आज असे हा वार गुरु
महिना चालू डिसेम्बरू
सप्त तारीख कॅलेंडरू
लेखणी माझी झाली सुरु
कित्ती विशेष हा असे दिनु
सहा वर्षांतूनी आगमनु
पहा अचंबूनी जाई मनू
कवीस पुरेसे हे कारणु
टाकुनी मागे त्या 'बुधि'या
धाव धावतो हा जरीया
धाव संपवी तो 'शुक्रि'या
शब्द वाकवी मी लीलया
एकेक दिन हा महामेरू
वाटे कविता त्याची करू
बसलो घेऊन मी बोरू
हवा कागदा स्पॉन्सरु
प्रतिक्रिया
8 Dec 2017 - 9:25 am | अनन्त्_यात्री
||अठरा भार ईक्षुदंडांची लेखणी |
समुद्र भरला मषीकरुनी |
ऐशा "कविता"लिहिता धरणी
ती ही पडेल तोकडी ||
(पुढील अथक लेखनास शुभेच्छा)
8 Dec 2017 - 12:44 pm | गबाळ्या
सासरे म्हणाले - जावै बहुदा तार सुरात लिहीत जा !
8 Dec 2017 - 9:36 am | दुर्गविहारी
लोल !!!! :-)
8 Dec 2017 - 12:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
चालवावा कुरु कुरु | आपुल्या हातातील बोरु |
वाचक जरी झाला बोरु | मारावे त्यास फाट्यावरी ||
पाडावी कविता इक्षुदंडी | रचून मुहुर्ताच्या उतरंडी |
जैसी हापुस अंब्याची करंडी | मुखी लागली रेड्याच्या ||
मुहुर्त संपले जर कॅलेंडरी | मग पकडावा शेतकरी |
लोळत गाद्या गिर्द्यांवरी | व्यथा त्याची जाणावी ||
कधीच गिरणी नये थांबवू | पीठ सदोदीत पाडीत राहू |
जर संपले आपले गहू | जाते कोरडेच रगडावे ||
(भयांकीत) पैजारबुवा
8 Dec 2017 - 12:31 pm | गबाळ्या
आम्हाला अजून लै अंतर कापायचंय तुमच्या सारखं झ्याक ल्याहायला.
8 Dec 2017 - 12:58 pm | खेडूत
__/\__
लोल..!
10 Dec 2017 - 1:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
11 Dec 2017 - 10:59 am | गबाळ्या
कुरु कुरु चालणारा बोरू - खूप हसलो
अंब्याची करंडी + रेडा आणि कोरडे जाते हे हि खूप आवडले.
8 Dec 2017 - 2:04 pm | अनन्त्_यात्री
चारोळी या जुनाट काव्यकन्येचे भरण-पोषण होण्यासाठी किमान एखादा विषय तरी लागतो. विषयवैविध्याच्या अभावामुळे ती हळूहळू रोडावत जाण्याची संभवनीयता भेडसावते. मात्र ||४दांडी||या नवजात काव्यार्भकाचे पोषण केवळ क्यालेण्डराची पाने खाऊन होत असलेने ते अल्पावधीतच बाळसेदार होईल याविषयी खात्री वाटू लागलेली आहे.
हे बाळ दिवसेंदिवस घातांकी श्रेणीत पापिलवार होत असलेमुळे त्याच्या बाल-लीला बघण्यासाठी एक शेपरेट खिडकी चालू करावी ही मिपा संपादक मंडळास नम्ब्र सूचना.
11 Dec 2017 - 11:00 am | गबाळ्या
||४दांडी|| :))
8 Dec 2017 - 2:10 pm | सूड
तिथीगणिक इक्षुदंड
सटीसामाशी अखंड
कविप्रतिभा उदंड
मिपाकरांसि न कळे
आता येत्या अवसेशी
कवि धरेल लेखणीशी
कविता पाडुनिया खाशी
पाहा तुमची जिरवेल
त्यासि हवेसे कारण
चतुर्थी चातुर्मास बोडण
प्रतिभेसि येइ उधाण
भरली पापे वाचकांचि
आता करावे काय
कवित्व फार उतू जाय
आवरण्याचा उपाय
आता कोणी सांगावा
=))
8 Dec 2017 - 3:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
विडंबक होता तू गत जन्मात | लागले कित्येक कवींचे तळतळाट |
म्हणौनी या जन्मी तव नशीबात | ऐशा कविता वाचणे आहे ||
यावरी उपाय काहीही नसे | प्राक्तनी लिहिलेले भोग ऐसे|
ते भोगल्यावीन सुटका नसे | मर्त्य मानवा तुझी ||
पैजारबुवा,
8 Dec 2017 - 3:51 pm | चांदणे संदीप
स्फूर्तिचा प्याला | रसांनी कॉकटेलवला |
वर समोर धरिला | तुम्हींच आधी ||
नवकवी पाहती | मनासी आपुल्या धरती |
काहीबाही रचती | कवने फार ||
द्या अजूनी कोलीत | नवकवींच्या हातात |
पहा मग गंमत | पॉपकॉर्नासी खाऊन ||
संदीप म्हणे ऐशा नरा | द्याव्या दोन पैजारा |
निघण्या तरातरा | काव्यांगणातून ||
(स.कृ.ह.घ्या.)
Sandy
9 Dec 2017 - 9:30 am | नाखु
सदैव कविवरा पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे ||धृ.||
सदा तुझ्या पुढे उभी असे इक्षा
सदैव काजळी सोडायच्या रिक्षा
मधून वाचक हे काव्यास ग्रासती
मध्येच ही प्रजा भयाण हासती
सदा धाग्यातुनी तुफान व्हायचे
सदैव कविवरा पुढेच जायचे ||१||
प्रतिसाद तुला न क्षोभ दाविती
न मोडबंधने पदास बांधती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो अजाण वैभवी
न सैन्य हे तुझे कधी हरायचे
सदैव कविवरा पुढेच जायचे ||२||
पसंत वा विरोध तुला न ती क्षिती
कशात अर्थ वा असो कुरापती
संकीर्ण काव्य हो मलिन पावले
तरी न बोरु हे कधी विसावले
न लोचनां तुवां दुखें दाटायचे
सदैव कविवरा पुढेच जायचे ||३
विशेष.सूचना : कविवर्य बापट यांची क्षमा मागितली आहे
11 Dec 2017 - 11:08 am | गबाळ्या
कोणीतरी प्रोत्साहित करणारा असायलाच हवा होता. हि गंमत एकांगी न होऊ दिल्याबद्दल धन्यवाद.
उत्तम प्रेरणा निवडली आहे आहे आणि ती चपखल विडम्बली सुद्धा आहे.
9 Dec 2017 - 11:17 am | सतिश गावडे
शनीमहात्म्य रोज वाचतो काय रे?
त्यातल्याच ओळी उचलून इथे चिकटवल्या आहेत असे वाटण्याइतपत शैलीत साम्य आहे.
10 Dec 2017 - 1:23 pm | पगला गजोधर
सगाजी,
पण मी म्हणतो, तुमचा शनिमाहत्म्याचा इतका अभ्यास कसा ??
10 Dec 2017 - 1:30 pm | पगला गजोधर
आणि सगाजी,
तुम्ही म्हणताय तसं कवीने, केले असेल तर, गुरू ला क्रोध येईल का ? (शनीमहात्म्यातून गुरू महिमा उचलला... )
उच्छिस्टे गुरुमहिमा अर्पिला, क्रोध येई तो गुरूला,
क्रोधे अज्ञानाच्या कृष्णविवारी, धाडी तो कवीला,
पगला भेणे चिंताक्रांत जाहला....
11 Dec 2017 - 1:14 pm | सूड
ओवी वृत्त्तात जी जी म्हणून स्तोत्र आहेत ती अशीच आहेत. पैकी तुझा शनिमाहात्म्याचा जास्त अभ्यास दिसतोय.
मराठीतलं दुर्गास्तोत्र काहीसं असच आहे.
उदाहरणादाखल काही ओळी
ऐकोनि धर्मराजाचे स्तवन
दुर्गा देवी झाली प्रसन्न
म्हणे तव शत्रू संहारुन
राज्यी स्थापीन धर्मा तू तें
तुम्ही वास करावा येथे
प्रकटो नेदि जनांते
शत्रू क्षय पावति तुमचे हातें
सुख अद्भुत तुम्हां होय
तुवां जे केले स्तोत्र पठण
हे जो करील पठण श्रवण
त्यासि सर्वदा रक्षीन
अंतर्बाह्य निज अंगे
11 Dec 2017 - 11:03 am | गबाळ्या
एकदम पौर्णिमा आणि समुद्र भरती चे उधाण डोळ्यासमोर आले. लाटांवर लाटा.. किनाऱ्यावरचे सगळे भिजून चिंब ...
8 Dec 2017 - 6:46 pm | दुर्गविहारी
हसवून हसवून मारणार तुम्ही लोक! :-)))))))) __________/\__________
9 Dec 2017 - 11:30 am | प्रचेतस
=))
अगदी अगदी.
धागा आता उघडून पाहिला आणि सार्थक झाले. =))
8 Dec 2017 - 10:35 pm | गबाळ्या
सर्व समावेशक आणि सर्वांना समान संधी या धोरणांचे आम्ही पुरस्कर्ते असल्यामुळे कवीची मते जाणून घेण्यासाठी काल आम्ही कवींकडे गेलो. सुदैवाने त्यांच्या घरापर्येंत जायची गरजच पडली नाही कारण रस्त्यातच असलेल्या शनी मंदिराच्या दारात ते दृष्टीस पडले. त्यांना गाठून मी या साऱ्या प्रकाराबद्दल सांगितले. ऐकता ऐकता त्यांना प्रसादाचा ठसका लागला. भटजींकडून तीर्थ घेऊन त्यांनी ठसका शमविला व ते काही विचारात हरवले. तेवढ्यात मंदिरात घंटा वाजली आणि त्याच बरोबर जणू त्यांच्या डोक्यातही घंटा वाजल्यासारखे ते एकदम भानावर आले आणि खिसे चाचपू लागले. दुर्दैवाने आज ते लेखणी घरीच विसरले होते. मग इकडे तिकडे शोधत त्यांनी तेथील जळती उदबत्ती उचलली, भटजींसमोरील अष्टगंधाचे पात्र उचलले. अष्टगंधामध्ये भटजींकडचेच थोडे तीर्थ ओतुन तो ओला केला. वहीसुद्धा घरीच विसरल्यामुळे शेवटी काखोटीचे शनी महात्म्यचे पुस्तक काढून टर्रर्रकन त्याचे पान फाडले. उदबत्तीचे खालचे टोक अष्टगंधामध्ये बुडवून ते त्या पानावर लिहू लागले. सर्व जण स्तब्ध होऊन पाहतच राहिले. उदबत्तीच्या खालच्या टोकातून ज्वलंत विचार उमटत होते तर वरच्या टोकातून धूर.
एका दमात लिखाण पूर्ण करून त्यांनी तो कागद माझ्या हाती दिला व म्हणाले हि आमची प्रतिक्रिया. टाका त्या तुमच्या धाग्यावर.
ती अशी :
नव्या कवितील नवकाव्याचा क्रूर कवी मी आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे
गणहि नाही, छंदहि नाही, न मी जाणी वृत्ताला
ठेचे मीटर मी जे आडवती उगाच काव्याला
मुर्दाड असे हि तुमची भूक
जिल्ब्यांचे जरी तुम्हा ना सुख
घालीत जाईन तरी रतीब
काव्यास माझ्या लाथा पडणे अगदी मला ना साहे !
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे
8 Dec 2017 - 10:55 pm | एस
विडंबकांच्या मांदियाळीत सहर्ष स्वागत. एन्ट्री जोरदार मारली आहे.
11 Dec 2017 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाकरांच्या काव्यप्रतिभेला बहुत दिनांनी इतुके धुमारे फुटलेले पाहून बहुत संतोष जाहला ! =)) =)) =))