भाग ४, ५, ६ एकत्रि
नोकरशाहीत नोकरी करणे हा एकच पर्याय मानणार्या माझ्या आप्तांना व्यवसायातले फायदे समजून घेण्याची इच्छाच नव्हती. पोती भरून धान्य, विजेची उपकरणे, गॅस शेगडी हे सगळे मी ५०० रुपयाच्या गुंतवणुकीवर सुरू केलेला व्यवसायातून कमावले होते. तरीही मी नोकरी करावी हे रडगाणे रोज असायचे. कटकटी वाढू लागल्या मी फक्त रात्री घरात येत असे. सकाळी लवकर निघून जात असे. घरातल्या मोठ्यांसमोर अंडरस्टॅन्डींग मान्य केले. रोजच्या कटकटीला कंटाळून एकदाचा व्यवसाय बंद केला.
१९७१ गांव सोडून मुंबईत भावा कडे आलो. विमान विरोधी तोफांचे इलेक्ट्रॉनिक नियंत्रकाचे भाग जुळवणीचे काम मिळाले. तिथे प्रथम मराठी - गैरमराठी वादाचा वाइट अनुभव घेतला. कंपनीत त्या विभागात मीच एक मराठी होतो, मॅनेजर व इतर केरळी होते. माझी कामातली सफाइ व कामाचा वेग बघून काम मिळाले होते. मी जोडलेले भाग सगळ्या चाचणीत पास होत असत. पण पगार मात्र इतरांपेक्षा कमीच होता. ६ महिन्यात ती कंपनी सोडली.
१९७२ एका खर्या हितचिंतकाने मला इलेक्ट्रॉनिक शिक्षण संस्थेत नोकरी मिळवून दिली. माझ्या जवळ कूठलेच प्रमाण पत्र नव्हते. कामातील सफाई व कामाची समज म्हणून काम मिळाले. इलेक्ट्रॉनिक लॅबच्या उपकरणांची देखरेख, दुरुस्ती व संबंधीत प्रयोगांची बांधणी असे काम होते. संस्थेचा कर्मचारी होतो म्हणून वाचनालयातील कोणतेही पुस्तक सहज उपलब्ध होते, भरपूर वाचन केले. इथे थेअरी व प्रॅक्टीकल ह्यातला फरक व थेअरीचे अवास्तव महत्त्व जाणवू लागले. माझ्या सारख्या प्रॅक्टिकल माणसाला थेअरी म्हणजे शब्दांची कसरत वाटू लागली. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची व भागांची थेअरी समजवताना प्राध्यापकांचा गोंधळ मला लवकर समजू लागला. विद्यार्थी शंका व माहिती करिता माझ्याकडे येऊ लागले. मी पटकन प्रात्यक्षिक दाखवून समजवू शकत होतो. विद्यार्थी सहज समजू शकत होते. परिणाम वाईट झाला. प्राध्यापक मंडळी मला दोन हात दूर ठेवू लागले. प्राध्यापकांनी जे विद्यार्थी माझ्याशी बोलताना बघितले असतील त्यांना त्रास द्यायचे सुरू केले. मी १५ - २० मिनिटात विद्यार्थ्यांच्या समोर उपकरण उघडून दुरुस्त कसे केले जाते ह्याचे प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केले. पण प्राध्यापकासमोर दुरुस्त करणे टाळायचो. हा प्रकार एका प्राध्यापकाच्या लक्षात आला. तो स्वतः त्याला माहीत नाही अशी कबुली देऊन विद्यार्थ्यांच्या बरोबरीने दुरुस्तीचे प्रात्यक्षिकं बघायला मुद्दाम हजर असायचा. मी उपकरणे लॅबमध्ये दुरुस्त केल्याने मुख्य कार्यालयातील काही महाभागांची बाहेरील कमाई थांबली, ते वेळोवेळी मला त्रास देण्याचे प्रयत्न करायचे.
विद्यार्थ्यांना ऑसिलोस्कोप व आतील भागांचे कार्य समजावे म्हणून प्रत्येक भाग सुटे करून एका ३फूट रुंद २फूट उंच तक्त्यावर मी जोडले होते. संस्थेला भेट देणार्यांना ते एक मुख्य आकर्षण ठरले होते. त्या अवधीत जे प्राचार्य होते ते माझे नेहमी कौतुक करीत असत.
अशा एकेक घटना घडत होत्या. त्याच संस्थेच्या नवीन प्राचार्याने मला नोकरीतून काढून टाकले. ते कसे?? पाहूया पुढील भागांत. एक मात्र खरं शिक्षित धेंडांची प्रमाणित घाणेरडी वृत्ती मी फार जवळून अनुभवली. पुन्हा तेच, अहो दोष माझा होता, असल्या कचर्यात सांभाळून घेणे मी शिकलो नाही - नशीब माझे
१९७३ - ७४ ला त्या शिक्षण संस्थेत एक साधन दुरुस्ती करता आले होते. क्रॅंकशॅफ्टच्या गुळगुळीत पृष्ठभागांचे मोजणी व नियंत्रण त्या साधनाने होत असे. मी साधन घेऊन येणार्या व्यक्तीला वापर कसा केला जातो वगैरे माहिती मिळवली. सगळ्यांनी हात झटकले. शेवटी प्राचार्यांनी मला आव्हान दिले. चांगले पैसे मिळतील असा विश्वास दिला.
त्या साधनाचे नकाशे कोणी जाळले होते. साधन उत्पादकाकडे जर्मनीत पाठवणे फार खर्चीक होते म्हणून ते आमच्या संस्थेत दुरुस्तीला आले होते. दोन दिवसांत मी नकाशे तयार करून सुरक्षित जागी ठेवले. नकाशा मुळे दुरुस्ती काम सोपे झाले. पुढल्या काही दिवसात कंपनीचा माणूस ते साधन घेऊन गेला. मी मिळणार्या पैशाची वाट पाहत बसलो.
दोन महिन्यानंतर एक दिवस कार्यालयातून माझ्या नावाचे पाकीट मला मिळाले. त्यात एक हस्तलिखित चिठ्ठी व २५० रुपये होते. ते क्रॅंकशॅफ्टचे साधन दुरुस्तीचे संस्थेला २५००० रुपये मिळाले होते त्याचे निम्मे संस्थेने ठेवून निम्मा भाग संबंधीत व्यक्तींना दिला आहे, त्याचे २५० रुपये रोख तुला देण्यात येत आहेत. त्या निम्म्या भागातला सगळ्यात कमी भाग माझा होता. कार्यालयातल्या कारकुनाला माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते. मी रागाने विभाग प्रमुखांना भेटायला गेलो, ते बाकीच्या फुकटात पैसे मिळालेल्या सगळ्या मंडळीनं बरोबर पार्टी करण्याचे ठरवीत होते. मी त्यांना भेटायला येणार हे त्यांना अपेक्षितच होते, अरे ये ये आम्हाला काही न करता पैसे मिळाले म्हणून पार्टी करतो आहे. मी दुर्लक्ष करीत चिडून बोललो "आपण शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहात, निती नियम शिकवता, तुम्हीच नियम धाब्यावर बसवता मग तक्रार घेऊन कुठे जाणार ? " " काम मी केले, एकाही महाभागाने ह्यात मदत केली नाही, पैसे वाटपांत सगळे सामील झालात ? साधन दुरुस्त केले ही माझीच चूक"
विभाग प्रमुख कुत्सित हसत मला शिकवतो " समुद्रात मोठा मासा लहान मासा खाऊन जगतो, हे तुला समजून घेणे जरूरीचे आहे." मी पण टोला हाणला " माणूस म्हणून मिरवणारे, वळवळणारे प्राणी म्हणून जगतात हे आज तुम्हाला बघून समजले, अश्या प्राण्यांना कसे ठेचायचे हे मला शिकले पाहिजे."
पुढे काही महिन्यांनी इलेक्ट्रॉनिक विभागाला बीई नापास झालेला, प्राचार्यांचा नातेवाईक प्रमुख म्हणून आला.
त्या काळात "टनेल डॉयोड" हा प्रकार बाजारात उपलब्ध नसताना ह्या महाभागाने बलसाड शहरात किलोने विकतात असे सांगत कामाचा कार्य भाग सांभाळण्याचे खेळ सुरू केले. डिप्लोमाचे विद्यार्थी शंका निरसना करिता माझ्या अवतीभवती बघून ह्याचा जळफळाट होत असे. प्राचार्यांचे सहीचे एक पत्र माझ्या हातात दिले. उपकरण बंद का झाले, कोणत्या आधाराने काय दुरुस्ती आवश्यक आहे हे ठरवले, दुरुस्ती करता कोणती हत्यारं / साधने वापरणार वगैरे सगळा तपशील लिहून काढा, विभाग प्रमुखाची मान्यता घ्या आणि नंतर दुरुस्ती सुरू करा. तिन महिन्यात लॅबमधील ५० टक्के उपकरणे दुरुस्ती करता बंद झाली. माझी तक्रार प्राचार्यां पर्यंत पोचली. सगळा तपशील वाचून दोष माझा ठरवला गेला. मला संस्था सोडा म्हणून सांगण्यात आले. उपकरणे बाहेरुन दुरुस्त करून घेण्याच्या कंत्राटावर संमती झाली. पैसे गिळण्याचे नवीन धंदे शिक्षण संस्थेत सुरू झाले.
डोक्याचा असा सुपीक उपयोग करणे मी का शिकलो नाही - - नशीब माझे
शिक्षण संस्थेतून बाहेर जाताजाता माझ्या त्याच खर्या हितचिंतकाने त्याच्या बॅंकेत नोकरी दिली. बॅंकेच्या बहुमजली इमारतीत अग्निदर्शक / सूचक ( फायर अलार्म ) पद्धतीची दुरुस्ती, ध्वनी / चलचित्र साधनांची दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक नियंत्रकांची दुरुस्ती असे कामाचे स्वरूप होते. पद्धतशीर काम करणार्याला ते काम तसे कमी होते. इथे मी कामगार संघटना पद्धतीत शिरलो होतो. कामाचा पसारा वाढवता कसा येईल ह्याची काळजी घेतली जात असे. त्यामुळे काम करण्याचे नाटक करीत एखादे काम लांबवणे शक्य असल्यास सर्व प्रकारच्या शक्यता शोधण्याचे प्रयत्न केले जात असत आणि त्यातच एकमेका साहाह्य करुचे पूर्ण पालन करणारे मदतनीस मदतीला धावून येत असत.
लहानपणापासून एकला चलोचा सराव झाल्याने मला ही गट पद्धती नवीन होती. महिन्याभरात माझे काम पूर्ण नियंत्रणात आल्याने काही कामगार मंडळी व त्यांची मदत करणारे / घेणारे अधिकारी माझे शत्रू झाले. मला त्यांच्या घोळात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या एका धुडगूस मेळाव्यात ( आजकाल ज्याला रेव्ह पार्टी म्हणतात ) ओढला गेलो. तिथे एका प्रसंगाने धुडगूस मेळाव्याचा खरा अर्थ समजला. लघुशंका निरसनाकरता जात असताना एका खोलीतून जे ऐकायला आले त्याने थबकलो. मेळावा आयोजक दोन व्यक्ती थंड पेयात दारू मिश्रणाच्या कामात मग्न असताना बोलत होते. " ए जास्त पिऊ नकोस आज मी दिलेली नाव विसरू नकोस, कोणत्याही परिस्थितीत माहिती मिळवलीच पाहिजे." तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला मी तिथून बाजूला झालो. मी शेवट पर्यंत त्यांच्या घोळ प्रयत्नात फसलो नाही.
१९७६ एक प्रसंग घडला, मी ती नोकरी सोडली. बॅंकेचे काम चालू असताना व्यत्यय नको म्हणून मी २ तास नंतर थांबून दुरुस्तीचे काम करीत असे. इमारतीच्या गच्चीवर असलेले काही नियंत्रक दुरुस्तीचे काम होते. सुरक्षा कार्यालयात त्याचा मुख्य नियंत्रक होता. ४४० वीज दाबाचे काम असल्याने, तो बंद केला, त्यातले फ्यूज बाहेर काढले, त्या नियंत्रकावर सूचना लिहून चिकटवली. ह्या सगळ्याची नोंद सुरक्षा कर्मचार्याने तिथल्या वहीत केली त्यावर आम्ही दोघांनी वेळ लिहून सही केली. मी फ्यूज माझ्या कपाटात ठेवले व कुलूप लावले. गच्चीवर काम करायला गेलो. एकटाच होतो. शिडीवर चढलो, नियंत्रकाचे दार उघडले, मीच वीज बंद केली होती, तरीही सवय म्हणून चाचणी करता स्क्रुड्रायव्हर आत घातला, मोठा आवाज झाला, मी शिडी वरून खाली पडलो. अंतर फारसे नव्हते ४ फुटा वरूनच पडलो होतो. हातातून रक्त आले होते. पाठ व हातातून कळा यायला सुरुवात झाली. कसाबसा सावरत तळमजल्याला आलो. माझी अवस्था बघून तिथे असलेले पुढे धावले.
सुरक्षा कार्यालयात नेले. प्रथमोपचार झाले. गरम चहा झाला. मग विचारपूस सुरू झाली. झालेल्या घटनेची नोंद सुरक्षा कर्मचार्याने तिथल्या वहीत केली. तिथे लिहिलेली आधिची नोंद त्याने वाचून दाखवली. मी फ्यूज काढल्यानंतर वीज दुरुस्तीवाला धावत आत आला होता. चाचणी करायची असे सांगून त्याने फ्यूज लावून नियंत्रक सुरू केला व चाचणी करता जातो म्हणत जिन्याकडे गेला. त्यानंतर काही वेळाने सुरक्षा कार्यालयातील नियंत्रकातून फ्यूज गेल्याचा आवाज आला होता.
दसर्या दिवशी वीज दुरुस्तीवाला एक दिवसाच्या रजेवर असल्याने कामावर हजर नव्हता. तिसर्या दिवशी संबंधीत अधिकारी वर्ग, मी व तो वीजवाला बैठक झाली. वीजवाल्याचे पाठीराखे कोण ते समजले. मी ती नोकरी सोडली.
मंडळी तुम्ही / मी जिवंत असणे ५०% स्वबळ व ५०% इतरांचे फसलेले प्रयत्न. हे सांगायला आज मी जिवंतं आहे - - नशीब माझे
प्रतिक्रिया
7 Jan 2010 - 4:37 pm | संताजी धनाजी
अतिशय छान लेख! खूप आवडले. परंतु "भाग ४, ५, ६ एकत्रित"च्या दुव्यावर टिचकी मारल्यावर "१,२,३" दिसत आहे.
- संताजी धनाजी
7 Jan 2010 - 4:44 pm | II विकास II
रेव्ह पार्टीचा हा उल्ल्लेख वाचला
http://mimarathi.net/node/396
बाकी प्रतिक्रिया नंतर
8 Jan 2010 - 8:47 am | विनायक रानडे
दुरुस्ति केली आहे चुक दाखवल्या बद्दल आभारी आहे.