'सिद्धार्थ' आणि शशी कपूर
(आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. )
मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'.
नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला.
तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो.... आणि मग त्याला येत गेलेले अनुभव, आणि शेवटी त्याला उमगलेले सत्य, असा सगळा प्रवास या चित्रपटात टिपला आहे.
यात आधी सिद्धार्थची गतानुगतिकता, मग बंडखोरी, मग वेगवेगळे प्रयोग, मग वैफल्य येऊन ऐहीकाचा उपभोग, त्यातला फोलपणा लक्षात यायला वेळ लागत नाहीच, परत एकाकी मार्गक्रमण, गौतम बुद्धाची भेट, तिथून मग सर्वांप्रती प्रेम आणि सर्व चराचरात चैतन्य पाहण्याची दृष्टी प्राप्त झालेला वृद्ध सिद्धार्थ! दिडेक तासात हा प्रचंड मोठा प्रवास प्रेक्षकांची दमछाक करतो.
यात शशी कपूरने साकारलेली सिद्धार्थची भूमिका कायम लक्षात राहिली. उत्सुकतेने घराबाहेर पडू पाहणारा तरुण सिद्धार्थ ते Everything changes. Like a river everything returns हे आत्मभान आलेला वृद्ध सिद्धार्थ त्याने ज्या सहजतेने रंगवला आहे, त्याला (माझ्यापुरती) तोड नाही. लौकिक आणि पारलौकिक जगातला आत्मसंघर्ष रेखणे, ते आपल्या सूचक अभिनयातून चित्रपटभर सहज दाखवत राहणे यासाठी जे काही 'उमजावे' लागते, ते या अभिनेत्याला उमगले होते. ही उमज त्याच्या अवघ्या व्यक्तिमत्वातून प्रतिबिंबित होत राहते. कुठेही underplay नाही, कि overacting नाही. त्याच्या संयत अभिनयाचा सुंदर आविष्कार म्हणजे हा चित्रपट.
पण दुर्दैवाने, हा चित्रपट त्यातल्या काही nude scenes मुळे भारतात 'वाईट' ठरला, तर काही बुद्धिवाद्यांनी हा चित्रपट Western centric म्हणत त्याला जमेस धरले नाही. काही कलाकृतींचे नशीब असते.
पण त्यातला शशी कपूर मात्र आजही स्मरणात आहे, राहील.
प्रेक्षकांना स्वतःत डोकावून पहायला लावणारे सिनेअभिनेते फार फार दुर्मिळ. शशी हा त्या दुर्मिळातला तारा होता.
देखण्या,हसतमुख, प्रसन्न, बुद्धिमान, अभ्यासू, नाटकासाठी तळमळीने काम करणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या या कलावंताची exit मनात कायम हुरहूर निर्माण करून गेली.
या कलावंतास सर्व मिपाकरां तर्फे विनम्र श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
5 Dec 2017 - 9:35 am | आनन्दा
बरं झालं लेख लिहिलाय..
शशीकपूर यांना श्रद्धांजली.
5 Dec 2017 - 12:26 pm | पद्मावति
उत्तम ओळख. 'सिद्दार्थ' विषयी माहीत नव्हतं. शशी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
5 Dec 2017 - 1:20 pm | समयांत
'सिद्धार्थ' विषयी पहिल्यांदा वाचलं इथे. लिंक असेल का, बघायला?
शशीजींना आदरांजली.
5 Dec 2017 - 2:15 pm | एस
'सिद्धार्थ' वॉज अ माईलस्टोन! शशी कपूर यांना विनम्र श्रद्धांजली!
5 Dec 2017 - 2:39 pm | मित्रहो
शशीकपूर यांना श्रद्धांजली !!
सिद्धार्थ बघितला नाही . शशीकपूरने निर्मता म्हणून जे सिनेमे केले ते सुद्धा उत्तम होते. आणि पृथ्वी थियेटर
श्रद्धांजली
5 Dec 2017 - 5:14 pm | स्मिता.
शशीकपूर यांना श्रद्धांजली !!
सिद्धार्थ हे पुस्तक वाचलंय पण चित्रपट बघितला नाही, खरंतर तो आहे हेच आतापर्यंत माहिती नव्हतं. आता चित्रपट शोधून नक्कीच बघेन.
9 Dec 2017 - 11:33 pm | अँड. हरिदास उंबरकर
सिद्धार्थ नक्की बघणार... असा चित्रपट आहे हे आता समजल.. माहितीच नव्हती याची..
9 Dec 2017 - 11:35 pm | अँड. हरिदास उंबरकर
सिद्धार्थ नक्की बघणार... असा चित्रपट आहे हे आता समजल.. माहितीच नव्हती याची..
9 Dec 2017 - 11:40 pm | मारवा
हर्मन हेसे चा सिद्धार्थ अनेकदा वाचलाय
व प्रत्येक वेळेस तो प्रचंड आवडतो
नदीच्या वर्णनापाशी अनेकदा मन घुटमळतं
हर्मन हेसेची ही महान कलाकृती आहे.
अद्वितीय अशी
10 Dec 2017 - 2:33 am | अरविंद कोल्हटकर
सिमी गरेवालच्या ओझरत्या topless दर्शनासाठी आंबटशोकी आणि उपासमार झालेल्या भारतीय प्रेक्षकांना ह्या चित्रपटाचे विशेष आकर्षण होते.
'जिना' ह्या मोहमद अली जिनांवरच्या पाकिस्तानी चित्रपटातील शशि कपूरची भूमिकाहि ध्यानामध्ये राहिलेली आहे. (ह्या चित्रपटाला IMDB चे ८.१ इतके रेटिंग आहे.)
(जाताजाता - जिनांची मुलगी दिना वाडिया ह्यांचे अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये निधन झाले,)