, हे कळल्या पासून त्याला माझ्या अनुभवाची थोडी फार कल्पना होती. शिवाय एडी करंट कॉन्स्टंट टॉर्क योजना, जी यांत्रिक लाटणी, साचे यंत्र व जाळीदार पट्ट्यावर वापरात होती, मी त्याला सोप्या भाषेत समजवून सांगितली होती, म्हणून आमची मैत्री लवकर जमली.
त्याच्या कडून मला त्याच्या ३० पानी कराराची माहिती मिळाली, त्यातून मी बरेच काही शिकलो. भारतीय असण्याचे दु:ख मला त्या घटकेला प्रथमच जाणवले (रक्तदोष असावा). त्याचे ह्या कंपनीशी कंत्राट ब्रिटिश सरकारी यंत्रणेतून झाले होते. मुलाखतीतून एकदा निवड झाल्यावर सरकारी प्रतिनिधी लंडनहून, इराणमधल्या दूतावासातून नाही, ह्या कंपनीच्या खर्चाने खोर्रामदार्रेहला दोन दिवस भेट देऊन गेला. नुसताच कंपनी परिसर नाही तर आजूबाजूचा परिसराची पाहणी केली. लंडनला परतल्यावर करारपत्र तयार झाले, ह्या कंपनीच्या स्वाक्षर्‍या झाल्या आणि मगच हा बाबा इथे येऊ शकला होता.
करारपत्राची प्रत त्याने मला दाखवली. "मी गीतेवर हात ठेवून खरं सांगतो की" (हे एका भारतीयाने दुसर्‍या भारतीया विषयी शंका दाखवणे ह्या जन्मसिद्ध हक्काचे पालन करणार्‍या तमाम वचकां करता ) असो - सात दिवसात कोणता व किती नाश्ता, दुपारच्या / रात्रीच्या जेवणात काय व किती असावे ह्याची यादी. राहती जागा कशी असावी, जागेत खुर्ची, टेबल, पलंग, गादी, उशी, चादरी, ब्लॅन्केट, टॉवेल, साबण, शांपू सगळ्याची यादी. कामाचे तास, ३० दिवसाचा २५,००० पगार. स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, ठरलेल्या वेळेनंतर दर तासाच्या पगाराच्या दीडपट हिशेबाने वेगळा मोबदला. महिन्यातून एकदा दोन रात्री व दिवस तेहरानला पंचतारांकित हॉटेल मध्ये कंपनी खर्चाने वास्तव्य, त्या करता चालकासोबत गाडीने येणे जाणे. ९० दिवसा नंतर १५ दिवसाची पगारी सुट्टी व तेहरान - लंडन परतीचे तिकीट, प्रवास विम्यासहित. मला पुढची अक्षरे दिसेनाशी झाली. माझ्या तोंडाकडे बघून तो चकीत झाला होता. माझे एकपानी करारपत्र ऐकून त्याला धक्काच बसला होता. कारण तो भारतीय नव्हता, एक इंग्रज कामगार होता.
असे काही भारतीय सरकारी यंत्रणेतून घडू शकेल असा विचार करणे गुन्हा ठरेल अशी परिस्थिती आहे. पुढील ५० पिढ्या असे करारपत्र न घडण्या करता तन मन धनाने प्रयत्न करतील ह्याची मला खात्री आहे. असो, दोन महिन्याने त्या इंग्रजाचा करार संपला. माझ्या कामाचे समीक्षण झाले पगार दुप्पट झाला, ५,०००/- तुम्हीच बघा त्या इंग्रजाच्या तुलनेत किती पटीने कमी होता. इंग्रजाला परतीचे तिकीट दिले गेले. जाताना तो रडला, माझ्या कडून, मोफत असूनही, इलेक्ट्रॉनिक्स शिकणे सोडून माझ्याशी फक्त दुश्मनी केली, ह्याचे त्याला दु:ख होते.
नशीब त्यांचे - भाग २० 10/18/09
वीज पुरवठा सरकारी होता त्यामुळे भार नियमनाचा त्रास त्या कंपनीला होता, तसेच वेळी अवेळी वीज येणे - जाणे प्रकार तिथे पण होता. त्याचा फार वाईट परिणाम बिस्किट प्रकल्पाच्या उत्पादनावर होत असे. कारण बिस्किट भाजण्याची क्रिया शेगड्यांतून तेल व हवेचे मिश्रण जाळून उष्ण हवेने होत असे. विजेचा अनियमित पुरवठ्याने हवेच्या पुरवठ्यात फरक होत असे त्यामुळे बिस्किटांचा दर्जा घसरायचा. सर्व प्रथम मी हवेच्या कॉम्प्रेसरचे नवीन स्वयंचलित वीज नियंत्रण पॅनल तयार करून दिले आणि मग हवेच्या साठ्याची मोठी टाकी बसवून घेतली. हवेचा नियमित पुरवठा वाढल्याने बिस्किट उत्पादनाचा दर्जा वाढला. ह्या कामाची जबाबदारी माझी नव्हती, तरीही मी ते घडवून आणले त्यामुळे बिस्किट उत्पादन विभागाचे गट प्रमुख माझे चाहते झाले.
मी फारसी भाषा शिकण्याची इच्छा व फायदे दाखवल्याने एका दुभाषी शिक्षिकेने मला फारसी वाक्य रचना, शब्दार्थ व वापर शिकवले ते मी फार लवकर शिकून घेतले व इराणी कामगाराशी मैत्री वाढवली. त्यांना कामातील अडथळे का व कसे निर्माण होतात हे समजवू शकलो, अडथळे निर्माण होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेणे आवश्यक असते हे पण समजवू शकलो. माझ्या कामातले अडथळे खूपच कमी झाले.
तो इंग्रज वीज दुरुस्तीवाला होता तेव्हा कोणताही बिघाड दुरुस्तीला, तो त्याच्या पद्धतीने चाचणीत वेळ घालवायचा त्या नंतर यंत्र दुरुस्तीवाले काम सुरू करणार मग त्यांच्यात मुद्दाम वादविवाद होणार मग प्रत्येक जण वेळ काढू दोषारोप करणार एकंदरीत ४ - ५ तास उत्पादन बंद. मी कामाची जबाबदारी घेतल्यानंतर हा वेळ १५ ते ४० मिनिटावर येण्याचे कारण इलेक्ट्रॉनिक योजनेतील बिघाड ही एक मोठा अपघात होण्याची सूचना असते हे मी चांगले समजलो होतो व तो दुरुस्त करण्यात मला फार कमी वेळ लागत असे. सरासरी उत्पादन वाढले. कंपनीत कामाचा माझा हा तिसरा महिना होता, माझा पगार २५००/- चा ६०००/- झाला होता. अजून बरीच मजल गाठायची होती.
त्या दोन महिन्याच्या काळात एक प्रसंग घडला. काही नवे जुने इराणी नाश्ता करता एकत्र जमले होते त्यात आमचा दुभाषी पण होता. माझी फिरकी घेणे चालू होते, त्यातून मला त्यांची फिरकी घेण्याची पद्धत, शब्द प्रयोग, द्वय अर्थी शब्द ह्याचा अनुभव मिळत होता. त्यातल्या एकाने मला मैत्रिणीची आठवण येत नाही का, मैत्रीण कशी दिसते वगैरे विचारणे सुरू केले. मी त्या सगळ्यांनाच समजेल अशा शब्दात माझ्या विचित्र परिस्थितीची माहिती दिली. एका शहाण्याने त्याच्या गाडीची चावी व काही पैसे माझ्या समोर ठेवले. कंपनीत इतक्या छान मुली आहेत, निवड कर, काही वेळा करता मिळवून देणार होता. वाचकहो तुम्हीच ठरवा त्याला जे उत्तर मी दिले ते चूक होते का बरोबर.
मी दुभाष्याची मदत घेत त्याला त्याच्या गावाकडच्या बहिणीच्या दलालाचा पत्ता विचारला. सगळे मोठ्या आवाजात हसायला लागले. पण तो फालतू मदत करणारा चवताळून मला मारायला उठला. बाकीच्यांनी त्याला आवरले, तो तावातावाने शिव्या देत होता. त्यांतल्या दोघांनी त्याचा गळा धरला, माझी माफी मागायला सांगितले व पुन्हा असे काही ऐकायला आले तर सगळ्या मुलींना त्याला मैदानात जाहिरपणे फटके मारायला सांगण्यात येईल, अशी ताकीद दिली गेली. ह्या प्रसंगाने मला जास्त चाहते मिळाले. कार्यालयातील मुली टेलिफोन वर मला आवडलेली दोन इराणी गाणी म्हणून दाखवण्याचा आग्रह करीत होत्या.
एक - गोले सांग्याम, गोले सांग्याम, चे बेग्याम आज देलेथांग्याम मिसले ऑफतॉब अगे बारमान नाथोबी सार्दामो बीरंग्याम - गाणारा सत्तार.
दुसरे - मान मर्दे तनहा ए शबाम मोहोरे खामोशी बारलाबाम - गाणारा हबीब. अर्थासकट - भेटू पुढच्या भागात.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर सातव's picture

27 Dec 2009 - 11:49 pm | चन्द्रशेखर सातव

रानडे काका,
तुमचे अनुभव चित्तथरारक आहेत.कशाचे हि पाठबळ नसताना पदेशात जाऊन कर्तृत्व गाजवणे खरेच मोठे काम आहे.तुमच्या विजीगिषु वृत्तीला सलाम !

चिरोटा's picture

28 Dec 2009 - 12:24 am | चिरोटा

कठीण परिस्थितीला सामोरे जावून स्वतःचे परदेशात स्थान निर्माण करण्याच्या वॄतीला सलाम.
अवांतर्(१९७९ साली इराणच्या शहाला पदच्युत करून खोमेनीसाहेब सत्तेवर आले.त्यावेळच्या इराणच्या राजकिय परिस्थितीवर सवडीने लिहिता आले तर बघा).
भेंडी
P = NP

sneharani's picture

28 Dec 2009 - 11:44 am | sneharani

खरच किती थरारक अनुभव आहेत.
बाकी खुप मोठ साहस आहे परदेशात झगडण्याला

फ्रॅक्चर बंड्या's picture

28 Dec 2009 - 5:46 pm | फ्रॅक्चर बंड्या

भारी....

binarybandya™

स्वाती२'s picture

28 Dec 2009 - 6:05 pm | स्वाती२

तुमच्या जिद्दीचे कौतुक वाटते.