नशीब भाग ४१ ते ४५ एकत्रित

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
2 Feb 2010 - 11:08 am

नशीब भाग ३६ ते ४० एकत्रित
संवेदनक्षम 1.11.09
वेदना समजण्याची क्षमता, हा मी समज करून घेतलेला अर्थ, शब्दार्थ जाणकारांनी दुरुस्ती करावी त्यांचे स्वागत. मी किती संवेदनक्षम ( सेन्सिटीव्ह ) आहे हे आहार, विचार, संस्कार आणि परिस्थितीशी संबंधित आहे. ह्याची जाणीव मला निद्रानाशाच्या आजारातून झाली - नशीब माझे भाग १. ह्याचे शास्त्रीय कारण रक्ताचा दर्जा बदल व शरीरातील आम्लाचे प्रमाण असावे. मी कोणत्या / किती विषयांशी संवेदनक्षम असावे ह्याची प्राथमिकता बाल वयात माझे पालक ठरवतात, मग शिक्षकवर्ग त्यांच्या कुवती नुसार त्यात भर घालतात, नंतर सामाजिक परिस्थिती त्यात चढ उतार घडवते. जे बालवयात खरे-खोटे होते त्याचे अर्थ वयोपरत्वे बदलतात, तसेच काहीसे चांगले-वाईट, लहान-मोठे, फायदा-तोटा वगैरे विषयांचे होते.

मी ह्या व्यक्तीची पाया बांधणी व दर्जा माझ्या जन्माच्या आसपास माझ्या जन्मदात्यांच्या ( दात्यांच्या पंचांगात लिहिलेले ) तन, मन, धन व काळ ह्यावर ठरवला गेला. त्यांची तेव्हाची शारीरिक क्षमता, मनस्थिती, वैचारिक समतोल, सांपत्तिक स्थिती आणि त्या काळातील सांसारिक / सामाजिक स्थितीमुळे ठरवला गेला. आम्ही ६ भावंड सगळ्याच बाबतीत खूप मोठ्या फरकाने वेगळे आहोत, मोठ्या बहिणीत व माझ्यात १८ वर्षांचे अंतर म्हणूनच मला मी एक नको असलेले शेंडेंफळ असल्याची जाणीव झाली, विशेष असे की बर्‍याच वर्षानंतर माझ्या आईनेच माझ्या ह्या कल्पनेला सत्य असल्याचा दुजोरा दिला तेव्हा तिला तिचे रडणे आवरेना, हा माझ्या संवेदनक्षम असण्याचा परिणाम.

टक्केवारीच्या जगात ९० टक्के जोड्या अपघाताने पालक झालेले असतात, ८ टक्के थोडेफार फरकाने ठरवून पालक झालेले असतात, दोन टक्के लोक योजना बद्ध, तन, मन, धन व काळ ह्या सगळ्याचा विचार करून मोठ्या दिमाखाने पालक होण्याची फळे चाखतात. प्रत्येक व्यक्ती जन्माने संवेदनक्षम असते त्याची पातळी व दर्जा कमी करणारे प्रामुख्याने पालकच असतात, त्यानंतर एक एक मंडळी आपापल्या परीने हातभार लावतात, ते कसे ? बघूया ह्या मंडळींचे योगदान. मोठ्यांचा आदर करावा ( मोठे कोण / कसे / कधी / का ठरवणार ). तुम्ही सुखी असाल तर इतरांच्या सुखाचा विचार करा ( मी अजून सुखी होण्याच्या प्रयत्नात अडकलो आहे, इतर कोण ? ) वगैरे.

९० टक्के पालक मंडळी त्यांच्या पाल्ल्याला एक जबाबदारी पदरी पडली म्हणून पाळतात. सुरुवात होते ति बाळ जन्माला आल्यापासून, संबंधित मंडळी सल्ला देत प्रयोग करतात. आहार कसा / कोणता / केव्हा, कोणत्या देवाला जा, डॉक्टर की वैद्यबुवा की एखादा बाबा, हे सगळे सल्लागार मंडळी ठरवतात. बाळ थोडे मोठे होताच बहुतांशी पालकांना संवेदनक्षमता जोपासणे विभिन्न कारणांनी शक्य नसते आणि ते मूल शिक्षण क्षेत्रातील विविध कारखान्यात ढकलले जाते. शाळेत जाणे हि एकमेव प्राथमिकता असते. पुढे अशा ९० टक्के पाल्ल्यांची प्राथमिकता उरते ती फक्त गूण / प्रमाणपत्र / प्रशस्तिपत्र मिळवणे. ह्यांच्या संवेदनक्षम असण्याचे महत्त्व व क्षेत्र हळूहळू संकुचित होते.

ति १० टक्के पालक मंडळी पाल्ल्याच्या संवेदनक्षमतेची व क्षेत्राची योजना बद्ध वाढ करणे हे कर्तव्य समजून प्रयत्नशील असतात. ह्यातील जनहित संस्कारांनी संवेदनक्षम असतात ती मंडळी जमेल त्या माध्यमातून जनतेचे भले व्हावे म्हणून प्रयत्नशील असतात, तर जे स्वहित संस्कारांनी संवेदनक्षम असतात ते जमेल त्या माध्यमातून जनतेला संभ्रमात गुरफटून स्वहित साधण्यात मग्न असतात. स्वहित संवेदनक्षम गटात राजकारणी, सल्लागार, बिल्डर / डेव्हलपर, संस्थांचे अध्यक्ष, व्यापारी, शिक्षक . . .यादी तुम्ही जर संवेदनक्षम असाल तर शोधून वाढवू शकाल. मी पण ना . . अहो तुम्ही इथपर्यंत वाचत आलात ते संवेदनक्षम आहात म्हणूनच, हो ना ?

नशीब हे शिकलो - भाग ४१ 24/11/09
त्या इजिप्शियन जोडप्याचे पहिले मूल असून सुद्धा दुसर्‍या मुलाच्या जन्माचा हा घोळ त्यांनी का घातला? तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणूनच अपघाताने, कोणतेही नियोजन न करता देवाची कृपा समजून, बेजबाबदार रित्या बाळाला जन्म देणारे ९० टक्के पालक असतात असे संवेदनक्षम (१/११/२००९) ह्या लेखात लिहिले होते त्याचा हा एक धक्कादायक पुरावा. दोन दिवस जोडून आलेल्या सुट्टीचा तो दिवस होता, माझे जेवण संपत आले होते, बायकोचे अर्धेच झाले होते. तेवढ्यात माझ्या दारावर जोरात हात मारत इजिप्शियन मित्र ओरडून माझ्या बायकोला बोलवीत होता. त्याची बायको विचित्र अवस्थेत आहे व ति माझ्या बायकोची मदत मागते आहे. मी धावलो, दार उघडले, इजिप्शियन रडत होता, त्याच्या बायकोने मुलाला जन्म दिला होता. माझी बायको हात पुसत त्यांच्या घराकडे धावली, तिने बाकीच्या बायकांना हाक दिली. मला आपत्कालीन मदत वाहिनीला कळवायला सांगितले, मी इजिप्शियन मित्रालाच बोलायला सांगितले. काय घडले असेल हे मी समजू शकलो, माझ्या बायकोने त्यांच्या दारात पाय ठेवलाच होता, मी तिला थांबवले, कोणीही आंत जाऊ नका, त्याचे परिणाम वाईट होतील ह्याची कल्पना दिली. माझ्या बायकोला अरबी बोलता येत असल्याने ति इजिप्शियन बाईला दारातच उभे राहून दिलासा देत होती.

आतल्या परिस्थितीची माहिती बायको बाकीच्या बायकांना सांगत होती, इजिप्शियन बाई खाली रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडली होती, मूल अर्धवट फरशीवर होते. माझ्या बायकोने समोर दिसणारी चादर तिच्या दिशेने फेकली व तिला ति चादर त्या बाळाच्या डोक्या खाली सरकवायला सांगितली जेणे करून ते बाळ थंड फरशीवर राहू नये. वैद्यकीय मदत एका तासाने मिळाली. दोन तरुण सेविका आत गेल्या पण त्यांना ति अवाढव्य इजिप्शियन बाई पेलवत नव्हती, शेवटी दोन पुरुष सेवक मदती करता आत गेले. इजिप्शियन मित्र ओरडून त्यांना आत जाऊ नका म्हणून सांगत होता. बाळ सुरक्षित होते परंतु बाईची परिस्थिती बिघडत होती. कसेबसे बाईला घरातून बाहेर काढले, परंतू त्या निमुळत्या जिन्यातून त्या अवस्थेत त्या बाईला गाडी पर्यंत नेताना १० मिनिटे लागली होती. त्या घटकेला तिथे उभ्या असणार्‍या प्रत्येकाने बांधकामाशी संबंधीत असणार्‍यांवर भरपूर तोंड सुख घेतले. त्या जिन्याची रुंदी फक्त दोन व्यक्ती जाऊ शकतील एवढीच होती.
मदतीला आलेल्या एका सेविकेने जमलेल्या बायकांना कोणी काही मदत केल्याचे विचारले, सगळ्या बायकांनी नाराजी व्यक्त केली, मी त्यांना मदत करू नका म्हणून सांगितले होते. मी असे केल्याबद्दल सेविकेने मला धन्यवाद दिले. कारण अशा परिस्थितीत अनधिकृत व्यक्तीने मदत दिल्यास व रुग्ण दगावल्यास ति व्यक्ती गुन्हेगार ठरते. काही वर्षापूर्वी एका प्रवास कंपनीच्या प्रमुखासोबत दोन मदतनिसांना तीन दिवस ह्याच कारणा करता तुरुंगवास भोगावा लागला होता.

पाच दिवसाने इजिप्शियन बाई एका गोंडस मुलाला घेऊन तिच्या घरी परतली. ति माझ्या बायकोवर मदत न केल्याबद्दल रागावली होती. बायकोने तिला मदत न करण्याचे कारण समजवून सांगितले, तिला ते पटले. पुढे १० दिवस माझ्या बायकोने तिला वेळोवेळी आवश्यक आहार पुरवला होता.

माझा मुलगा बालवाडीत जात असे त्याला ने आण करण्यात काम सांभाळून वेळ काढावा लागत असे. बर्‍याचवेळा मुलगा वाट पाहत शाळेत थांबत असे. काही महिन्यांनी त्या शाळेने गाडी सुरू केली व माझी पळापळ कमी झाली. मधल्या काळात बायकोला पहिल्या मुलाला सोबत असावी असे वाटुलागल्याने आम्ही संवेदनक्षमवाले १० टक्के पालक (१/११/२००९) बनण्याच्या प्रयत्नाला लागलो. दुसर्‍या मुलाच्या जन्माने आम्हा दोघांना मनुष्य स्वभावाचे अजून काही पैलू अनुभवता आले. आमचे यश हे ५० टक्के प्रयत्न होते तर ५० टक्के इतरांनी वापरलेले गतिरोधक ओलांडल्याचे होते.

नशीब हे शिकलो - भाग ४२ 26/11/09
माझ्या बायकोने त्या इजिप्शियन बाईला मदत न करण्याचे अजून एक महत्त्वाचेकारण बायकोचा नववा महिना सुरू झाला होता. योजनाबद्ध पालक होण्या करता जीबंधने आम्ही पाळली त्यातलेच ते एक होते, तीच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण पडू दिला नाही. त्या नऊ महिन्याच्या काळातील आहार, व्यायाम, वैद्यकीय मदत ह्या सगळ्याचा विचारा करून दैनंदिनीची आखणी केली होती. सुदैवाने राहत्या जागेच्या त्या इमारतीची १२० फुटाची सरळ साफ गच्ची दिवसातून दोनतीन वेळा चालण्याच्या व्यायामा करता उपयोगी ठरली होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार पालेभाज्या - फळांचा आहाराचा जास्त भर दिला गेला. त्यासंपूर्ण काळात लहान मोठे आजार व ती औषधे घेण्याची वेळ आली नाही व येऊ दिली नाही. हेच आमचे ५० टक्के प्रयत्न झाले.

मोठ्याला लहान भाऊ मिळाला.पण जन्मापासूनच त्रास वाढले. बायकोला तिच्या मैत्रिणींनी मदतीचे आश्वासन दिले होते ते एका विचित्र प्रसंगाने विसरले गेले. पाहिल्या ३० दिवसाचा फार महत्त्वाचा आहार वेळेवर मिळणे आम्हाला विसरावे लागले. बायको दवाखान्यातून घरी आली त्या चार दिवसात मी सकाळी कामावर जाताना मला शक्य होते तसा नाश्ता तिला बनवून देत होतो. चौथ्या दिवशी नेमके कंपनीतल्या त्या गटप्रमुखाने ६० की.मी. दूरचे दुरुस्तीचे काम मला दिले. बाहेरुन खानावळीचे जेवण आणेस्तोवर दुपारचे ३ वाजले होते. पाचव्या दिवसा पासून बायको स्वैपाकाला लागली. इथे मला माझ्या आईने बर्‍याच बाळंतिणींना केलेली मदत आठवली, ती मालीश, ते शेक देणे, ते अळिवाचे / डिंकाचे / मेथीचे लाडू, साजूक तूप /बदामाचा शिरा, ते सगळे आठवले. नशीब त्या बाळंतिणींचे त्यांना इतकी महत्त्वाची मदत योग्य घटकेला मिळाली पण तिच्याच ह्या सुनेला मिळू शकली नाही ह्याचे वाईट वाटले.

ह्या सगळ्या घटनांचा परिणाम तेव्हा जाणवला नाही पण आज तो जाणवतो आहे. श्रेय देण्या घेण्याचा विचार न करता एक अभ्यासक म्हणून मला तेव्हा जे जाणवले व आज जे जाणवते आहे त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. माझी बायको त्या लहान बाळाशी काय, मोठ्या मुलाशी काय संवाद साधण्याच्या प्रयत्नांत माझ्या पेक्षा वेगळी होती. त्या मुळे दोन्ही मुलांना माझ्याशी संवाद साधणे जास्त सोयीचे वाटले व आजही वाटते. माझ्यामते आम्ही पालक नव्या पिढीशी संवाद साधण्यात असमर्थ ठरतो त्याचे हे एक कारण असावे की त्या लहान वयात पालक मंडळी अपेक्षित संवाद साधण्याला महत्त्व देण्यास विसरले असावेत.

१९८५ - ८६ च्या दरम्यान मस्कतच्या मराठी कलाकारांनी एका नाटकाचे चलचित्रण करण्याचे ठरवले. माझ्या एका खास मित्राने त्याचा चलचित्र ग्राहक ( व्हिडिओ कॅमेरा ) मला वापरायला दिला. मी बर्‍यापैकी चित्रण करू शकलो. त्या नाटकाची पार्श्व संगीताची ध्वनिफीत मी बनवली होती. ते नाटक दुबईला दाखवले गेले तिथे मी जाऊ शकलो नव्हतो. पण पार्श्वसंगीताचे पारितोषक व प्रशस्तिपत्र दुसर्‍यानेच स्वत:चे नाव पुढे करून,मला डावलून मिळवले. त्या नंतर माझ्या डोक्यात सारखा चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा ) विषय घोळू लागला. कारण नाटकाचे काम करताना चित्र चौकट (फ्रेमींग ), प्रकाशाचा समतोल, संपादनातले अडथळे ह्या सगळ्याचा फार चांगला अनुभव मिळाला होता. आता ह्या तंत्रातील बारीकात बारीक गोष्ट, वस्तू, मुद्दे, आवश्यक माहिती भूक लागल्या सारखे शोधू लागलो.

सगळ्यात आधी माझ्या खिशाचे वजन सांभाळत बाजारात काय मिळते ह्याचा शोध सुरू झाला. विक्रेत्यांशी ओळख वाढवली, विक्री पुस्तिकांचे ढीग जमा केले, त्यांचे समीक्षण, विश्लेषण करीत एक चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) घेण्याचे निश्चित केले. महिन्याच्या पगारातून ६० - ७० रियाल जमत होते, जरुर होती ५०० रियालची. बॅंकेतून कर्ज भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हीडंड फंड) तारण दाखवून मिळेल असे समजताच चौकशी केली, ५०० रियाल करता कंपनीच्या विभाग प्रमुखाचे विरोध नसल्याचे पत्र आवश्यक होते. गंमत बघा पैसे माझे पण त्याचे मी काय करायचे हे कोणीतरी दुसरा ठरवणार. तसेच झाले २६ वर्षाच्या पदवीधर विभाग प्रमुखाने मला भविष्याची काळजी नाही, माझ्या कुटुंबाचा विचार मी करायला हवा असे सांगत पत्र देण्याचे नाकारले. मी - "फालतू उपदेशाकरता आलो नाही, माझ्या मुलांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून त्याचे योग्य ज्ञान मला आज असणे आवश्यक आहे. निवृत्ती नंतर हे ज्ञान मिळवण्याची मला आवश्यकता नसेल, महत्त्वाचे म्हणजे मुले मोठी झाल्यावर माझ्या कडून काही ज्ञान मिळवण्याच्या मनस्थितीत नसतील ह्याची मला खात्री आहे. पत्र देणार की नाही एवढेच अपेक्षित आहे." तो माझ्या वर भडकला होता.
दैवाने साथ दिली, एका अमराठी मित्राने माझ्यावर विश्वास दाखवला, मला ५०० रियालकाढून दिले. जेव्हा जमतील तेव्हा द्यायचे, अट फक्त एक रकमी देण्याची होती.

नशीब हे शिकलो - भाग ४३ 29/11/09
मला व बायकोला पहाटे उठून दोन्ही मुलांना बघताना हसायला यायचे मोठ्याचा डावा तर लहानाचा उजवा अंगठा तोंडात असे, तसे छायाचित्र मी घेऊन ठेवले आहे. चलचित्र ग्राहकाचा ( व्हिडिओ कॅमेरा ) उपयोग व प्रयोग करण्या करता दोन्ही मुले व त्यांच्या दैनंदिन हालचाली व खेळ हे माझे विषय बनले. घरात येणार्‍या (मित्रांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रीकरण करणे हा माझा अभ्यास व ध्यास होता. ह्यातून मला चग्रा (व्हिडिओ कॅमेरा) वापरण्याचा आत्मविश्वास मिळाला. मी व्यावसायिक कामे घेणे सुरू केले. दोन महिन्यात ५०० रियाल जमवले व ज्या अ मराठी मित्राने चग्रा घेण्यास मदत केली होती त्याला ५५० रियाल परत केले. एक दिवस मुद्दाम कंपनीत मी विकत घेतलेला चग्रा माझ्या विभाग प्रमुखाला दाखवायला घेऊन गेलो, त्यानेच माझेच पैसे मला मिळण्याला नाकारले होते. त्याला अभिमानाने सांगितले, मित्राने मदत केली त्याला ५०रियाल जास्तीचे देऊन मिळालेल्या पैशाने परतफेड करू शकलो होतो व एक चांगला चलचित्रकार म्हणून माझी ओळख बनवू शकलो होतो.

चलचित्राचे संपादन, शीर्षक, ध्वनिग्रहण, प्रकाश योजना वगैरे आत्मसात करण्याच्या मागे लागलो. दिवसभर कंपनीचे काम करायचे व संध्याकाळ झाली की माझा हा अभ्यास सुरू होत असे. सर्वप्रथम वीजक प्रतिमा - वीप्रत (इलेल्ट्रॉनिक इमेज) निर्माणप्रक्रियेचा व पद्धतीचा महत्त्वाचा अभ्यास मी केला. वीप्रतचे तीन प्रकारआहेत, पॅल, एन्टीएस्सी व सेकॅम. पॅल पद्धत भारत, ब्रिटन, आखाती व इतर देशात वापरात आहे. ह्या पॅल पद्धती प्रमाणे एक वीप्रत ६२५ आडव्या रेघांची एक चौकट असते अशा २५ चौकटी दर सेकंदाला दाखवण्याने चलचित्र (व्हिडिओ)तयार होते. चलचित्रा बरोबर ध्वनी मुद्रण व्यवस्था व उपकरणांचा पण अभ्यास केला. चग्रा (व्हिडिओ कॅमेरा), चलचित्र मुद्रक (व्हीसीआर) ह्यात दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, एक व्यावसायिक प्रक्षेपण - व्यप्र - (ब्रॉडकास्टक्वालिटी) उत्तम दर्जा असणारे व दुसरा प्रकार छंद / उपभोगता - छउ - (हॉबी / कंझ्युमर क्वालिटी) दुय्यम दर्जा असणारे. मी लग्न - वाढदिवस वगैरे चित्रणापेक्षा व्यावसायिक चलचित्र फिती बनवण्यात जास्त लक्ष घातले. त्याचकाळात निकॉन एफ ४०१ प्रग्रा (स्टिल फोटो कॅमेरा) विकत घेतला. मला एकचल चित्रकार (व्हिडिओग्राफर) व स्थिरचित्रकार (स्टिल फोटोग्राफर) म्हणून काम मिळणे सुरू झाले.

१९८८ ला मी, दोन्ही मुले व बायकोसिंगापुरला तीन दिवस / रात्र प्रवासाला गेलो तो एक वेगळाच अनुभव होता.ह्याचे कारण मी इराण मधून बाहेर पडताना आमच्या दिघांची खुली तिकिटे तेहरान- मुंबई - सिडनी - तेहरान विकत घेतली होती त्याची परतफेड इराण मधल्या क्रांतीमुळे फार लांबली होती, पण मी ती तिकिटे फार जपून ठेवली होती. त्या तिकिटांची परतफेड एअर इंडियाच्या एका अ मराठी अधिकार्‍याने मला सात वर्षानंतर मिळवून दिली होती. त्याची ही मदत मी जन्मभर विसरणार नाही. ते पैसे न घेता मी मस्कत - मुंबई - सिंगापूर - मस्कत अशी चार नवीन तिकिटे घेतली होती. मी भारतात पाच वर्षा नंतर परतलो होतो. दोन दिवस पुण्यात राहून सिंगापूरला गेलो. बायको मुले फार आनंदात होती. स्वच्छ रस्ते, प्रेक्षणीयस्थळे बघण्यात तीन दिवस कसे संपले कळलेच नाही. तिथल्या हॉटेल जवळ पाण्याचे पाइप बदलण्याचे काम सुरू होते ते काम बघायला आम्ही मुद्दाम गेलो होतो. आपल्या कडे ९० अंशात रस्ता पाचसहा मजूर कुदळीने खोदायला सुरुवात करतात त्यातील बेशिस्त कामाच्या तुलनेत ते सिंगापुरी काम फारच उच्च दर्जाचे, शिस्तबद्ध होते.

वाहनांची रहदारी बंद केली होती. फळ्यावर कितीवेळाने रस्ता वाहतुकीला खुला होईल ते लिहिले होते. मुळात फक्त तीन कामगार होते. एक यांत्रिक कुदळ / फावडा चालवणारा चालक होता. दुसरे दोघे रस्त्याच्या दोन विरुद्ध बाजूने गोल तबकडी करवतीने ३० ते ४० अंशात रस्ताकापीत होते. त्याचे कारण कोणत्याही क्षणी वाहनाचे एकच चाक त्या नवीन दुरुस्ती केलेल्या खड्ड्यावरून जाणार होते. त्यामुळे वाहनाला व रस्त्याला बसणारा धक्का टाळता येतो. त्या तुलनेत आपल्या कडे रस्ता डांबरी झाला की महिन्याभरात तोडफोड मंडळी कामाला लागतात व नव्याने साफ झालेल्या रस्त्याला कमरतोड खड्डे तयार करून शहरी रस्त्याला खेड्याचा दर्जा प्राप्त करून देण्याचे सत्कार्य पार पाडतात. ह्या रस्ते विभागाचे व दवाखान्यांचे तसेच वाहन उत्पादकांचे कंत्राट असावेत ह्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, तीन तासानंतर आम्ही पुन्हा सिंगापुरी रस्ताकाम बघायला गेलो, काम संपलेले होते, साफसफाई चालू होती. रस्ता मूळ रस्त्याशी एकजीव झाला होता, फक्त रंगवेगळा, नवीन असल्याने दुरुस्ती झाल्याची खूण दिसत होती. ती सिंगापुरी जमात किती सुदैवी होती. असे रस्ते भारतात करायला किती पिढ्या लागतील हा हिशेबकरण्याचा वेडेपणा मी केला नाही.

सिंगापूरला गेलो ते फक्त मजाकरायला नव्हे. ५ इंचाचा रंगीत जेव्हीसी दु.चि.संच (टीव्ही) घेतला त्याचा उपयोग चलचित्र ग्रहण करीत असताना फार उपयोगी ठरतो. रंगसंगती, चित्र चौकट, आवाज पातळी व आवश्यक प्रकाश ह्या गोष्टींचे निरीक्षण करणे सोपे होते. तो जेव्हीसी दु.चि.संच घेताना एक गोष्ट समजली. जेव्हीसी कंपनीतले खराब ठरलेले संच बाहेर दुरुस्ती करून विक्रीला बाजारात आणतात, हे समजण्या करताव स्तूच्या मागील वा खालच्या भागाला लहानसे माहिती पत्रक असते, त्यावर उत्पादन क्रमांक असतो तो मिटवून त्यावर एक असंबद्ध क्रमांक चिकटवलेला असतो, तोच दुय्यम दर्जा दर्शक असतो. मी घेतलेला दुचिसंच असाच दुय्यम दर्जाचा होता. पण त्याचे कार्य मूळ संचा सारखेच होते. पण मूळ किमतीच्या निम्मी किंमत मी दिली होती. मी माझ्या निकॉन प्रग्रा + फेर भिंग (कॅमेरा+ झूमलेन्स) करता एक सुरक्षा पिशवी शोधत होतो. एका दुकानात ४०० डॉ. तर पाचव्या दुकानात तीच पिशवी १२५ डॉ. ला मिळाली. मी मात्र अजून पुढे गेलो नाही, कदाचित दहाव्या दुकानात पिशवी बरोबर अजून एखादी वस्तू मोफत मिळाली असती. (बाय वन गेस वन + गेट वन) मला त्या संपूर्ण बाजारात अशा प्रकारची फसवणूक प्रत्येक दुकानातून आढळली.
मनसोक्त चल / छाया चित्रणकरून आम्ही भारतात परतलो. तोच प्रकार मी मुंबई, पुणे व माझे जन्म गाव ह्याठिकाणी केला व मस्कतला परतलो.

नशीब हे शिकलो - भाग ४४ 1/12/09
मस्कतला परतल्यावर चलचित्रणाचे एक चांगले काम मिळाले. विजेच्या कमी दाबाच्या तारा (लो व्होल्टेज केबल) बनवणार्‍या कंपनीच्या उत्घाटन समारोहाचे चित्रीकरण करायचे होते. त्यामुळे संबंधीत अधिकार्‍याची चांगली ओळख झाली. चित्रणात बर्यार्‍या त्रुटी होत्या त्यामुळे संपादनाचा चांगला अनुभव मिळाला. कारण बर्‍याच जागी चग्रा (व्हिडिओ कॅमेरा) फार हालला होता. यंत्र साधनांच्या काही महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण झाले नव्हते. तसेच काही ठिकाणी तोंडी माहिती देण्याची आवश्यकता होती. हे सगळे व्यावसायिक चलचित्र ग्राहकात सहज करता येते, परंतु माझ्या त्या साध्या चलचित्र ग्राहकाने व मुद्रण उपकरणाने हे सगळे घडवून आणणे फार घाम काढू झाले होते. पण फार मोलाचा अनुभव मी मिळवला.

पुन्हा काही कारणाने घर बदलावे लागले. ह्या घरात आम्ही चौघेच होतो. ह्या जागेत असताना खूप बर्‍या वाईट प्रसंगांना तोंड देण्याची कला व सामर्थ्य मला मिळाले. सर्व प्रथम एका मराठी मुंबईकराने फसवले, एका नवीन बांधलेल्या इमारतीचा जाहिराती करता छायाचित्रे काढायला लावली, ति चित्रे संबंधित मालकाला दाखवून आणतो म्हणून घेऊन गेला. दोन दिवसाने सगळी चित्रे परत केली, त्या मालकाला आवडली नसल्याचे खोटे कारण सांगून त्या चित्रांचे पैसे दिले नाही. दुसर्‍याच दिवशी माझेच चित्रे वापरून त्या इमारतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. मला भांडण करून काही फायदा झाला नाही. त्या नंतर एका बंगाली बाईने जाहिराती करता चित्रे मागितली थोडे पैसे दिले तितकीच चित्रे मी तिला दिली. ह्या वेळेला मी सावध होतो. ह्याच काळात मी निकॉन एफ ८०१ प्रग्रा (कॅमेरा) घेतला. एका पुणेकराने मला फार मोलाची मदत केली. त्याच्या कंपनीच्या औषधाच्या लहान मोठ्या बाटल्या, गोळ्यांची आकर्षक चित्रे काढून हवी होती. त्यात अट अशी होती की १ इंचाच्या बाटलीचा अथवा लहानशा गोळीचा फोटो १२ इंचाचा हवा होता, बाटलीवर लिहिली माहिती रेखीव व सुस्पष्ट असणे आवश्यक होते. त्या करता लागणारे विशेष भिंग माझ्याजवळ नव्हते. मी निकॉन विक्रेत्याकडे गेलो त्याच्या परवानगीने एक ७५ - ३०० चे फेरभिंग (झूम लेन्स) माझ्या एफ ८०१ प्रग्राला जोडले व त्या भिंगाच्या समोर एक जवळून मोठे - जमो - भिंग (क्लोजप लेन्स) जोडले. त्याच दुकानातील एक इंचाच्या अत्तराच्या बाटलीची प्रतिमा चाचणी केली, ति प्रतिमा सव्वा इंचाच्या प्रतिमा फितीच्या संपूर्ण मापात बरोबर दिसत होती.
मी काय करत होतो ते जाणून घेण्याची उत्सुकता त्या निकॉन विक्रेत्याला होती, मी जो प्रकार केला होता त्याचे त्याला कौतुक वाटले, आम्ही दोघे चांगले मित्र झालो. त्या अत्तराच्या बाटलीचे ए४ चित्र मी छापून औषध कंपनीवाल्या मित्राला दाखवले, मग एक करार केला की त्याच्या कंपनीने मला ती भिंगांची जोडणी विकत घेण्या करिता ४०० रियाल रोख द्यायचे व मी ३० चित्र त्यांना काढून द्यायची, नंतरच्या प्रत्येक चित्राचे २० रियाल हिशेबाने पैसे मिळतील. ति भिंग व्यवस्था अजून माझ्या जवळ आहे. ओमानच्या १९ वर्षाच्या वास्तव्यात त्या भिंग योजनेचा वापर करून मी सुमारे १०,०००रियाल कमावण्यात यशस्वी झालो. त्या निकॉन विक्रेत्याचे व पुणेरी मित्राचे मन:पूर्वक आभार, ह्यांनी वेळोवेळी मला खूप मदत केली.

मस्कत मधल्या पहिल्या कंपनीत मी सकाळी आठ तास काम केल्यावर चित्रणाची ही कामे सांभाळत होतो. आंतर्राष्ट्रीय कंपन्यांचे विक्री विभाग असलेल्या एका संस्थेतील अजून एका मराठी बांधवाने त्याच्या कंपनीचे चलचित्रण जाहिरातीचे महत्त्वाचे काम मला मिळवून दिले. दोन महीने हे काम चालू होते. ह्या कामा करिता त्या कंपनीतल्या एका इंग्रज बाईने पटकथा तयार केली होती. त्या पटकथेतील बर्‍याच गोष्टी चलचित्रणाच्या माध्यमात न बसणार्‍या होत्या त्या त्रुटी नीट करताना पटकथा कशी असावी ह्याचा चांगला अनुभव मला मिळाला. ते काम करीत असताना एकदा भर रहदारीत तिपाईवर (ट्रायपॉड) लावलेला प्रग्रा माझ्या चुकी मुळे घसरून पडला, त्याचे बरेच तुकडे झाले. काम थांबू नये म्हणून "एसव्हीएचएस" पद्धतीचा नवीन प्रग्रा हप्त्याने घेतला. विक्रेत्यांशी बाळगलेले चांगले संबंध कामी आले."एसव्हीएचएस" पद्धतीने चलचित्रणाचा दर्जा खूप चांगला होता. ह्याचे कारण वीजक प्रतिमा ग्रहण( इलेक्ट्रॉनिक इमेजींग ) पद्धतीत झालेला बदल. सामान्य पद्धतीने प्रतिमा उजेड (वाय इन्फो) व रंगाची (सि इन्फो) माहिती एकत्र केली जाते, परंतु "एसव्हीएचएस" पद्धतीने ती माहिती वेगळी ठेवून वेगळीच मुद्रित होते.

त्याच काळात आमच्या कंपनीने मुंबईहून एक अनुभवी प्रशिक्षकाला सेवा प्रशिक्षण शिबीरा करता आणले होते. त्या प्रशिक्षणात माझ्या सकट ७ व्यक्ती विक्रेते व तंत्रज्ञ, ह्यांना फार चांगले गूण मिळाले व प्रशस्तिपत्रे दिली होती. दोन महिन्या नंतर आम्हा ७ जणांना कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला. त्या प्रशिक्षणाचे चलचित्रीकरण मी केले होते त्याचे पैसे मला मिळाले तेव्हा कंपनीच्या केरळी नालायक कॅशियरने मला पैसे देताना फसवले. ३७५ रियाल च्या पावती वर कंपनी प्रमुखाची स्वाक्षरी होती मला स्वाक्षरी करायला सांगितले, माझ्या पुढे असणार्‍या मित्राला २०० रियाल दिले मला देताना पैसे कमी असल्याचे सांगून दुसर्‍या दिवशी देण्याचे आश्वासन दिले. दुसर्‍या दिवशी जाऊन बघतो तर ३७५ चे १७५ झाले होते आकडे व अक्षरी बदल त्याने केला होता. जोरदार भांडण झाले हात चलाखीने त्याने २०० रुपये उडवले होते. मला चुपचाप १७५ रियाल मान्य करावे लागले. मी ती कंपनी सोडली, पुढे दोन वर्षानंतर कळले की मला फसवणारा फक्त कॅशियर नव्हता तर त्यावेळचा गुजराथी कंपनी प्रमुखाचा त्यात हात होता, कसे ते पाहू या पुढील भागात.

नशीब हे शिकलो - भाग ४५ 5/12/09
माझे छाया चित्रण चांगले होते हे माझ्या त्या कंपनीच्या गुजराथी प्रमुखाला माहीत होते. त्याने मला त्याच्या घरी बोलावून नव्याने केलेल्या घर सजावटीची (घर-सजावट कंपनीचे होते) छायाचित्रे काढायला बोलावले होते. ३६ चित्राची ३ रिळे संपली, त्याचा छपाईचा खर्च त्या प्रमुखाने दिला. २ महिन्या नंतर - हॅपी होम - नावाचे ब्रिटिश मासिक वाचताना मी काढलेले ते फोटो मला दिसले. छायाचित्रकार म्हणून व त्याने न केलेल्या घर सजावटीचे वर्णन त्या प्रमुखाने स्वत:चे नाव लावले होते, सगळेच खोटे. त्यामुळे अशा प्रत्येक प्रसिध्दी मिळणार्‍या ह्या धेंडांच्या कोणत्याही वाक्याची / कामाची मला नेहमी शंका असते. असेच विचार मी कंपनीत बोलून दाखवले होते.

त्या प्रमुखाने अजून बराच मोठा हात मारला होता. कंपनीचा दर आठवड्याला आयात होणारा माल बोटीतून उतरवून कंपनीत आणायला एक ट्रक + ४ मजूर वापरायचे पण ३ - ४ ट्रक व १० मजुरांचा खर्च दाखवून तो खिशात घालण्याची "हुशारी" त्याने दाखवली होती. हे त्या मजुरांनी मला सांगितले होते. कदाचित हा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम असावा कारण असे काम करण्याचा जणू परवानाच ह्या उच्च पदस्ताना दिलेला असतो, त्यातले काही उपयोग करायचे विसरत असावेत, इतक्या मोठ्या पुस्तकांतून काही पाने वगळली जात असावीत.

माझी नोकरी सुटलेली होती, १ महिन्याच्या सूचनेचा उपयोग करून मी ओमानला काम करण्याचा दुसरा परवाना मिळवला. बायको व मुलांचा राहण्याचा परवाना सहा महिन्या नंतर बदलणार होता. छाया / चल चित्रणाच्या व्यवसायातून घर चालवणे सहज शक्य होते, तसा सवलत असलेला परवाना मिळवणे फार आवश्यक होते. एकाच्या ओळखीने तसा परवाना मिळाला परंतू परवाना देताना मध्यस्ती जास्त पैशाची मागणी करू लागला. मी थोडा वेळ मागून घेतला व मूळ परवाना देणार्‍या मालकाचा शोध सुरू केला. एका हॉटेल मालकाशी आमची चांगली ओळख झाली होती त्याला माझी परिस्थिती समजवून सांगत असताना मूळ मालकाचे नाव मी सांगितले योगायोग असा की त्याचाही परवान्याचा मालक तोच माणूस होता. त्याने त्याच्या घरचा पत्ता दिला. मी बायकोला घेऊन त्याच्या घरी गेलो व त्याला वस्तुस्थिती समजावून सांगितली. मध्यस्ती करणार्‍या माणसाने त्याला फसवले हे त्याला समजले. त्या मालकाने माझे काम फार कमी पैशात करून दिले, तो माणूस विमान तळाच्या सुरक्षा पोलीस दलात काम करत होता. मध्यस्ती करणार्‍याला ते सगळे समजल्यावर त्याने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली व दुसर्‍या दिवशी तो रस्त्यावर अपघात घडवणार होता. त्याचे बोलणे आम्ही ध्वनी मुद्रण सोय असलेल्या फोन वर मुद्रित केले होते. मी ते परवाना देणार्‍या त्या पोलिसाला ऐकवले. त्याने मध्यस्ति करणार्‍याला माझ्या घरी बोलावले होते. मध्यस्ति बायकोला घेऊन आमच्या घरी आला, तो एक गुजराथी होता. ध्वनी मुद्रण ऐकताच आमचे पाय धरून रडायला लागला. त्या मालकाने ती ध्वनी फीत स्वत:च्या खिशात ठेवली व त्या मध्यस्ति माणसाला बजावले. आम्हा चौघांना काही झाले तर त्याला व त्याच्या बायकोला तुरुंगात पाठवायला ति फीत उपयोगी ठरेल.

पोलिस मित्राची बायको माझ्या बायकोची मैत्रीण झाली. त्याच्या ओळखीने छाया / चल चित्रणाची नवीन कामे मिळाली. त्या कामातून पैसे जमवून मी एक ब्रोनीका एस्क्युए प्रतिमा ग्राहक - प्रग्रा - (कॅमेरा) विकत घेतला. ह्या प्रग्राचे प्रत्येक भाग सुटे करता येतात व आवश्यकते नुसार जोडता येण्याची सोय असते. ६ से. मी. चौकट असलेले चित्र रीळ ह्यात वापरतात. हे चित्र रीळ एका छोट्यापेटीत (फिल्म बॅक) ठेवण्याची व्यवस्था असते. ही पेटी काढघाल करता येते. मी तशा दोन पेट्या विकत घेतल्या. बदलता येणारी तत्काळ ६ से. मी. चौकट चित्र प्रतिमा तयार करणारी छपाई कागद पेटी (पोलरॉईड बॅक) मी विकत घेतली. तत्काळ प्रतिमा छपाईमुळे छायाचित्रातील उजेड व रंग ह्यात होणारे बदल व अपेक्षित परिणाम ह्यांची तपासणी काही क्षणात सहज करता येते. ११० मी.मी. चे जमो - जवळून मोठे - (मॅक्रो लेन्स) व ४५ मी.मी.चे रुंद कोनी (वाइड ऍन्गल) असे दोन भिंग विकत घेतले. ह्या प्रग्रा संचाने मी छायाचित्राची बरीच मोठाली कामे केली. ह्याच प्रग्राला चित्रफीत पेटीच्या जागी नव्याने तयार केलेली २५ ते ५६ दशलक्ष चित्रपेशींची (मेगा पिक्सेल्स) डिजीटल पेटी आज बाजारात उपलब्ध आहे, पण २ ते ५ लाख रुपये मोजावे लागतात म्हणून मी अजून विकत घेऊ शकलो नाही.

त्या पोलिसवाल्या परवाना मालकाचा नातेवाईक माझ्या कामात त्रासदायक ठरू लागला व सुदैवाने सुक्ष्मचित्र फीत सेवा (मायक्रोफिल्म) कंपनीत सेवा प्रमुखाची नोकरी चालून आली. त्या कंपनीत काम करण्याचा परवाना मिळण्या करता तेव्हाच्या त्या पोलिसवाल्या परवाना मालकाला ८०० रियाल द्यावे लागले. थोडक्यात नवीन परवाना विकत घ्यावा लागला. - क्रमश: -

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

पक्या's picture

3 Feb 2010 - 4:03 am | पक्या

जबरदस्त अनुभव.
प्रतिसाद काय द्यावा तेच कळत नाही.

एवढी सुंदर लेखमाला असताना वाचक प्रतिसाद अगदीच मोजके किंवा नाहितच असे का व्हावे?

जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

3 Feb 2010 - 4:33 am | शुचि

पहील्यांदा म्हटलं प्रतिक्रिया वाचू.

हा लेख आत्मकथन आहे का? वाचून तर असच वाटतं.

खूपच ओघवत्या शैलीमध्ये वर्णन केलेलं आहे. शेवटचा "अपघात घडवून आणण्याचा" अनुभव चित्तथरारक आहे.

पहीलं संवेदनशीलतेचं कथन छान आहे आणि रानडे आपण खरोखर एक अभ्यासक या दृष्टीने "विथ रॅशनल माइंड" पाहीलेलं आहे

बाकी मला कंटाळवाणं वाटलेलं म्हणजे- तान्त्रिक माहीती "वीप्रतचे तीन प्रकारआहेत, पॅल, एन्टीएस्सी व सेकॅम ........"

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

विनायक रानडे's picture

3 Feb 2010 - 6:54 pm | विनायक रानडे

मी माझा अनुभवलेला भुतकाळ शब्द बध्द करावा असे माझ्या मोठ्या मुलाला वाटले. मूळ इंग्रजीतून सुरुवात केली होती. मराठी चार शब्द लिहिण्याचा मला सराव नव्हता हे, सगळे ऑगस्ट २००९ पासून प्रयत्न केला आणि सुरु झाले. मी एवढे करू शकतो ह्याचाच मला आनंद आहे. त्यात तुमचे प्रतिसाद वाचून जास्त आनंद मिळतो.

सहज's picture

3 Feb 2010 - 7:00 am | सहज

वाचतो आहे.

अनुभवकथन आवडत आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2010 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो.

सहगल्फकर बिपिन कार्यकर्ते

स्वाती२'s picture

3 Feb 2010 - 6:09 pm | स्वाती२

आवडले.

चित्रा's picture

4 Feb 2010 - 9:26 am | चित्रा

प्रत्येक व्यक्ती जन्माने संवेदनक्षम असते त्याची पातळी व दर्जा कमी करणारे प्रामुख्याने पालकच असतात, त्यानंतर एक एक मंडळी आपापल्या परीने हातभार लावतात.

हम्म. खरे आहे असेच म्हणावे लागते.

सनविवि's picture

6 Feb 2010 - 7:59 am | सनविवि

हा भाग ही आवडला!

भारतीय लोकांनीच तुम्हाला जास्त त्रास दिला हे वाचून विचित्र वाटलं :|