निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग
काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!
एकदा एक जण पर्वतावर चढत होता. त्याच्याजवळ एक थैली होती. थकून गेलेला तो कसाबसा एक एक पाऊल चढत होता. तेवढ्यात त्याच्याजवळून एक लहान मुलगी पुढे निघून गेली. तिने तिच्या भावाला खांद्यावर घेतलं होतं आणि तरीही ती सहज पुढे जात होती. त्याला खूप आश्चर्य वाटलं. ही कशी काय भावाचं वजन घेऊन चढतेय पण मला तर ही थैली नेता येत नाहीय! त्याने तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की माझ्यासाठी हे ओझं नाहीय, माझा भाऊ आहे. त्याचं वजन मला कसं जाणवणार? तेव्हा त्याला कळालं. ही कथा खरंच अर्थपूर्ण आहे. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीला परकं मानतो, तेव्हा ते आपल्यासाठी ओझं असतं, कर्तव्य असतं. पण जेव्हा आपण त्या गोष्टीला आपलेसं करतो, स्वत:चं मानतो, तेव्हा ती सहज आणि सोपी होते.
अगदी हीच गोष्ट पर्यावरणाबद्दलही आहे. आज आपल्याला वाटतं की, पर्यावरणाचं रक्षण करणं किती कठिण आहे; फार अवघड काम आहे असं. पण आपल्या अगदी जवळ अशी उदाहरणं असतात की ज्यांच्याकडे बघून पर्यावरणाचं रक्षण करणं इतकं कठिणही नाहीय, असा विश्वास निर्माण होतो. आज अनेक लोक मानतात आणि अनेक शेतकरीही ह्या मताचे असतात की, गाय संभाळणे, गायीचं पालन करणे आज खूप कठिण झालं आहे. आज गोपालन 'viable' नाही आहे. आज ते एक 'asset' नसून 'liability' आहे. पण थोडे डोळे उघडले तर आपल्याला दिसतं की हे अगदी अपरिहार्य नाहीय. आजसुद्धा असे भटके समुदाय (nomadic tribes) आहेत, जे स्वत: बिकट परिस्थितीत असूनही गायींचं पालन करतात. त्यांच्यासाठी गाय कोणती वस्तू नसते, तर त्यांचा स्वत:चा एक भाग असते. निसर्गाच्या जवळ असलेल्या कित्येक समुदायांमध्ये दिसतं की, त्यांना स्वत:ला खाण्यासाठी अनेक वेळा काही नसलं तरी त्यांच्याकडे जो पाहुणा येतो, तो न खाता जात नाही. माणूस तर दूर, ते कुत्र्यालाही भुकेलं ठेवत नाहीत. स्वत:कडे जे काही असेल ते त्यालाही देतात.
एक सत्य घटना आहे- एकदा एक सरकारी अधिकारी एका आदिवासी पाड्यावर आला. आदिवासी शेतकरी आपल्या घरात खळं करतात. पीकाच्या कापणीनंतर ते लगेच वापरत नाहीत. त्याचा खूप सन्मान ठेवतात. शुद्ध मनाने व शुद्ध शरीरानेच ते त्याला हात लावतात. आंघोळ केल्याशिवाय त्याला स्पर्श करत नाहीत. तिथे केलेल्या त्या खळ्यावर तो अधिकारी बूट घालून चालून गेला. त्याला हा रिवाज व त्यामागची आदर देण्याची दृष्टी माहितच नव्हती. लोक नाराज झाले. पण त्यांनी त्याला समजून घेतलं. त्याला सांगितलं. तोही चपापला. मग लोकांनी त्याचं आतिथ्य सुरू केलं. गावात आलेला पाहुणा तसाच कसा जाईल? त्याच्यासाठी चहा करायला लागले. पण एक अडचण आली. गावात दुध नव्हतं. आता पाहुण्याला बिनदुधाचा काळा चहा कसा देणार? त्यामुळे ते अगदी चिंतित झाले. दुध बाहेरून आणणं त्यांच्यासाठी कठीण होतं. तितक्यात ही चर्चा काही बायकांनी ऐकली. त्यांनी लगेचच एक गोष्ट केली. गावात एक लहान बाळाला दुध पाजणारी बाई होती. त्यांनी तिला सांगितलं आणि तिने चक्क आपलं दुध एका वाटीत काढून दिलं! त्या दुधाचा चहा त्या पाहुण्याला देण्यात आला! आपला विश्वास बसत नाही की असं होऊ शकतं. पण ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे.
आदिवासींमध्ये निसर्गाशी जोडलेले असल्यामुळे एक अतिशय संतुलित जीवनशैली दिसते. पण जर आपण शहरी प्रदूषित दृष्टी घेऊन गेलो तर कदाचित ते समजू शकणार नाही. आदिवासींमध्ये जन्मलेल्या मुलाला कुत्र्या, डोंग-या किंवा दगडू अशी नावं देतात. वरवर बघता वाटतं की, ही काही नावं आहेत का? पण नाही. आदिवासींना माहिती असतं की, जंगलात राहताना कुत्रा किती मोठा सोबती असतो- किती मोठी साथ देतो. त्याच्याविषयी आदर म्हणून मुलाला त्याचं नाव देतात. डोंगर किती मदत करतो हे माहिती असल्यामुळे मुलाला डोंग-या नाव देतात. निसर्गातील कार्य शृंखलांमध्ये प्रत्येक सृजनाचं स्वत:चं विशिष्ट स्थान आहे, महत्त्व आहे. आणि हे सर्व परस्पर- सहजीवन (Symbiosis) आहे. जर ह्या शृंखलेतला एक घटक तुटला तरी सगळ्यांची हानी होते. असो.
पर्यावरणासाठी काही करत असलेले लोक सगळीकडे असतातच. फक्त थोडीशी सजगता पाहिजे ज्यामुळे आपणही त्यांना बघू शकतो. उदाहरण म्हणून काही लोकांचा परिचय करून घेऊया.
- चिपको आंदोलनातल्या गौरी देवी ज्यांनी महिलांचं संघटन केलं आणि ७० च्या दशकामध्ये सगळ्या विरोधांना न जुमानता झाडं वाचवली. आज त्या झाडांचं महत्त्व हळु हळु आपल्याला कळत आहे.
- चेवांग नॉर्फेल असे अवलिया आहेत ज्यांनी मानवनिर्मित ग्लेशिअर्सचं तंत्र वापरलं. लदाख़मध्ये अशा मानवनिर्मित ग्लेशिअर्समुळे भूजल स्तर वाढण्यास मदत होते आहे. सिंचनाचा मौसम वाढतोय. त्यांना 'आईस मॅन' म्हंटलं जातं!
- कोईंबतूरमध्ये बस कंडक्टर असलेले एम वाय योगानंथनजी! त्यांनी गेल्या २६ वर्षांमध्ये तमिळनाडूमध्ये ३८,००० पेक्षा जास्त झाडं लावली आहेत!
आणि असे असंख्य लोक. त्यातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण नाव- आपण स्वत:! आपणही तितकेच पर्यावरण प्रेमी आहोत. पण त्याविषयी सजग नसतो. आपल्याला रोग आहे हे कळतं म्हणजेच आपल्याला आरोग्यसुद्धा माहिती आहेच. असं कोणीच नसतं ज्याने जीवनाच्या एखाद्या मुक्कामावर कडक जमिनीमधून बाहेर येणा-या अंकुरला बघितलं नसेल. असं कोणी नसतं ज्याला/ जिला काळ्या ढगांसोबत पाऊस आलेला पाहून उत्साहाने भरतं येत नाही! असं कोणी नसेल ज्याला खूप तहान लागल्यावर पाणी पिताना मिळणारं स्वर्गसुख मिळालं नसेल. त्यामुळे आपण सर्व पर्यावरण प्रेमी आहोतच! पण त्याला एक 'सेवा', एक 'कर्तव्य', एक 'ओझं' मानतो आणि त्यामुळे त्याच्याजवळ जाण्यापासून चुकतो. पण जर आपण ह्या निसर्गाला व पर्यावरणाला आपलाच विस्तार असं जाणलं तर तर पर्यावरणाचं संवर्धन असं करावं लागत नाही. ते आपोआप होतं. पुढच्या भागात ह्याविषयीच्या काही गोष्टींची चर्चा करूया.
पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ८: इस्राएलचे जलसंवर्धन
माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
31 May 2016 - 1:24 pm | एस
Sorry for English. GaMaBhaNa not working despite many attempts. :-(
Chewang Norphel baddal ajun vachayla aavadel. pubhaapra.
2 Jun 2016 - 10:19 am | मार्गी
वाचनाबद्दल धन्यवाद. इथे थोडी माहिती आहे.
3 Jun 2016 - 3:11 pm | कलंत्री
पर्यटनाऐवजी पर्यावरणाला महत्त्व दिले तर बरेच मानवनिर्मित प्रश्न सुटतील.
9 Jun 2016 - 10:58 pm | पैसा
अशा अनाम लोकांमुळे पर्यावरण थोडेफार शिल्लक आहे.