अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.
अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास
ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास |
निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन
भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण||
त्या दिवशी सार आभाळ, एकाएकी फाटलं होत
वैरी आहे लेकाचा असं, पहिले-पहिले वाटलं होत |
वाटलं.....,वाटलं वेळ टळून गेली आणि आज पहायचही राहून गेल
उलट वेड पाखरू आज माझ्यासवे आडोशाला आल ||
(तेंव्हा तो पाऊस मला खरच आवडला होता.....)
रागावल्याचा आव आणत, मी कोण आहे? म्हणून विचारलं
थरथरणाऱ्या ओठांमधून, नकळत नाव तरी कळाल |
खिडकीपाशी आवाज ऐकून, घराचा मालक आला धावत
मग 'म' 'भ' ने निरोप समारंभ, आमच्या इज्जतीची वाट लावत ||
आठवत तुला, त्यानंतर कित्येकदा, त्याच रस्त्यावर गाठून
मी जाहीर माफी मागितली होती, पुन्हा पुन्हा भेटून |
मैत्रिणी काढू लागल्या खोडी, माझ नाव घेऊन
गाल लाल होऊ लागले, मनातल्या मनात लाजून ||
मग हातात हात, गळ्यात गळे
डोळ्यात स्वप्न, स्वप्नात झुले |
आधी चोरून सिनेमा, मग हळूहळू प्रेमपत्र
आणाभाका घेत आयुष्याच्या, घालवलेली रात्र ||
कधी धाय मोकलून रडणार आभाळ, अन् असह्य होणारा दुरावा |
अनन्य ओढीच्या, चिंब भेटींना, या पावसाचाच पुरावा ||
(तेंव्हा हा पाऊस सुद्धा माझ्यासवे गहिवरला होता खरा.....)
मग ओसरलेला पाऊस, अन् मातीत साठलेला ओलावा
चिंब भिजलेल्या कड्यावर फुललेला, रानफुलांचा ताटवा |
तुझा फुलांसाठी लाडीव हट्ट आणि मी जवळून पाहिलेलं मरण
भासमात्र पाऊल म्हणत, दोन्हीपैकी एक याव फिरून ||
एक अशीच भिजरी सांज, अन् तो नानेघाटातील डोंगर
तारुण्याचा कैफ उतरवता झाला, स्वप्नांना लागलेला पोखर |
कातीव घाटातील एक अंधारी वळण,
अन् वास्तवाच्या तीव्र झोतावर मांडलेल, माझ्या प्रेमाच सरण ||
पावसाइतक नशीब खरच, मला मिळाल नाही
कारण पावसाला आणि तुला कोणी विलग करू शकल नाही |
तुझ्या मनात पाऊस म्हणून पावसानंतर यायचीस तू
आधी नाही कळल कि हे त्रेराशिकच लागलय चुकू.....||
(आता वीज चमकली कि, तो मला हसत असल्याच जाणवत राहत.....)
पाऊस कायमचा माझा झाला, तसं आमचं Agreement सुद्धा झाल
नंतर कळल मोबदल्यात त्यान, तुलाच येथून हिरावून नेल |
Contract renewal ची अट आता, आयुष्यभर झेलावी लागतेय
अन् प्रत्येक वेळी पाऊस आला कि मला अपराध्यासारख वाटतंय ||
पश्चातापाचे अश्रू अन् उदवेगांचे आवंढे गिळतोय
चिता माझीही धगधगतेय,फक्त मी wheel-chair वर जळतोय |
घाबरू नको या मुर्दाड जिवाच, याहून वाईट होणार नाही
आधीच तुला दिल असल्याने, ऊर भरूनही काळीज मात्र फुटणार नाही ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
तरीही मी आशा सोडलेली नाही, कि तू पुन्हा माझी होशील
सखे पावसासह दामिनी होऊन, पुन्हा माझ्या घट्ट मिठीत येशील |
त्याच्यापासून तुला मी हिरावून घेईन, म्हणून तो नेहमीच घाबरतो
माझ्या आवारात आला कि, आजकाल तो केवळ रिमझिम बरसतो ||
म्हणून, म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
-मुकुंद.
प्रतिक्रिया
28 Jan 2017 - 4:28 pm | बरखा
मस्त आवडली काव्यकथा.
28 Jan 2017 - 6:05 pm | पद्मावति
अतिशय सुरेख.
शेवटचा परिच्छेद तर अप्रतिम.
28 Jan 2017 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा
@शेवटचा परिच्छेद तर अप्रतिम. >> +१
28 Jan 2017 - 7:56 pm | पराग देशमुख
पल्लवि कुलकर्नि, पद्मावति आणि आत्मबंध आपल्या प्रतिक्रियांकरिता आभार
29 Jan 2017 - 2:04 pm | पैसा
खूप सुरेख लिहिलीय!!
30 Jan 2017 - 12:05 pm | संजय क्षीरसागर
पण अनेक अनुभव एका वेळी मांडण्याच्या प्रयत्नात त्यांची दाटी होऊन कवितेचा इंपॅक्ट हरवलायं.
30 Jan 2017 - 2:43 pm | अनन्त्_यात्री
अनवट लिहिलयस ! कविता वाचून स॑पली तरी पावसाचे सपकारे बसतच होते !
30 Jan 2017 - 4:16 pm | पाटीलभाऊ
भावनांचा थोडा उद्रेक झालाय...पण तरी मस्त काव्यकथा
30 Jan 2017 - 7:11 pm | पराग देशमुख
संजय क्षीरसागर, अनन्त्_यात्री, पाटीलभाऊ...
स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार...
मी नवकवी आहे सुधारणेला चिक्कार वाव आहे.
परकाया प्रवेश करताना मनात येणारी प्रत्येक भावना शब्दात उतरवण्याचा मोह यापुढे नक्की आवरेन
7 Feb 2017 - 11:25 pm | Snow White
अतिशय सुरेख...मनाला भिडली काव्यकथा !!!