निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा
फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग
अनेक वेळेस आपण म्हणतो की एक माणूस काय करू शकणार? जो काही बदल घडवायचा असेल, तो 'एकटा/ एकटी' तर करूच शकत नाही; हे काम तर सरकारचं आहे. इ. इ. आपल्या मनात हा विचार अगदी रुजलेला आहे. पण ज्या लोकांना त्यांच्या क्षमतेची जाणीव असते, ते एकटेच खूप काही करू शकतात. त्यांची सुरुवात तर एकट्याने होते, पण हळु हळु सोबती मिळत जातात. आणि एकाने सुरू केलेलं काम विराट रूप घेतं आणि त्यामध्ये दुसरे लोकच नाही तर पशु- पक्षीसुद्धा सहभाग द्यायला येतात. मागच्या लेखात आपण भारताच्या वॉटरमॅनबद्दल चर्चा केली. ह्या लेखामध्ये भारतातल्या 'फॉरेस्ट मॅन'विषयी चर्चा करूया.
फिशिंग आदिवासी समूहातून येणारे असम राज्यातले जादव पायेंग! त्यांनी लहानपणी पर्यावरणाचा -हास होताना बघितला. प्राण्यांचा मृत्यु बघितला. त्यांना काळजी वाटली व त्यांनी सोबत असलेल्यांना विचारलं की पुढे कसं होईल? तेव्हा सोबतच्या लोकांनी सांगितलं की, काही होणार नाही, सगळं ठीक होईल. पण जादवचं समाधान झालं नाही. त्यांनी स्वत:ला प्रश्न केला की, मी ह्यासाठी काय करू शकतो? आणि त्यांना जो मार्ग दिसला त्यावर ते पुढे निघाले- एकटे. अनेक दिवस, महिने आणि वर्ष पुढे जात राहिले. बांबूचं एक रोप लावण्यापासून सुरू झालेल्या प्रवासामध्येच पुढे जाऊन १३६० एकरांचं जंगल उभं राहिलं आणि त्या जंगलामध्ये थेट बंगाली टायगर आणि गेंडे असे वन्य प्राणीही राहायला आले!
असममध्ये पूर नेहमीचाच. अशाच एका पूरानंतर जेव्हा जादव १६ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, झाडांवर पक्षी कमी येत आहेत. सापही मरत आहेत. अशावेळी परिस्थिती आधीसारखी करण्याचा एकच मार्ग होता- ह्या पशु- पक्ष्यांचं घर पुन: उभं करणे. त्यासाठी ते वन विभागाकडे गेले. त्या लोकांनी त्यांनाच झाडं लावायला सांगितली. हे सूत्र घेऊन त्यांनी आपलं जीवन त्याला अर्पण केलं. त्यांनी ब्रह्मपुत्र नदाजवळ एक जागा बघितली आणि तिथे रोपं लावायला सुरुवात केली. रोज तिथे जाऊन रोपं लावणं सुरू केलं. हा क्रम तीस वर्षं सुरू राहिला! पण सुरुवातीला लगेचच जेव्हा रोपांची संख्या वाढली, तेव्हा त्यांना पाणी देण्याचा प्रश्न आला. पारंपारिक हुशारी व कौशल्याच्या आधारे त्यांनी त्याचं सोल्युशन शोधलं. रोपांच्यावर एक लाकडी प्लॅटफॉर्म लावला आणि त्यावर मडकी ठेवली आणि प्रत्येक मडक्यात छोट छिद्र केलं ज्यामुळे अनेक दिवस पाणी टिकत राहील. हे वर्ष होतं १९७९|
पुढच्या वर्षी त्यांनी असमच्या सामाजिक वनीकरणाच्या योजनेत मजूर म्हणून काम सुरू केलं. योजना संपेपर्यंत ते तिथे मजूर म्हणून काम करत राहिले आणि इतरांपेक्षा जास्त रोप लावत राहिले. जेव्हा योजना थांबली, तेव्हाही त्यांनी काम सुरू ठेवलं. ते तिथेच राहू लागले. काम पुढे सुरू राहिलं. पोटापान्यासाठी त्यांनी दुग्घ व्यवसाय सुरू केला. झाडांसोबत व प्राण्यांसोबत त्यांचा संसार पुढे जात राहिला. कित्येक वर्षांपर्यंत बाहेरच्या जगात कोणालाही ह्या कामाची माहिती झाली नव्हती. एकदा जंगली हत्तींना पकडण्यासाठी असम सरकारचे फॉरेस्ट गार्ड हत्तींच्या पाठलागावर होते. जेव्हा त्यांनी त्या हत्तींना एका दाट जंगलात जाताना बघितलं, तेव्हा ते थक्क झाले. तेव्हा कुठे जादव ह्यांनी केलेलं काम इतकं मोठं झालं आहे, हे बाहेरच्या जगाला कळालं. हळु हळु देशामध्ये आणि विदेशातही ह्या कामाची माहिती पोहचली.
बघितलं तर काम साधंच आहे- झाडं लावणे व त्यांची काळजी घेणं. त्यासाठी वेगळं कौशल्यसुद्धा आवश्यक नाही. जमिनीशी जोडलेला प्रत्येक माणूस हे जाणतोच. पण सामान्य दिसणारं हे काम मोठं विराट झालं. एक पाऊल उचलून कोणी कुठे पोहचत नाही. पण जेव्हा एकाचे शंभर, शंभरचे हजार आणि हजारची लाख पावलं होतात, तेव्हा हेच होतं-
हिम्मत से जो कोई चले
धरती हिले कदमों तले
क्या दूरियाँ क्या फासले
मन्जिल लगे आ के गले . . .
तेव्हा कोणतंही उद्दिष्ट पूर्ण होतंच. पण हा प्रवास अर्थातच सरळ नसतो. अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. सरकार आणि समाजासोबतही. अगदी जादवांच्या स्वत:च्या आदिवासी समाजाचाही विरोध त्यांना सहन करावा लागला. ज्या हत्तींच्या कळपामुळे सरकारला ह्या जंगलाची माहिती कळाली, त्या कळपाला खूप काळानंतर इतकं घनदाट जंगल मिळालं होतं. त्यामुळे त्यांनी तिथे थोडी नासधूस केली. त्यासाठी स्थानिक आदिवासींना जवाबदार ठरवलं गेलं आणि ते लोग जादवांवर रागवले. पण हळु हळु सगळं स्थिर झालं.
An illustration of Jadav Payeng, from the biographical children's book Jadav and the Tree-Place by Vinayak Varma
आपण जेव्हा असं काही बघतो, तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. कारण आपण स्वत:ला अशा व्यक्तीच्या समोर ठेवून बघतो तेव्हा आपलं मन म्हणतं की, आपण काही असलं करू शकत नाही. नक्कीच त्यांनी खूप मोठा त्याग केला असला पाहिजे, ते नक्कीच कोणीतरी महात्मा किंवा महापुरुष असणार. आपण कुठे त्यांच्यापुढे. आपण तर असे. पण असा माणूसही आपल्यासारखाच माणूस असतो. फक्त फरक इतकाच असतो की, तो एकाच दिशेने पुढे जात राहतो. समस्या त्याला थांबवू शकत नाहीत. थांबण्याची शंभर कारणं असतानाही तो पुढे जाण्यासाठीच्या एका कारणामुळे पुढे जात राहतो. जादवांना समस्याही खूप आल्या. पण त्यांची जीवनशैली अशी होती की, ते निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन राहिले. तथा कथित विकासाच्या शहरी जीवनशैलीपासून ते अजूनही लांबच आहेत. आणि जो कोणी निसर्गाच्या जवळ जातो, त्याच्यावर निसर्गाची कृपा होतच असते. त्याला खूप काही मिळतं. तिथे मानव निसर्गाचा एक सदस्य बनतो, त्यामुळे त्याचा संसारही निसर्गच चालवतो. त्याला स्वत:साठी वेगळा संघर्ष करावा लागत नाही. म्हणून जादव स्वत:चं घर चालवण्यासोबतच एका पूर्ण जंगलाचे पालक होऊ शकले. आणि आता ते अन्य कित्येक जंगलांचं संवर्धनही करत आहेत.
प्रसिद्धी मिळाल्यानंतर आजही ते माणूस सरकारी मदत घेऊ इच्छित नाहीत. घेऊ तरी कसे शकतील? निसर्गाच्या जवळ राहिल्यामुळे इतकं काही मिळतं की, मागण्याची सवयही राहात नाही. उलट देण्याचा स्वभाव बनतो. झाडं असतील, पशू असतील, मानव असेल किंवा पाणी असेल, आपण ज्या माध्यमातून निसर्गाला काही देऊ लागतो, तितक्याच तीव्रतेने आपल्यालाही अनेक प्रकारे मिळायला सुरुवात होते. तेव्हा न मागता मिळतं. आणि जे न मागता दिलं जातं, त्याची गुणवत्ता वेगळीच असते. अशाच काही अन्य पर्यावरणप्रेमींची चर्चा पुढील भागात करूया.
जादव पायेंग ह्यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर फक्त गूगल करा.
पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी
माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
26 May 2016 - 11:52 pm | एस
चैतन्य गौरांगप्रभू यांच्या पायेंग यांच्यावरील एका लेखाची आठवण झाली. सतत आपल्या ध्येय्याचा पाठलाग चिकाटीने करत राहणे हे अशा यशासाठी आवश्यक असते हे अधोरेखित होते. पुभाप्र.
27 May 2016 - 2:00 pm | अभिरुप
या माणसाने जमिनीला भुसभुशीत करणार्या एक प्रकारच्या लाल जंगली मुंग्या हाताने वाहून नेल्या आहेत असे ऐकले आहे.त्यांच्या कार्याला सलाम.
27 May 2016 - 3:48 pm | यशोधरा
पायेंग यांच्यावरील मिपावर येऊन गेलेला लेख http://www.misalpav.com/node/21469
28 May 2016 - 10:32 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!
28 May 2016 - 12:04 pm | मुक्त विहारि
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख...
28 May 2016 - 12:45 pm | पैसा
आपल्याला जमेल तितकी झाडे लावायची, निदान लाकडी फर्निचर, कागद तरी साक्षेपाने वापरावेत. एवढ्याने बरेच साध्य होईल.