नशीब भाग २६ ते ३०

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
7 Jan 2010 - 9:30 am

"नशीब भाग २१ ते २५"
नशीब त्यांचे - भाग २६ 10/29/09
इराण्यांना शहाच्या विरुद्ध क्रांती केल्याचे फार अप्रूप वाटले. येणार्‍या मु्ल्लाराजवटीने असाध्य वचने देऊन भुरळ पाडली. हे कळायला त्यांना अजून किती वर्ष सोसावे लागेल खुदा जाने. असाध्य गुळमुळीत वचने देण्याचे हक्क खरेतर इंडियनाइज्ड राजकारण्यांचे आहेत (भारतीय म्हणवून घेणे त्यांना कबूल नाही, मला तर बर्‍याच बाबतीत ह्यांना भारतीय मानणे तमाम स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्या सारखा वाटतो).

मी एकटा भारतीय त्या कंपनीत उरलो होतो. ज्या दिवशी माझे सगळे भारतीय मित्र कंपनी सोडून गेले त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यातील वेळमुद्रण यंत्राशी ( एंट्री टाइम प्रिंटर ) रोज असते तशीच गर्दी जमली होती. मी पण होतो, तेवढ्यात एक रॅश्ती पुढे आला. इथे रॅश्तीचा अर्थ समजणे महत्त्वाचे आहे. रॅश्त एका शहराचे नाव आहे त्या आजूबाजूच्या गावातील मंडळींना रॅश्ती गणले जाते. ही मंडळी थोडीशी गावठी, "ट्युबलाईट", उद्धट, लसूण खाणारे वगैरे असतात. आपण दक्षिणी लोकांना जसे मद्रासी व पंजाब्यांना सरदार म्हणून विनोदात गुंफवतो तसेच काहीसा रॅश्ती हा प्रकार आहे. एसफहानी = कंजूस तर तोर्क = ताब्रीझ भागातील बनीये, सर्व अर्थाने.
असो, त्या रॅश्तीने माझे खांदे धरले, मोठ्या उत्साहात सांगू लागला - " सगळ्या भारतीयांना चुटकी सरशी बाहेर फेकून दिले, बघ आमची इराणी ताकद !" मी - " त्यांच्या पगारातला कितवा हिस्सा तुला मिळणार आहे. ह्या उलट आज पासून किती यंत्रातून बिघाड झाल्याने उत्पादन कमी होणार त्याचा हिशेब तुला कधीच कळणार नाही." तो हार मानणारा नव्हता. त्याने हवेत सदर्‍या ची कॉलर पकडल्याचे नाटक करीत सांगितले -" अशी कॉलर धरून एक एक लाथ घातली प्रत्येकाच्या कुल्ल्यावर" असे म्हणत त्याने एक लाथ हवेत मारली ती समोरून येणार्‍या- एका इराण्याला लागली. तो लाथ बसल्याने एकदम भडकला. मी जोरात ओरडलो - " अरे बघा आवरा ह्या रॅश्तीला, हा मागचा जन्म आठवल्याच्या खुशीत लाथा झाडतो आहे." हे मी फारसी भाषेत सांगितल्यामुळे सगळे मोठ्याने हसायला लागले.

असेच एका सकाळी चहा नाश्त्याला नेहमीचे इराणी मित्र जमलो होतो. क्रांतीच्या धुंदीने काम थंडावले होते. त्यातला एक हातात लाकडी काठी घेऊन आला, प्रत्येकाच्या डोक्यावर मारत माझ्या पर्यंत आला. सगळ्यांच्या डोक्याचा ट्ण्ण आवाज आला, माझ्या डोक्याचा दबलेला आला. तो काठीवाला - " व्हीके बघ इराणी डोके कसे भरलेला आवाज देतो, तुझे डोके कसे भुसभुशीत, आवाज देत नाही." मी - " माझे डोके जमिनी सारखे सुपीक आहे, काहीही पेरा लगेच फळ मिळेल, तुमचे डोके इतके कडक काही आत शिरायला / बाहेर पडायला जागाच नाही." सगळे त्याच्या वर चिडले - " ए रॅश्ती तुला नाही कळायचे, एका वाक्यात आम्ही सगळे मठ्ठ डोक्याचे आहोत, असे व्हीके सांगून गेला, चूप बस, त्याच्या पासून तू दूर राहा." असो.

क्रांती पूर्वी विजेचे भार नियम कमी होते, ते क्रांती नंतर फार वाढले. दर तासा दोन तासांनी पुरवठा एकदम बंद होणे वाढले. त्यात ५ मेगा वॉट चा जनरेटर चालू बंद करण्यात जास्त वेळ लागत असे. म्हणून त्याची स्वयंचलित पद्धत करून देण्याचे ठरले. तशी इलेक्ट्रॉनिक नियंत्रणाची पद्धत त्या जनरेटर वर होती पण त्याची जोडणी केलेली नव्हती. ती मी यशस्वी रित्या करून दिली. मग २२,००० व्होल्टचा सरकारी वीज पुरवठा स्वयंचलित करणे आवश्यक झाले. माझ्या जवळ ते काम करण्याचा आंतर्राष्ट्रीय परवाना नव्हता. तसले काम करणारे इंजिनिअर देश सोडून गेलेले असल्याने कंपनी व्यवस्थापनेने ते काम मी करावे अशी परवानगी मिळवली. हत्यारांची जुळवाजुळव केली. व वीज कपातीचा दिवस निश्चित झाला. मी मोजक्या इराणी सहकार्‍यांना घेऊन कामाला सुरुवात केली. १० चं मिनिटे झाली असतील एका क्षणाकरता आमचे डोक्यावरचे अंगावरचे केस एकदम ताठरले व खूप मोठा स्फोट झाला लोकांची धावाधाव सुरू झाली. पायाखालची जमीन चांगलीच हादरली होती. इराणी सहकार्‍यांनी मला मिठी मारली. का? भेटू पुढच्या भागात.

नशीब त्यांचे - भाग २७ 10/30/09
२२,००० दाबाचा मुख्य वीज प्रवाहाचा सर्कीटब्रेकर (स्वीच) स्वयंचलित उघडझाप करण्याच्या कामाची जबाबदारी माझ्यावर येताच मी माझे समर्थक असणारे चार इराणी मदतनीस घेतले. प्रथम जनरेटरचा सुरक्षा सर्कीटब्रेकर बंद केला व त्याच्या कपाटाला कुलूप घातले. तिथून २०० मीटर दूर असलेल्या मुख्य प्रवाहाच्या सर्कीटब्रेकर कपाटा कडे गेलो. सुरक्षा नियमाप्रमाणे कपाटाचे दार नेहमी बंद असावे लागते तरच तो सर्कीटब्रेकर सुरू करता येतो. सर्कीटब्रेकर बंद केल्याशिवाय कपाटाचे दार उघडणे शक्य नसते परंतु ते कपाट उघडे होते व सर्कीटब्रेकर सुरू स्थितीत होता. ति चूक आहे ह्याची जाणीव बरोबर आलेल्या सहकार्‍यांना दिली.

त्यातल्या एका धाडसी सहकार्‍याला सर्कीटब्रेकर बाहेर काढण्याकरता लागणारा साखळदंड आणायला सांगितला व तो साखळदंड आम्ही बाहेरून येणारी मुख्य प्रवाह केबलची टोके व जनरेटरला जाणार्‍या केबलची टोके असे सगळ्यांना एकत्र गुंढाळून ठेवला. सगळ्यांना त्याचे फार आच्शर्य वाटले. मी त्यांना अपघात होऊ नये म्हणून एक सुरक्षा असे सांगितले, आम्ही सगळे सर्कीटब्रेकरच्या खूपच जवळ होतो, नटबोल्ट उघडण्याच्या तयारीत होतो तेव्हढ्यात आम्हा सगळ्यांचेच केस एकदम ताठ उभे झाले. जमीन हादरली व मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. बाहेर धावा धाव ऐकायला आली त्यातला एक जो कपाटा बाहेर उभा होता त्याने सांगितले जनरेटरच्या जागेकडे सगळे पळत जात होते.

मी त्यांना खात्रीपूर्वक सांगितले कोणीतरी आम्हा सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यांना कळेना कसे घडले. आम्ही हातातले काम तसेच टाकून जनरेटरकडे धावलो. तिथल्या चालकाने सुरक्षा कपाटाचे कुलूप उघडून सर्कीटब्रेकर सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या स्फोटाचा तो आवाज होता. माझ्या त्या सहकार्‍यांनी मला चक्क मिठी मारली माझे १२ मुके घेतले (३ मुके घेणे हा आनंद दर्शवण्याचा इराणी रिवाज). सगळा अधिकारी वर्ग जमा झाला. साखळदंड बांधून चार इराण्यांचे जीव वाचवले म्हणून खूप कौतुक झाले.

जनरेटर चालकावर गुन्हा दाखल करा, पोलिस बोलवा सुरू झाले. मी ओरडून सगळ्यांना थांबा सांगितले. " माझा आता इराणी व्यवस्थेवर मुळीच विश्वास नाही. माझ्या जवळ मुख्य वीज प्रवाहावर काम करण्याचा परवाना नाही म्हणून मलाच शिक्षा सुनावली जाईल ह्याची मला खात्री आहे. ह्या चार जणांचे जीव वाचले ह्यांच्या शुभेच्छा मला मिळाल्या आहेत. हे असेच घडेल ह्याची कल्पना मला होती म्हणूनच मी सुरक्षा नियम पाळले." कंपनीचा कामगार वर्ग आजूबाजूच्या गावात राहणारा होता त्या घडलेल्या प्रसंगाचे वर्णन कंपनी बाहेर समजले होते. गावकरी मला, बायकोला रस्त्यात थांबवून आम्हाला शुभेच्छा देताना जाणवायचे ते नशीब त्यांचे.

कंपनीचा वेफर बिस्किटाचा एक वेगळा प्रकल्प होता. त्यात वीज दुरुस्तीचे काम करणारा माझ्या वर फार चिडलेला असायचा. त्याच्या बायकोच्या बहिणीशी मी लग्न नाकारले होते व माझ्या विविध कामामुळे त्याचे कंपनीतले महत्त्व कमी झाले होते. क्रांती नंतर इराणी तथाकथित संशोधकांचा सुळसुळाट झाला होता. त्याने पण एक उष्णता नियंत्रकाचा शोध लावला आहे असे सांगायला सुरुवात केले. माझ्या समर्थकांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सरळ प्रश्न टाकला, आधी खराब झालेले सगळे नियंत्रक कुठे गेले त्याचा हिशेब विचारा, मग हे सुटे भाग इराण मध्ये मिळत नव्हते त्याने कोठून आणले. मी अशी शंका दाखवल्या बद्दल त्याने माझ्या वर एकदा एअर रायफल चालवली व दुसर्‍यांदा भर बैठकीत पिस्तूल रोखले होते ते कसे? भेटू पुढच्या भागात.

नशीब त्यांचे - भाग २८ 10/31/09
कंपनीच्या क्रिमवेफर बिस्किट प्रकल्पातील त्या वीज दुरुस्तीवाल्याचा शोध माझ्यामुळे शंकाग्रस्त झाला होता. त्या दिवशी मी घरी जात असताना (त्या शोधक इराण्याच्या घरासमोरूनच जावे लागत असे) एका सोबत्याने माझी विचारपूस केली म्हणून मी थांबलो, मी एक विनोद केला म्हणून माझा हात धरून त्याने मला जवळ ओढले. त्याच क्षणी मला काही तरी चावले असे वाटले म्हणून आम्हा दोघांचे लक्ष माझ्या हाताकडे गेले. कोपराच्या थोडे वर जखम झाली होती व त्यातून रक्त वाहू लागले होते. माझ्या बरोबरच्या सोबत्याला एअर रायफलचा परिचित आवाज ऐकायला आला होता, त्याचे लक्ष समोरच्या खिडकीत रायफल घेऊन उभ्या असलेल्या त्या शोधक इराण्या कडे गेले, त्याला रायफल चालवलीसका म्हणून विचारले, त्या शोधकाने हसतच सांगितले झाडावरच्या चिमण्या मारत होतो. झाड आम्ही उभे होतो तेथून दूर होते शिवाय रायफलवर दुर्बीण बसवलेली होती. माझ्या बरोबरच्या सोबत्याने त्याला शिव्या घालायला सुरुवात केली.

आजूबाजूच्या घरातून मंडळी धावत बाहेर आली. माझ्या हातावर रुमाल बांधून एका मित्राने जवळच्या सरकारी दवाखान्यात नेले तिथे असणारे डॉक्टर भारतीय मित्रच होते.जखमेला अर्धा तास झाला होता. हात सुजायला सुरुवात झाली होती. वेगाने शल्यक्रीयेची तयारी करून जखमेच्या बाजूने दीड इंच जागा उघडण्यात आली. एअररायफलची छोटी गोळी सापडली. गोळीच्या बाजूने रंग बदलायला सुरुवात झाली होती. सुरुक्षा म्हणून बाजूचा शक्य होता तेवढा मासाचा भाग काढून टाकला जखम दोनदा औषधाने स्वच्छ धुतली, टाके घालून बंद केली. डॉक्टर मित्राचे घर त्या सरकारी दवाखान्यातच होते. मी, बायको व इतर नातेवाईक चार तास त्याच्या घरातच तपासणी करता बसलो.

तिकडे कंपनीत पोलिस गेले, त्या शोधक इराण्याला ताकीद देऊन गेले होते. मला ५ दिवस रोज डॉक्टरला भेटावे लागले. त्या गोळीचे दुष्परिणाम झाले नव्हते. सगळ्यांनी मशादला एमाम रेझाच्या झियारदगाला (दर्शनस्थळ) भेट देण्याचा आग्रह केला. जाऊन येऊन २६०० किलोमीटरप्रवास होता. माझा उजवा हात ताठ घट्ट बांधल्यामुळे वाकत नव्हता मी स्टेअरिंग धरून होतो बायको गियर बदली करायची असा सगळा प्रवास केला. माझी पेकान स्टेशनवॅगन गाडी होती त्यामुळे मागची सीट खाली टाकून दोन रात्री गाडीतच झोपलो होतो. प्रवास फार छान झाला. वाटेत दिसलेली गावं, शहरं, निसर्ग एक वेगळा आनंद मिळाला.

एमाम रेझा दर्शनस्थळ आणि आपली भारतीय दर्शनस्थळे ह्यात सर्वार्थाने साम्य दिसले. श्रद्धा, भोंदूगिरी, नवस फेडणे सगळे इथे अनुभवतो तसेच होते. मी आस्तिक आहे, ह्या शक्तीचे अस्तित्व मला मान्य आहे, आदर आहे, पण का कोणास ठाऊक कोणत्याही प्रकारची श्रद्धा माझ्या मनात नाही. कारण श्रद्धा, अनुभुती वगैरे सगळे मानव सापेक्ष आहे. ह्या सगळ्या शक्तीचा अनुभव, प्रकट रूप स्पंदनामुळे (फ्रिक्वेन्सीस्पेक्ट्रम ) घडते असा माझा अनुभव आहे. प्रत्येक वस्तूच्या, व्यक्तीच्या स्पंदन क्षमतेशी त्याचे नाते आहे. म्हणूनच व्यक्ती तितक्या प्रकृती वगैरे. असो, हेच पाहाना मी नवीन गाडी घेतली, माझे भले व्हावे, अपघात टळावे म्हणून बोकड कापायचे, अहो मी जिवंत राहावे म्हणून एकाचा जीव संपवण्याचा मला काय अधिकार ? मंत्र म्हणा, नमस्कार करा, त्या क्षणाला चार भुक्या पोटांना जेवू घाला. तेही खरेच, कोणते मंत्र, पाठकाची समज व क्षमतेची शंका आहेच. गाणार्‍याच्या क्षमते वर परिणाम अवलंबून असतो.

दोघे सुखरूप घरी आलो. कंपनीचे काम रोज होते तसेच सुरू होते. तो शोधक इराणी अजून गोंधळ घालण्यात मग्न होता. त्याने तयार केलेला एक उष्णता नियंत्रक कंपनीला ९० हजाराला वीकण्या करता आणला. त्या खरेदी बैठकीत मला त्या विषयातला माहितगार म्हणून बोलावले होते. त्या बैठकीतल्या एका अधिकार्‍याने एक असंबद्ध मुद्दा शोधून काढला, "एक इराणी जर उष्णता नियंत्रक तयार करू शकतो तर हा परदेशी कोणत्या कामा करता आहे ? ह्याला काढून टाका." दुसर्‍या अधिकार्‍याने मला विचारले "बाहेरून विकत घेण्याऐवजी कंपनीत बनवणे शक्य आहे का ?" मी - "सुटे भाग इराणमधे मिळत नाही असे खरेदी विभागाने मला नेहमी सांगितले आहे. सुटेभाग विभागात मी ह्या नियंत्रकांची मोठी संख्या बघितली आहे. सध्यातरी नवीन आवश्यक नसावेत." सुटे भाग विभाग प्रमुखाने बॉम टाकला " गेल्या सहा महिन्यात त्या शोधकाने ४५ नियंत्रक नेले होते व एकही नादुरुस्त परत केला नव्हता." सुरक्षा विभाग प्रमुखाने शोधकाच्या पिशवीत दोन वेळा असे नियंत्रक पकडले होते. तेव्हा त्याला ताकीद देऊन सोडून दिले होते.

तो इराणी शोधक भडकला " हा एक तुच्छ हिंदी मला चोर म्हणतो, ह्याला मी संपवतोच." त्याने पोशाखात लपवलेले भरलेले पिस्तूल माझ्यावर रोखले (क्रांती नंतर सगळ्या प्रकारची हत्यारे सहज उपलब्ध होती, ६ - ७ वर्षाच्या मुला मुलींचे ए.के. ४७ मशिनगन उघडझाप करण्याच्या शर्यती आयोजीत केल्या जात होत्या) त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकार्‍याला आमच्या भांडणाची कल्पना होती, त्याने क्षणात त्याच्या पिस्तुलावर जोरात हात मारला, पिस्तूल उडाले गोळी सुटण्याचा आवाज आला. नशीब आम्हा सगळ्यांचेच, कोणी जखमी झाले नाही. पुन्हा पोलिसात तक्रार झाली नाही, का ते विचारणे शक्यच नव्हते. मी भारतीय दूतावासात गेलो, मला "इंडियन" असल्याची घृणा तिथून सुरू झाली. भेटू पुढ्च्या भागात.

नशीब त्यांचे - भाग २९ 11/1/09
मी माझे जन्मदाते निवड करू शकत नाही तसेच, जन्म स्थान, वेळ, जात, धर्म, भाषा, देश कोणते असावे हे पण ठरवू शकत नाही. १९८० चा हा प्रसंग, डोक्यावर हात मारत, लाचार, सकाळच्या १० अंशाच्या थंडीत, तेहरान मधील आपल्या दूतावासाच्या जाळीदार खिडकीच्या खाली, रस्त्यावर आतला बाबा माझ्या कडे केव्हा लक्ष देईल ह्याची वाट बघत उभा होतो. त्याच्या समोर असणार्‍या कागदाच्या गठ्ठ्यातून त्याने नजर वर करत विचारले "हां क्या है, पहिला पासपोर्ट दिखाव, तुम्हारा रजिस्ट्रेशन नही है, ये फॉर्म भरके दो" म्हणत मला माझा पासपोर्ट परत केला. मी १९७७ ला केलेल्या रजिस्ट्रेशनच्या शिक्क्याचे पान उघडून त्याला दाखवले. "हां ठीक है, क्या मांगता है?" मी त्याला माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संबंधित अधिकार्‍याची भेट हवी आहे असे सांगितले. " अधिकारी दो हफ्तेके बाद इंडीयासे आयेगा बादमे आओ, अगर ज्यादा डर लगाता है तो मै प्लेन रिझर्वेशन के लिये फोन करता हूं मुझे तारीख बोलो."
म्हणून भाग २८ व्या भागात मला इंडियन असण्याची घृणा वाटायला सुरुवात झाली असे लिहिले होते. अहो त्या थंडीत ११४ भारतीय त्या महिन्यात तेहरानच्या रस्त्यावर ८ दिवस विमानाची वाट बघत झोपले होते. त्यांच्या बरोबर भारतातून निघालेले ८ - १० जण अफगाणीस्थान - इराणच्या रस्त्यावर ट्रकवर लादलेल्या कंटेनर मध्येच खपले होते. दोष कुणाचा - इंडियन असण्याचा? चार इंग्रज माझ्या बरोबर कंपनीत होते. १९७८ ला क्रांतीची सुरुवात होताच त्यांच्या दूतावासातून सरळ संपर्क झाला होता, सुरक्षा कारणा करता देश सोडणे आवश्यक झाले आहे तयार राहा. विमानाच्या तिकीटा सहित तयारी निशी ब्रिटिश दूतावासातला एक दुभाषी तेहरानहून गाडी घेऊन आला होता. कागदपत्रावर शिक्के, करारपत्रात नमूद केलेले सोडून जाण्याचे सगळे फायदे मिळवून चौघांना घेऊन निघून गेला. ते नशीब त्यांचे होते. तेच भारतीयांना १ पानी पत्रामुळे उपकार म्हणून १ महिन्याचा जास्तीचा पगार प्रत्येकी २००० देऊन परत पाठवले होते.

असो, मी कंपनीत परतलो, माझ्या नावाने ओरडा सुरू होता. पाचनसुलभ (डायजेस्टीव्ह) बिस्किट शृंखलेतील एका बिस्किट थंड करणार्‍या पट्ट्याचे (कन्व्हेअर बेल्ट) दोन वेळा वेग नियंत्रक जळले होते व उत्पादन २४ तास बंद होते. त्या पट्ट्याची निगा राखणारा फाटलेला भाग शिवण्यात मग्न होता. मी पट्ट्याची पाहणी केली. मला पट्ट्याच्या वजनाची शंका आल्याने त्या शिंपी बाबाची मदत मागितली. पट्टा शिवण्या करता जमिनीवर अंथरणे आवश्यक आहे असे सांगून बाहेर काढून त्याचे वजन केले. नवीन पट्ट्याच्या ८०० किलो वजनाच्या तुलनेत त्या जुन्या पट्ट्याचे ५ मेट्रीक टन वजन मोटर क्षमतेच्या फार बाहेरचे होते. ती वजन वाढ पाचनसुलभ बिस्किट उत्पादन सुरू झाल्या पासून फक्त सहा महिन्यात झाली होती. सगळा अधिकारी वर्ग जमा झाला, शंका निरसन नंतर नवीन पट्टा बदलला गेला व उत्पादन सुरू झाले. माझ्या समर्थकांना माझ्या कौतुकाचा विषय मिळाला. पाचनसुलभ बिस्किटात गव्हाचा कोंडा व मार्गारीन चरबीचा वापर सामान्य बिस्किटापेक्षा फार जास्त होता. ताज्या भाजलेल्या बिस्किटातून ते मार्गारीन कापडी पट्ट्याने शोषले जात होते म्हणून वजन वाढ झाली होती. त्यावर उपाय सुचवण्यात मला स्वारस्य नव्हते. आता मी इराण्यांना मदत करणार नाही असे ठरवले होते.

वर्ष पूर्ण होत आल्याने २० दिवसाची सुट्टी, आम्हा दोघांचे तेहरान - मुंबई - तेहरान तिकीट मंजूर झाले. त्या तिकिटात भर घालून मुंबई - हॉन्कॉन्ग - मुंबई अशी प्रवास सोय विमान कंपनीने दिली. आम्हा दोघांना हॉन्कॉन्ग परवान्याची गरज नव्हती. बायको इराणी असल्याने भारताचा प्रवास परवाना आवश्यक होते. त्यावर फक्त एकदाच प्रवेश असा शिक्का मारला होता. हॉन्कॉन्ग परती नंतर मुंबईत भारतीय नवरा असल्याने परवाना सहज मिळेल असा सल्ला मिळाला.

क्रांतीमुळे कंपनीचा ताबा सरकारी विभागाने घेतला. एक नवीन प्रमुख नियुक्त केला. तो स्वत:ची ओळख क्रांतिकारी म्हणून करून देत असे. त्याला कंपनीतील माझ्या कामाची प्रसिद्धी खूप खटकली. त्याने माझ्याशी बोलणे टाळले. बायकोला कंपनीतून काढून टाकले. ठरल्या प्रमाणे आमचा मुंबई प्रवास झाला व चार दिवसांनी हॉन्कॉन्गचा प्रवास सुरू झाला. हॉन्कॉन्ग विमान तळावर मी भारतीय म्हणून मला प्रवेश परवाना मिळाला, बायको इराणी म्हणून तिला प्रवेश नाकारला. काय घडले? भेटू पुढील भागात.

नशीब त्यांचे - भाग ३० 11/3/09
हॉन्गकॉन्ग विमानतळावर मी भारतीय म्हणून एका रांगेत उभा होतो माझी बायको इराणी म्हणून एका वेगळ्या रांगेत उभी होती. मला प्रवेशाचा शिक्का मिळाला मी पुढे जाऊन बायकोची वाट पाहतं उभा होतो. काचेच्या मागून बायकोला उशीर का होतो म्हणून बघत होतो. तेवढ्यात दोन स्त्री पोलिस पुढे आल्या, बायकोच्या दोन्ही दंडांना धरून एका खोलीत नेताना मी बघितले. ति मागे वळून रडक्या चेहर्‍याने माझ्या कडे बघत होती. मी हादरलो होतो. दर १५ मिनिटांनी चौकशी मदतनिसाला बायको बाहेर का येत नाही म्हणून विचारीत पिडत होतो. तिसर्‍या वेळेला मी पुढे होताच तो उठला मला थांबायला सांगून आंत निघून गेला. १५ मिनिटाने बाहेर आला. माझ्या बायकोची तपासणी अजून चालू होती, दोन तास लागणार होते, तपासणी संपल्यावर ती माझ्याशी बोलू शकणार होती.

त्या दोन तासात मी विमान कंपनीच्या, भारतीय / इराणी दूतावासातल्या अधिकार्‍यांना भरपूर त्रास दिला सगळ्यांनी मदत करणे शक्य नसल्याचे सांगितले. अडीच तास कसे निघून गेले कळलेच नाही. चौकशी मदतनिसाने मला बोलावून बाजूच्या खोलीत जाऊन बायकोशी ध्वनी व्यवस्थेतून (इंटर कॉम) बोलायला परवानगी दिली. बायको रडत होती, तिचे हुंदके ऐकून मला रडायला येत होते. तिच्या कडून जे कळले त्याने आम्ही दोघांनी जितके जितक्यांना दोष देणे शक्य होते तेवढे दिले, तेवढेच आमच्या हातात होते. त्याच दिवशी आम्ही विमानात असताना इराण मधील ब्रिटिश दूतावासावर क्रांतिकारकांनी हल्ला केल्याने माझ्या बायकोची कसून तपासणी घेतली गेली व ३६ तासानंतर आमच्या तिकीट योजने प्रमाणे बॅन्कॉक ला जाणार्‍या पहिल्या विमानाने तिला परत जाण्यास सांगितले होते, तो पर्यंत तिला विमानतळावरील सुरक्षा कवचात राहावे लागणार होते.

योगायोग बघा, बायको माझी ५ महिन्याची गर्भवती होती, शंका म्हणून स्त्रि वैद्यकीय तज्ञाने तिला विवस्त्र करून कसून तपासणी केली होती, नंतर कर्तव्य आहे असे सांगत तिची माफी मागितली होती. तिला बोल भरून पाणीदार सूप देण्यात आले होते. पुढील ३० तासात हेच मिळणार होते. तिच्या पिशवीतली बिस्किट संपणार होती. हो सांगायचे राहिलेच, संवेदनक्षम लेखात नमूद केल्याप्रमाणे आम्ही दोघांनी आमचे पहिले मूल योजनाबद्ध असावे असे ठरवले होते त्यात अशा प्रसंगाचा विचार केला नव्हता. त्या प्रसंगाचे बरे-वाईट परिणाम लहानग्या जीवावर होणार हे निश्चित होते. ह्यालाच नशीब म्हणतात हे सिद्ध झाले.

मी विचित्र परिस्थितीत बाहेर पडलो. माझी खासियत, मी फार लवकर स्वतःला सावरू शकतो. ज्या कामाकरता हॉन्गकॉन्गला आलो होतो ते पूर्ण करण्याच्या मार्गी लागलो. कॅनन ए१ प्रतिमा ग्राहकाची (कॅमेरा) माहिती मिळवली व एका ठिकाणी प्रतिमा ग्राहकाचा मुख्य भाग (कॅमेरा बॉडी), १.२ झरोक्याचे (ऍपरचर) ८५ मी.मी.चे सामान्य भिंग (नॉर्मल लेन्स), ३५ - ३०० मी.मी.चे फेरभिंग (झूम लेन्स), वखडू - वर-खाली, डावे-उजवे भिंग (टिल्ट-शिफ्ट लेन्स), क्षप्र - क्षणिक प्रकाश (फ्लॅश) आणि चर्म पेटी (लेदर बॉक्स) विकत घेतले, त्या खर्च केलेल्या किमतीत तेहरानला फक्त प्रतिमा ग्राहक, ५५ मी.मी. चे सामान्य भिंग व क्षप्र एवढेच भाग मिळत होते. मी मला हॉटेलच्या खोलीत बंद करून घेतले, विकत घेतलेल्या वस्तूंना नीट समजून घेतले आणि इतक्या वेळा हाताळले की त्या वस्तू माझ्या शरीराचा एक भाग झाल्या पाहिजेत, असे केल्यानेच अशा प्रकारच्या कोणत्याही उपकरणावर आज पर्यंत मी प्रभुत्व मिळवले आहे.

बर्‍याच उशिरा थकव्याने मी झोपलो. सकाळी बर्‍याच उशीराने जागा झालो, शहरात कुठेही न जाता सरळ विमान तळावर गेलो. परवानगी मिळवून बायकोशी बोललो, तिला शक्य तेवढा धीर देण्याचा प्रयत्न केला. तासाभराने विमान कंपनीच्या ताब्यात सामान दिले कॅनन प्रतिमा ग्राहकाची चर्म पेटी हातात ठेवली व विमान प्रस्थान सुरक्षा कक्षात बायकोला भेटायला गेलो. ति माझ्या आधीच तिथे आली होती. मला घट्ट मिठी मारून बसली व तिला झोप लागली, मधूनच घाबरून जागी झाली, तिला आम्ही बाहेर जाणार ह्यावर विश्वास नव्हता, कदाचित त्या स्त्री पोलीस तिला परत आत नेतील अशी भिती वाटत होती, मी काहीही सांगितले तरी तिला पटत नव्हते. विमानात बसण्याची परवानगी मिळाल्यावर तिचा चेहरा खुलला. रोज दर तासाला इराणी चहा पिणारी, गेल्या ३६ तासात तिला एक कप चहा मिळाला नव्हता. तिची परिस्थिती ऐकून व बघून हवाई सुंदरीने तिला मोठी बाटली भरून चहा आणून दिला. खुर्चीचा पट्टा उघडण्याची परवानगी दिल्यावर तिला आनंद झाला. मग ति माझ्याशी बोलू लागली. नवीन घेतलेला प्रतिमा ग्राहक व खर्च केलेली किंमत ऐकून तिला आनंद झाला.

बॅन्कॉक विमान तळाच्या बाहेर आलो, स्थानिक वेळेनुसार रात्रीचे दोन वाजले होते. सुरक्षा हद्दीतून बाहेर येताच प्रवास वाटाडे (गाईड) मागे लागले. त्यातल्या एकाला हाताशी धरले. त्याने हॉटेल मिळवून दिले, तो आमची सर्व प्रकारची काळजी घेईल असे आश्वासन सारखे देत होता, आम्हाला तो व्यवसायाचा भाग वाटल्याने जास्त लक्ष दिले नाही. सकाळी १० ला तो मला शहराची सहल करण्या करता हजर राहा सांगून गेला. भेटू पुढील भागात.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 9:56 am | विजुभाऊ

अरे १५० वाचने आणि अजून एकही प्रतिसाद नाही ?

विनायक रानडे's picture

8 Jan 2010 - 11:29 am | विनायक रानडे

कलादालनात "क्लोजप" http://www.misalpav.com/node/10366 अहो १२१९ टीचक्या आहेत, प्रतिक्रिया १४ आहेत. माझा ऊद्देश " आय इज (व.पु. उवाच)" एव्हडाच मर्यादित आहे. मी मराठीत लिहू शकतो हाच मला आनंद आहे.