नशीब भाग - ६४

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
11 Oct 2010 - 10:08 am

आमच्या नवीन पत्रिका तयार झाल्या (भाग ६२). त्या बाई आमचे घर व घराची रचना बघण्या करता आमच्या घरी आल्या. त्यांनी आम्हाला वास्तू शास्त्राची कल्पना दिली. त्या माहिती नुसार आमच्या घरातील वास्तू दोषाने आमचे बरेच नुकसान झाले होते व होणार असे त्यांना जाणवत होते. ह्या वास्तू शास्त्राची माहिती त्या आधी दोन पुस्तकांचे PDF रुपांतर करताना मला मिळाली होती, परंतु त्या बाईंनी ते दोष दूर करण्याचे जे साधे उपाय सांगितले ते करून बघायला मी तयार झालो. प्रत्येक खोलीच्या चार कोपर्‍यात थंड पेयांच्या बाटल्या नळाचे पाणी भरून ठेवायचे. बरोबर पाच दिवसाने ते पाणी हात धुण्याच्या जागी रिकामे करायचे व पुन्हा ताजे पाणी भरून ठेवायचे हे शक्य आहे तितके दिवस करायचे होते. आम्हा चौघांच्या त्या काळातील ग्रह रचनेचे परिणाम व आमच्या राशींचा पाण्याशी संबंध असल्याने वास्तू दोष दूर करण्यास मदत होणार असे त्यांचे मत होते. महिन्या भरात त्याचा थोडा बदल जाणवू लागला होता.

लहान मुलगा नवीन शाळेत रमला होता. त्याची चिडचिड कमी झाली होती. मोठ्या मुलाला नवीन काम मिळायला सुरू झाले. मी व मुलाने केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नव्हता दोन तीन महिने सारख्या चक्रा मारणे आवश्यक ठरले. एवढे करून हप्त्याने पैसे मिळत होते. त्यामुळे ओमानला असताना बॅंकेत जमवलेल्या रकमेला गळती लागली होती. आमच्या "चिंतकांनी" त्याचे कारण आमच्या परदेशीय राहणीमानाची सवय असे दाखवण्याचा खूप प्रयत्न केला. ज्या दवाखान्यात मी गुडघ्यांचे ऑपरेशन व्हिडिओ बनवले होते (नशीब भाग ६०) तिथेच एक पाठीच्या कण्याचे ऑपरेशन ठरले ते व्हिडिओचे काम मला मिळाले त्यात एका १७ वर्षाच्या मुलीच्या पाठीच्या कण्याचे ऑपरेशन होते. ती मुलगी जन्मा पासून ९० अंशात वाकलेली होती, तिला ह्या ऑपरेशनने सरळ करणार होते. सकाळी सहा पासून मी त्याची तयारी केली. माझा सोनीच DSR PD1 कॅमेरा एका लांब दांड्यावर लावून डॉक्टरांच्या डोक्यावरून नीट फिरवता येईल असा तयार ठेवला.  त्या व्हिडिओचा हा नमुना. ते वर्ष होते २००२ चा नोव्हेंबर महिना.

२००२ पर्यंत माझ्या मुलाला अ‍ॅपल संगणक पध्दती अतिशय आवडती होती (आजही तितकीच आवडती आहे). त्यामुळे त्याने विंडोज किंवा लायनक्स पध्दतीचा कधीच विचार त्याने केला नव्हता. पण भारतात बोटा वर मोजता येण्या इतपतच अ‍ॅपल संगणक पध्दती समजणारे त्याला मिळाले होते म्हणून त्याने युनिक्स, विंडोज व लायनक्स पध्दतीचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे एक नवीन मित्र मिळाला. त्याने एका संस्थेचे व्हिडिओ स्ट्रिमींग व ईमेल सर्व्हर बनवण्याचे काम दिले. त्या सर्व्हरची जुळणी मुलाने लायनक्स पध्दती करता तयार केली होती. सर्व्हरचे नियंत्रण मात्र छान तयार केले होते.

आम्ही पाठीच्या कण्याचे ऑपरेशन व्हिडिओ केले होते त्याच दवाखान्यात एन्जीओ प्लास्टी विभागात ती उपकरणे पुरवणार्‍या एका कंपनीच्या मालकाशी ओळख झाली. त्याला मी तांत्रिक भागातील काही योजनांच्या जुळणीत मदत केली. माझ्या मोठ्या मुलाने त्या मालकाला संगणकातील योजना जुळणीत मदत केली. ह्यात पैशाचा व्यवहार कुठेच नव्हता. आमचा अनुभव व क्षमता संबंधितांना समजावी म्हणून ही कामे आम्ही सुरू केली. मुलाने MRI, CT scan व क्ष किरण प्रतिमांचा अभ्यास सुरू केला. प्रत्येक कंपनीच्या क्ष किरण प्रतिमा प्रक्रिया / संपादन योजनेस त्याच कंपनी कडून संगणक व साधने विकत घेणे आवश्यक होते. वेगवेगळ्या कंपनीच्या प्रतिमांचा एक संच करणे शक्य नव्हते. एका कंपनीच्या संगणकातील त्या प्रतिमा दुसर्‍या कंपनीच्या संगणक पध्द्तीत दिसत नव्हत्या. वेगवेगळ्या दवाखान्यातून येणार्‍या रुग्णांच्या प्रतिमांचा अभ्यास करणे शक्य नव्हते. क्ष किरण प्रतिमा प्रक्रिया व संपादन PACKS संपादन पध्दत फक्त सिमेन्स उपकरणा करता उपलब्ध होती. माझ्या मुलाने PACKS प्रतिमा संपादक प्रणालीत नवीन बदल करून कोणत्याही संगणकावर कोणत्याही पध्दतीची क्ष किरण प्रतिमा संपादन करून दाखवले. त्या संपादन पध्दतीला मान्यता मिळण्या करता जर्मनीत जाऊन वेगवेगळ्या चाचण्या करून घेणे आवश्यक होते.

जर्मनीत जाण्याची संधी आली. नवीन साधने बसवण्याचे काम त्या कंपनीला मिळाले होते. त्या नवीन साधनांच्या प्रशिक्षणाकरता माझ्या मुलाला जर्मनीला नेण्याचे त्या मालकाने ठरवले. पण कोणत्याही प्रकारचा करार न करता व्हिसा मिळवण्या करता एक साधे पत्र देण्यात आले. तीन महिन्याचा व्हिसा मिळाला होता. त्यामुळे १० दिवसाचे प्रशिक्षण संपल्यावर मुलाने PACKS प्रतिमा संपादक प्रणालीचा शोध सुरू केला. त्या कंपनीने मुलाला जर्मनीत राहण्याची परवानगी दिली. मुलाने २००० साली कोलोन येथील फोटोकीना ह्या जागतिक प्रदर्शनीला भेट दिली होती तेव्हा त्याला अ‍ॅपल संगणक कंपनीचे मित्र मिळाले होते त्यांच्या मदतीने त्याने अ‍ॅपल संगणक मदत केंद्र सुरू केले व त्यांच्या मदतीने सहा महिन्याचा जर्मनीत राहण्याचा नवीन परवाना मिळवला. पण त्यानंतर त्याला भारतात परतावे लागले होते.

तंत्रअनुभव